आम्ही राष्ट्रवादीत घुगर्या खायला गेलो, अन तुम्ही भाजपात काय द्राक्षाचे घड खायला गेले होते का- गायकरांची पिचडांवर टिका आणि सोज्वळ धमकीही.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :- अकोले तालुक्याचे राजकारण आता दिवसेंदिवस वेगळे वळण घेत आहे. पुर्वी विधानसभेच्या वेळी भांगरे आणि डॉ. लहामटे हे पिचड-पिता पुत्रांवर वाट्टेल तशी टिका करीत होते. तर आज ज्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला तेच त्याला प्रतिउत्तर देत होते. आज 19 मार्च नंतर मात्र परिस्थिती काहीशी वेगळी झाली आहे. येथे आता जे पिचडांच्या सोबत होते तेच त्यांच्यावर बेधडक टिका करु लागले आहे. याचीच प्रचिती आज दि. 20 मार्च रोजी आली. कारण, ज्या सिताराम पाटील गायकर यांच्यावर वैभव पिचड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिकडे घुगर्या तिकडे उदोउदो असे म्हणत टिका केली त्यालाच प्रतिउत्तर देताना आज राष्ट्रवादीच्या आजी-माजी कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाच्या कार्यक्रमात गायकरांनी पिचडांना आपल्या अजेंड्यावर घेतले. मी जिकडे घुगर्या तिकडे जातो तर मग तुम्ही काय भाजपत द्राक्षाचे घड खायला गेले का? असे सवाल करीत वेळ आली तर तुमची कोठे-कोठे व कशी चौकशी लावायची हे देखील मला माहित आहे असे म्हणत गायकरांनी पिचडांना थेट सोबर धमकीच दिल्याचे पहायला मिळाले आहे. त्याच्या या भाषणाने आ. डॉ. किरण लहामटे यांनी मात्र, गायकरांचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज (दि.20) अकोले तालुक्यात जुने आणि नवे अशा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यात पहिली गोष्ट असे नमुद करावेसे वाटते की, जेथे अंत्यविधीला 15 आणि लग्नाला 50 मानसांची परवानगी आहे तेथेच आज दशकभर लोक व्यासपिठावर आणि शेकडो लोक समोर उपस्थित होते. त्यात आज हा राजकीय कलगितुरा ऐकण्यासाठी ही तोबा गर्दी जमली होती. यात आजवर ज्यांनी कोरोनासाठी जनजागृती करून आपण किती आदर्श आहोत असा अविर्भाव आणणार्यांचा देखील सामावेश होता. तर तेथे जवळजवळ 75 टक्के लोकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेतल्याचे दिसले नाही. त्यामुळे, त्यांच्यावर प्रशासन काय कारवाई करणार, की झाकली मुठ सव्वा लाखाची असे म्हणून काना डोळा करणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
यापलिकडे या बैठकीत अनेकांनी भाजप आणि पिचड पिता-पुत्रांवर टिकेच्या तोफा डागविल्या. यात महत्वाचे भाषण अशोक भांगरे, डॉ. किरण लहामटे व सिताराम पाटील गायकर यांचे होते. भांगरे यांनी नेहमीप्रमाणे विकास आणि पिचड यांना टारगेट करुन तालुक्याला आता पुन्हा परिवर्तनाची गरज कशी आहे हे सांगितले. तर यात सर्वात महत्वाचा मुद्दा असा होता की, भांगरे यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला समजून सांगितले, डॉ. किरण लहामटे व भांगरे यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. तर जुने आणि नवे कार्यकर्ते असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही. त्यामुळे, आपल्याला राष्ट्रवादी पक्ष मोठा करताना जे काही योगदान देता येईल ते प्रत्येकाने दिले पाहिजे.
तर आ. डॉ. किरण लहामटे म्हणाले की, मी एकदा पवार साहेबांना म्हणालो होतो. मी निवडून आलो खरा. मात्र, मला सहकारातील काहीच माहिती नाही. त्यावेळी साहेब म्हणले होते. सहकार हा राष्ट्रवादी पक्षाचा कणा आहे. त्यासाठी त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. मात्र, आज सुदैवाने गायकर साहेब सहकारासाठी आपल्या मदतीला धावून आले आहेत. ते पुढे म्हणाले की, आमदार झाल्यानंतर पाच वर्षात मी जी काही कामे केली आहेत त्याची फाईल मी जनतेसमोर ठेवणार आहे. जर त्यांनी मला पास केले तर मी पुढील आमदारकी लढविणार आहे जर नापास केले तर मी निवडणुक लढविणार नाही असे म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आपण पुढील आमदारकीची निवडणुक लढविणार असल्याचा युक्तीवाद मांडला आहे. त्यावेळी मंचकावर असणार्या काहींची भुवया अगदी नकळत उंचावल्याचे पहायला मिळाले.
तर सिताराम पाटील गायकर यांनी मात्र आज अक्षरश: ट्वेंटी ट्वेंटी बॅटींग केल्याचे पहायला मिळाले. पिचडांवर टिका करताना ते म्हणाले की, 1995 साली देखील बहुजन समाजावर प्रचंड अन्याय होत होता. त्याची सल मनात धरुन माझ्यासह अनेकांनी पिचडांपासून काढता पाय घेतला होता. आज देखील तुलनात्मक परिस्थिती वेगळी नाही. आज पिचड व त्यांचे कार्यकर्ते माझ्यावर टिका करीत आहेत. मी जिकडे घुगर्या तिकडे उदोउदो असे म्हणत असेल तर पिचड पिता-पुत्र भाजपत काय द्राक्षांचा घड खायला गेले आहेत का? त्यांना देखील मंत्रीपदाची लालसा होती अशी टिका गायकरांनी पिचडांचे नाव न घेता केली. गेली 14 महिने त्या भाजपत जीव गुद्मरला होता, आता मात्र राष्ट्रवादीतच राहून मरायचे आहे असे विधान करीत त्यांनी स्वत:ला राष्ट्रवादी तथा पवार कुटुंबाला समर्पित केले आहे.
यावेळी गायकर यांनी महत्वाची गोष्ट स्पट केली की, आज जे कोणी राष्ट्रवादीत आले आहेत. त्यांच्याकडून कोणावर अन्याय होणार नाही. ज्यांनी पक्षाला पडत्या काळात साथ दिली आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही. ज्याच्याकडे मिरीट असेल तोच मोठा होईल, त्याला नक्की संधी मिळेल. येणारी नगरपंचायत, कारखाना, बाजार समिती अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात येणार आहेत. त्यासाठी आपल्याला ऐकोप्याने काम करावे लागणार आहे. यावेळी गायकर यांनी पिचडांचे नाव न घेता फार मोठे विधान केले की, आजही माझ्या मनात त्यांच्याविषयी सन्मान आहे. मात्र, त्यांनी त्याचा आदर करावा. माझ्या चौकशा लावा. मात्र, माझ्याकडे देखील त्यांची जंत्री आहे चुकीचे आरोप कराल तर मला देखील माहिती आहे की, कधी, केव्हा, कोठे कशी व कोणती चौकशी लावायची आहे. असे म्हणत गायकरांनी पिचडांना थेट जशास तशी सोज्वळ धमकीच दिल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. त्यामुळे, हे राजकीय वातावरण आता कोठे जाऊन स्थिरावते आहे. याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.