पिचडांनी पवारांच्या तर गायकरांनी पिचडांच्या पाठीत खंजिर खुपसला.! मोठे राजकीय वादळ येणार.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                       राजकारणात कोणी कोणाचा दिर्घकाळ शत्रु आणि मित्र नसतो. हेच वारंवार इतिहास सांगत आला आहे. तर एखादी घटना घडल्यानंतर त्याची पुनरावृत्ती झाली नाही असे देखील कधी होत नाही. हे राजकीय उत्खनन राजकीय परिघावर वारंवार होतच असते. म्हणून तर हे राजकारण आहे बॉस.! ते सर्वसामान्यांच्या समजण्यापलिकडे असते असे म्हटले जाते. यात कोणी कोणाला दगा दिला म्हणजेच त्याने विश्वासघात करुन पाठीत खंजिर खुपसला अशी म्हण रुढ झाली आहे. त्यामुळेच आज जेव्हा सिताराम पाटील गायकर यांनी पिचडांना सोडून पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हा त्यांनी पिचडांच्या पाठीत खंजिर खुपसला अशी टिका होऊ लागली आहे. मात्र, ही खंजिर खुपसा-खुपशी ही आजची नव्हे तर या राजकीय घडामोडीला फार पुर्वीपासूनची परंपरा आहे. अर्थात हीच लोकशाहीची एक मोठी ताकद म्हणता येईल. याचा फायदा घेत 43 वर्षापुर्वी पवार साहेबांनी वसंत दादांच्यात, दिड वर्षापुर्वी अजित पवारांनी शरद पवारांच्या, दोन वर्षापुर्वी पिचड साहेबांनी शरद पवारांच्या तर तीन दिवसांपुर्वी गायकर साहेबांनी पिचड साहेबांच्या पाठित खंजिर खुपसला हा इतिहास येणार्‍या पिढीसाठी राजकीय निष्ठेचे प्रमाण देताना नेहमी उपयोगी ठरेल.

सन 18 जुलै 1978 साली आय काँग्रेस व रेड्डी काँग्रेस दोन्ही विधानसभेला अलिप्त लढल्या होत्या. त्यात रेड्डी काँग्रेसला 69 जागा, इंदिरा काँग्रेसला 62, जनता पक्षाला 99, शेतकरी कम्युनिष्ठ पक्ष 13, माकप 09 व 39 जागा अपक्ष आल्या होत्या. तेव्हा 99 आमदार असून देखील जनता पक्षाला बहुमत सिद्ध करता आले नाही. म्हणून वसंतदादा पाटील यांनी रेड्डी व गांधी यांच्यात एकोपा करुन 7 मार्च 1978 ला सरकार स्थापन केले होते. तेव्हा पवार साहेब त्यात उद्योगमंत्री होते. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे आणि वसंत दादा याचे टिपन बसत नसे. त्यांना कंटाळून पवारांनी सर्वात मोठी चाल खेळली आणि त्यावेळी 40 आमदारांसह ते सत्तेतून बाहेर पडले. परिणामी सरकार अल्प मतात आले. वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदाचा राजिनामा द्यावा लागला होता. 

दरम्यान, शरद पवार, यांनी जनतादलाशी बैठक घेऊन म्हणजे, आजच्या भाजपच्या पाठींब्याने सरकार स्थापन केले. अखेर, 18 जुलै 1978 रोजी पवार प्रणित भाजपची सत्ता महाराष्ट्रात आली. यात समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप व कम्युनिष्ठ पक्ष यांनी मिळून पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) स्थापन करुन वयाच्या 38 वर्षी पवार साहेब मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा शरद पवार यांनी काँग्रेस व वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजिर खुपसला अशा प्रकारची टिका पवार साहेबांवर झाली होती. त्या घटनेची इतिहासात अशी नोंद होऊन बसली की, त्यांची पुनरावृत्ती आजही वारंवार होत आहे.

 अगदी त्याच इतिहासाला अनुसरुन पुढे पवार साहेबांना त्यांच्याच घरातील व्यक्तीने आठवण करुन दिली. कारण, 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे अजित पवार यांनी 38 आमदार घेऊन भाजपला साथ दिली आणि पहाटे-पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. म्हणजे, ऐकीकडे शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी अशी गणिते सुरू असताना मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी चांगलीच सोयरीक जुळून आणली होती. कारण, भाजपकडे 105 आमदार होते, तर बहुमतासाठी 145 आमदारांची गरज होती. त्यात 40 आमदार आणायचे कोठून तर 15 उमेदवार अपक्ष आणि दादांचे 38 असे मिळून 158 आमदार होऊन पुन्हा पवार प्रणित सत्ता स्थापन करता येते अशा प्रचारची समज करुन दादा पुन्हा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी, दादांच्या मनाचा ठाव खुद्द शरद पवार यांना देखील घेता आला नाही. अखेर काकांच्या म्हणजेच शरद पवारांच्या पाठीत दादांनी खंजिर खुपसला अशी सर्वत्र चर्चा रंगली होती.

हा प्रकार आता येथेच थांबला नाही. तर, 25 मे 1999 साली राष्ट्रवादी पक्ष स्थापन करताना पवार यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यावर मोठा विश्वास टाकला आणि त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपविली. त्यानंतर जेव्हा जेव्हा आघाडी सरकार सत्तेत राहिल तेव्हा तेव्हा कोणाला कोठे बसवायचे आणि कोणाला बाजुला ठेवायचे. याचा अधिकार खुद्द पिचड साहेबांना देण्यात आला होता. तर जेव्हा सरकार सत्तेत नव्हते तेव्हा त्यांनी कधी प्रदेशाध्यक्ष तर कधी विरोधी पक्षनेता अशा प्रकारची मोठी जबाबदारी देऊन त्यांच्या भरवशावर पवार हे अगदी निच्छिंत होते. तर सरकार सत्तेत असताना आर. आर पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्यांचे काही चालत नव्हते तितके पिचडांचे चालत होते. याची प्रचिती 6 डिसेंबर 2009 साली प्रदेशाध्यक्ष निवडताना आली. मात्र, झाले काय? 31 जुलै 2019 रोजी पिचड पिता-पुत्र अचानक भाजपत दाखल झाले. खरंतर वैभव पिचड या तरुण आहेत, त्यांचा निर्णय स्वयंभू असू शकतो. मात्र, मधुकर पिचड यांनी देखील भाजपत जाणे हे मात्र, अनेकांना न पटण्यासारखे होते. तेव्हा पिचडांना काही एक कमी न करता देखील त्यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांनी पवार साहेबांच्या पाठीत खंजिर खुपसला अशा प्रकारची टिका त्यांच्यावर झाली होती.

आता एक मात्र लक्षात आले की, राजकारणात कोणी कोणाचा निष्ठावंत नसतो. वेळेनुसार सगळी गणिते बदलत असतात हेच इतिहास सांगून जातो. त्यामुळे, पिचडांच्या सोबत गायकर गेले नाहीत म्हणून अनेकांनी त्यांच्यावर टिकेची झोड ऊठविली आहे. अर्थात राजकीय अस्तित्वासाठी पवारांनी 38 व्या वर्षी बंड पुकारला, अजित दादांनी देखील सत्ता म्हणा की, राजकीय स्वार्थ पण पहाटे-पहाटे शपथ घेतली तर पिचडांनी देखील 45 वर्षाची मैत्री बाजुला ठेऊन लेकाच्या राजकीय अस्तित्वासाठी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे, सिताराम पाटील यांनी देखील राजकीय अस्तित्व म्हणा किंवा अजित पवार यांच्यावरील व्यक्तीनिष्ठा म्हणा त्यांनी 16 मार्च 2021 रोजी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला तर बिघले कोठे? भलेही पिचडांच्या सानिध्यात त्यांनी राज्यासह जिल्हा आणि तालुक्यात सत्ता उपभोगली असेल. मात्र, या दरम्यान त्यांनी पिचडांशी कधी गद्दारी केली नाही. आता पिचड त्यांचा स्वार्थ पाहु इच्छितात तर गायकरांनी त्या पाऊलावर पाऊल ठेवले तर बिघडले कोठ? त्यामुळे, गायकर पाटील यांनी पिचडांच्या पाठीत खंजिर खुपसला असे म्हणताना देखील टिकाकारांनी इतिहासाची पाने चाळली पाहिजे. तर जिकडे घुगर्‍या तिकडे उदो-उदो असे म्हणत गायकर व त्यांच्या समर्थकांवर टिका करताना पिचडांनी देखील भाजप मध्ये जाताना घुगर्‍याच नाही पहिल्या का? असे देखील प्रश्न त्याच्याकडे बोट करुन गायकर समर्थक विचारत आहेत. त्यामुळे, अशा आरोप प्रत्यारोपामुळे कालचा सख्खे भाऊ पक्के वैरी होताना दिसू लागले आहेत.

दरम्यान, काही झाले तरी एक मात्र खरे आहे. की, पिचडांच्या सभोवताली जो काही नेत्यांचा गोतावळा येऊन ठेपला होता. तो आता जवळ-जवळ 80 टक्के पुन्हा राष्ट्रवादीत गेला आहे. त्यामुळे, 1995 प्रमाणे लोक स्वत:हून पिचडांच्या बंगल्यावर घेराव घालताना दिसत आहेत. त्यांचे सांत्वन करताना दिसत आहेत. त्या निमित्ताने 1995 साली कैलास वाकचौरे, विकास शेटे यांच्यासारखी तरुण टिम उभी राहिली होती. आता देखील अशीच काहीशी टिम उभी राहू शकते. मात्र, भाऊंनी त्यांच्याभोवती ज्या चांडाळ चौकटी आणि स्वार्थी ठेकेदार आहेत त्यांना थोडे बाजुला लोटले पाहिजे. ज्या दिवशी घाटघर, समशेरपुर, ब्राम्हणवाडा आणि कळस अशा चार टोकाहून आलेला सामान्य कार्यकर्ता स्वत: वैभव पिचड यांचे दार स्वत: हक्काने उघडेल तेव्हा खर्‍या अर्थाने जनमानसांत त्यांची प्रतिमा अधिक लोकप्रिय होईल. कारण, आजही वैभव पिचड यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी त्या चांडाळ चौकटीचा गोतवळा पार करुन आत प्रवेश करावा लागतो. अशी प्रतिक्रीया भाजपच्या गोटातून येत आहे. त्यामुळे, आता येणारा काळ तालुक्यासाठी फार मोठे राजकीय वादळ घेऊन येणारा आहे. हेच तुर्तास दिसत आहे.