संगमनेरात बिल्डरांना, डेव्हलपर्स, ठेकेदारांना तिकीट दिले खरे पण कोरोनाच्या संकटात गेले कुठे.!
- सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जनतेला वेठीस धरले आहे. संगमनेरमध्ये रोजच 200 च्या घरात कोरोना बाधित रुग्ण आढळुन येत आहेत. त्यामुळे, तालुक्यातील 166 गावामधील वाडी-वस्तीवर हा विषाणु जाऊन पोहचला आहे. तर तब्बल 13 हजार 368 लोकांना कोरोनाने विळखा घातला आहे. मात्र, या वाढत्या रुग्ण संख्येमुळे कोणाला बेड उपलब्ध होत नाही. इकडून तिकडून मिळाला तर रेमडीसीवीरचे इंजेक्शन मिळत नाही, तर कधी व्हेंटिलेटरचा बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे आता संगमनेरमध्ये उपचाराअभावी कोरोना बाधीत रुग्ण मयत होत असल्याचे चित्र दिसत आहेत. यात युवक युवती, वयोवृद्ध यांचा समावेश आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येबरोबर कोरोनाचा मृत्यूदर देखील वाढत चालला आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गोर-गरीब जनतेवर उपासमारीचे संकट पुन्हा ओढवले आहे. संगमनेरात निराधार लोकांची मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे. या गरजु लोकांना कोणीतरी दिलासा देण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. एरव्ही गावात पांढरे कपडे घालुन नामदार साहेबांच्या मागे पुढे हिंडणारी लोक आता कुठे नॉटरीचेबल झालेत हे कळेनासे झाले आहे. साहेबांच्या छत्रछायेखाली आपली राजकारणाची भूक भागवून घेणारे पुढारी मात्र संकटाच्या काळात लोकांची चौकशी करण्यासाठी सुद्धा फिरकले नाही. त्यामुळे, संगमनेरातील जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक शिखर संस्थेचे चेअरमन हे हरवले आहे की काय? अशी संतप्त टिका जनतेकडून सोशल मीडियावर होताना दिसत आहे.
निवडणुकीपुर्ती जनतेची काळजी घेणारे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक हे कोरोनाच्या संकटात अदृश्य झाले आहेत. शहरातील काही सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढे येऊन मदतीचा हातभार लावला. आपल्या प्रभागात कोणाची हेळसांड होणार नाही याची दक्षता यांनी यावेळी घेतली. माणुसकीच्या नात्याने त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. पण, लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांनी आपल्या कर्तव्याला तिलांजली वाहिली आहे. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे. राजकारणात उधळपट्टी करायची म्हणल्यावर कोणीच कमी पडत नाही. तेव्हा अनेक इच्छुकांची भाऊ गर्दी होते. यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेला अनेक ठेकेदार, बिल्डर, डेव्हलपर्स यांना राजकीय आखाड्यात संधी मिळाली. यांच्यापुढे विरोधी उमेदवारांचा ठाव ठिकाणा ही लागला नाही. आर्थिक बाजू कमकुवत असल्याने विरोधक टिकाव धरू शकले नाहीत. असेच विश्लेषण राजकीय अभ्यासकांनी केले होते. ह्या वर्षीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी निवडणूकीत आपल्या पायाला भिंगरी बांधली होती. जनतेला आश्वासन देताना यांची दमछाक होत होती. मतांच्या राजकारणापोटी त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. प्रत्येक मतदाराच्या घरात जाऊन कोणी वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडत होते तर कोणी समन्वय असनाऱ्यांना मिठी मारत होते. मतदानाचे चिन्ह सांगून याच चिन्हावर बटन दाबण्यास सांगत होते. हिच तळमळ लक्षात घेऊन जनतेने त्यांना डोक्यावर घेतले व मोठ्या मताधिक्याने निवडून देखील दिले.
आता जिल्ह्यापरिषद, पंचायत समिती व नगरपालिका सदस्य म्हणल्यावर तो खर्च निव्वळ लाखोंत असतो. आता तालुक्यात कोरोना नागरिकांच्या जीवावर बेतला आहे. कोरोनाने 78 जणांचा बळी घेतला आहे. तालुक्यात कोरोना वाडी-वस्तीवर पोहचला. मात्र, या काळात आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्यांनी, पंचायत समिती सदस्यांनी व नगरसेवकांनी नागरिकांना कोरोना संकटाच्या काळात वाऱ्यावर सोडले. मग जेव्हा निवडणूक लागते तेव्हा प्रत्येक मतदाराचे उंबरे झिजवणारे हे सदस्य आता कुठे गेले? असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनाला भेडसावत आहे. मात्र, ह्या चार वर्षात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे चार वर्षात कार्यक्षम दिसले नाहीच नाही, पण या संकटातही त्यांचा पांढरा कपडा चमकला नाही. त्यांची हजेरी तेव्हाच लागते जेव्हा नामदार साहेब संगमनेरला येणार असतात. तेव्हा मात्र, समाजसेवेचा बुरखा घालुन हे बगळे ताठ मानेने फिरतात.
दरम्यान, नामदार साहेबांवर महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठी जबाबदारी आहे. त्यांना संपूर्ण राज्यात लक्ष द्यावे लागते. संगमनेरात देखील प्रत्येक समस्येला त्यांनाच तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ते सारखे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यस्त असतात. पण, साहेबांच्या नावावर निव्वळ मिरवणारे प्रत्येक कार्यलयातील पायऱ्या मोजणारे आपल्या कामासाठी फक्त नावाचा वापर करणारे व गडगंज पैसा कमावणारे आता नामदार साहेबांनी देखील ओळखले पाहिजे. कारण, आताच झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये यांच्यावर गावातील जनतेकडून नाराजीचा सुर पाहायला मिळाला आहे. मातब्बर नेत्याच्या गावात त्यांचे पॅनल पडले तर पहिल्या पेक्षा अधिक भाजप-सेनेचे सदस्य निवडून आले आहेत. हे विसरून त्याकडे काना डोळा करुन चालणार नाही. कारण, हे येणाऱ्या काळात साहेबांना जड जाऊ शकते. त्यामुळे, जनतेकडून हळूहळू यांना विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे असे डोमकावळे साहेबांनी आत्ताच निवडून बाजुला सारले पाहिजे असे मत त्यांच्या हितचिंतकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, ना. साहेब नेहमी निवडणुकींमध्ये भाकर फिरवत असतात त्यामुळे आपला नंबर ह्या वेळेस लागतो की नाही याची कल्पना कोणालाच नसते. त्यामुळे आपला होणारा खर्च व्यर्थ जायला नको अशी ही भावना अनेकांची असू शकते अशी तालुक्यात चर्चा आहे. कारण, एकाच पदाला 4 ते 5 जण आपला दावा करतात नंतर कोणाला ठेवायचा आणि कोणाला काढायचे हे सर्व नामदार साहेबच ठरवतात. त्यामुळे, या कोरोनासारख्या कठीण काळात देखील जो जनतेसाठी काम करील त्यालाच संधी द्यावी. अशा प्रतिक्रिया संगमनेरातील सुज्ञ नागरिकांन कडून सोशल मीडियावर उमटत आहे. पुढील वर्षभरात नगरपालिका तर दिड वर्षांनी जिल्हापरिषद, पंचायत समिती आहे. जर अशाच संतप्त प्रतिक्रिया जनतेकडून उमटत राहिल्या तर पुढील काळात अनेक दिग्गजांना धक्का बसु शकतो. असे राजकीय विश्लेषणाना वाटते. त्यामुळे, साहेबांनी देखील या बाबी विचारात घेतल्या पाहिजे.