तालुक्याला दत्तक घेणारे हे दोन सुपुत्र.! राजकारणा पलिकडची मदत आणि सामाजिक उत्तरदायित्व!

- निलेश गायकर

सार्वभौम (अकोले) :-
               अकोले तालुक्यातील राजकीय परंपरा बदलत चालली आहे. त्यात अनेक नेत्यांची कोंडी झालेली पहायला मिळाली. एकीकडे राजकारण, दुसरीकडे निष्ठा आणि तिसरीकडे सामाजिक बांधिलकी. या सगळ्यांची शिदोरी जर कोणाला बांधता आली असेल तर ते सहकारमहर्षी सिताराम पाटील गायकर आणि शिक्षणमहर्षी मधुभाऊ नवले हे आहेत. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी कोणता पक्ष किंवा नेता सोडला म्हणून कोणावर सडकून टिका टिपण्णी करायची आणि प्रसिद्धी झोतात यायचे. हा या नेत्यांचा पिंड मुळीच नाही. तर गरज पडेल तेथे उभे रहायचे आणि अगदी कर्णाच्या अंत:करणासारखे दान करत आपले सामाजिक कर्म पार पाडायचे. हीच यांची कार्यशौली. त्यामुळे, गायकर पाटील आणि मधुभाऊ यांनी आज कोरोनाच्या काळात लाखो रुपयांची मदत देऊन तालुक्याला दत्तक घेतले आहे. त्यामुळे, त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहे. तुमचे हे पडत्या काळातील सत्कर्म ही जनता काळजात जतन करुन ठेवेल यात तिळमात्र शंका नाही.
         देशात कोरोनाची दुसरी लाट आली आणि बोलबोल करता प्रत्येक घरात पॉझिटीव्ह रुग्ण मिळून येऊ लागले. असेच जर गावं बाधित होऊ लागले तर समाज भेदरुन जाईल, त्यामुळे, त्यांच्यावरील संकट टाळण्यासाठी गायकर साहेबांनी प्रवरा परिसरात ज्या-ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ती गावे सॅनिटाईझ करण्याचा पहिला अजेंडा हाती घेतला. काही झाले तरी, माझ्या बहुजन समाजाला आधार मिळाला पाहिजे. या तत्वाला अनुसरुन त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा सुरु केली. जसजसा कोरोना वाडीवस्तीवर जाऊन पोहचला तसतसे गोरगरिब उपासपोटी त्याच्याशी झुंज देत होते. कोणी भुकेने तर कोणी उपचारा आभावी देहत्याग करत होते. या पडत्या काळात गायकर साहेबांनी अनेक गावांत, वाडी वस्तीवर तथा गरजुंना अन्नधान्य, किराणा, भाजीपाला देण्याचे काम सुरु केले. अन्य व्यक्तींप्रमाणे कोठे फोटो सेशन करण्यात त्यांनी कधी धन्यता मानली नाही. कारण, या हाताने केलेले दान त्या हाताला माहित नसावे. त्याची दखल आपोआप होते हीच त्यांची धारणा आहे.
            खरंतर प्रत्येक कष्टकऱ्याला त्याच्या बुद्धीनुरुप व घामाचे दाम मिळावे, यासाठी त्यांनी अगदी त्यांच्या उसतोडी कामापासून तर आजवरील राजकीय जिवणात देखील हेच तत्व अंगिकारले आहेत. तसा मोबदला जर कधी मिळाला नाही. तर, त्यांच्या मनाला ते चटका देणारे ठरते. त्यामुळे, जेव्हा लॉकडाऊन लागले आणि आशा सेविका स्वत:चा जीव धोक्यात घालुन मैदानात हिरकणी होईन काम करीत होत्या. तेव्हा त्यांनी केवळ १६ ते १७ रुपये रोज पडत होता. अशा वेळी स्वत: गायकर साहेबांनी या महिलांसाठी ४ लाख रुपये देऊ केले. हे दानशुर काळीज येथेच स्थिरावले नाही. तर, त्यांनी उसतोड कामगारांच्या आरोग्याची आणि संसाराची देखील धुरा आपल्या खांद्यावर घेतली. अर्थात त्यांनी स्वत: उसतोडणी केल्यामुळे त्या आयुष्याचे चटके काय असतात हे त्यांना नव्याने सांगण्याची गरज नव्हती. त्यामुळे, हजारो कामगारांच्या चुली पेटून त्यांचे आरोग्य निर्मळ कसे राहिल, यासाठी ते अग्रही हाेते. यात आनंदाची बाब नमुद कराविशी वाटते की, जेव्हा कारखाना बंद केला गेला. त्यावेळी एकही उसतोड कामगार कोरोना पॉझिटीव्ह मिळून आला नाही. हेच त्यांच्या कार्याची पावती आहे.
           तालुक्यात एकीकडे राजकारण तर दुसरीकडे कोरोनाचा कहर सुरु होता. या राजकारणात गायकर साहेब कोठे दिसून आले नाही. मात्र, ज्यांनी कोणी मदतीला आवाज दिला तेथे साहेब खंबिरपणे उभे राहिले. कोरोनाच्या काळात अकोल्यातील लोकांना संगमनेर गाठावे लागत होते. गावागावात विलगिकरण कक्षांची तालुक्यास नित्तांत गरज होती. अशा वेळी साहेबांनी स्वत: पुढाकार घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी विलगिकरण कक्ष सुरु करण्यास भरीव मदत केली. हिवरगाव, गणोरे, अगस्ती, शेंडी, कोतुळ, ब्राम्हणवाडा, धुमाळवाडी, सुगाव अशा ठिकाणी त्यांचे अनमोल मार्गदर्शन व भरीव आर्थिक मदत झाली आहे. कोठे बेड दिले तर कोठे पीपी किट, कोठे लाखो रुपयांची औषधे तर कोठे सॅनिटायझर, कोठे अॅक्सिजन तर कोठे अन्नधान्य. म्हणजे तालुक्याच्या पडत्या काळात साहेबांनी तालुकाच दत्तक घेतल्याचे पहायला मिळाले आहे. सुगाव कोविड सेटरला तर २ लाखांपेक्षा जास्त मदत,  आशा सेविकांना ४ लाख, ब्राम्हणवाडा कोविड सेंटरला ५१ हजार तर शेंडी सीसीसीला २१ हजार रुपये असे अनेक ठिकाणी त्यांनी तालुक्याला पदरात घेतल्याचे पहायला मिळाले आहे. खरंतर हे फक्त आम्हाला वरवर माहित आहे इतकीच माहिती आहे. या पलिकेड साहेबांनी अनेकांना अॅस्किजन बेड, व्हेंटीलेटर, बायोपॅप, रेमडिसीवीर, टॅसिलीझुमॅब ही औषधे उपलब्ध करुन दिली आहेत. इतकेच काय.! अनेकांची हॉस्पिटल बील साहेबांच्या माध्यमातून भरली गेली आहेत. त्यामुळे, इतकी आर्थिक व सामाजिक मदत या तालुक्यात शक्यतो कोणी केलेली दिसत आहे.
              यापलिकडे मधुभाऊ नवले साहेबांचे देखील योगदान तालुक्याला कमी नाही. तालुक्यात कोणी कोरोनाशी दोन हात करण्यास तयार नव्हते तेव्हा नवले साहेबांनी त्यांची अभिनव कॉलेज चार महिने प्रशासनाच्या ताब्यात दिले होते. त्यात ४० बेड आणि सर्व अन्य खर्च हा त्यांनी स्वत: केला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भाऊंचे योगदान तालुक्याला तारणारे ठरले. जेव्हा तालुक्यातील जनता अॅस्किजनविना तडफडत होती. तेव्हा साहेबांनी स्वत: १ लाख रुपये देऊन मोठी मदत कार्यकर्त्यांच्या स्वाधिन केली. समाज कार्यात माघार घेतील ते भाऊ कसले.? त्यांनी प्रवरा क्लॉथ सेंटरच्या वतीने पुन्हा ५० हजार रुपये दिले. समाज कार्यात केवळ त्यांचाच सहभाग राहिला नाही. तर, त्यांच्या संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने फुल ना फुलाची पाकळी देत २५ ते ३० हजार रुपये जमा करुन प्रशासनाच्या ताब्यात दिले होते. मधुभाऊंच्या पुढाकाराने काँग्रेस पक्षाने  ६० हजार रुपयांची मदत दिली होती. या पलिकडे काही गरजू व्यक्तींच्या रुग्णालयाची बिले देखील त्यांनी भरली आहेत. सुदैव म्हणा की दुर्दैव काँग्रेसच्या विचारवंतांनी आयुष्यात जे काही चांगले काम केले. त्याची मीडियाबाजी आणि गौगवा त्यांना कधी करता आला नाही. त्यामुळे, मदत करुन देखील त्यांच्यावर चिखलफेक झाली. अर्थात हा सामाजिक प्रश्न नव्हताच तर तो द्वेष म्हणा की, भाऊबंदकी. पण, त्यामुळे मधुभाऊंच्या कार्यावर जी धुळ फेकली गेली. ती उडून गेली आणि त्यांनी देखील तालुक्याच्या पालकत्वात आपला सिंहाचा वाटा आहे. हे सिद्ध करुन दाखविले आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. या तालुक्याच्या पालकास उदंड आयुष्य लाभो. हिच सदिच्छा.!

लढू आणि नक्की जिंकू
मागच्या काही शतकांकडे वळुन बघितल्यास एका शतकाच्या दरम्यान एकतरी महामारी येवून गेल्याचे लक्षात येते. एका महामारीतून तीन पिढ्यांना जावे लागते. (आजोबा,वडील व नातू) या तीन पिढयांमधून एखादी पिढी अपवादाने निसटून जाते. ढोबळपणे प्रत्येकालाच महामारीच्या महासंकटाचा सामना करावा लागतो. आपण आता कोरोना महामारीचा सामना करत आहोत. रोग प्रतिकार शक्तीचे बळ घेवून आणि आपली मानसिक स्थिती सांभाळून कोरोना निर्बंध पाळून  या  संकटातून  आपण निभावून जावू. एका व्यक्तीवर येणारे हे संकट नाही तर एका कुटुंबावर घाला घालणारे  हे भयानक संकट आहे. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने  स्वतःला जपले पाहिजे. तर कुटूंब वाचेल. प्रत्येक व्यक्तीने स्वतः निर्बंधाचे पालन करून स्वत:ला सुरक्षित राखले तरच अवघा समाज सुरक्षित राहील. या संकटात आपण आपले किती तरी माणसं आजपर्यत गमावलीत. तसेच कितीतरी माणसं या संकटातून आपण वाचवलीत सुद्धा. आतातर निर्वाणीची वेळ येवून ठेपलीय. कोरोना बाधितांची संख्या वाढतेय. मृत्यूचे प्रमाणही वाढतेय. दुसऱ्या लाटेने मानवीसमूहावर चढविलेला महाभयानक मानवी संहार ठरावा असा हा हल्ला आहे. अजूनही या दुसऱ्या लाटेशी आपली लढाई संपली नाही. केंद्र व राज्य सरकार सामाजिक संघटना व इतर संस्था कोरोनाला पराभूत करण्यासाठी लढत आहे. गेले १४ महीने सलग लढत असलेले कोरोना योद्धे जीवाची पर्वा न करता अथक परिश्रम घेत आहे. १९६२ च्या चीन विरोधी युद्धातल्या गीताची आठवण येणे अशा प्रंसगी स्वाभाविक आहे. शब्द बदललेत आशय तोच आहे.
कोरोना शत्रुसंगे युद्ध आमचे सुरु !
लढती डॉक्टरर्स, लढती पोलीस. लढे प्रशासन ,
लढतात महिला, लढती  बालक, लढे संशोधक,
शर्थ लढ्याची करू...!!
याच जिद्दीने कोरोनाविरोधात आपली लढाई चालू आहे. परतीचे दोर तुटलेत याची जाणीव ठेवून प्रत्येकाने कोरोना विरोधात लढणे आपले काम आहे. स्वत:ला व कुटूंबाला  पर्यायाने अवघ्या समाजाला या महामारीतून वाचवले पाहिजे . सुदैवाने कोरोना लसीचे डोस आता आपल्या हाती आलेत. या निमित्ताने  संशोधकांना विशेष धन्यवाद देणे आवश्यक आहे. तिसरी लाट येण्यापूर्वी बालकांसाठीही कोरोना प्रतिबंधात्मक लस येणे व लसीकरण  होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच १८ वर्षावरील प्रत्येकाचे लसीकरण झाल्यास तिसरी लाट परतून लावणे  सोपे होईल. खांद्याला खांदा लावून ही लढाई नाही तर कोरोना काळातील प्रत्येकाने पाळावयाचे निर्बध महत्वाचे आहे. इतर मतभेद,मनभेद अगर राजकारण  बाजूला ठेवून तसेच निर्बंध पाळून आत्मविश्वास प्रबळ ठेवून “ कोरोनाचा आलाय हल्ला आता प्रत्येक घर आहे किल्ला ” 
        हे जाणून प्रत्येकाने आपण ,आपले कुटुंब व समाज सुरक्षित ठेवणेस अग्रक्रम देऊन कोरोना विरोधात लढावे. हेच अपेक्षित आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त प्रिंट मीडिया ,सोशल मीडिया, फ्लेक्स यातून मला शुभेच्छा नकोत. प्रत्यक्ष भेट नको. आपणा सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद आहेत व होते म्हणूनतर अपघातातून मी वाचलो आणि आज आपणासर्वांबरोबर आहे. माझ्यासह आपण हाच आत्मविश्वास बाळगून लढू. कोरोना संकटातून बाहेर पडू.
  
मधुकर नवले