स्टार मोबाईल शॉपी फोडणारे दरोडेखोर जेरबंद.! संगमनेर पोलिसांची कामगिरी.! अकोले पोलिसांचा आयत्यावर कोयता.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरालगत असलेल्या दोन शोरूमची व अकोल्याच्या स्टार मोबाईल शॉपीची चोरी करणार्या सिन्नर येथील गुन्हेगारांच्या सराईत टोळीस संगमनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले यांनी बेड्या टोकल्या आहेत. आरोपींकडून 1 लाख 80 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात विजय सुदाम कातोरे (वय 20), सोमनाथ निवृत्ती मेंगाळ (वय 21), विजय सखाराम गीर्हे (वय 20) सर्व रा. शिवडे, ता. सिन्नर, जि. नाशिक या तिघांना सिन्नर पोलीस स्टेशनच्या मदतीने संगमनेर व अकोले पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आता आरोपींना लाखोंच्या मुद्देमालासह संगमनेर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पुढील तपास चालु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कामगिरीनंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, यांनी संगमनेर शहर पोलिसांचे कौतुक केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी संगमनेर शहरालगत समनापुर रोड येथे होंडाई शोरूमचे रात्री 8 ते 16 फेब्रुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमांनी कॅशिअरच्या कॅबिनचे लॉक तोडून ड्रावरचे लॉक तोडत 3 लाख 13 हजार 812 रुपये रोख रक्कम चोरले होते. त्याबाबत शोरूमचे मॅनेजर वैभव रामदास येवले यांना कळताच त्यांनी लगेच संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले तसेच पोलीस कर्मचारी हे त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने तपास करत असतानाच महाले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरच्या गुन्ह्याबाबत सिन्नर येथील सराईत टोळीचा हात असू शकतो. अशी गोपनीय माहिती मिळताच पथकातील पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले, स.फौ. राजेंद्र गायकवाड, पो.ना. विजय खाडे, पो.कॉ. अमृत अढाव, पो.कॉ.प्रमोद गाडेकर, पो.कॉ. शरद पवार, पो.कॉ. सचिन उगले, पो.कॉ. सुभाष बोडखे, पो.कॉ. फुरकान शेख व सिन्नरच्या पोलिसांची मदत घेऊन या सर्वांनी मिळवुन सिन्नर मध्ये जाऊन मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांच्याकडून काही प्रमाणात मुद्देमालाची रिकवरी केली आहे.
दरम्यान याच चोरट्यांनी अकोले शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी स्टार मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडून एक गोणी भरुन मोबाईल, हेडफोन, ब्लुटूथ, पेन्ड्राइव्ह असा 2 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. ही घटना बुधवार दि. 9 ते गुरूवारी दि. 10 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी समीर मोहंमद सय्यद (रा. बाजारपेठ, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली होती. हा गुन्हा कशा पद्धतीने घडला ती बाब सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्या दरम्यान अकोले पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक अभय परमार हे पोलीस ठाण्यात नव्याने हजर झाले होते. मात्र, दुदैवाने त्यांनी या गुन्हाचा छडा लावण्यात यश आले नाही. या दरम्यान राजुरचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दोन मोठ्या कामगिर्या करुन काही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. मात्र, अभय परमार यांना ते काम जमले नाही. उलट राजकीय पक्षाच्या काही कर्मचार्यांच्या उटारेट्या सोडविण्यात ते दंग झाले मात्र, ते हजर झाल्यापासून एकही उल्लेखनिय कामगिरी त्यांच्याकडून पहायला मिळाली नाही.
परमार हजर झाल्यानंतर अकोले शहरात बस स्थानकाच्या अगदी काही अंतरावर म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी समीर सय्यद यांची स्टार मोबाईल शॉपी आहे. त्यांनी बुधवारी 8:30 वाजता नियमित आपले दुकान बंद केले होते. मात्र, शहरात कोणत्याही प्रकारची गस्त नाही, कोठे पेट्रोलिंग नाही त्यामुळे, चोरट्यांनी दुकानेच काय! पोलीस ठाणे फोडले तरी या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही. यापुर्वी चक्क पोलीस ठाण्यात चोरी होऊन फार काळ लोटलेला नाही. त्यामुळे, तालुक्याला हे देखील काही नवे नाही. त्यामुळे, या चोरट्यांनी बरोबर या दुकानावर पुर्वीपासून वॉच ठेवलेला आणि सुस्तावलेल्या पोलिसांचा फायदा घेत रात्रीचा वेळ साधून बरोबर चोरीचा डाव साधल.
खरंतर अकोले शहरात नाईट पेट्रेलिंग, सेक्टर पेट्रोलिंग, बंदोबस्त यांची नित्तांत गरज आहे. मात्र, दुर्दैवाने येथे 755 इतका क्राईम रेट असताना देखील पोलीस अधिक्षक अकोले तालुक्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. इतकेच काय? आमदार किरण लहामटे यांनी पोलीस ठाण्याकडे एकदा तरी डोकावून पाहिले पाहिजे. कारण, येथे केवळ एक पोलीस निरीक्षक व एक पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर 94 गावांचा कारभार सुरू आहे. तर केवळ 34 कर्मचारी त्यात दोन वाहन चालक, कोणी गार्ड, कोणी सुट्टीवर, कोणी सिकमध्ये, आजवर चौघे निलंबित, कोणी साप्ताहीक सुट्टीवर.! तुम्हीच सांगा! हे पोलीस ठाणे चालवायचे तरी कसे? एक पोलीस उपनिरीक्षक त्यांच्याकडे पोतेभर तपास.! काही कर्मचारी तर निकामीच आहेत? मग या दोन अधिकार्यांनी पोलिसिंग करायची की पेट्रोलिंग, तपास करायचे की पोलीस ठाणे संभाळायचे? त्यामुळे येेथे दोन अधिकारी आणि काही कर्मचारी यांची पुर्तता होणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्रकारच्या चोर्या येथे घडतच राहतील.
दरम्यान, आता अकोले पोलिसांना विजय सुदाम कातोरे (वय 20), सोमनाथ निवृत्ती मेंगाळ (वय 21), विजय सखाराम गीर्हे (वय 20 सर्व रा. शिवडे, ता. सिन्नर, जि. नाशिक) ही तिघे आयते आरोपी मिळाले आहे. मात्र, तालुक्यात व शहरात देखील असे फार गुन्हे दाखल असून ते कायम तपासावर आहे. त्यामुळे, किमान त्यांची तरी उकल करण्यात यश मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता ज्या व्यक्तीचा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला आहे. ते पोलीस तपासावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. इतक्या दिवस होऊन देखील साधा एक मोबाईल देखील चोरट्यांकडून पोलीस मिळवू शकले नाहीत. असे बोलले जाते की, चोरट्यांनी त्या मोबाईलांची विल्हेवाट लावली असून त्या बदल्यात गाडी घेतल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पोलीस तपास सुरु आहे. यात ज्या व्यक्तीची लाखो रुपयांची नुकसान झाली ती त्यास मिळाली म्हणजे बरे. अन्यथा मोबाईल रहायचे बाजुला आणि पोलीस ठाण्यात खेटा माण्याची वेळ यायला नको.!