भर लॉकडाऊनमध्ये दोन मित्रांनी त्याला घरातून नेवून गळा कापला.! गुन्हा दाखल, संशयित व्यक्ती ताब्यात.!
दोन मित्रांनी त्यांच्या मित्रास घरातून नेवून धारधार हत्याराने मानेवर वार करत हत्या केली. ही घटना भर लॉकडाऊनमध्ये संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथे शनिवार दि. 24 ते आज रविवार दि. 25 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यात सचिन अरविंद शिंदे (वय 28, रा. मोठेबाबा मळा, सारखिंडी शिवार, संगमनेर) हा तरुण मयत झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अरविंद दामु शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांनी काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सचिन शिंदे हा शनिवार दि. 24 एप्रिल रोजी रात्री 9:15 वाजता त्याच्या घरी होता. यावेळी त्याला घेण्यासाठी दोन तरुण एका दुचाकी वाहणावर आले होते. त्यावेळी शिंदे याच्या पालकांनी त्यास विचारणा केली असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे, आलेली दोन मुले हे त्याचे मित्र असतील असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत सचिन घरी आलाच नाही. त्यामुळे त्याच्या घरच्यांना चिंता लागली होती. अगदी पहाट झाली तरी सचिन परतला नाही. त्यामुळे, त्याच्या पालकांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली.
दरम्यान, रविवार दि. 25 एप्रिल 2021 रोजी सकाळी सचिनचा शोध सुरू झाला. त्यांच्या पालकांनी त्यांच्या मित्रांकडे चौकशी केली, नंतर नातेवाईकांना विचारणा केली. मात्र, त्याचा शोध लागला नाही. त्यानंतर तो सायखिंडी परिसरात असणार्या सोमनाथ पारधी यांच्या शेतात मृत अवस्थेत मिळून आला. त्यावेळी त्याच्या डोक्यावर तसेच मानेवर धारधार शस्त्राने वार केलेले होते. हा प्रकार कसा, का व कोणी केला याबाबत त्याच्या घरच्यांनी काही एक कल्पना नाही. त्यांनी तत्काळ ही माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिली व काही मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, हा प्रकार कोणी व का तसेच कसा केला याबाबत सर्वच अनभिज्ञ होते. मात्र, दोन मुले आली आणि त्यांनी सचिन शिंदे यास ठार माण्याच्या हेतूने घरातून घेऊन गेली. अशा प्रकारची माहिती पालकांनी दिली. यात हाच एक धागा पकडून पोलिसांनी काही धाग्यादोर्यांचा शोध घेणे सुरू केले. अर्थात संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे एक अनुभवी पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात भल्याभल्या गुन्ह्यांचा शोध लावला आहे. त्यामुळे, त्यांना हा प्रकार फारसा काही जड जाईल असा नव्हता. त्यांनी तत्काळी आपल्या तपासाची चक्रे फिरविली आणि काही संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
आता हा प्रकार कोणी व का केला याची निष्पत्ती जोवर गुन्हेगार अटक होत नाहीत तोवर होणे शक्य नाही. काही झाले तरी या हत्येमागील कारण फार वेगळे असू शकते. तुर्तास पोलिसांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवले आहे. मात्र, लवकरच या गुन्ह्याची उकल करण्यात पोलीस यशस्वी ठरतील यात काही शंका नाही. सध्या हा तपास अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधिक्षक राहुल मदणे व पोलीस निरीक्षक बाजिराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एस सानप करीत आहेत.