भाजपकडून महाविकास आघाडीचा कुच्चामोड.! सत्ता, लोकशाहीपुढे शुन्य.! तर अकोल्यात भाजप आमदार, काँग्रेस फक्त पाठींब्यापुरती.!
सार्वभौम (अकोले) :-
पंढरपूर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुक झाली आणि तेथे एक नवा इतिहासच रचला गेला आहे. असे इतिहासात पहिल्यांदाच झाले असावे की, तीन बलाढ्य पक्ष आणि ते देखील विद्यमान सरकार, त्यांच्या नाकावर टिच्चून विरोधी पक्षाच्या भाजपने आपला उमेदवार पंढरपूर येथून निवडून आणला आहे. त्यामुळे, खरोखर महाविकास आघाडीने आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तर जयंत पाटील यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादीच्या पराभवाचे कारण जर तीन पक्षातील विसंवाद असेल तर येणार्या काळात महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढणार नाही. यावर बाकी आजच शिक्कामुर्तब झाले आहे. कारण, राष्ट्रवादीला पाडण्यात काँग्रेस कमी पडली तर शिवसेनेने नक्की कोणाला साथ दिली? जर तिन्ही पक्ष सोबत होते तर महाविकास आघाडीचा उमेदवार पडला तरी कसा? या सगळ्यांचा उहापोह नक्कीच झाला पाहिजे. याचा मर्म इतकाच की, जनता आता सत्तेकडे नव्हे तर सत्याकडे पाहून मतदान करते असे म्हटल्यास काही वावघे ठरणार नाही. तर दुसरीकडे पंश्चिम बंगाल येथे भाजपच्या पाघड्या टाकून तृणमुल काँग्रेस सत्तेवर विराजमान झाले आहे. तेथे काँग्रेसचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे पहायला मिळाले आहे.
सन 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यात पंढरपूर मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांचा दणदणीत विजय झाला होता. मात्र, दुर्दैवाना त्यांना अल्पायुष्य लाभले आणि त्यानंतर ही जागा रिक्त झाली. संविधानाच्या तत्वानुरुप येथे काही दिवसात पोटनिवडणुक लागली आणि राष्ट्रवादी व भाजप यांच्या लढतीवर शिक्कामुर्तब झाला. आता सरळ-सरळ गणित होते की, काही जिल्ह्यांत महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडीने एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यामुळे, येथे वेगळे काही अपेक्षित नव्हते. ही तीन प्रकारचे तिघे एकत्र येऊन कमळला अस्तव्यस्त करतील यात तिळमात्र शंका नव्हती. जनतेला देखील तेच अपेक्षित होते, एव्हाना भल्याभल्या नेत्यांना आणि राजकीय विश्लेषकांना देखील हेच वाटत होते आणि का न वाटावे? कारण, राज्यात सत्ता यांचीच आहे. त्यात सत्ताधारी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, त्यामुळे विरोधी बाकावर बसलेल्या भाजपला लोकं का मत देतील? असा उघड-उघड सवाल होता.
आता यात झालं काय? एकतर ही अनपेक्षित महाविकास आघाडी होऊन बसली आहे. हा केवळ सत्तेसाठी रचलेला डाव होता. यात अनेक तळागाळातील नेते कार्यकर्ते प्रचंड नाराज झालेले होते. म्हणजे उभी हयात ज्यांच्या विरोधात घोषणा केल्या, अनेकांना अंगावर घेतले आज त्यांच्याच सोबत मनात नसताना तोंड मुरडून अन पाय दुमडून मांडीला मांडी लावून काम करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे, कार्यकर्त्यांच्या मनात संताप नसला तरी नाराजी होती. त्याचे प्रतिबिंब या निवडणुकीतून पहायला मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्था यांची हुकूमत, बेरोजगारी आणि पाणी हे प्रश्न सोबत होतेच. मात्र, शिवसेना व काँग्रेस यांनी किती प्रचार आणि अपप्रचार केला आणि त्याचा फायदा काय झाला? याचे खर्या अर्थाने आत्मचिंतन केले पाहिजे. कारण, इतकी सगळी ताकद आणि सत्ता, पैसा, प्रतिष्ठा असून देखील महाविकास आघाडीचा उमेदवार पडतो. या इतकी शरमेची बाब कोणती नाही. तर प्रत्येकवेळी पावसात भिजून देखील निवडणुका जिंकल्या जात नाही. याचे प्रमाण जनतेने दाखवून दिले आहे.
खरंतर 2019 च्या निवडणुकीने अनेकांचा मी आणि ग धुळीस मिळाला होता. जसे आज पश्चिम बंगाल येथे ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपने ममता बॅनर्जी यांच्या गोटातील अनेक बड्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतले. त्याचा तोटा असा झाला की, हे सर्व नेते गेल्यामुळे, भाजपला तेथे पराभवाला सामोरे जावे लागले. कारण, प्रत्येकवेळी त्याच त्याच चाली यशस्वी होतील असे नाही. भाजपने महाराष्ट्रात देखील ऐन निवडणुकीच्या वेळी असेच केले होते. अखेर झाले काय! तर 104 आमदार असून देखील सत्तेपासून दुर रहावे लागले. अर्थात फार अतातईपणा योग्य नाही. तरी देखील जनतेचा कौल अजून देखील भाजपला असल्याचे दिसून येेत आहे. याचे उत्तम उदा. म्हणजे एकीकडे भाजप आणि दुसरीकडे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस अशी तिघे. तरी देखील राज्यात हवा असणार्या राष्ट्रवादीला भराभवाला सामोरे जावे लागले आहे. ही खरोखर आत्मचिंतनाची गरज आहे.
या सगळ्यांमध्ये एक मात्र नक्की की, शिवसेनेचे तळागाळातील लोक आजही काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रास्तापित नेत्यांशी मिळते जुळते घेत नाही. त्यामुळे, महाराष्ट्रात अशा पद्धतीने महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणे आता अशक्य वाटू लागले आहे. तर गेली कित्तेक दशके ज्या काँग्रेसने देशावर अधिराज्य गाजविले तो बलाढ्य काँग्रेस पक्ष आज फक्त पाठींबा देण्यापुरता उरला आहे. अशा प्रकारची टिका होताना दिसते आहे. अर्थात यात काही खोटे वाटत नाही. कारण, आज पुर्ण देशात फक्त तीन राज्यात (राज्यस्थान, पंजाब, छत्तीसगड) काँग्रेसची सत्ता आहे. 2014 पुर्वी यांची 13 राज्यात एकहाती सत्ता होती. तर आज महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी केवळ काँग्रेसची भुमिका पाठींबा देण्यापुरती आहे. त्यामुळे, या पक्षाने देखील आत्मचिंतन केले पाहिजे.
वास्तवत: पंढरपुरचा निकाल हा प्रवाहाच्या विरुद्ध वाटत असला तरी तो लोकशाहीतील जनतेचा कौल आहे. राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांना पराभूत करुन (मते 1 लाख 5 हजार 717 ) भाजपचे समाधान अवताडे (मते 1 लाख 9 हजार 450) विजयी झाले आहेत. येथे भलेही काट्याची टक्कर झाली असली तरी 3 हजार 733 मतांनी का होईना पण विजय आणि पराजयावर शिक्काबुर्तब झाले आहे. आता लक्ष या गोष्टीकडे लागले आहे की, ज्या देवेंद्र फडणविस यांनी आश्वासन दिले होते की, मला येथे विजय मिळवून द्या, यांचा मी करेक्ट कार्यक्रम करतो. आता हा करेक्ट कार्यक्रम काय आहे? याबाबत महाविकास आघाडीला फार चिंत पडली आहे. कारण, कोणती पहाट काय घेऊन येईल आणि कोणत्या रात्रीत काय खेळ होईल हे सांगता येत नाही. खरंतर जयंत पाटील यांच्या शब्दाला आज धार राहिली नाही. ती अशी की, आमच्या टप्प्यात आले की आम्ही कार्यक्रम करतोच. आता भाजपने त्यांचाच कार्यक्रम केला आहे. तर भाजप आमचा काय करेक्ट कार्यक्रम करतो यासाठी ते चिंतेत आहेत.
आता एक मात्र निच्छित झालं की, सत्ता आणि पैसा, पत प्रतिष्ठा हे नेत्यांसाठी असते. त्याचा जनतेवर काही एक परिणाम होत नाही हेच या पोटनिवडणुकीने दाखवून दिले आहे. तर अकोले तालुक्यात देखील या गोष्टीची प्रखर्शाने फार वेगळी चर्चा सुरू झाली आहे. कारण, येथे पुरोगामीत्वाचे झेंडे नाचविणारे लोक आज डोक्याला हात लावून बसले आहेत. तर माजी आमदार वैभव पिचड यांच्या समर्थनांमध्ये एक नवे चैतन्य संचारले आहे. येथे आता भाजपचा देखील आमदार होऊ शकतो. याची शास्वती येऊ लागली आहे. कारण, कितीही नेते एकत्र झाले तरी जनता जनार्दन असते ती योग्य तो माणूस पाहून मतदान करीत असते याचा प्रत्येय पंढरपुरात आला आहे. खरंतर वैभव पिचड यांनी देखील समाधान अवताडे यांचा प्रचार केले होता. त्यामुळे, भाजपची रणनिती काय असते हे त्यांनी अभ्यासले आहे. त्यामुळे, अकोल्यात भलेही भाजप म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून त्यांना विजय मिळविण्यात तशी अडचण येणार नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत.