संगमनेरातील सारोळेपठार येथे माजी सरपंच व ग्रामसेवकाचा 25 लाख 22 हजारांचा घोटाळा, गुन्हा दाखल.! निधी खाल तर जेलमध्ये जाल.!
संगमनेर तालुक्यातील सारोळापठार येथे माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी विविध योजनांमध्ये गैरव्यवहार करुन संगनमताने ग्रामपंचायतीचा 25 लाख 21 हजार 911 रुपयांचा निधी गिळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सन 2014 ते 18 या कालाधित सरपंच प्रशांत गवराम फटांगरे व ग्रामसेवक सुनिल शंकर शेळके अशा दोघांनी हा प्रकार केला असून याप्रकरणी संगमनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनिल गुलाबराव माळी यांनी शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी संगमनेर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सरपंच, ग्रामसेवक आणि ठेकेदार यांच्यात मोठी खळबळ उडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन 2014 साली सारोळापठार येथे आरोपी प्रशांत गवराम फटांगरे यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली होती. त्यावेळी तेथे भ्रष्टाचारी ग्रामसेवक सुनिल शंकर शेळके हा कार्यरत होता. या दोघांनी मिळून कोणत्याही सदस्यांना विश्वासास न घेता आपला मनमानी कारभार सुरू ठेवला. गावात येणार्या वेगवेळ्या कामांमध्ये मलिदा कसा जमा करता येईल या भावनेने मिळेल त्या कामात अफरातफर करण्याची यांनी संधी सोडली नाही. त्यामुळे, या भ्रष्ट व्यक्तींच्या विरोधात बंड पुकारुन गावातीलच एक सामाजिक कार्यकर्त्याने सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात दि. 25 जानेवारी 2020 गटविकास अधिकार्यांसह अन्य ठिकाणी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यावर सखोल चौकशी करण्यासाठी बीडीओ सुरेश शिंदे यांनी व्ही. एस. जोंधळे, आर. एस कासार, बी.बी वाघमोडे या तीन विस्तार अधिकार्यांची समिती नेमली होती. या समितीने अगदी पारदर्शी व निर्भिड तपास करुन दि. 31 जुलै 2020 रोजी चौकशीअंती अहवाल दाखल केला होता. त्यात भ्रष्ट ग्रामसेवक सुनिल शंकर शेळके व सरपंच प्रशांत फटांगरे हे दोघे दोेषी आढळून आले होते.
दरम्यान, कायदेशीर दृष्ट्या या दोघांनाही प्रशासनाकडून शो-कॉझ (कारणे दाखवा) नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या. मात्र, यांच्याकडून वेळीच त्यास उत्तर मिळाले नाही. सरपंच यांनी धास्ती घेत उत्तर दिले नसले तरी ग्रामसेवक यांना नोकरी कराणे उत्तर देणे अनिवार्य होते. त्यांनी 1 आक्टोंबर 2020 रोजी आपले लेखी म्हणणे सादर केले. एकंदर ज्या पद्धतीने शासनाने जो निधी दिला होता. त्याचा योग्य ठिकाणी विनियोग होणे गरजेचे होते. तेथे तो झाला नाही. त्यात अंदाजपत्रक घेणे, मुल्यांकण करुन घेणे, त्याला ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत मंजुरी घेणे असे कायदेशीर सोपस्कर न करता या दोघांनी मनमानी कारभार करुन लाखो रुपयांचा अपहार केला. यात प्रशांत फटांगरे याने 16 लाख 13 हजार 720 रुपये स्वत:च्या नावे काढले तर भ्रष्ट ग्रामसेवकाने 9 लाख 8 हजार 191 हजार रुपये स्वत:च्या नावे काढले. एकंदर चौकशीअंती असे लक्षात आले की, या दोघांनी मिळून शासनाच्या पैशांचा अपहार करुन शासनाची फसवणुक केली आहे.
दरम्यान, या दोघांवर जे काही आरोप करण्यात आले होते ते सिद्ध झाल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी काही सबळ कागदपत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले होते. त्यानंतर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगमनेरच्या गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी सुनिल माळी (विस्तार अधिकारी) यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल पाटील करीत आहेत.
खरंतर, अनेक गावांमध्ये गावाच्या विकासासाठी लाखो आणि कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असतो. मात्र, आजकाल बहुतांशी ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवक हे संगनमताने फार मोठा भ्रष्टाचार करतात. एखाद्या ठेकेदारांना हताशी धरुन टक्केवारी ठरवून घेतात आणि लाखो रुपयांचे काम अगदी काही रकमेत अगदी निकृष्ठ दर्जाचे करुन मोकळे होतात. अर्थात आजकाल तरुण पिढी राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय होत आहे. त्यामुळे, त्यांनी अशा भ्रष्ट यंत्रणेवर अंकुश ठेवला पाहिजे. ग्रामसेवक व सरपंच यांच्या हाती कारभार दिला म्हणजे त्यांनी गावाचा विकास करायचा तर वोटोळे करण्याचा चंग बांधला आहे की काय? असे बोलले जात आहे. अशाच प्रकारचा रोजगार हमी घोटाळा पाथर्डी येथे हरिहर गर्जे यांनी काढला होता. त्यात भल्याभल्यांना पळता भुई थोडी केली होती. असे सामाजिक कार्यकर्ते तयार झाले तर खात्रीशीर गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रीया जनतेतून उमटत आहे.