अर्रर्र.! ना.थोरात साहेबांच्या मुलीच्या नावे सायबर अटॅक.! फेसबुकहून फोन पे वर तो लुटेरा पैसे मागतो! पोलिस चौकशी सुरु.!

- सुशांत पावसे 

 सार्वभौम (संगमनेर) :- आजकाल ऑनलाईन लुटेरे पैशासाठी कोणाला हात घालतील याचा काही नेम राहिला नाही. कारण, आता सामान्य जनता आणि व्यापारी सोडून या बहाद्दरांनी चक्क मातब्बर राजकारण्यांच्या मुलींच्या नावे लुट सुरू केली आहे. कारण, दस्तुरखुद्द महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांची सुकन्या जयश्रीताई थोरात यांच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट तयार करुन एका अज्ञात व्यक्तीने पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आज बुधवार दि.3 मार्च 2021 रोजी दुपारी अशा प्रकारची सायबर क्राईमची तक्रार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. संगमनेर तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक संजय मालपाणी, नगर मधील एक पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी अल्ताफ शेख आणि महसुलमंत्री, बाळासाहेब थोरात, यांसाख्या आणखी बड्या मातब्बर लोकांचे अकाऊन्ट हॅक होउ शकते तर आपले का नाही ?

त्याचे झाले असे की, आजकाल देशात कायदेशीर माध्यमांचा प्रभाव कमी आणि सोशल मीडियाचा प्रभाव जनतेवर अती झाला आहे. त्यामुळेच तर सन 2014 साली मोदी सरकारने आपली पोळी भाजून घेत सोशल मीडियाला अनन्य साधारण महत्व प्राप्त करुन दिले. मात्र, त्याचा अतिरेख इतका झाला की, सामान्य जनतेची खुलेआम लुट होऊ लागली. याच मीडियाचा वापर करुन ना. बाळासाहेब थोरात यांनी देखील स्वत:ची मीडिया ट्रायल केली. मात्र, आज दुर्दैवाने त्यांच्याच मुलीच्या नावे फेसबुकवर एक बनावट खाते तयार करण्यात आले आणि त्याहून अनेकांना पैशाची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे, अशा प्रकारची एक तक्रार संगमनेर पोलिसांकडे करण्यात आली. 

यात सिद्धार्थ थोरात यांनी तक्रारीत म्हणले आहे की, एका अज्ञात व्यक्तीने जयश्री थोरात यांच्या नावे एक बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले आहे. त्याचा गैरवापर करुन या व्यक्तीने दि. 1 मार्च व 2 मार्च रोजी रात्री 10 च्या सुमारास जयश्री थोरात या फेक अकाउंट अनाधिकाराने वापर करून मेसेजच्या माध्यमातून गुगल पे व फोन पे वर पैशाची मागणी केली आहे. हा प्रकार म्हणजे एक खोडसाळपणा असून एकतर पैसा कमविण्यासाठी उभे केलेले ते एक षडयंत्र असू शकते किंवा बदनाम करण्याचे कट कारस्थान. त्यामुळे, संबंधित जो कोणी व्यक्ती असेल त्याचा प्रशासनाने शोध घेऊन त्याने अशा प्रकारचे कृत्य का केले? याची त्याच्याकडून माहिती घेत त्याच्यावर कडक कारवाई करावी. तर अशा प्रकारचे मेसेज कोणाला आले तर त्याला बळी पडू नये. त्यामुळे, आता चक्क महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबाबत हा प्रकार घडल्यामुळे, पोलीस याकडे किती गांभिर्याने पाहतात हे पाहणे महत्वाचे आहे. मात्र, काही झाले तरी, नगर जिल्ह्याची जी सायबर शाखा आहे ती अतिशय तत्पर असून त्यांनी अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यामुळे, त्यांचे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. ते या गुन्ह्याचा देखील तत्काळ छडा लावतील यात तिळमात्र शंका नाही. 

दरम्यान, सोशल मीडियावर फेसबुक, व्हॉटसअँप, इन्स्टाग्राम यावर बनावट अकाउंट खोलुन नामांकीत लोकांचे नाव टाकुन पैश्याची मागणी होत असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे वारंवार येत आहे. त्यामुळे, आजकाल सोशल मीडियाचा वापर अगदी तळहाताच्या फोडा सारखा करावा लागत आहे. आपले अकाउंट कोणी हॅक तर करणार नाही ना? त्याचा चुकीचा वापर तर करणार नाही ना? त्याहून चुकीचे व्यावहार तर होणार नाही ना? कोणी आपला पासवर्ड वापरुन गैरप्रकार तर करणार नाही ना? अशा प्रकारची भिती आता राजरोस निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे, सोशल मीडियाचा वापर करताना फार काळजी घ्यावी लागते आहे.

      दरम्यान, फेसबुक अकाउंट हॅक करून त्याचा गैरवापर केला जात असल्याच्या तक्रारींचे प्रमाण सायबर पोलिस स्टेशनला दिवसेंदिवस वाढते आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दररोज अशा दोन ते तीन तक्रारी येत आहेत. फेसबुक अकाउंट हॅक होऊ नये म्हणून नागरिकांनी फेसबुक अकाउंटचे पासवर्ड बदलून दक्षता घ्यावी. असे आवाहन सायबर पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, लोकांना सोशल मीडियावर वापरायला गोड वाटतो परंतु त्याची काळजी घेणे त्यांना गरजेचे वाटत नाही. त्याचा त्रास सायबर पोलिसांना होत असून हकनाक पोलीस बळ तेथे वाया जात आहे.

फेसबुक अकाउंटचा पासवर्ड, स्वतःचे नाव, आपण वापरात असलेल्या मोबाईल, गाडी नंबर, जन्मतारीख असे ठेवणार्‍यांबाबत हा प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहे. फेसबुक अकाउंट हॅक होऊ नये म्हणून अल्फान्युमेरिक पासवर्ड ठेवावा. जुने पासवर्ड बदलून दक्षता घ्यावी. असे आवाहन सायबर पोलिस स्टेशनने नागरिकांना केले आहे. त्याचबरोबर मोबाइल फोनवर अथवा कॉम्प्युटरवर फेसबुक अकाउंट चालू करताना स्वतःचा युजर आयडी व पासवर्ड कोणाला दिसणार नाही. याची दक्षता घ्यावी.

विशेषत: तुम्हला आश्चर्य वाटेल की, आजवर जे काही गुन्हे घडले आहेत. त्यातील जवळजवळ 80 टक्क्यापेक्षा जास्त गुन्हे हे आपल्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून आथवा पासवर्डची दक्षता घेतली नाही म्हणून मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे, कितीही जवळचा मित्र किंवा मैत्रिणी असली तरी आपले फेसबुक त्याला वापरण्यास देऊ नये, त्याला पासवर्ड शेअर करू नये अशा दक्षतेच्या सूचना प्रशासनाने वारंवार देऊन देखील म्हणतात ना सांगून शिकवून भोपळ्यात बिया, अशा प्रकारची बेजबाबदार कृती सुज्ञ व्यक्तींकडून होताना दिसते आहे.