वैभव पिचड यांना आमदार होण्यासाठी काय करावे लागेल! वाढदिवसानिमीत्त कटू पण सत्य.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
सन 1972 पासून माजी मंत्री मधुकर पिचड यांनी पंचायत समितीच्या सभापती पदापासून तालुक्याचे नेतृत्व करायला सुरूवात केली. तेव्हापासून त्यांच्या धुर्त राजकारणाचा ठसा उमटला आणि बोलबोल करता ते लोकनेता होत गेले. तेव्हापासून तर 2014 पर्यंत पिचड पर्व खचले नाही. ते इतके बलाढ्य राजकारणी झाले की, तालुका आणि जिल्ह्यात बाप होतेच मात्र, राज्याच्या राजकारणात त्यांचे अनन्य साधारण महत्व होते. हा दबदबा त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेईपर्यंत कळसुबाईच्या उंचीइतका ऐतिहासिक आणि ताठ होता. मात्र, या शिखराचे वैभव कालांतराने धुळीस मिळाले व 35 वर्षीची अखंड परंपरा एका निर्णयाने खंडीत झाली. हा सदमा इतका मोठा होता की, संबंध जनता एका बाजुला आणि पिचडांचा निर्णय एका बाजुला त्यामुळे काही क्षणात मधुकर पिचड यांच्या प्रतिष्ठेचे वैभव मातीमोल झाले. राज्यात नव्हे देशात त्यांच्या भाजप प्रवेशाने चर्चा रंगल्या आणि पवारांचे काळीज जणू निखळून पडले अशा भावना काहींनी व्यक्त केल्या तर काय कमी केले होते? असे म्हणत त्यांच्यावर टिका झाली. अर्थात हा निर्णय त्यांचे सुपूत्र वैभव पिचड यांचा होता. उतार वयात आलेल्या साहेबांचे तेव्हा काही चालले नाही आणि त्यांनी होे मध्ये हो मिळवत प्रचार सुरू केला. बोलबोल करता त्यांच्याकडे जनतेने पाठ फिरविली आणि अगदी निष्ठावंत नेते देखील त्यांना सोडून गेले. आता जनतेचा विश्वास आणि गेलेले बहुजन नेते यांची पुर्नवापसी झाली तर वैभव पिचड हे पुन्हा आमदार होऊ शकतात. मात्र, त्यासाठी त्यांना एक नवा पक्ष उभा करावा लागेल अन्यथा जनतेला न रुचनारा भाजप सोडून कोणत्याही पुरोगामी विचारांच्या पक्षात प्रवेश करुन पुन्हा वैचारिक चळवळीचा झेंडा हाती घ्यावा लागेल. कारण, आज जनतेला पिचड यांच्यासारख्या संयमी नेत्याची निकडीने गरज आहे. त्यामुळे, कटू वाटेल परंतु हेच सत्य अंगीकारले तर येणारा काळ त्यांच्यासाठी पुनर्वसन करणारा असेल, अन्यथा...
अगदी कडू काळ म्हणजे राज्यात 1972 चा दुष्काळ पडला होता. तेव्हा दिवंगत नेते यशवंतराव भांगरे हे तालुक्याचे आमदार होते. त्याच वेळी मधुकर पिचड यांनी तालुक्यात स्वत:ची नवी ओळख निर्माण करण्याचा ध्यास घेतला होता. अर्थात हे सर्व पुर्वनियोजित होते. कारण, अकोले मतदारसंघ हा आदिवासी समाजासाठी राखीव असल्याने तोच खरा पिचडांच्या राजकारणाचा सुर्योदय होता. सन 1977 साली त्यांनी आय काँग्रेसकडून आमदारकी लढविली. मात्र, त्यात त्यांना अपयश आले आणि पुन्हा भांगरे निवडून आले. परंतु 1980 मध्ये जेव्हा आणिबाणी उठली तेव्हा पिचड यांनी इंदिरा गांधी यांच्या अटकेबाबत जेव्हा आंदोलन करत विसापूर जेल गाठले तेव्हापासून पिचड पर्वाचा खर्या अर्थाने ऊदय झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
सन 1980 ते 1999 पर्यंत काँग्रेसचा आमदार राहिलेले मधुकर पिचड नंतर राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर संस्थापक सदस्य झाले आणि शरदचंद्र पवार यांच्या राजकारणाचा एक अविभाज्य भाग ठरले. पिचड साहेब जोवर पवार साहेबांच्या छत्रछायेखाली चालले होते तो वर ते एक अपराजित योद्धे म्हणून गणले जात होते. मात्र, सन 2014 साली त्यांच्या आमदारकीवरच घरातुनच आणिबाणी लागली. कारण, त्याचे साथीदार असे सांगतात की, सन 2014 साली जेव्हा मोदींची लाट आली तेव्हाच वैभव पिचड यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. तेव्हा, स्वत: मधुकर पिचड हे त्याच्या जिवणातील अखेरची निवडणुक लढण्यात इच्छूक होते. मात्र, त्यांच्या पुत्र हट्टापुढे साहेबांनी माघार घेतली आणि तेव्हापासून वैभव पर्वाचा उदय झाला. तेव्हा असे वाटत होते की, एकतर देशात मोदींची लाट होती, मोठ्या साहेबांना माननारा वर्ग जरासा नाराज झाला होता, नव्याने राजकारणात येऊ घातलेल्या वैभव पिचड यांना राजकारणात जनता स्थैर्य देतील का? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, त्यावेळी, मधुकर पिचड यांनी ती निवडणुक स्वत: हाती घेत बहुजन नेते सिताराम पाटील गायकर यांच्याकडे सर्व जबाबदारी सोपविली. तालुक्यातील मराठा समाज आणि आदिवासी समाज यांची या दोघांनी मोट बांधली तर तरुणांना अकर्षित करण्याचे काम उमेदवाराने केले. म्हणजे त्यावेळी देश मोदींसोबत वाहत होता आणि तालुक्यातील भोळी भाबडी जनता पिचडांच्या पाठीशी दिपस्तभासारखी पाय राखून उभी होती. या लाटेत वैभव पिचड जनतेचे खरोखर वैभव ठरले, त्यांना जनतेने 67 हजार 696 मतांनी निवडून दिले होते.
खरंतर तेव्हा वाटले होते की, आता पुढे आणखी 40 वर्षे कोणी पिचडांच्या राजकारणात घुसखोरी करु शकत नाही. आता हे वैभव पर्व थांबणे अशक्य वाटत होते. मात्र, अवघ्या पाच वर्षात त्यांच्या डोक्यात मंत्री होण्याची हावा शिरली आणि पिताश्रींच्या 35 वर्षावर त्यांनी अक्षरश: पाणी फेरले अशी टिका त्यांच्यावर झाली. त्याचे कारण देखील तसेच होते. या तालुक्यात यापुर्वी 1957 ची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ रुचली, त्यानंतर 1962 ची कम्युनिस्ट चळवळ रुचली, नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील रुचली, मात्र, 1977 साली पवारांनी जनता दलाशी संलग्न होऊन पुलोद स्थापन केली ती देखील अकोले तालुक्याला रुचली नाही असे इतिहास सांगतो. माग वैभव पिचड असो वा अशोक भांगरे यांनी जेव्हा जेव्हा भापचा झेंडा हाती घेतला तेव्हा तेव्हा जनतेने त्यांचा दारुन पराभव केला आहे. म्हणजे 2014 मध्ये भांगरे यांनी भाजपकडून भल्या-भल्या नेत्यांची मोट बांधली होती, त्यात मोदी लाट होती तरी देखील त्यांना 27 हजार 446 मते ते देखील तीन नंबरची मते मिळाली होती. म्हणजे येथे कमळ कधीच फुलू शकत नाही. हेच जनतेने त्यांना सांगून दिले.
आता वास्तव पाहता पिचडांच्या एका निर्णयामुळे त्यांचे किती नुकसान झाले हे त्यांना नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यांचे सहकारी देखील त्यांच्या पाठमोहरी झाले आहेत. त्यामुळे, ते एकटे पडले आहेत अशा प्रकारची मीडियाबाजी होत आहे. मात्र, वास्तवत: ते त्यांच्या एका निर्णयामुळे एकटे पडले आहेत. आजही तालुक्याला आणि त्यांच्या पासून दुर झालेल्या नेत्यांना पिचड नावाविषयी आत्मीयता आहे. आज सिताराम पाटील गायकर, मधुकर नवले, कचरुपाटील शेटे, अशोक देशमुख, पर्बत नाईकवाडी यांच्यासह अन्य नेत्यांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे, तरुण वर्ग पिचडांकडे अकर्षित झाला आहे असे म्हणत 1995 ची पुनरावृत्ती पुन्हा होती की काय? असा अंदाज वर्तविला जातो. मात्र, या भरोशावर जी पिचड राहिले तर पुन्हा एकदा अंधारात बाण मारल्यासारखे होईल. कारण, त्याकाळची परिस्थिती फार वेगळी होती. साक्षरतेचे प्रमाण कमी होते, लोकांना चळवळीत जास्त पण राजकारणात फारसा रस नव्हता, विशेषत: सोशल मीडियाचा वापर अगदी अल्प होता, नात्यागोत्यांचे राजकारण फार पाळले जात नव्हते, पक्ष आणि निष्ठा ही महत्वाची होती, व्यक्ती परत्वे राजकारण होते, विकासाचे मुल्यांकण होत नव्हते आता हा सर्वच प्रमाण लागू होते. तेव्हा कोठे मतदार मतदान करण्याच्या मानसिकतेत येतो.
आत वास्तव पाहिले तर पिचड यांना पुन्हा आमदार व्हायचे असेल तर आमरावतीचे आमदार रवी राणा व खा.नवनित राणा कौर यांच्यासारखा एखादा स्वाभिमानी पक्ष, किंवा नेवाशाचे मंत्री महोदय शंकरराव गडाख यांच्याप्रमाणे एखादा शेतकरी क्रांतीकारी पक्ष स्थापन करुन स्वबळावर लढणे, किंवा राजकीय वारे पाहून पुन्हा राष्ट्रवादी, काँग्रेस अन्यथा शिवसेना अशा एखाद्या समविचारी पक्षात जाऊन आपला डेरा दाखल करणे हाच त्यावरील जलीम उपाय आहे. या व्यतिरिक्त तालुक्यातील नेते जसे की, सिताराम पाटील गायकर साहेब यांच्या नेतृत्वाशिवाय तालुक्याला पर्याय नाही. त्यांची ताकद पाहता येथील राजकारण हे अपुर्ण आहे हे त्यांनी कारखाना, मार्केट कमिटी व दुधसंघ यातून दाखवून दिली आहे. त्यामुळे, काय, कसे व केव्हा राजकीय बदल करायचे ते पिचडांनी करावे. परंतु येथील बहुजन समाज हा गायकारांच्या शब्दापलिकडे नाही हे त्यांनी सिद्ध करुन दिले आहे. त्यामुळे, एकंदर येणार्या काळात वैभव पिचड यांना जर आमदार व्हायचे असेल तर, त्यांच्या भोवती असणारी चांडाळ चौकट, योग्य मार्गदर्शक, प्रॉपर मीडियाबाजी, बहुजनांची मोट, योग्य पक्ष निवडण्याचा निर्णय, स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणारी पकड आणि वारंवार जनतेत कायम टिकून राहण्याचा संयम या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन मोका पाहून चौका मारणे हेच त्यांना तारु शकेल असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
वैभव पिचड यांना वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा.!