संगमनेरात 163 तर अकोल्यात 111 रुग्ण पॉझिटीव्ह.! बाहेर पडले त्यांना बडविले.! 2 दिवसात 100 जाळले.! खासदार आमदार गेले कोठे.!
सुशांत पावसे
संगमनेर (प्रतिनिधी) :-
संगमनेर आज कडकडीत बंद असले तरी कोरोना मात्र थांबायचे नाव घेत नाही. आज शनिवार दि.10 एप्रिल रोजी तब्बल 163 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर 1 हजार 225 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. आज 26 जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये कोरोना आता वाडी-वस्तीवर जाऊन पोहचला आहे. तालुक्यातील 166 गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. तर आजपर्यंत 69 जणांनी उपचारादरम्यान आपला जीव गमवावा लागला आहे. आज अखेरपर्यंत 9 हजार 832 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 1 हजार 225 वगळता सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. तर उद्या टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय होणार आहे. त्यात कदाचित १५ दिवस तडकडीत लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. असा अंदाज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तविला आहे.
खरंतर संगमनेरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. सुरवातीस 30 ते 40 रुग्णांची सरासरी होती, ती आता 150 ते 200 वर जाऊन पोहचली आहे. सर्व हॉस्पिटल संपूर्ण क्षमतेने भरत आहे. पण तेथे देखील रेमडीसीवरचे औषध उपलब्ध होत नाही. डॉक्टर रेमडीसीवर चिटी लिहुन देतात पण आणायचे कोठून ? याचा शोध आजपर्यंत रुग्णाचे नातेवाईक घेताय. जर भेटले तर अव्वाच्या सव्वा भावात ते घ्यावे लागत आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. एकीकडे हॉस्पिटलचे लाखो रुपयांचे बील तर दुसरीकडे औषध नाही, असा अनागोंदी कारभार संगमनेरमध्ये पाहायला मिळत आहे. जर कोरोनाची आकडेवारी हळूहळू वाढत होती तेव्हाच प्रशासनाने कोरोनाचे सेंटर उभे केले असते किंवा फारशी लक्षणे नसणाऱ्याना विलगिकरन कक्षेत ठेवले असते तर कोरोनाची संख्या आटोक्यात आली असती असे मत समाजसेवक व सोशल मीडियावर जनतेकडून उमटत आहे.
दरम्यान, नामदार बाळासाहेब थोरात संगमनेर प्रशासनाबरोबर बैठका घेत आहेत. पण, आतापर्यंत त्या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला हे जनतेला मात्र कळेनासे झाले आहे. हे निर्णय चार भिंतीपुरतेच मर्यादित राहतात की काय ? अशी टिका देखील संगमनेरचे सुज्ञ लोक करत आहेत. एकीकडे राज्याचा गाडा त्यांनी चालवला पण संगमनेरात आरोग्य विभागाचा गाडा चालविणे त्यांना जिकरीचे होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऐवढेच काय.! संगमनेरच्या प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देखील औषध उपलब्ध होत नाहीत.! यापेक्षा कय दुर्दैव असू शकते ? एकीकडे तालुक्यातील आरोग्य विभागाचे औषध संपत आहे तर दुसरीकडे कोविड सेंटर वेळेवर उभारली नसल्याने खिशाला झळ बसत आहे. तर मिनी लॉकडाऊन चालु आहे तरी कोरोनाचा आकडा हाताबाहेर जाताना दिसत आहे. त्यामुळे पुर्णत: कायम लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जात आहे. पण त्यामुळे व्यापारी, कामगार, शेतकरी व्यावसायिक या सर्वांनाच मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे संगमनेरचे नागरिक चांगलेच अडचणीत सापडणार आहे. एव्हाना सापडले आहेत.
दरम्यान, येवढ्या कठीण प्रसंगी खासदार लोखंडे संगमनेरात साधे आढावा बैठक घेण्यासाठी देखील आले नाही. पण, याच संगमनेरच्या जनतेने त्यांना बलाढ्य थोरतांच्या विरोधात जाऊन सात हजार मतांचे लीड दिले होते. तेथे हे मोहदय साधे डोकावून देखील पाहत नाहीत.! तर, जे विखे पाटील विधानसभेच्या काळात गावागावात स्वत:चे संघटन बांधून स्वत:चे अस्तित्व निर्माण करु पाहत आहेत, त्याच संगमनेरकरांच्या आरोग्याचे अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसत असून देखील ते येथे डोकून देखील पहायला तयार नाहीत. आता संगमनेरची जनता अडचणीत आहे वरती ठाकरे सरकार आहे. साधं रेमडीसीवरची देखील मागणी करू शकत नाही का? आपल्या निधीतून आरोग्य यंत्रणेची परिस्थिती सक्षम करू शकत नाही का? असे एक ना अनेक प्रश्न जनतेच्या मनाला भेडसावत आहेत. मात्र, त्याचे उत्तर कोणाला मिळत नाही. कोरोनाचे संकट संगमनेरकरांच्या डोक्यावर थै-थै नाचत आहे. तर दुसरीकडे खासदार सदाशिव लोखंडे या सर्व परिस्थितीत तालुक्यात कुठं दिसायला तयार नाही. त्यांची कोणतीही मदत तालुक्यापर्यंत पोहचली याबद्दल जनतेच्या मनात साशंकताच आहे. तरी देखील कोविड संकटात मदत वाटपात ते देशात 25 व्या क्रमांकावर दिसतात याबाबत जनतेच्या मनात शंकेचे घर निर्माण झाले आहे.
दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना नगरजिल्ह्याचा विसरच पडला आहे की कय.? निव्वळ नगर जिल्ह्यात येऊन भाजपवर टिका करण्याची मुसाफिरी करत बसले आहेत अशीच टिका त्यांच्यावर होऊ लागली आहे.कारण, संगमनेरात कुठल्याही प्राथमिक आरोग्य केंद्राला ते भेट देऊ शकले नाही, हे दुर्दैव आहे. जर पालकमंत्रीच येऊ शकले नाही तर त्यांनी पालकत्व कसलं व कोणाचे स्विकारले या बाबत मुश्रीफांवर जनतेकडून टिकेची झोड उठली आहे. पालकमंत्री यांनी जिल्ह्याकडे पाठ फिरवली की अधिकारी देखील जनतेकडे पाठ फिरवतात ही वस्तुस्थिती आहे. एकेकाळी संगमनेरकरांवर असेच संकट आले होते तेव्हा पालकमंत्री दिलीप वळसे पाटील हे होते. शहरातील काही व नदीकाठच्या गावातील घर पाण्याखाली गेले होते. त्यांनी गुडघ्या एवढ्या पाण्यात जाऊन संगमनेरचा आढावा घेतला आणि तातडीने अधिकाऱ्यांना सुचना देऊन नागरिकांच्या समस्या सोडवल्या होत्या. आजही जनतेच्या मनात दिलीप वळसे पाटील यांनी खर केलेले कायम आहे. तर मुश्रीफ पालकमंत्री झाल्यापासून जनतेच्या पदरात कायम निराशाच पडल्याचे दिसत आहे.
तर
आता शासन कुचकामी ठरत असल्यामुळे राजूर व राजूर परिसरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नियम मोडल्यास मोठ्या दंडात्मक कारवाईला लोक सामोरे जात आहे. मात्र, पोलिसांच्या या कामगिरीचे राजूर मधून कौतूक होताना दिसत आहे. राजूर पोलिसांनी उचललेला कारवाईचा बडगा. मा. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्याकडून राजूर व परिसरातील नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे. विनाकारण फिरतांना आढळून आल्यास १००० रुपये, विना मास्क ५००, सोशीयल डिस्टन्स १०००, दुकाने १०,०००, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान थुंकणे १००० इतकी होणार दंडात्मक कारवाई दिनांक 5 एप्रिल 2021 ते 30 एप्रिल 2021 पर्यंत खालील आस्थापना बंद करणेबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने अत्यावश्यक सेवा वगळता, हॉटेल, रेस्टॉरंट्स, बार, फूड, कोर्ट हे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. तसेच पार्सल घरपोहच सेवा देणाऱ्या हॉटेल कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच सलून दुकाने, ब्युटी पार्लर, व्यायामशाळा, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सास्कृतिक कार्यक्रम, संम्मेलने सर्व कार्यक्रम बंद करण्यात आले आहेत. तर यावेळी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून हॉस्पिटल डायग्नोसटिक सेंटर, दवाखाने, मेडिकल स्टोर, किराणा दुकान, डेअरी, बेकरी, भाजीपाला, फळ दुकाने, मिठाई खाद्यापदार्थ दुकाने, सार्वजनिक वाहतून टॅक्सी, शेती संबंधीत सेवा चिकन, मटण, पेट्रोल पंप गॅस इत्यादी सेवा सुरू ठेवण्यात आले आहे.
दरम्यान आज अकोले तालुक्यात कडकडीत बंद पहायला मिळाला, यावेळी जे काही हौसे-गौसे-नवसे रस्त्यावर पहायला मिळाले त्यांना पोलिसांकडून चांगलाच काठीचा प्रसाद मिळाला. मात्र, काही लोक फालतू कारणे काढून घराबाहेर पडताना दिसतात हे मात्र फार मोठे दुर्दैव आहे. त्यामुळे, अशा व्यक्तींना प्रसादासह दंडात्मक देखील कारवाईला सामोरे जावे लागल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, तहसिलदार मुकेश कांबळे यांनी यापुर्वी जो काही निर्णय घेतला होता. तो योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. अन्यथा जसे नगर शहरात दोन दिवसात १०० मयत रुग्ण जाळले गेले. तसे अकोले तालुक्यात देखील दशकभर लोकं जाळल्याचे चित्र पहायला मिळाले असते. काल अरिफ सारखा चांगला व्यक्ती कोरोनाने खाल्ला तर सागर नवलेसह अनेकांनी जगाचा निरोप घेत तालुक्याला दु:खाच्या खाईत लोटले आहे.
आज अकोले तालुक्यात १११ रुग्ण मिळून आले आहेत. तर संगमनेरात १६३ रुग्ण. तसेच संपुर्ण जिल्ह्यात २ हजार २१० रुग्ण आज एका दिवसात मिळून आले आहेत. तसेच अकोल्यात २०२१ मध्ये १ हजार ५५३ तर आजवर वर्षभरात ४ हजार ४७७ रुग्ण पॉझिटीव्ह झाले असून ४७ व्यक्तींनी अखेरचा श्वास घेतला आहे. काल अकोल्यात १२९ रुग्ण मिळून आले होेते. एकंदर हा आकडा पाहता आता अकोल्यात कोरोनाचा अतिरेख झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे, प्रशासन जे काही नियम व अटी घालुन देत आहेत. त्यांचे पालन करण्याची गरज आहे.
आकाश देशमुख