पिचडांच्या कार्यकर्त्याकडून थेट अजित दादा टारगेट.! तुम्हा पहाटे गेले आणि मेहुणे भर दिवसा.! पुलोदची आठवण आणि १९९५ ची पुनरावृत्ती.!

 

- सागर शिंदे

अकोले (प्रतिनिधी) :-  

                   खरंतर राजकारण म्हटलं की, आरोप प्रत्यारोप आणि मग त्यानंतर त्याचा दाखला देण्यासाठी पहिले इतिहासाचे उत्खनन होते. मग कोण काय बोलले होते आणि कोणी कोठे प्रवेश केला होता. कोणी किती गुण उधळले होते आणि कोणी कोण कसा हस्तक्षेप करत होते, अगदी सगळी सरबत्ती पुढे येते. अगदी तसाच प्रकार आता अकोले तालुक्यात पहायला मिळत आहे. ज्या अजित दादांनी खुद्द पवार साहेबांना न सांगता पहाटे-पहाटे भाजपं गाठलं त्यांनी पवार प्रेम पिचड कुटुंबाला काय सांगावं? ज्यांचे मेहुणे पाटील हे राष्ट्रवादी सोडून भाजपत दाखल झाले त्यांनी काय निष्टा सांगावी असे म्हणते थेट अजित दादा पवार यांनाच वैभव पिचड यांच्या कार्यकर्त्यांनी अगदी गावरान भाषेचा मेवा देत खरबसर टिका केली आहे. तर, दादा तुम्ही राज्याचे नेते आहात, आपण, कारखाने, नगरपंचायती आणि बाजार समिती यांकडे लक्ष देऊन चालणार नाही असे म्हणत एखाद्याच्या मागे व्यक्तीद्वेश म्हणून मागे लागणे, हे तुम्हाला कितपत शोभते आणि ते ही कोणाच्या मागे? ज्या व्यक्तीने राष्ट्रवादी पक्ष हा सह्याद्रीच्या कुशित आणि डोंगराच्या दऱ्या खोऱ्यात नेवून पोहचविला. त्याला राजकारणातून बाजुला ठेवण्यासाठी हा इतका मोठा आटापिटा? हे तुम्हाला शोभत नाही. असे म्हणत तालुक्याला या तरुणाने १९९५ च्या निवडणुकीची देखील आठवण करुन दिली आहे.

              आजकाल, राजकारण आणि राजकीय मतभेद हा मुद्दा प्रचंड मायने निर्माण करणारा झाला आहे. त्यातल्या त्यात जशी २०१९ ची विधानसभा झाली. तेव्हापासून तर बाप रे, बाप.! कारण, हा काळ म्हणजे राजकीय संक्रमणाचा होता असे म्हटले तर काही वावघे ठरणार नाही. कारण, जे काही लोक त्या अपराजित म्हणून भाजपच्या वाटेवर पळत सुटले की पक्ष नव्हे, तेथे जणूकाय एक प्रकारची जत्राच भरली होती. पण, सृष्टीच्या नियमानुसार अति तेथे माती झाली आणि येथे पुन्हा पवार पॅटर्ण राबविला गेला. या दरम्यान राज्यात पवार साहेबांचे सहकारी मधुकर पिचड यांचा पक्षबदल पवार यांना फार जिव्हारी लागला असे बोलले जाते. मात्र, राजकारणात सर्व काही क्षम्य असतं असे म्हणतात. मग त्यांच्या मागे इतके हात धुवून लागणे हे कितपत योग्य आहे.? बरं शरद पवार साहेबांनी देखील सत्तेसाठी बंड पुकारले होतेच की.! मग पिचडांकडे बोट करताना तुम्ही इतिहास का विसरता? तुम्हाला ठाऊक असेल-नसेल, पण तुमच्या माहितीस्तव सांगतो की, सन १९७८ साली जेव्हा आणीबाणी उठली तेव्हा महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस विधानसभेला अलिप्त लढल्या. त्यात रेड्डी काँग्रेसला ६९ जागा, इंदिरा काँग्रेसला ६२, जनता पक्षाला ९९, शेतकरी कम्युनिष्ठ पक्ष १३, माकप ०९ व ३९ जागा अपक्ष आल्या होत्या. तेव्हा जनता पक्षाला "बहुमत" सिद्ध करता आले नाही. म्हणून वसंतदादा पाटील यांनी रेड्डी व गांधी यांच्यात एकोपा करुन ७ मार्च १९७८ ला सरकार स्थापन केले होते. तेव्हा शरद पवार त्यात "उद्याेगमंत्री" होते. त्यावेळी  ४० आमदारांसह पवार साहेब सत्तेतून बाहेर पडले आणि परिणामी सरकार अल्पमतात आले.  वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदाहून पायऊतार व्हावे लागले होते. याचे करते करविते कोण होते ? कोठे होती व्यक्तीनिष्ठा ? कोठे होते पक्षप्रेम, कोठे होती विचारधारा?  त्यावेळी याच पवार साहेबांनी जनता दल, शेतकरी कम्युनिष्ट, माकपं यांच्यासह अपक्ष एकत्र घेऊन पुलोद सरकार स्थापन केले होते. मग, एखादा आपल्याला सोडून गेला मग त्याला संपविण्यासाठी पुरी कायानात एक करणे हे कोणत्या राजकीय गणितात व विचारांत बसते. हे अद्याप माझ्यासारख्या व्यक्तीला समजले नाही. असे मत या तरुणाने मांडले आहे.



               यावर व्यक्त होताना हा तरुण म्हणतो की, दादा तर आमच्यासाठी आदरणीय आहेतच. मात्र, पिचड कुटुंबावर ते ज्या पद्धतीने रोष धरतात. ते आमच्या सदसद विवेक बुद्धीला न पटण्यासारखे आहे. कारण, तेच पक्षनिष्टा सांगणारे दादा आपल्या काकांच्या राष्ट्रवादीत फुट पाडून पहाटे पहाटे २३ नोव्हेबर २०१९ रोजी उपमुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे, त्यांनी इतरांच्याही भावना देखील जाणून घ्यायला पाहिजे. इतकेच काय.! पवार साहेबांना विचारले गेले की, अन्य लोक पक्ष सोडून जातात ठिक आहे. मात्र, नातेवाईक देखील त्याच वळणावर जात आहेत. यावर उत्तर देण्याऐवजी साहेबांनी फार चिडचिड केली होती. तर दादांचे तर ते मेहुणे आहेत. त्यामुळे, घरच्यांनी केले ते चालतं, त्यांचे राजकीय अस्तित्व अंपुष्टात आणण्यासाठी बारामताहून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. मात्र, अकोल्यात व्युव्हरचना आखून पिचडांना एकटे पाडण्याचे कट रचले जातात. वा रं देवा, अजब तुझे सरकार अन अजब तुझा न्याय.! अशाच प्रकारची कैफियत या तरुणाने आपल्या गावरान शब्दात माडून हे कोठेतरी साहेबांचे चुकते आहे असे मत सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.

           यावर पुढे बोलताना तो म्हणतो की, आजवर काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी पुरोगामीत्वाचे झेंडे फडकविले आणि २०१९ साली सत्तेसाठी केलं काय? तर अशक्य अशा शिवसेनेसोबत युती केली. तेव्हा कोठे गेले त्यांचे हिंदुत्व आणि यांचे पुरोगामित्व? सत्तेसाठी सगळे काही गहान ठेवले जाते. आज जे लोक पवार साहेबांना मानतात त्यांनीच   १८ जुलै १९७८ साली जनतादल म्हणजेच भाजपच्या ९९ आमदारांना घेऊन त्यांच्यासोबत नव्याने चुल मांडली होती. त्यामुळे, सत्तेसाठी वाट्टेल ते अशाच प्रकारची भूमिका प्रत्येकाची असते मग तेथे कोणी का असेना. त्यामुळे, पिचडांवर टिका करताना पहिले प्रत्येकाने स्वत:च्या इतिहासाची पाने जरा काळजीपुर्वक वाचून केली पाहिजे. खरंतर बारामतीकर निष्ठावंत तथा विचारनिष्ट नाहीत तर सत्ताप्रेमी आहेत. ते फक्त नावाला फुले-शाहु - आंबोडकरांचे नाव घेतात, त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत कोणाच्याही पक्षाच्या कुबडीचा आधार न घेता राज्यात वैयक्तीक निवडणुका लढवून दाखविल्या पाहिजेत. मग कळेल स्वत:ची ताकद किती आहे. एक साध उदा. म्हणेज जेव्हा स्वतंत्र निवडणुका झाल्या तेव्हा अगदी शेजारीच संगमनेरात राष्ट्रवादिच्या उमेदवारास अवघे २२ शे मते होती. त्यामुळे, ही "दादा"गिरी लोक मतदानात खपून घेत नाहीत. आता जाणारे सोडून गेलेत. मात्र येथे १९९५ ची पुनरावृत्ती होणार  आहे. त्यामुळे, कोणी आले काय आणि गेले काय.! पिचड कुटुंबाचे योगदान सगळ्यांच्या समोर आहे. आता सगळे सोडून द्या. साहेब, तेव्हढं मराठा आरक्षणाकडे लक्ष द्या असे म्हणत या तरुणाने आपल्या लेखाची सांगता केली आहे. त्यामुळे, गावठी आणि अगदी गावंढळ परंतु मजेशीर शब्दांनी लिहीलेल्या या लेखाची तालुक्यात चांगलीच चर्चा लंगली आहे.