अभ्यासाला गेली अन शेततळ्यात बुडाली, बाप वाचवायला गेला पण दोघांनी जीव गमविला.! अकोल्यातील विरगावची घटना.!


सार्वभौम (अकोले) :-

                    अकोले तालुक्यातील विरगाव येथे सणासुदीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. शेततळ्याच्या कडेला असणार्‍या झाडाच्या सावलीला अभ्यास करण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय दहावीच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना देखील मृत्युला सामोरे जावे लागले आहे. ही घटना आज सोमवार दि. 29 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. यात आश्वीनी कृष्णांगर थोरात (वय 16) व कृष्णांगर जगन्नाथ थोरात (वय 45, दोघे रा. विरगाव, ता. अकोले, जि. अ.नगर) असे मयत झालेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आश्विनी ही दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अभ्यास करण्यासाठी शेततळ्यावर गेली होती. उन्हाळ्याच्या मार्च मधील उष्णतेची दाहकता वाढत चालल्यामुळे घरात गरम होत होते. म्हणून शेतात थंड वातावरण शोधून ही विद्यार्थीनी अभ्यास करत होती. मात्र, या दरम्यान तिचा शेततळ्याच्या कागदाहुन पाय घसरला आणि ती अगदी कोपर्‍यावरच घसरली. तिने शेततळ्याचा कागद धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नाही म्हणून तीने जोरजोराने आरडायला सुरूवात केली. आपल्या मुलीचा आवाज येत असल्याचे तिच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी हातातले काम टाकून थेट शेततळ्याकडे धाव घेतली.

दरम्यान पोटचा गोळा जिवाच्या आकांताने हातपाय खोडतो आहे. हे पाहिल्यानंतर कोणाला शांत बसावेसे वाटेल. त्यावेळी कृष्णांगर थोरात यांनी तिला बाहेर काढण्यासाठी थेट शेततळ्यात उडी घेतली. मात्र, जो व्यक्ती बुडतो तो स्वत:च्या बचावासाठी जो दिसेल त्याला मिठी मारत असतो. त्यामुळे, बुडत्या लेकीने आपल्या पित्याला घट्ट पकडले. मात्र, दुर्दैवाने कृष्णांगर थोरात यांना फारसे पोहता येत नव्हते. त्यामुळे, त्यांनी मुलीला वाचविण्याच्या नादात स्वत:ला झोकून दिले. दुर्दैवाने दोघेही शेततळ्यात बुडत होते. या दोघांचा आवाज ऐकूण कृष्णांगर यांनी पत्नी शेततळ्याकडे धावत आली. तीने घडलेला प्रकार पाहिला आणि एकच टाहो फोडला. त्यांच्या आवाजाने रस्त्याने ये-जा करणारे लोक धावून आले तर काही परिसरातील लोक देखील शेततळ्यावर आले. दावं आणि अन्य संसाधने येईपर्यंत या दोघांनीही जीव सोडला होता.

तब्बल घटना घडल्यानंतर ज्यांना पोहता येत नव्हते त्यांनी तर शेततळ्यात उडी मारण्याची धाडस केली नाहीच. मात्र, ज्यांना पोहता येत होते. त्यांनी देखील शेततळ्यात उतरण्याची धाडस केली नाही. ही घटना घडल्यानंतर अगदी काही काळाने या दोघांना बाहेर काढण्यात आले. आज दुपारी हा प्रकार घडल्यानंतर तेथे रावसाहेब वाकचौरे, बाळासाहेब मुळे, सुनिल वाकचौरे, बाबासाहेब वाकचौरे, एकनाथ वाकचौरे यांच्यासह अन्य लोक मदतीला धावले होते. हा प्रकार घडल्यानंतर दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास या दोघांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात आणला होता. ऐन सनासुदीच्या दिवशी असा दु:खद प्रसंग घडल्यामुळे या पंचक्रोशीत शोककळा पसरली होती.

दरम्यान, जशा शाळा बंद झाल्या आहेत तेव्हापासून पोहण्यासाठी गेलेली मुले बुडून मयत झाले, मामाच्या गावी आलेले भाचे बुडून मयत झाले, कडेला बसलेले विद्यार्थी बुडून मेला, शेळ्या बकर्‍यांकडे गेेलेला मुलगा पाय घसरुन बडून गेला असे कित्तेक उदा आहेत. हे डोळ्यासमोर असताना देखील पालक आपल्या पाल्यांना समज देत नाहीत असे दिसते आहे. तर ज्या व्यक्तींना पोहता येत नाही. त्यांनी भावनेपेक्षा बुद्धीचा वापर करुन पाण्यात बुढणार्‍यांना वाचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेेल की, गेल्या वर्षी याच उन्हाळ्याच्या काळात जितके बालक कोरोनाने मयत झाले नाही. तितके अकोले तालुक्यात पाण्यात बुडून मयत झाले आहेत. त्याची संख्या 22 आहे. त्यामुळे, आजुनही वेळ गेलेली नाही. शेतकरी व त्यांच्या मुलांनी  या घटनेपासून धडा घेतला पाहिजे.