जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू.! आठवडे बाजार बंद म्हणजे बंद.! लग्न व साखरपुड्याला परवानगी हवी, होळी, आणि रंगपंचमीवर कोरोनाचा धुराडा.!
सार्वभौम (अहमदनगर):- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लग्न समारंभ आणि साखरपुडा यासारख्या धार्मिक समारंभाचे आयोजनास संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्यांची पूर्वपरवानगी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अशा प्रकारच्या कार्यक्रम, समारंभानंतर कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. याशिवाय, जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार दिनांक २९ मार्चपासून ते १५ एप्रिल, २०२१ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतूदीनुसार भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
तर संगमनेरात पठारात भुकंपा नंतर तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. काल संगमनेरात कोरोनाने आजपर्यंतचा उचांक गाठला. काल तब्बल तालुक्यात 148 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले. तर आज शुक्रवार दि. 26 मार्च रोजी तालुक्यात 37 रुग्ण आढळुन आले आहे.तर एकुण 574 रुग्ण ऍक्टिव्ह आहे तर आज 68 कोरोना बधितांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव तालुक्यात झपाट्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. संगमनेरात आजपर्यंत एकुण 8 हजार 176 रुग्ण आढळुन आले होते. तर 7 हजार 515 रुग्ण आजपर्यंत ठणठणीत झाले आहे. तर 63 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तालुक्यात नोव्हेंबर महिन्यापासुन कोविडचे रुग्ण कमी झाले असे समजुन लोक बेधडक वागु लागले होते. मात्र, मार्च महिन्यात तालुक्यात कोरोनाने चांगलाच धसका दिला आहे. मागील आठ दिवसात तब्बल 588 रुग्ण संगमनेरात आढळुन आले आहे.
दरम्यान, मार्चच्या वाढत्या आकडेवारीमुळे जिल्हाधिकारी भोसले यांनी संगमनेरात आढावा बैठक घेतली. यामध्ये नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाई करा असे आदेश असताना जिल्हाधीकार्यांच्याच आदेशाला संगमनेरातुनच हरताळ फासला जात आहे. कारण, बाजारात होणारी गर्दी प्रशासनास रोखण्यात अपयश येत आहे. तर यापूर्वी झालेले लग्न समारंभ राजकीय कार्यक्रम रोखले गेले असते तर ही परिस्थिती उदभवली नसती. परंतु मंगल कार्यलयांवर कारवाई करताना झालेला दुजाभाव आणि नुकतीच दुकानांवर कारवाई करताना प्रशासनाने दाखवलेला फार्स हा केवळ चेष्टेचा विषय ठरला आहे. कारण गर्दी दिसली तर महिनाभर दुकान सील बंद करण्याचे प्रशासनाचे आदेश कागदोपत्रीच राहिले. स्वतः तहसीलदार अधिकाऱ्यांनी सील केलेली दुकानच एका दिवसात उघडलेली जनतेला दिसली. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईचा धाक बाळगायला कोणी तयार नाही. यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व राजकीय पक्ष संघटना, व्यापारी संघटना, सामाजिक संघटना याना विश्वासात घेऊनच कोविडच्या नियमावलींची अंबल बजावणी करावी लागेल. कारण, प्रशासन आणि जनता यांच्यात पाहिजे इतका सुसंवाद होताना दिसत नाही. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या होणाऱ्या आढावा बैठका केवळ फोटो मध्येच दिसतात. त्यामध्ये होणारे निर्णय जनतेला आज पर्यंत समजले नाही. जनतेला दिलासा देयला लोकप्रतिनिधी कमी पडत आहे. खासदार सदाशिव लोखंडे या सर्व परिस्थितीत तालुक्यात कुठं दिसायला तयार नाही. त्यांची कोणतीही मदत तालुक्यापर्यंत पोहचली याबद्दल जनतेच्या मनात साशंकताच आहे. तरी देखील कोविड संकटात मदत वाटपात ते देशात 25 व्या क्रमांकावर दिसतात याचे जनतेच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे.
जरी लॉकडाऊन करण्याचा शासनाचे धोरण नसले तरी स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहुन निर्णय करण्याचे अधिकार तहसीलदार आणि मुख्यअधिकाऱ्यांना जिल्हाधीकाऱ्यांनी दिले आहे. किमान त्यानुसार तरी आता अंबलबजावणी करून कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळवावे. ही जनतेच्या प्रति माफक अपेक्षा आहे. तर पठारावरील बोटा गाव कोरोनाच्या वाढत्या परदुर्भावामुळे बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे.
जिल्ह्यात विवाह समारंभास जास्तीत जास्त ५० व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी आहे. मात्र, लग्न समारंभ असलेले मंगल कार्यालये, लॉन्स, मॅरेज हॉल, आणि इतर समारंभाचे ठिकाणी ५० व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तीउपस्थित राहणे, सोशल डिस्टंन्सिंग, गर्दीचे व्यवस्थापन, समारंभ ठिकाणचे निर्जतुकीकरण, उपस्थित व्यक्तींसाठी सॅनिटायझरची व्यवस्था, ऑक्सीमीटरची व्यवस्था या व अन्य कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणार्या मंगल कार्यालयांना १० हजार रुपये दंड करण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी आता लग्न समारंभ, साखरपुडा या सारख्या धार्मिक समारंभ आयोजनास आता संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. याशिवाय, नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार आता २९ मार्चपासून ते १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
अकोले तालुक्यात आत्तापर्यंत ३ हजार ६२८ रुग्ण झाले आहेत. त्यात नव्याने तपासणी सुरु केली आहे त्यात ४४९ रुग्ण तालुक्यात मिळून आले आहेत. काल ३६ रुग्ण तर आजवर एकूण ४३ रुग्णांचा कोरोनाने प्राण घेतला आहे. गेल्या जानेवारीत ५३, फेब्रुवारीत ४९ व मार्च मध्ये ४०२ असे एकूण ५०४ रुग्ण मिळून आले आहेत. तर या दरम्यान ५ जणांना मृत्युला सामोरे जावे लागले आहे. तर २९ तारखेपासून अकोले तालुक्यातील बाजार पुर्णपणे बंद राहणार आहे.