सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील एका 17 वर्षीय मुलाने देशी दारूच्या दुकानासमोर दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने बाचाबाची झाली. पैसे न दिल्याने शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील तंत्रज्ञ यांच्या डोक्यात टणक दगड टाकुन जीवे ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार बुधवार दि. 6 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या दरम्यान शहरातील परदेशपुरा येथील देशीदारू दुकानाच्या समोर घडली. यामध्ये सुहास रामचंद्र वाघमारे (वय 53) हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांच्या डोक्यावर व कानावर गंभीर दुखापत झाली आहे. ते खाजगी दवाखान्यात बेशुद्धअवस्थेत असल्याने पोलिस कॉ. अजित कुर्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाडेकर गल्ली परिसरातील 17 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरातील परदेशपुरा येथे एक देशीदारूचे दुकान आहे. तेथे असंख्य तळीराम दारू पिण्यासाठी एकत्र येतात. याच परिसरात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र परदेशपुरा येथे तंत्रज्ञ म्हणुन सुहास वाघमारे हे काम करत होते. ते मूळचे राहणारे सांगली येथील आहे. कामामुळे ते संगमनेरातील परदेशपुरा परिसरातच राहत होते. तेथेच जवळ देशीदारू दुकानाच्या समोर रात्रीच्या वेळी ते आले. त्यांची भेट वाडेकर गल्लीतील 17 वर्षीय तरुणासोबत होती. या तरुणाला दारू पिण्यासाठी पैसे लागत होते. तो पूर्णतः नशेत होता. सुहास वाघमारे यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे, 17 वर्षीय तरुणाला राग अनावर झाला. तो सुहास वाघमारे यांच्या सोबत वाद करू लागला.
दरम्यान, बाचाबाची सुरू होती. या 17 वर्षीय तरुणाला समजुन सांगेल असे तेथे कोणी नव्हते. हा तरुण देखील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने सुहास वाघमारे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत मारहाण सुरू केली. रात्रीच्या वेळी कोणी नसल्याचा फायदा घेत या तरुणाने सुहास वाघमारे यांना बेदम मारले. सुहास वाघमारे हे खाली पडले. तेव्हा या तरुणाने नशेत जवळ असलेले टणक दगडाचे तुकडे सुहास वाघमारे यांच्या डोक्यात वारंवार टाकले. सुहास वाघमारे यांच्या कानातुन व डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तश्राव सुरू झाला. ते गंभीर जखमी असुन बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहुन तेथील जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर त्यांना अत्यावस्थेत खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ पंचनामा केला. तेथिल जवळपासच्या लोकांना विचारण्यात आले. मात्र, ही घटना कोणी प्रत्यक्ष पाहिली नव्हती. जेव्हा पोलिसांनी दारूच्या दुकानाबाहेर सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा एक तरुण सुहास वाघमारे यांच्या डोक्यात टणक वस्तु मारत असल्याचे पाहायला मिळाले. मारहाण करणारा तरुण हा अल्पवयीन असुन त्याने यापूर्वी ही गुन्हे केलेले असल्याने त्याची ओळख तात्काळ झाली. तो कुठे जातो, कुठे राहतो याची माहिती काढुन त्याला 6 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता संगमनेर शहरातील मेनरोड परीसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून या 17 वर्षीय वाडेकर गल्लीतील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
दरम्यान, संगमनेर शहरात अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळत आहे. अल्पवयीन तरुण मुले टोळी करून नशा करतात. नंतर रात्रीच्यावेळी सामान्य माणसांना रस्त्याला लूटमार करताना पाहायला मिळतात. अकोलेनाका परिसरात या तरुणांनी धुमाकूळ घातला आहे. अनेकवेळा अधिकाऱ्यांच्या देखील यामध्ये चौकशी करण्यात आली आहे. कारण, तेथील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही. गुंजाळवाडी रोड, नाशिक पुणे महामार्ग, परदेशपुरा, अकोलेनाका येथे अल्पवयीन तरुणांनी टोळ्या करून चैन स्नॅचिंग, मोबाईल काढणे, डिझेल चोरी, रस्तवरील माणसांना अडवून रोख रक्कम काढणे असे प्रकार सुरू आहे. त्यामुळे, संगमनेर शहर पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक राहिला की नाही असा प्रश्न संगमनेर शहरातील सुज्ञ नागरिकांना पडत आहे.