थोरातांनी विशाखापट्टनमहून ऑक्सिजन, विखेंनी दिल्लीहून औषधे, लंकेंनी कोविड सेंटर अन अकोल्याचे तरुण ऑक्सिजन शोधत फिरत आहे. खरंच अकोले तालुका पोरका झाला का?

ऑक्सिजनच्या शोधार्थ टिम.!

 - सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                      अकोले तालुक्यात यापेक्षा फार वेगळी परिस्थिती आहे. येथे जे काही प्रस्तापित राजकारणी आणि त्यांच्यात असणारी समाजसेवेची उर्मी हेच लोक आज रस्त्यावर दिसत आहेत. आज जेव्हा अकोल्यात राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला तेव्हा अनेक बोलघेवड्या पुढार्‍यांचा नव्याने जन्म झाला. सोशल मीडियावर त्यांनी अनेकदा अकलेचे तारे तोडले. आम्ही तालुक्यासाठी हे करु ते करु मात्र, आज काहीतरी करुन दाखविण्याची वेळ आली आहे तर राष्ट्रवादीची किती लोक ग्राऊंडवर काम करीत आहेत? जे वैचारिक चळवळींचा धडा शिकवत होते, ज्यांना पुरागामीत्व या विषयावर बोलायला आवडत होते. आता हे तरुण नेते आणि बुजुर्ग गेले तरी कोठे? आज तालुक्यात लोक तडफडून मरत आहेत. लोकांना बेड नाही, ऑक्सिजन नाही, रेमडिसीवीर मिळत नाही, औषधे मिळत नाही, अ‍ॅम्ब्युलन्स मिळत नाही. मग तालुक्यात मिळते तरी काय? मग जनता श्वास घेण्यावाचून मरत असताना हे राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते गेले कोठे? यात राष्ट्रवादीचे आमदार तर कमी पडत आहेच. मात्र, तालुकाध्यक्ष आणि त्यांची फौज काय करते हे कोठे दिसत नाही. त्यांनी एक सपाटा बाकी भारी लावला आहे. घरात बसून सोशल मीडियावर टामटामा बोलून आपण अकोल्याच्या राजकीय परिवर्तनात किती हातभार लावला आहे. मात्र, आता खरी वेळ आहे ज्या जनतेने तुम्हाला भरभरून दिले त्यांना मरू न देण्याची. मात्र, हे उत्तरदायीत्व कोणी स्विकारायला तयार नाही.

खरं पाहिले तर ना. बाळासाहेब थोरात यांना अकोल्यात टिकेचे धनी केले खरे. मात्र, त्यांनी अगदी पडत्या काळात तालुक्याला मदत केली. माजी मंत्री मधुकर पिचड म्हणतात की, ना. थोरात आणि मी आम्ही सत्तेचा उपयोग विकास करण्यासाठी आणि तालुक्याच्या हितासाठी केला. आमच्यात नेहमी मैत्रीचे संबंध राहिले. दुर्दैवाने नामदार साहेब एकदाच तालुक्यात आले आणि त्यांच्या पदरी अपमानाची उपेक्षा पडली. ते पुन्हा तालुक्यात येतील का? मदतीचा हात पुढे करतील का? यावर शंकाच आहे. गेल्या कित्तेक दिवसांपासून संगमनेरात ऑक्सिजनचा तुटवडा होता. नामदार थोरात यांनी पुणे, नाशिक, नगर आणि आज तर विशाखा पट्टणम येथून ऑक्सिजन टँक मागविले आहेत. म्हणजे संगमनेरसाठी ते खंबीर आहेत. येथे ज्या जनतेने परिवर्तनाचा झेंडा हाती घेतला तीच जनता आज स्वत:चे मरण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. हा तालुका डोळे झाकून याच लोकांनी राष्ट्रवादीच्या पदरात टाकला. मात्र, येथे सुप्रियाताई यांच्यासारखी संसदपट्टू एक दिड हजारांची सायकल देते, त्याची मीडियाबाजी राज्यभर होते. मग त्या बरोबरीने आज त्या एखादा ऑक्सिजन टँक का देऊ शकत नाही? लोक जगले तर त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील. पण, त्यांची चापलुसी करण्यात तालुक्यातील काही तरुण दंग झाले आहेत. त्यांची मजल इतकी नाही की, जनतेसाठी ते ताईंना इतक्या मोठ्या खर्चात पाडतील.

खरंतर आज महेश नवले, सुरेश गडाख, काँग्रेसमधून आलेले संदिप शेणकर, पत्रकार गणेश आवरी, नितीन नाईकवाडी, शिवाजी नेहे, सचिन शेटे, प्रदिप हासे यांसारख्या व्यक्तींचे मानावे तितके आभार कमी आहे. हे लोकं जरी तालुका पातळीवर राजकारण करीत असले तरी यांनी राज्य पातळीवरील लोकांचे पाय धरुन तालुक्याला ऑक्सिजन पुरवठा केला आहे. तालुक्यात राज्यास्तरावर काम करणारे नेते आहेत. मात्र, त्यांच्या नेटवर्कचा उपयोग काय झाला? हे आपण पाहतो आहे. त्यामुळे, खरोखर आज तालुका पोरका असल्याचे पहायला मिळत आहे. शेजारी तालुक्यात मंत्री महोदय 14 मॅट्रीक टन ऑक्सिजन संगमनेरसाठी विशाखापट्टनम येथून मागवितात, दुसरीकडे विखे पाटील हे दिल्लीहून खाजगी विमानात औषधे आणून जनतेसाठी दिवस रात्र एक करीत आहेत, पारनेर सारख्या ठिकाणी आमदार हजारो बेड स्वखर्चातून उभे करीत आहेत आणि अकोले तालुक्यातील शेतकरी पुत्र व पत्रकार मित्र पायपिट करुन उपासपोटी ऑक्सिजन शोधत टाक्या गोळा करुन मिनिट-मिनिटांचा विचार करीत आहेत. खरोखर हा तालुका पोरका झाला नाही तर काय म्हणावे? अशा प्रकारची खंत सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे.

या सगळ्यात आणखी एक खंत व्यक्त होत आहे. अगदी बोटावर मोजण्याईतके नगरसेवक जनतेसाठी काम करताना दिसत आहेत. बाकी ज्यांना येणार्‍या काळात तिकीटाची अपेक्षा आहे ते भामटे घरात दडून बसले असून हे वशिल्याचे तट्टु एनवेळी बरोबर डोमकावळ्यासारखे बाहेर पडणार आहेत. यात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे तर अगदी दुर्मिळ झाले आहेत. काही प्रतिनिधी काम करताना दिसतात, अधून मधून त्यांच्या काही पोष्ट झळकतात. मात्र, त्याला भरीव कामगिरी म्हणता येणार नाही. ज्यांना मोठ्या अपेक्षेने लोकांनी निवडून दिले आहे ते जर स्वत:ची जीव वाचविण्यासाठी घरात दडून बसले असतील तर त्यांना जनतेने डोक्यात ठेवले पाहिजे, बोलून दाखविण्याची गरज नाही. मात्र, त्यांना मतदानाच्या वेळी मतपेटीतून उत्तर दिले पाहिजे. खरंतर अकोल्याचे राजकारण फार गडूळ झाले आहे. त्यामुळे, जनतेला कोणी वाली नाही ना जनता स्वत: स्वयंभू आहे. त्यामुळे, येथे सगळी खिचडी झाली आहे. त्याचा परिणाम आज काय होत आहे याचे आत्मचिंतन जनतेने केले पाहिजे असे अभ्यासकांचे मत आहे. 

एकंदर अकोल्याचे राजकारण, खालावलेले आरोग्य, संगमनेर व अकोल्याचे नेते त्यांच्यात निर्माण झालेली दरी, येणार्‍या निवडणुका आणि आजी माजी आमदार यांच्यातील श्रेय्यवादाच्या पलिकडे तालुक्यात बहुजन समाज फार खचून गेला आहे. आता प्रत्येकाने परिस्थितीपुढे हार मानली आहे. या सगळ्यांचा केंद्रबिंदू म्हणून लोक सिताराम पाटील गायकर यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. आज तालुक्याला ऑक्सिजनची गरज असताना त्यांच्याकडून पाच लाखांची मदत झाली आहे. गायकर पाटील यांचे राज्यात जितके संबंध आहे तितके संबंध कोणाचे नाही. त्यामुळे, त्यांनी पुढाकार घेऊन तालुक्यात जो काही संगमनेर अकोले वाद उभा राहिला आहे. त्यावर तोडगा काढून एकोप्यावर शिक्कामुर्तब केला पाहिजे. असे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

       अकोले तालुक्यात आज 55 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात सुगाव बु येेथे 42 वर्षीय पुरुष, नवलेवाडी येेथे 24, 29 वर्षीय पुरुष व 29 व 27 वर्षीय महिला, धुमाळवाडी येेथे 13 वर्षीय तरुण, 35 वर्षीय पुरुष, खामुंडी येेथे 21 वर्षीय तरुणी, ब्राम्हणवाडा येेथे 23 वर्षीय पुरुष, कारंडी येेथे 70 वर्षीय महिला, शिरपुंजे येेथे 45 वर्षीय महिला, शेंडी येेथे 66 वर्षीय पुरुष, पिसेवाडी येेथे 75, 38 वर्षीय पुरुष, कोतुळ येेथे 52 वर्षीय पुरुष, पिंपळगाव खांड येेथे 45 वर्षीय महिला, 49, 58, 36 वर्षीय पुरुष, पाडाळणे येेथे 71 व 32 वर्षीय पुरुष, अंभोळ येेथे 25 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरूष, पांगरी येेथे 19 वर्षीय तरुण, येसरठाव येेथे 22 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरूष, लिंगदेव येेथे 65 व 27 वर्षीय पुरुष, कोतुळ येेथे 30, 60 व 48 वर्षीय महिला, बुळेवाडी येथे 36 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय तरुणी, आंभोळ येथे 9 वर्षीय बालिका, पांगरी येेथे 55 वर्षीय पुरुष, पाडाळणे येथे 65 वर्षीय महिला, पिंपळगाव नाकविंदा येथे 65, 63, 35 वर्षीय पुरुष, 30,60 वर्षीय महिला, व 12 वर्षीय बालिका, देवठाण येथे 29 वर्षीय महिला, नवलेवाडी येेथे 40 वर्षीय पुरुष, कळस खु येेथे 55 वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी येेथे 71 वर्षीय पुरुष, मवेशी येथे 3 वर्षाचा बालक, आंबड येथे 53 वर्षीय पुरुष, पाडेकर बिल्डींग अकोले येेथे 37 वर्षीय पुरुष, गर्दनी येेथे 43, 32 वर्षीय महिला, 1 वर्षाचा बालक, सुगाव खुर्द येेथे 52 वर्षीय पुरुष,लव्हाळी येेथे 50 वर्षीय पुरुष, कोतुळ येेथे 44 वर्षीय पुरुष असे 55 रुग्ण अकोले तालुक्यात पॉझिटीव्ह मिळून आले आहेत. त्यामुळे, अकोले तालुक्यात आजवर 6 हजार 609 व्यक्ती कोरोना बाधित मिळून आल्या आहेत. तर 66 जणांचा मृत्यु झाला आहे.

  तर संगमनेरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. आज संगमनेरमध्ये कोरोनाने आज पर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. आज शनिवार दि. 24 एप्रिल रोजी 297 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यामुळे, दर 24 तासात दोनशेच्या पुढे आकडा येत असल्याने प्रशासनापुढे चिंतेचा विषय ठरत आहे. तर प्रशासन देखील कोरोना बाधित मृत्यूचा आकडा लपवा-छपवीचा डाव करत असल्याचा आरोप होत आहे. तर आज संगमनेरकरांना दिलासा देणारी वार्ता आहे. आज विशाखापट्टणम येथून रेल्वेद्वारे नाशिक येथे ऑक्सिजन आल्यानंतर 1 ऑक्सिजन टँकर संगमनेरकडे कडक बंदोबस्तात पोहच झाला आहे. यामध्ये 14 मेट्रिकटन क्षमतेचा ऑक्सिजन आहे. तर संगमनेरकरांसाठी दर 24 तासाला 10 मेट्रिकटन इतकी ऑक्सिजनची मागणी आहे. तर देवगाव रोड येथील सिद्धीकला हॉस्पिटलच्या पाठीमागे कोरोना बाधित रुग्णाचे वेस्टेज मटेरियल, मेडिसीन  उघड्यावर लोक वस्तीच्या ठिकाणी फेकले जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे, कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो त्याची योग्य ती विल्हेवाट करणे अपेक्षित असताना ती उघड्यावर फेकणे योग्य आहे का? असा संतप्त प्रश्न देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे. याची स्थानिक पातळीवर तक्रार केली असता प्रशासनाने याकडे कानाडोळा करत दुर्लक्ष केले आहे. 

            दरम्यान,निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आलेला लसीचा डोस तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश घोलप यांनी दबावातून जोर्वे येथील आरोग्य केंद्रात पाठविल्याने असंख्य नागरिक लसीकरणापासून वंचित राहील्याच्या तक्रारी झाल्या होत्या. यासंदर्भात त्यांची चौकशी करण्याची मागणी होत असून, त्यांच्या विरोधात मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे देशभर लसीकरण मोहीम सुरू आहे. तालुक्यातील निमगावजाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण मोहीम सुरू होती. मात्र, मागील काही दिवसांपासून निमगावजाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण मोहीम ठप्प झाल्याने या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना लस न मिळाल्याने माघारी फिरावे लागले. या घटनेबाबत डॉ सुरेश घोलप यांच्या विरोधात झालेल्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राज्याचे मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे  झाल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ घोलप चांगलेच अडचणीत सापडले आहेत. लाॅकडाऊन संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल  आ.विखे पाटील यांनी पोलीस प्रशासन आणि गटविकास अधिकाऱ्यानाही धारेवर धरले.

निमगावजाळी येथील लसींचा डोस डॉ घोलप यांनी कोणाच्या सांगण्यावरून किंवा दबावामुळे जोर्वे येथे पाठवला, याबाबत इन्सीडंट कमांडर असलेल्या अमोल निकम यांना  कोणतीच कल्पना नसल्याचे समजते. त्यामुळे या गंभीर घटनेबाबत  आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यातील महसूल आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आश्वी येथे  झालेल्या  एका बैठकीत चांगलेच धारेवर धरले. कोणाच्या सांगण्यावरून जर  शिर्डी मतदारसंघात अधिकारी निर्णय करणार असतील तर ते खपवून घेणार नाही. आमचे राजकारण आम्ही पाहून घेवू  तुम्ही या संकटकाळात राजकारण  करू नका आशा शब्दात आ.विखे  पाटील यांनी आरोग्य अधिकारी डॉ घोलप यांना खडेबोल सुनावल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. या बैठकीस उपस्थित असलेल्या तहसिलदार अमोल निकम यांनाही याची चौकशी करण्यास विखे पाटील यांनी सांगितले.

- सुशांत पावसे