डॉक्टर मंत्री आणि भाऊ आमदार.! अशक्य असे काही नाही. तेव्हाही भांगरे व रुपवते होतेच की.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
माजी मंत्री मधुकार पिचड यांनी राष्ट्रवादीला सोडल्यानंतर स्थानिक जनतेला इतका राग आला नाही. तितका पवार कुटुंबाला आला होता. त्यामुळे, त्यांनी अकोले तालुक्यात एकास एक केले आणि डॉक्टर किरण लहामटे यांना निवडून देखील आणले. त्यामुळे, ज्या ठिकाणी प्रतिष्ठा आणि अस्मिता पणाला लागली होती. तेथील जागा निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीने येथे पिचड साहेबांच्या नाकावर टिच्चून डॉ. लहामटे यांना मंत्रीपद द्यायला हवे होते. अगदी झाले देखील तसेच होते. मात्र, मध्येच तनपुरे यांच्या मामाने मंत्रीपदावर डल्ला मारला आणि डॉक्टर व्हेंटीलेटवर पडले. तर दुसरीकडे, इतका मोठा व मात्तबर नेता आपल्या पक्षात आला आणि त्यांचा पराभव करण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीनेच नव्हे-नव्हे तर पवार साहेबांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे, पिचड यांचा पराभव झाला. मात्र, राष्ट्रवादीच्या नाकावर टिच्चून भाजपने तथा देवेंद्र फडणविस यांनी वैभव पिचड यांना विधानपरिषदेवर घ्यायला हवे होते. तेव्हा खर्या अर्थाने पडत्याच्या पाठी पक्ष उभा राहतो हे सिद्ध झाले असते. गोपिचंद पडळकर यांच्याप्रमाणे पिचडांचे पुनर्वसन केले असते तर भाजपचा चेहरा आज फार वेगळा असता. पण राजकारण, हे अनेकांच्या समजण्यापलिकडे असते हे मात्र नक्की. परंतु, गणित चुकते हे बाकी नक्की.!
राजकारणात अशक्य असे काही नाही. कारण, ज्या एकनाथ खडसे यांनी 40 वर्षे भाजपचा झेडा इहलोकी मिरविला त्यांनी तो 23 ऑक्टोबर 2020 साली खाली ठेवत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर दि. 23 सप्टेंबर 2019 साली जे अजित दादा पवार अकोल्यात येऊन ज्यांच्याबाबत धोरतावर बोलले होते, त्यांनाच जिल्हा बँकेत बिनविरोध करण्यासाठी स्वत: कसोशिने प्रयत्न केले. तर ज्या डॉ. लहामटे यांनी भाजपच्या तिकीटावर झेडपीत निवडून येत आरएसएसच्या गणवेशात शपत घेतली. त्यांनीच पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करुन नशिबी आमदारकी ओढून घेतली. तर ज्या अशोक भांगरे यांनी उभी हयात ज्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी त्यांना आजही वाट पहावी लागत आहे. त्यामुळे, एकंदर राजकारणात अगदी काहीही होऊ शकते हेच त्रिवार सत्य आहे. त्याचे अंतीम सत्य म्हणजे काँग्रेसने शिवसेनेसोबत संसार थाटला आता नवे काय सांगायचे? त्यामुळे, राजकारणात अशक्य असे काही नाही.
आता थेट मुद्दा असा की, सन 2022 मध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे, येथे पिचडांना पराभूत करून जनतेने जो काही इतिहास रचला आहे. त्याचे फलित अद्याप राष्ट्रावादीकडून मिळाले नाही. त्यामुळे, येणार्या काळात डॉक्टर आमदार होण्यासाठी स्थानिक व्यक्तींनी जी काही ताकद लावायची आहे ती आतापासून लावली पाहिजे. असे झाले तरच तालुक्याला 10 वर्षानंतर पुन्हा मंत्रीपद मिळू शकेल आणि यात अशक्य असे काही नाही. त्यामुळे, येणार्या वर्षभरात डॉक्टरांना मंत्री करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी गट ताट विसरुन कामाला लागले पाहिजे. मात्र, तालुक्यात सध्या राष्ट्रवादीच्या गोटात काय राजकारण सुरू आहे. हे येणार्या काळासाठी फार घातक आहे. कारण, पक्षातील निष्ठावंत म्हणा किंवा नेते, कार्यकर्ते यांच्या मनात वादळापुर्वीची शांतता आहे. चेहरे गोड व गोंडस दिसतील. मात्र, प्रत्येकाच्या मानात भलतीच यंत्रणा शिजत आहे. त्यामुळे, डॉक्टरांना मंत्री करण्यात तालुक्यापेक्षा राज्यातूनच त्यांनी फिल्डींग लावली पाहिजे. अन्यथा पुन्हा एखादा मामा त्यांना मामा बनवून जाईल.
आता एका गोष्ट सरळसरळ दिसून येते की, पुर्वी 2014 मध्ये जसे श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली होती. त्याचीच पुनरावृत्ती अकोले तालुक्यात पहायला मिळाली. एव्हानी पिचड यांना पक्षप्रवेशाचा फार मानसिक त्रास दिला गेला. एवढेच काय! त्यांना एकटे पाडण्यासाठी षडयंत्र रचले गेले. त्याची पहिली प्रचिती विधानसभेत तर दुसरी जिल्हाबँकेत आली. जर भाजपत असणार्या एका माजी आमदाराला राष्ट्रवादी एकवटून इतकी एकाकी पाडत असेल तर खुद्द भाजप हाय कमांड किंवा देवेंद्र फडणवीस यांनी पिचड यांना बळ देणे अपेक्षित होते. केवळ बारामतीतून लढले म्हणून पडळकरांना आमदार केले. मात्र, आख्खी बारामती अकोल्यात ज्यांच्या विरोधात उतरली त्यांच्यासाठी मात्र, भाजपने निव्वळ बघ्याची भूमिका घेतली. थोडं वाईट वाटेल पण, राष्ट्रीय नामधारी मंत्रीपद देण्यापेक्षा केवळ विधानपरिषदेची आमदारकी दिली असती तरी त्यांना फारसे ऐकटे वाटले नसते. त्यांना सोडून जाणारे देखील गेले नसते. त्यांच्या कार्यकर्त्यांना राजा एकटा पडलाय असे म्हणावे लागले नसते. मात्र, भाजप त्यांच्या किती पाठीशी उभे आहे. हे दिसतेच आहे. मात्र, तालुक्यातील आरएसएसने तरी अग्रही भुमिका घेत गुप्तपणे या गोष्टी घडून आणायला हव्या होत्या मात्र, तसे झाले नाही. अशा करुया की, जेव्हा येथे यशवंतराव भांगरे हे आमदार होतेे तेव्हा विधानपरिषदेतून दादासाहेब रुपवते हे राज्यात मंत्री होते. या दोघांनी तालुक्याचा विकास केला. भलेही ही परिस्थिती उलट-पालट असो. परंतु विकासासाठी एक मंत्री आणि एक आमदार पुन्हा या तालुक्यात होवो. हीच इच्छा.!