यांना लाजा कशा वाटती नाहीत.! तो गेला अजून किती घालवायचे आहेत.!

 

mla nyay dya

सार्वभौम (अकोले) :- 

                   कोल्हार-घोटी या राज्य महामार्गाला नेमकी आणखी किती बळी द्यायचे आहेत हे एकदा ठेकेदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना जाहिरपणे सांगितले पाहिजे. म्हणजे तो मृत्युचा कोरम पुर्ण होत नाही. तोवर कोणी रस्ता दुरूस्तीची मागणी करणार नाही. कारण, आज डोळ्याची पाते लवते ना लवते तोच आपला मित्र सागर नवले हा दृष्टीआड झाला आहे. त्याच्यासारखे व्यक्तीमत्व क्षणात काळाच्या पडद्याआड जावे हे अनेकांच्या काळजाला चटका लावून जाणारे आहे. आज खरोखर रस्त्याचे काम नसते झाले तरी चालले असते. मात्र, सागरचे जाणे हे फार दुर्दैवी आहे. या पलिकडे थोडे कटू पण सत्य आहे की, चुकीच्या लोकांचे सानिध्य देखील तरुणांना तितकेच घातक आहे अशा प्रकारची चर्चा देखील तालुक्यात फार हळव्या पद्धतीने चर्चीली जात आहे. कारण, गेल्या कित्तेक दिवसांपासून सागर हा तालुक्यातील काही वाळुतस्कारांच्या सानिध्यात होता. त्यांच्या संगती ह्या कशा असतात हे नव्याने सांगायला नको.! त्यामुळे, रस्ता आणि संगत ही सागरला मृत्युच्या दारापर्यंत घेऊन गेली अशा प्रकारची चर्चा शहरात सुरू होती.

भाऊसाहेब नवले हे इंदोरीचे अगदी प्रेमळ व प्रमाणिक व्यक्तीमत्व, अकोल्याच्या कन्या विद्या मंदीर येथे शिपाई पदावर कार्यरत होते. अचानक काळाचा घाला आला आणि त्यांना घेऊन गेला. तेव्हा त्यांचा मुलगा सागर नवले (वय ३०, रा. इंदोरी, ता. अकोले. जि. अ.नगर) हा अगस्ति कॉलेजमध्ये ११ वीत आमच्या सोबत शिक्षण घेत होता. अचानक वडिलांच्या निधनाची वार्ता समजली आणि बिचारा धाय मोकलून रडू लागला. तेव्हा त्याच्या पाठीवर हात ठेऊन अनेकांनी धिर दिला. तुला एकटे पडू देणार नाही असे म्हणत त्याच्यासमोर अश्‍वासनांची खैरात मांडली. कालांतराने सागर कन्या विद्या मंदिर शाळेत शिपाई या पदावर कार्यरत झाला. तेव्हा खर्‍या अर्थाने त्याचा स्वार्थी दुनियेशी संघर्ष सुरू झाला होता. अगदी तोडक्या पगारावर सागर शाळेची घंटा वाजवत होता. मात्र, अंतीम क्षणी तेथे त्याच्या हाती लागले तर काय? जे वाजवत होता तेच.!

सागरने दोन ते तीन वर्षे तेथे नोकरी केली. मात्र, अनुकंपाचा विषय पुढे आला तेव्हा अनेकांच्या रोषाला त्यास सामोरे जावे लागले. कालांतराने तो विषय थेट कोर्टात गेला आणि सागर मयत होईपर्यंत तो अद्याप कोर्टातच प्रलंबित राहिला. आता पुढे हा खटला कोणासाठी, कोणी आणि कसा चालवायचा, हा प्रश्‍न उपस्थित न केलेलाच बरा. अन्यथा त्याच्या मृत्युनंतर देखील त्याच्या भावनांची लक्तरं वेशीवर टांगल्यासारखी होईल. त्यामुळे, या विषयाला पुर्णविराम.

तोडक्या पगाराची नोकरी गेली.  मग उपजिविका करायची कशी? असा प्रश्‍न त्याच्यासमोर पडला. तेव्हा त्याला जगनशेठ यांनी सहारा दिला. अर्थात सागर फार प्रामाणिक होता. त्यामुळे, तो सहज कोणाच्याही नजरेत भरेल किंवा सहज कोणीही त्याच्या प्रेमात पडेल अशी त्याच्या जगण्याची शैली होती. त्यामुळे, जगनशेठ यांचा सगळा कारोबार तो एकटा सांभाळत होता. अगदी कमी वयात त्याच्याकडे फार पैसा खेळता झाला होता. जगनशेठ यांनी कधी सागरवर अविश्‍वास दाखविल्याचे आठवत नाही. मात्र, सागरचा ज्या काही अन्य वाळुतस्करांशी संपर्क झाला होता. तो ज्या-त्या ठिकाणी ठेवण्यात त्याला अपयश आले. जगनशेठने दुनिया पाहिली मात्र, त्यांच्या कृतीचा कधी अतिरेख झाला नाही. त्या सानिध्यात राहून सागर तो एक गुण घेऊ शकला नसल्याची ती एक खंत आहे. कारण, नको त्या व्यक्तींच्या सानिध्यात राहून सागर मृत्युला हळुहळु कवटाळत होता. याची त्याला देखील कल्पना नव्हती.

वरील वास्तवाची चर्चा होणे साहजिक आहे. कारण, एक शांत, संयमी आणि प्रेमळ व सोज्वळ स्वभावाचा तरुण आज या तालुक्याने गमविला आहे. मात्र, या पलिकडे प्रचंड चिड निर्माण होते ती या प्रशासकीय व्यवस्थेची. कारण, जसे या महामार्गाचे काम सुरू झाले आहे. तेव्हापासून ८ जणांचा बळी या रस्त्याने घेतला आहे. झाडाझडती या कादंबरीत एका ठिकाणी वर्णण केले आहे. की, जेव्हा एखादे बांधकाम हाती घेतले की, पुर्वी त्यात काही बळी दिले जायचे. तशा पद्धतीची या मुर्दाड प्रशासनाने शपथ घेतली आहे की काय? असा प्रश्‍न आता सुज्ञ लोक उपस्थित करु लागले आहेत. कारण, वर्षे-दोन वर्षे किंवा आणखी किती दिवस हे काम चालणार आहे? आणि अजून किती नागरिकांचे बळी यांना हवे आहेत? हे त्यांनी जनतेला सांगितले पाहिजे. जसे एखाद्या मिटींगचा किंवा संसदेचा कोरम (निर्धारीत केलेली संख्या) पुर्ण होत नाही तोवर ती सभा सुरू होऊ शकत नाही अशा प्रकारे यांना कोल्हार घोटी महामार्ग पुर्ण करण्यासाठी मृत्युचा कोराम हवा आहे की काय? असा सवाल लोक उपस्थित करत आहेत.

आता लोकांना एक गोष्ट कळायला तयार नाही. या ठेकेदाराने आणि अधिकार्‍यांनी रस्त्याला इतकी थिगळं का मारुन ठेवली आहेत देव जाणे.! ज्या ठिकाणी प्रचंड खड्डे आहेत त्या ठिकाणी तिळमात्र रस्ता केलेला नाही. तर जेथे बर्‍यापैकी रस्ता आहे. तेथे मात्र, यांचा रस्ता करायचा सुरबुडा उठला आहे. आज पथिक पेट्रोलपंपाच्या समोर गाड्या चालविताना किती कसरात करावी लागते हे नव्याने सांगायला नको. तर सगळ्यांना माहिती आहे, संगमनेरला जाताना सातवा मैल किंवा निमाई डेअरी ते संगमनेर हा रस्ता किती चांगला आहे. त्या तुलनेत अकोले ते संगमनेर म्हणजे चंद्रावर कमी इतके पृथ्वीतलावर खड्डे आहेत. यांचे हात इथे का धजत नाहीत? अर्थात नामदार साहेबांचा प्रशासनावर फार मोठा वचक आहे. मात्र, डॉ. किरण लहामटे यांना प्रशासन नुकते बोटावर खेळविण्याचा प्रयत्न करते. इतकेच काय! माजी आमदारांनी देखील बघ्याची भुमिका घेत होऊद्या त्रास म्हणजे आमची किंमत कळेल अशी खुणगाठ बांधली आहे की काय? असे बोलले जात आहे. या सगळ्यात जनता अकोले संगमनेरला जाताना किती घाणेरड्या आणि कोणा-कोणाला शिव्या देत असेल हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

आता जनतेने ठाम भुमीका घेतली पाहिजे. एकीकडे काम सुरु आणि मग आंदोलन मागे यावर ठाम राहिले पाहिजे. कारण, कळस येथे भाजपचे भाऊसाहेब वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे यांनी उपोषण केले होते. चार दिवसात अकोले ते कळस दोन्ही बाजुंचा रस्ता करुन देतो असे लेखी अश्‍वासन दिले होते. झाले काय? प्रशासनाने त्यांना घुट्टाच दाखविला. आंदोलकांना पाणी पाजले आणि चालते झाले. महिना उलटला रस्ता तोच खडतर आहे. त्यामुळे, आता आश्‍वासने करुन पांचाट भुमीका घेऊन बुळगा विरोध होत असेल तर असल्या गुदगुल्या बंद केल्या पाहिजे. सागर नवले संदर्भात पहिले दोषी अधिकारी, ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण, याच गेंड्याच्या कातड्यांमुळे तीन महिन्यांपुर्वी कोतुळ परिसरात दोन तरुणांचा जीव गेला होता. तेव्हाच यांच्यावर गुन्हे ठोकणे अपेक्षित होते. मात्र, दुर्दैवाने तालुक्यात बुजगावणे पांघरून भाषणे ठोकणारे लोक फार झाले असून प्रत्यक्ष न्यायासाठी पाठपुरावे करणारे फार कमी असल्याचे दिसते आहे. त्यामुळे, अपेक्षा करुयात की, सागरला न्याय देताना कोणत्याही प्रकारचे राजकारण न होता सुज्ञ लोक योग्यती भूमीका घेतील आणि उद्या सकाळी होणार्‍या आंदोलनातून सकारात्मक मार्ग निघेल.

भाग १ क्रमश: