...तर गायकर साहेब पुन्हा जिल्हाबँकेचे अध्यक्ष.! कसे असतील गणिते.! पिचड साहेबांमुळे औंदा अकोल्याकडे पवारांचे विशेष लक्ष.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
माजी मंत्री मधुकर पिचड भाजपत गेले आणि त्यांच्या पाठोपाठ अनेकजण त्याच वाटेवर चालते झाले. मात्र, जसे साहेबांनी सोईचे राजकारण पाहिले, तसे इतरांनी का पाहू नये. त्यामुळे, त्यांचा पराभव झाला आणि त्या पाठोपाठ साहेबांच्या निष्ठावंतांना गळती लागली. या सर्वांच्या केंद्रस्थानी होते ते म्हणजे सिताराम पाटील गायकर. कारण, त्यांच्याकडे बहुजनांचा नेता म्हणून आजही तितक्याच आदबीने पाहिले जाते आणि तेच तालुक्याचे राजकारण पलटवू शकतात हे देखील तितकेच वास्तव आहे. हे खुद्द अजित पवार यांनी ओळखले आणि रोगरोष बाजुला ठेऊन स्वत: लक्ष घालत त्यांना जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून नेले. अर्थात दादांसारखा माणूस तालुक्यात वैयक्तीक लक्ष घालतो म्हणजे येथे काहीतरी गणिते असतीलच. मात्र, त्यांनी पिचडांवर जी नाराजी आहे ती त्यांच्या विश्वासातील व्यक्तींवर कधी दाखविली नाही. म्हणून तर गायकर साहेब जिल्हाबँकेत चेअरमन आणि कैलास वाकचौरे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे गटनेते राहिले. आता जर दादा तालुक्यात लक्ष घालु शकतात तर ते पुन्हा गायकर साहेबांना बळ देऊ शकतात, एकीकडे चेअरमन पदासाठी महाविकास आघाडीची ओढाताण सुरू असताना यात गायकर हे एकमेव व्यक्तीमत्व असे आहे की, त्यांच्याकडे भलाभक्कम अनुभव आहे. ते काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील दुवा साधत योग्य संधान साधु शकतात. कारण, गेल्या सहा वर्षात अनेक आपत्त्या आल्या, आरोप प्रत्यारोप झाले. मात्र, गायकर यांनी स्वत:ला सिद्ध करुन दाखविले. इतकेच काय.! कधी नव्हे इतका जिल्हा बँकेचा विकास झाला आणि आज हीच बँक आशिया खंडात नावारुपाला आली आहे. त्यामुळे, एकंदर विचार करता ना. थोरात साहेबांचे शेजारी व अघाडीचे सहाकरी आणि दादांचे वारकरी म्हणून ते या पादास पुन्हा न्याय देऊ शकतात त्यामुळे, त्यांना पुन्हा जिल्हा बँकेत चेअरमन करावे अशा प्रकारची मागणी तालुक्यातून होऊ लागली आहे.
खरंतर, सन 2019 च्या काळात भाजपला सत्तापासून दुर ठेवण्यासाठी राज्यात फार धक्कादायक व ऐतिहासिक घडामोडी घडल्या. सत्तांतरापुर्वीच अनेकांचे गत्यांतर झाले पवार साहेबांच्या धुरंधरी नंतर गच्छंती देखील झाली. त्यात माजी मंत्री मधुकर पिचड यांची चर्चा देशभर झाली. त्यांनी घड्याळ सोडले, मात्र, त्यांचे सहकारी जिल्हा पातळीवर बारामतीशी एकनिष्ठ राहिले. म्हणून तर गायकर साहेब जिल्हाबँकेत आणि कैलास वाकचौरे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन ताठ मानेने उभे होते. तालुका पातळीवर थोडफार प्लस-मायनस होणं साहजिक होतं. कारण, ज्यांनी उभे केले त्यांच्या विचारांना कायमचे सोडून देण्याची परंपरा या मातीत मुळीच नाही. कारण, आजही पिचड भाजपत असेल तरी त्यांच्या मनात आणि विचारांत पवार साहेबांचा वारसा कायम आहे, हे उतावीळ राजकारणी काय जाणणार? त्यामुळे, एकंदर पाहता जेव्हा गायकर साहेबांविषयी तालुक्यातून विरोधाची प्रचंड रि ओढली जात असताना थेट मुंबईहून दादांचे आदेश आले आणि अनेकांनी हाताची घडी तोंडवर बोट ठेवत राष्ट्रवादी पुन्हाचा नारा दिला. ही खरी राजकीय पारख म्हणावी लागेल.
खरंतर, निष्ठावंत नेत्यांना पक्ष वाढवायचा असतो तर कार्यकर्ते हे हा माझा तो तुझा असे म्हणून गावगाड्याचे राजकारण द्वेषाने करीत असतात. अर्थात याला मुळीच राजकारण म्हणता येत नाही. ते धडे फक्त पवार कुटुंबाकडूनच गिरवायचे असतात. आता अजित पवार यांनी तालुक्यात पिचड कुटुंबाला एकटे पाडण्यासाठी त्यांच्या काखेत असणारे जालीम शस्त्र काढून घेतले आहे. गायकर यांना जिल्हा बँकेवर बिनविरोध घेत ते पुन्हा त्यांना चेअरमन पदाची संधी देऊ शकतात किंवा कारखाना ताब्यात घेण्यासाठी बळ देऊन तेथे मोठी संधी देऊ शकतात. मात्र, तालुक्यापेक्षा अकोल्यातून राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी गायकर यांना जिल्ह्यावर मोठी संधी दिली तर बहुजन समाज हा राष्ट्रवादीकडे टिकूण राहिल. कारण, आज पिचड की गायकर अशा दोन गटात अनेक कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत आहेत. पण, नवरा मेला तरी चालेल, सवत रांडकी झाली पाहिजे अशा प्रकारे कठोर व सडेतोड भूमीका घेणारे तालुक्यात फार कमी लोक आहेत. त्यामुळे, येणार्या काळात गायकर यांना जिल्ह्यात पुन्हा संधी मिळणे हे पक्षासाठी हिताची गोष्ट आहे.
एकंदर, हेरंब कुलकर्णी व दिपक महाराज देशमुख यांनी योग्य मत मांडले होते. जिल्हा बँक म्हणजे आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी राखीव आहे की काय? त्यामुळे, गायकर यांच्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती जर तेथे पुन्हा बसत असेल तर ते जिल्ह्यासाठी चांगली गोष्ट आहे. कारण, गेल्या सहा वर्षात गायकर यांनी 1.5 लाखावरुन 3 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज शेतकर्यांना दिले आहे, शेतकर्यांना घरकुलासाठी अल्पदरात कर्जपुरवठा केला आहे, बँकेचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच तरुणांना रोजगार म्हणून मोठी नोकर भरती त्यांनी घेतली, जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकर्यांना पिक विमा योजनेचा लाभ झाला आहे, कामगारांना 50 लाख रुपये आरोग्य विम्याचे कवच याच व्यक्तीने दिले. एमएसइ बँकेकडे असणारे जिल्ह्यातील कारखाने जिल्हा बँकेकडे घेऊन त्यांनी जिल्ह्यातील कारखानदारी त्यांनी वाचविली आहे, तिला बळ दिले आहे. राज्यात जसे फक्त पुण्यात गावोगावी एटीएम सुविधा देणारी व दुर्गम भागात मोबाईल व्हॉन बँकींगची सुविधा आहे तेच मॉडेल त्यांनी जिल्ह्यात राबविले आहे. त्यासाठी त्यांचा गौरव देखील झाला आहे. इतकेच काय! शेतकर्यांच्या मुलांना शेतीपुरक प्रक्रिया उद्योग करण्यासाठी वाजवी दरात कर्ज पुरवठा करण्यात आला. म्हणजे गेल्या सहा महिन्यात त्यांनी इतकी कामे केली आहेत की, त्याची एका लेखात मांडणी करणे देखील अशक्य आहे.
एकंदर, आता अजित दादा पवार आणि नामदार थोरात साहेब यांनी जर ठरविले तर पुन्हा गायकर पाटील यांच्या गळ्यात जिल्ह्याबँकेचे सुत्र पडू शकतात. कारण, आता श्रीगोंद्यातून राहुल जगताप, दुसरीकडे चंद्रशेखर घुले यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा सुरू आहे तर भाजपकडून शिवाजी कर्डीले आणि काँग्रेसकडून कानवडे याचे नाव पुढे येऊ लागले आहे. मात्र, वास्तवत: चर्चा काहीही असल्या तरी राष्ट्रवादीचे संचालक जास्त आहे त्यामुळे, जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहणार आहे. त्यात सर्वसमावेशक व्यक्तीमत्व म्हणून किंवा अभ्यासू आणि यशस्वी अनुभवी म्हणून गायकर पाटील यांचे नाव अग्रभागी येते. त्यामुळे, तुर्तास अद्याप कोणाचेही नाव निच्छित नाही. मात्र, राजकारण हे रात्रीतून बदलते हे देखील दादांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे, झाले तरी अमित भांगरे देखील चांगल्या पदावर विराजमान होऊ शकतात. कारण, अनपेक्षीत धक्का देणे हीच तर राष्ट्रवादी पक्षाची खासियत आहे. त्यामुळे, वेट अॅण्ड वॉच.! आता दादा आणि नामदार हे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.