संगमनेरात मंगलकार्यालयाला मोठा दंड.! शुभ मंगल सावधान, अन पोलीस आले.! वऱ्हाड ढेकळं तुडवित उसातून पसार.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरालगत असलेल्या गुंजाळवाडी येथे अमृतालॉन्स मध्ये 50 पेक्षा अधिक लोक असल्याने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नियमांची पायममल्ली झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर संबंधित मालकावर 20 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करून तीन दिवस उलटत नाही तेच आज पुन्हा लग्न सोहळे थाटामाटात सुरू झाले आहेत. या लग्न सोहळ्यामधून पुन्हा लोक कोरोनाला निमंत्रण देत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला लोकांनी केराची टोपली दाखवत सर्व नियम धाब्यावर बसवून घुलेवाडी येथे पाहुणचार लॉन्समध्ये लग्न सोहळा पार पडत होता. पण, कोरोना ग्रामसुरक्षा समिती घुलेवाडीने सतर्कता दाखवत लॉन्सवर 10 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची संगमनेरमध्ये वारंवार पायममल्ली होत असल्याचे पाहायला मिळत असून महसूल यंत्रणा त्यावर कारवाईचा बगडा उचलण्यास मागेपुढे पाहत नाही असे दिसून येत आहे.
दरम्यान, संगमनेर शहरात व उपनगरात ठिकठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या आहेत. या स्पर्धा संगमनेर नगरपालिका डोळ्यासमोर ठेऊन भरवल्याची टिका आता होत आहे. युवकांना आकर्षित करण्यासाठी आजी-माजी नगरसेवक व नेते मंडळीनी या स्पर्धेला साह्ययता केली आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेमधून कोरोनाला आपण आमंत्रण देत आहोत याचा मात्र नेते मंडळींना विसरत पडला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी केली खरी परंतु, रात्रीच्या होणाऱ्या या क्रिकेटच्या स्पर्धेला 8 ला सुरवात होती तर रात्री उशिरापर्यंत शेकडोच्या संख्येने युवक उपस्थित राहतात. ना नियम ना त्यांच्या तोंडाला मास्क. ना आयोजक सॅनिटायझरचा वापर करतात. ना कोणाला सुचना देतात. आता या स्पर्धेच्या बॅनरवर दिग्गज नेत्यांचे फोटो असल्याने कारवाईसाठी संगमनेर प्रशासन कुचराई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या स्पर्धा अधिकाऱ्यांच्या घरासमोर भरवून देखील ते फक्त बघायची भुमिका घेत असल्याची टिका त्यांच्यावर होत आहे.
दरम्यान, संगमनेर मध्ये आजपर्यंत 6 हजार 616 रुग्ण आढळून आले आहे. तर आजतागायत 146 रुग्ण उपचार घेत आहेत. तर या 11 महिन्यात 52 रुग्ण उपचारादरम्यान दगावले आहेत. 11 महिन्याच्या आकडेवारी वर नजर टाकली तर एप्रिल महिन्यात 8, मे महिन्यात 36, जुन महिन्यात 65, जुलै महिन्यात 650, ऑगस्ट महिन्यात 961, सप्टेंबर महिन्यात 1 हजार 529, ऑक्टोबर महिन्यात 1 हजार 41, नोव्हेंबर महिन्यात 908, डिसेंबर महिन्यात 817, जानेवारी महिन्यात 301, फेब्रुवारी महिन्यात 300 ही आकडेवारी कुठेतरी थांबवायची असेल तर नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात कोरोनाची वाढती संख्या पाहता सार्वजानिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठी व संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी 15 मार्चपर्यंत जमावबंदी आणि रात्रीच्या नियंत्रित संचारबंदीचा आदेश दिला आहे. याशिवाय इतर ही निर्बंध कडक करण्यात आले आहे. अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 लोकांना परवानगी, सर्व प्रकारची दुकाने सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेपर्यंत खुली ठेवता येणार. हॉटेल, रेस्टॉरंट, बार 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार. सहकारी संस्थेच्यावार्षिक सभेला 50 व्यक्तींना परवानगी. समारंभ, सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, मनोरंजन, क्रीडास्पर्धा,सण-उत्सव, उरूस, जत्रा या कार्यक्रमांना 50 व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असेल. 'नो-मास्क,नो एन्ट्री' हा नियम सर्वत्र पाळण्याची सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, अकोले तालुक्यात देखील तहसिलदार मुकेश कांबळे व पोलीस निरिक्षक अभय परमार यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या मंगलकार्यालयांना भेटी दिल्या. काही ठिकाणी नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसते कर काही ठिकाणी नियम नेहमीप्रमाणे धाब्यावर बसविले जात असल्याचे लक्षात आले आहे. विशेष म्हणजे अकोल्यातील एका मंगलकार्यालयात एक शुभ प्रसंग चालू होता. त्यावेळी पोलीस व महसूल पथक तेथे दाखल झाले आणि मंडपालीस लोक सैरभैर पळताना दिसून आले. कोणी उसात पळाले तर कोळी ढेकळातून पळत सुटले. त्यामुळे, अशा प्रकारची वेळ निर्माण होण्यापेक्षा नवरी नवरदेव आणि त्यांच्या कुटुंबानेच थोडी सामंजस्याची भूमीका घेतली पाहिजे. तर, नातेवाईकांनी देखील घरुनच आशिर्वाद देत गर्दी टाळली पाहिजे. विशेष म्हणजे आजकाल लोक लग्नाला येतात, वधुवरांना भेटतात आणि पोटोबा करुन चालते होतात. त्यामुळे, गर्दीही होत नाही आणि कारवाईचा प्रश्नही उरत नाही. लग्नाला भेटही होते आणि कोणी नाराजही होत नाही. त्यामुळे, भारत हा जुगाड करणारा देश म्हणून ओळखला जातो. आता असेच काहीसे जुगाड करुन आनंद घेत कोरोनाला हद्दपार करायचे आहे. त्यामुळे, प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे.
- सुशांत पावसे