माझ्यावर उपचार करा, बेवारस महिलेने मागितली डॉक्टरकडे भिक.! पण, ३ तास उंबऱ्यावर मृत्युशी झुंजली अन.! हे महसुलमंत्र्यांचे अपयश.!

- सुशांत पावसे

संगमनेर (प्रतिनिधी) :- 

                          कोरोनाच्या काळात ज्यांचा उदो उदो झाला त्या प्रशासनाचे दुसरे निर्दयी रुप संगमनेरात पहायला मिळाले आहे. कारण, एक बेवारस महिला एका समाजसेवकाने सरकारी रुग्णालयाच्या दारात आणले असता ती एक ना दोन तब्बल तीन तास अगदी मृत्युशी झुंज देत राहिली. मात्र, तिला डॉक्टर, नर्स आणि शिपायाने देखील हात लावला नाही. तेव्हा, अक्षरश: १०८ काम करणाऱ्या वाहन चालकाने वाकडा तिकडा ऑक्सिजन लावला आणि त्यावर ती माऊली अखेरच्या घटका मोजत राहिली. जेव्हा हा प्रकार सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा व्हायरल झाला तेव्हा भोंगळ प्रशासनाला जाग आली आणि मग एक-एक डोमकावळे जमा झाले. तोवर या माऊलीची एक सेंकदही हलचाल झाली नव्हती. त्यामुळे, ३ तास प्रवास आणि ३ तास बेवारसाचा बेवारस पणा यात त्या माऊलीचे काय झाले देवाला माहित. मात्र, या निमित्ताने संगमनेर नगरपालिका, महसूल प्रशासन आणि डॉक्टर यांच्या दगडाच्या काळजाचे दर्शन घडले आहे.

        त्याचे झाले असे की, शुक्रवार दि. १९ रोजी रात्री ६ वाजण्याच्या सुमारास धुमाळ नावाच्या तरुणास संगमनेर बस स्टॅण्ड परिसरात एक महिला अत्यंत दयनिय अवस्थेत दिसून आली. एरव्ही तर ती पोटासाठी भिक मागत होती, आज मात्र ती जगण्यासाठी कोणाकडे तरी मदत मागत होती. कोणीतरी तिला रुग्णालयात नेईल या हेतूने ती बस स्थानकाच्या कोपऱ्यात खितपत पडली होती. त्या क्षणी एका धुमाळ नावाच्या तरुणाने तिच्या वेदना जाणल्या आणि १०८ क्रमांकाला फोन लावला. अर्थात डॉ. एपी रंगा राव यांनी ज्या उद्देशाने या रुग्णवाहिका उभ्या केल्या, त्या आत्मियतेने यावर असणारे चालक किंवा व्यवस्थापन सुविधा देत नाहीत. हा एक बुडत्याला ओंडक्याचा आधार नक्की आहे. मात्र,  बहुतांशी वेळा ग्रामिण भागात १०८ ला कॉल केल्यानंतर ती १ ते दिड तासाने येते. मग या वेळी देखील वेगळे काय होणार होते. हो ना करता करता १० ते १५ वेळा फोन केल्यानंतर एक रुग्णवाहिका तेथे हजर झाली. मात्र, दुर्दैवाने त्यात एकही डॉक्टर नव्हता. अखेर, संबंधित बेवारस महिलेस वाहन चालकाने संबंधित बेवारस महिलेस प्राणवायू लावला आणि संगमनेरच्या सरकारी रुग्णालयात नेले गेले.

https://www.facebook.com/100022418136482/posts/936347600455836/ (व्हिडिओसाठी लिंकला कॉपी करा, किंवा अक्षय धुमाळ यांचे फेसबुकला जा)

              खरंतर, लोक म्हणतात रुग्णालयात यातना आणि वेदना दोन्ही कमी होतात, तेथील देव तत्काळ जीव वाचवायला घावून येतात. संगमनेरात मात्र एका महिलेबाबत अक्षरश: कसायासारखी वागणूक देण्यात आली. कोविड आणि अवेरनेस, समाज आणि आत्मियात यांच्या भाषा बोलणारे अधिकारी देखील गेंड्याच्या कातड्याचे  आहेत की काय.! असा प्रश्न या प्रसंगातून दिसून आला आहे. कारण, जेव्हा या तरुणाने या बेवारस महिलेला सरकारी रुग्णालयात नेले तेव्हा तब्बल तीन तास ती मत्युशी झुंज देत राहिली. हा धुमाळ तरुण डॉक्टरांना, नर्सला विनंती करीत होता. मात्र, दुर्दैवाने आपण ज्यांना कोविड वॉरियर्स म्हटलं तेच योद्धे आज मैदान सोडून पळताना दिसले. कोणी म्हणी आम्ही जेवायला आलो आहोत (तीन तास) कोणी म्हणे, डॉक्टर सुट्टीवर आहेत, कोणाची ड्युटी संपली होती, कोणी फोन उचलत नव्हते. अशा दिरंगाईत ही महिला जीवदान मागत होती. कदाचित कोणी मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक असता तर प्रशासनाने पायाला भिंगरी बांधली असती. पण, आजकाल गरिबांविषयी आत्मियता आहे तरी कोणाला.!

            आता अडिच तास उलटले तरी देखील कोणी मदतीला येईना, जो तो याच्या त्याच्यावर ढकलत होता. म्हणून या सगळ्या भोंगळ कारभारावर आणि गेंड्याच्या कातड्यांवर धुमाळने एक जालीम उपाय शोधला. फेसबुक लायु करुन संगमनेर प्रशासनाच्या कर्तुत्वाचे वाभाडे ओढले आणि त्यांचा हा पराक्रम थेट प्रेक्षपण करुन जगासमोर मांडला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, अवघ्या दिड तासात त्याचे २४ हजार व्हिवर्स होते. म्हणजे, इतकी हळहळ व्यक्त होत होती. मात्र, तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही. खरंतर,  आजकाल मलिदा मिळेल ती कामे अगदी तत्काळ पुर्ण हातात, मात्र असे सामाजिक व एमर्जंन्सी कामांकडे कोणी लक्ष देताना दिसत नाही. हे वसंगमनेरचे फार मोठे दर्दैव आहे. याला जबाबदार कोण? याचे आत्मचिंतन करावे.

                    दरम्यान, जेव्हा फेसबुक लायु झाले तेव्हा संगमनेर तहसिलदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे बेवारस रुग्ण थेट नगर येथे पाठवून दिले. आता ज्या व्यक्तीला ३ तास दवाखाण्याच्या दारात बेवारस पडावे लागते त्या व्यक्तीला तीन तासानंतर कोणत्याही प्रकारचा उपचार न देता हात वर करुन रुग्ण नगरला पाठवून देणे आणि स्वत:वरील जबाबदारी झटकून टाकणे हे कितपत योग्य आहे.  जेव्हा या समाजसेवकाने नगर येथील रुग्णालयात संपर्क केला असता माहिती मिळाली की, तेथे बेड शिल्लक नाहीत. आता संगमनेरात साधं कोरोनावर उपचार होऊ शकत नाही. ही किती मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. येथे ना. बाळासाहेब थोरात हे राज्याचे महसुलमंत्री आहेत. सुधिर तांबे हे विधानपरिषदेवर आमदार आहेत, मंत्री महोदयांची भगिनी नगराध्यक्ष आहेत मग यावर बोलावं तरी काय! अखेर, तहसिलदार अमोल निकम यांनी तीन तासानंतर रुग्ण नगरला पाठवून दिले.  आता ही महिला जीव वाचविण्यासाठी अजुनही धीर खचलेली नाही. मात्र, प्रशासन तिच्या धैर्यापुढे शुन्य ठरले आहे. सुदैवाने जर ती माऊली वाचली तर धुमाळ यांची तळमळ फळाला लागेल. मात्र, जर दुर्दैवाने काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी समाजसेवक प्रयत्न करणार आहेत.

              खरंतर नामदार प्रेमींना थोडं वाईट वाटेल. पण, संगमनेरात प्रशासकीय अधिकारी म्हणजे फार नंगानाच करताना दिसत आहेत. पोलिसांच्या वरदहस्ताने अवैध धंद्यांचा उत्पात, गुन्हेगारांचा हैदोस, महसुलचा काळा बाजार, वाळु तस्करी, वर्गवारीतील जमिनींची अफरातफर, गौणखणिजांचा अवैध कारभार असे अनेक मुद्दे तर आरोग्य विभागाचा बोजबारा म्हणजे एकंदर जे नामदार साहेब राज्याचा गाडा हाकतात त्यांना तालुक्याचा गाडा हाकने जिकरीचे होत असल्याचे दिसते आहे. तर या पलिकडे हम करे सो कायदा अशा पद्धतीने अधिकारी वागताना दिसत आहे. त्यामुळे नक्कीच थोरात साहेबांचा जरा देखिल वचक प्रशासनावर राहिलेला दिसत नाही. तालुक्यात कोणाला आणायचे आणि कोणाला नाही. हे तेच ठरवितात. मग जे येथे येतात ते साहेबांच्या प्रतिमेला लाजवेल अशी कामे का करतात? त्यांना जरा देखील काहीच कसे वाटत नाही? एकतर ते साहेबांना जुमानत नाही असे म्हणावे लागेल किंवा मग साहेबांचा प्रशासनावर अंकुश राहिला नाही असे म्हणावे लागेल. मात्र, जे काही चालु आहे. त्यामुळे, थोरात साहेबांच्या तालुक्यात ते स्वत: अपयशी ठरल्याचे संदेश राज्यभर जाऊ लागले आहेत. त्यामुळे, साहेबांनी याकडे वेळीच लक्षा घातले पाहिजे. अन्यथा वेळ वैऱ्याचा आहे. हे त्यांना विसरुन चालणार नाही.