आजी माजी आमदारांची कोविड सेंटरवर राजकीय दंगल.! हे उभारले की मी.! कार्यकर्त्यांच्या भोंगळ कारभाराने श्रेय्यवाद बाधित.!
आमच्यातील विसंगती आम्हाला नडली म्हणून आमचा पंढरपुरात पराभव झाला. जयंत पाटलांचे हेच वाक्य आज दिवसभर कानाभोवती गुंजत होते. कारण, अकोले तालुक्यातील आजी-माजी आमदार यांच्यातील मतभेद आणि कार्यकर्त्यांची एकमेकांवर होणारी शब्दफेक यात आज किती विसंगती दिसली ती फार खेदजनक होती. यात या दोघांचे काही नुकसान होणार नाही. मात्र, जनतेचा फार मोठा पराभव होईल आणि पुन्हा तालुक्यातील निरागस मानसांच्या मृत्युचे स्टेटस सोशल मीडियावर पहायला मिळेल. त्यामुळे, जेथे यम उभा राहतो त्या दारात आज प्रचंड मतभेद आणि मनभेदाचे राजकारण पहायला मिळाले. दुर्दैवाने या सर्व राजकीय केंद्रबिंदू असणार्या स्टंण्टबाजीला जाणकार नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील राजकीय स्थैर्यासाठी खतपाणी घातले ही खेदाची बाब आहे. यात माजी आमदार यांनी जे काही वक्तव्य केले त्यावर तालुक्यातील जनतेने नाराजी व्यक्त केली आहे. त्यातील महत्वाचे म्हणजे, कोणीतरी त्यांचे कान भरविले की, आमदार म्हणाले मला फित कापू दिली नाही तर मी ऑक्सिजन देणार नाही. हा आरोप कितपत योग्य आहे त्याची शहनिशा त्यांनी करायला पाहिजे, तर केवळ श्रेयवादापोटी त्यांना अंधारात ठेऊन त्यांच्याच कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची रुपरेषा काय होती हे त्यांनी सांगितले नाही त्यामुळे ऐनवेळी हा इतका मोठा राडा उभा राहिला व राजकीय शाब्दीक दंगल घडली. या श्रेय्यवादाची चर्चा तालुकाभर रंगली खरी, मात्र यात पराचा कावळा करुन दोन्ही गटांनी तालुक्याला वेड्यात काढण्याचे काम नक्की केले.
खरंतर अकोले तालुक्याला पुरोगामी चळवळीचा इतिहास आहे. मात्र, दुर्दैवाने येथे चळवळी स्वत:च्या स्वार्थापोटी वापरण्याची प्रथा पडली आहे. तर यापुर्वी गेली 40 वर्षे अशोक भांगरे वगळता कधी पिचडांवर प्रकर्षाने प्रहार करण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. तो विरोध देखील सलग पाच वर्षे कधी रौद्र रुप धारण करु शकला नाही. तर तो अती खालच्या पातळीवर देखील गेला नाही. आता मात्र, गेल्या 40 वर्षानंतर डॉ. लहामटे यांच्या रुपाने लोकसहभागाचा आमदार तर मिळालाच, मात्र जनता देखील पिचडांच्या विरोधात गेल्यामुळे त्यांची अस्वस्थता पहायला मिळत आहे. खरंतर लहामटे हे देखील संयमी राजकारणी नाहीत. त्यामुळे, त्यांच्या कृतीचा आणि शब्दांचा तोल गेल्यामुळे त्यांना नेहमी टिकेचा धनी व्हावे लागले आहे. तर संघटन कौशल्यात देखील अनेक नको त्या नेत्यांना सोबत घेऊन फिरल्यामुळे, त्यांच्यातील सामाजिक पातळी फारशी काही विकसित झाली नसल्याचे बोलले जाते. परंतु जनतेत त्यांच्या लोकप्रियतेचा ठसा मात्र कायम ठिकून आहे. राग आणि संघटन कौशल्य वगळता भेटीगांठींच्या बाबत त्यांनी दिवंगत यशवंतराव भांगरे या नेतृत्वाचे गुण अंगिकारल्याचे मत बुजुर्गांनी व्यक्त केले आहे.
आता हा प्रचंड मांडण्याचे कारण असे की, आज सुगाव खु येथे जे काही वास्तव घडले, त्यासाठी त्यांचा स्वाभाव देखील कारणीभूत आहे. खरंतर जेव्हा त्यांना कोविड सेंटरवर बोलविण्यात आले होते तेव्हा तो वेळ 9 वाजण्याचा होता. डॉक्टर त्यांच्या वेळेत आले होते. मात्र, माजी आमदार तोवर दुधसंघात बसून होते. तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणालाही न सांगता रात्रीच वेगळे नियोजन करून तालुक्याची अस्मिता असणारे निवृत्ती महाराज देशमुख यांना बोलविले तर त्यांच्या सोबत पद्मश्री राहिबाई पोपेरे यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. आता याबाबत माजी आमदारांना कल्पना होती, मात्र विद्यमान आमदारांना माहित नव्हेत. त्यामुळे अचानक त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी अर्धा तास त्यांची वाट पाहिली. तोवर महाराज व पोपेरे यांना येण्यासाठी अर्धा ते एक तास लागणार होता. ते आल्यानंतर वैभव पिचड तेथे येऊन सोबत उद्घाटन करणार होते. तरी देखील त्यांनी थांबण्याचे नियोजन केले. मात्र, त्याच कोविड सेंटरवर सतराशे साठ गृप झाले होते. ज्याला त्याला मोठेपणा पाहिजे होता. त्यामुळे एका गटाने डॉक्टरांना अग्रह करुन रिबन काटण्याचा प्रयत्न केला. आता डॉ. लहामटे यांना एका ठिकाणी अमरण उपोषण साडण्यासाठी जायचे होते. त्यामुळे, त्यांनी होकार दर्शविला आणि ते दरवाजात आले.
आता डॉ. किरण लहामटे यांच्या हास्ते उद्घाटन होणार हे लक्षात आल्यानंतर पिचड समर्थकाने ज्या फित कापण्याच्या कात्री होत्या त्या दोन्ही लपून ठेवल्या. त्यावेळी, डॉक्टर म्हणाले की, आरे कात्री लपून काय होणार आहे? या केविड सेंटरला मीच ऑक्सिजन पुरवठा देणार आहे आणि याच शब्दाचा पुढे विपर्यास करण्यात आला. या शब्दाचे रुपांतर असे करण्या माजी आमदारांपर्यंत पोहचविण्यात आले की, फित कापू दिली नाही तर मी ऑक्सिजन देणार नाही. त्यामुळे, पराचा कावळा झाला आणि तेव्हापासून सुरू झाले राजकारण.! त्यानंतर डॉ. लहामटे यांनी उद्घाटन केले आणि त्यांनी आतील व्यवस्था पाहून ते तसेच मागिल दाराने मार्गस्त झाले. त्यानंतर माजी आमदार तेथे आले आणि त्यांच्या समर्थकांशी चर्चा झाली आणि कोविड सेंटरचा काही क्षणात राजकीय आखाडा तयार झाला. हे वातावरण इतके पेटले की, एकीकडे राष्ट्रवादीचा गट तर दुसरीकडे भाजपचा गट, या दोघांमध्ये प्रशासनाचे पुरती गळचेपी झाल्याचे पहायला मिळाले.
खरंतर यात चुक कोणाची? असा प्रश्न उपस्थित होतो. तर जे कोणी शिक्षक आणि सर्व पक्षिय नेते होते. यांनी या कार्यक्रमाचे नियोजन आखणे गरजेचे होते. कारण, इतके सगळे करुन देखील इतक्या मोठ्या कार्यक्रमाला गालबोट लागले हे दुर्दैव आहे. जर या नेत्यांनी आजी माजी-आमदारांमधील वैचारिक मतभेद दुर करुन एक कार्यक्रम पत्रिका केली असती, त्यात शिक्षकांचा एक पाहुणा, प्रशासनाचा एक पाहुणा आणि राहिबाई किंवा निवृत्ती महाराज यांच्या हस्ते हा कार्यक्रम करुन मदत दिलेल्यांची नावे आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती दर्शविली असती तर अगदी शांततेत हा कार्यक्रम पार पडला असता. यात सर्वात महत्वाचे म्हणजे, जर डॉ. लहामटे तेथे येणार असे पत्रिकेत जरी वैभव पिचड यांनी वाचले असते तर त्यांनी कोविड सेंटरला नंतर भेट दिली असती. असा त्यांचा स्वभाव आहे. मात्र, दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी मोठेपणा मिरविण्याच्या नादात कार्यक्रमाचा बट्याबोळ केला हेच खरे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
जर तालुका एकीकडे मृत्यू शय्येवर आहे आणि दुसरीकडे राजकारणाचे फड कोविड सेंटरवर भरत असतील तर या तालुक्याला पुरोगामी विचारांचे का म्हणावे? म्हणून तर मधुकर नवले यांनी मोठी मदत करुन देखील ते तेथे आले नाही आणि सगळ्यांच्या अग्रहखातर गायकर साहेब आले तर त्यांनी तेथे जास्तकाळ आपला वेळ वाया घातला नाही. म्हणजे त्यांनी एका हाताने दान केले आणि दुसर्या वाटेने ते निघून गेले. या अपरोक्त येथे भलतेच राजकारण पेटले. अर्थात हे सर्व पुर्वनियोजित होते असे अनेकांचे मत आहे. काही असले तरी वैभव पिचड यांनी जरी आज आपला रोष व्यक्त केला तरी त्यांनी जे काही ऐकले ते नक्कीच हलक्या नाकाचे होते. त्यामुळे, नेत्यांना उभे करणारे कार्यकर्ते हवे स्वत: उभे राहण्यासाठी नेत्याला पाडणारे नको.! असा सुर आजच्या कार्यक्रमातून बाहेर पडू लागला आहे. या कार्यक्रमातून कधी न तापणारा नेता पोटतिडकीने आक्रोष व्यक्त करताना दिसला. हे जनतेला फार वाईट वाटले. कारण, हे कोविड सेंटर उभारण्यात त्यांची फार मोठा वाटा दिसून आला. यात डोक्यावर उन घेत कोविड सेंटर उभे करण्यासाठी पाठपुरावा करणारे नितीन गोडसे व मधुभाऊ हे व्यक्तीमत्व देखील कोठे झळकले नाही ती देखील एक खंत अनेकांनी बोलून दाखविली.
डॉ. किरण लहामटे हे लोकप्रतिनिधी झाले म्हणून काय ते तालुक्याचे बाप झाले काय? असा तडाखेबाज सवाल पिचडांनी उभा केला. तर ते ऑक्सिजन पुरवणार असले तरी ते काय घरातून देणार नाही.! त्यासाठी आपण कर देतो आणि तो शासनाकडे जमा करतो त्यातून हा निधी उभा राहतो. त्यामुळे, ते काही उपकार करीत नाहीत. असाच काहीसा सवाल त्यांनी केला. यावर मात्र सगळेच समहत आहोत. मात्र, सुगावची इमारत देखील ते आमदार असताना घरातून दिली नाही, त्यासाठी आम्ही देखील अडिच कोटींचा कर भरुन ती उभी झाली आहे हे देखील त्यांनी विसरु नये असा पलटवर त्यांच्यावर सोशल मीडियातून करण्यात आला. यात पिचड यांनी मांडलेल्या मुद्दयाला मात्र चांगलीच सहानुभूती मिळाली. ती म्हणजे आमदार किंवा प्रशासन जे काही 20 ते 40 रेमडिसीवीर अकोल्यातील डॉक्टांना देतात तेच रेमडिसीवीर हे डॉक्टर लोक त्यांच्या बिलात 20 हजार रुपयांना लावतात. याला खतपाणी कोणाचे आहे? म्हणजे घ्यायचे सरकार कडून आणि द्यायचे डॉक्टरांना आणि पेशन्टकडून पैसा उकळायचा अशा प्रकारचे धंदे अकोल्यात सुरू आहे. ही गंभीर गोष्ट आमदारांना दिसत नाही का? यावर जनतेने फार आक्रमक प्रतिक्रीया दिल्याचे पहायला मिळाले. एकंदर एकीकडे जनता जगण्यासाठी झटत आहे तर दुसरीकडे राजकारणी श्रेय्यवादासाठी झटत आहेत हे चित्र तालुक्यातील जाणकार नेत्यांना फार खेदात्मक वाटली. त्यानंतर देखील याच कार्यक्रमाहून राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुपली होती. आता हीच मैदानी लढाई येणार्या काळात आता सोशल मीडियातून उभी राहणार आहे. आता फक्त देखते जाव.!