मयताच्या श्रद्धांजलीचा फोटो रस्त्यावर लावला म्हणून काठ्या कत्तीने मारहाण.! 25 जणांवर गुन्हे, घर कोविड पॉझिटीव्ह असल्याचा राग.! घरावर दगडफेक.!
सार्वभौम (संगमनेर):
मयत आजीचा दशक्रियाचा फोटो रस्त्याच्या कडेला लावत असल्याचा राग आरोपीला आल्याने काठ्या, लोखंडी पाईप, लोखंडी कत्ती घेऊन घरात घुसून आई, वडील, भावाला लथाबुक्यांनी मारहाण केली. तर तुमच्या घरातील सर्व लोक कोरोना पॉझिटिव्ह आहे. तुम्ही जास्त लोक जमा करू नका असे म्हणताच आरोपीने काठीने फिर्यादीचा भाचा व फिर्यादीस लथाबुक्यांनी मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरातील एकलव्यनगर अकोले नाका येथे रविवार दि. 2 मे रोजी 6 वाजण्याच्या सुमारास घडला. तर या किरकोळ कारणावरून दोन गट एकमेकांना भिडले, त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी 25 जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, योगेश मनोहर सुर्यवंशी (रा. अकोले नाका, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत काही दिवसांपुर्वी फिर्यादी यांची आजी मयत झाली. त्यांचा दशक्रियाविधी होता. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फोटो लावत असताना आरोपी यांना राग आला. हा फोटो रस्त्याच्या कडेला का लावला यावरून फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाचीचे रूपांतर हळूहळू वादात झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी यांनी काठ्या, लोखंडी पाईप, लोखंडी कत्ती हे सर्व घेऊन फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीचे वडील मनोहर सुर्यवंशी व आई अरुणा सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी या सर्वांना घरामध्ये घुसुन लथाबुक्यांनी मारहाण केली तर नंतर शिवीगाळ करून फिर्यादीच्या घरावर दगडफेक केली. फिर्यादीच्या घरासमोर असलेल्या मोटार सायकलचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी योगेश सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून आरोपी अतुल सूर्यवंशी, सिद्धार्थ सूर्यवंशी, परिगा सुर्यवंशी, आकाश माळी, मयुर माळी, मेघनाथ सूर्यवंशी, विघ्नेश सूर्यवंशी, संपत सुर्यवंशी, उज्वला सुर्यवंशी, मथुरा सूर्यवंशी, पुनम माळी, आदित्य सुर्यवंशी, मीना माळी, रूपा माळी, अनिता माळी, गणेश माळी सर्व राहणार अकोले नाका, ता. संगमनेर या सर्वांवर विविध कलमान्वये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, परीगा सहादु सूर्यवंशी (रा. अकोले नाका ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादी यांचा भाचा आदित्य हा आरोपी यांना म्हणाला की, तुमच्या घरातील सर्व लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तुम्ही जास्त लोकसंख्या जमा करू नका. असे म्हणल्याने आरोपी यांना राग अनावर झाला. आरोपी यांनी मागेपुढे न पाहता हातामध्ये काठी घेऊन फिर्यादी व फिर्यादीचा भाचा आदित्य व सिद्धेश यांना मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच न थांबता एका महिलेला देखील मारहाण केली. पुनम माळी हिस लथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. यावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी परीगा सहादु सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून आरोपी योगेश सूर्यवंशी, सागर सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, विनोद सूर्यवंशी, उमेश सूर्यवंशी, शिवानी सूर्यवंशी, शोभा सूर्यवंशी, अरुणा सूर्यवंशी, मनोहर सूर्यवंशी सर्व राहणार अकोले नाका ता. संगमनेर या सर्वांवर विविध कलमान्वये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, संगमनेरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. संगमनेरमध्ये 11 वाजल्यानंतर सामान्य माणसाला घराबाहेर पडणे अवघड आहे. पण, काहींना कोरोनाचा विसर पडला आहे. आणि काही एकमेकांचा कड काढण्यात व्यस्त झाले आहे. त्यामुळे, शहर हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाले आहे. त्यामुळे, गुन्हेगारांना खाकीचा धाक दाखवून सुता सारखे सरळ करायला हवे. अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.