ज्यांचा अगस्ति कॉलेजसाठी शुन्य वाटा, त्यांचाच मोठा आटापिटा.! आमदारांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन संस्थेंवर निशाणा.!
सार्वभौम (अकोले) :- सन 1972 च्या दुष्काळाचे सावट राज्यावर कोसळलेले असताना देखील महाराष्ट्रात फक्त आणि फक्त 3 कॉलेज्यांना विधानसभेत मंजुरी मिळाली. त्यातील एक कॉलेज म्हणजे अगस्ति कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले हे होय.! तालुक्यातील गोरगरिब तरुणांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी माजी मंत्री दादासाहेब रुपवते व साहेब काही नको! फक्त माझ्या तालुक्याला कालेज द्या. असे म्हणणारे मा.आ. यशवंतराव भांगरे यांच्या स्मृती सर्वात प्रथम येथे जाग्या होतात. मात्र, दुर्दैवाने येथे फक्त त्यांच्या आठवणींचा सागांडा उभा आहे. तर ज्यांचा अगस्ति कॉलेजसाठी शुन्य वाटा आहे. त्यांचाच मोठा आटापिटा.! सुरू असल्याचे दिसते आहे. म्हणजे, एकंदर या राजकारणाच्या गोतावळ्यात कॉलेजचे आणि येथील विद्यार्थ्यांचे वाटोळे झाले नाही म्हणजे सर्व काही आपण जिंकले म्हणायचे.
अकोले तालुक्यात 1972 साली शिक्षणाच्या सेवा सुविधा नव्हता. तालुक्यात माध्यमिक शिक्षण झाले की, एकतर संगमनेर किंवा तालुका सोडून विद्यार्थ्यांना बाहेर पडावे लागत होते. अशा वेळी मुलींचे शिक्षण फार तोडके होते तर ज्यांना शिकण्याची प्रचंड इच्छा होती तेच घराबाहेर पडत होते. त्यामुळे, शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य पुर्णत्वास जात नव्हते. त्यामुळे, दादासाहेब यांनी बीड, नगर, अकोले, राजूर, संगमनेर, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणसंस्था उभ्या केल्या होत्या. म्हणून त्यावेळी तालुक्याचे भूमिपुत्र भाऊसाहेब हांडे, लालचंद शहा यांच्यासह अन्य मंडळींनी थेट दादासाहेब रुपवते यांची भेट घेऊन अकोल्यात कॉलेज व्हावे असा अग्रह धरला. त्यानंतर दादासाहेबांनी सर्व प्रकरण स्वत:कडे घेत कॉलेजचा प्रस्ताव विधानसभेत मांडला.
अर्थात, अकोले तालुक्यात जर कॉलेज झाले तर संगमनेर तालुक्यातील कॉलेज बंद पडतील अशा प्रकारचा आवाज पुढे आला आणि सगळ्यात पहिला खोडा शेजारच्या तालुक्यातून मिळाला. मात्र, दादासाहेब यांचा तो काळ फार चलतीचा होता. आंबेडकरी चळवळीत त्यांचे फार वजण होते आणि ही चळवळ संभाळण्यासाठी काँग्रेस त्यांना मंत्रीपदांसह फार बळ देत असे. त्यामुळे, ऐकीकडे प्रचंड विरोध होत असताना दुसरीकडून यशवंतराव भांगरे हे देखील तालुक्यात कालेज हवेच यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे, 1972 च्या कडक दुष्काळात देखील अकोले कॉलेजला मान्यता मिळाली आणि येथील तरुण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागला. त्यानंतर पै-पै करुन कॉलज उभे राहिले, नंतर त्याचे नामांतर होण्यासाठी अनेकांनी लढा दिला. हा इतिहास नंतर मांडूच. मात्र, काल जे कॉलेज लोकांच्या घामातून उभे राहिले, आज त्याच कॉलेजवर सत्ता प्राप्ती किंवा वर्चस्व मिळविण्यासाठी हमरी-तुमरी सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
अर्थात काल दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी अगस्ति कॉलेजवर सुरू असलेल्या मनमानी कारभाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक बैठक घेतली. ही बैठक पक्षीय नव्हती तर कॉलेजच्या हितचिंतकांच्या बाबत आयोजित केली होती. मात्र, दुर्दैवाने येथे राष्ट्रवादीचे समर्थक वगळता अगदी एका हाताची बोटे कमी पडतील इतकी त्रयस्त मानसे होती. यात अनेकांनी कायद्यावर बोट ठेवले तर कोणी पिचड विरोधी म्हणून तोंडसुख घेतले. या पलिकडे कोणी व्यवस्थापनातील काही व्यक्तींवर रोष व्यक्त केला आणि प्लस मायनस भूमीका घेत दशरथ सावंत यांनी घेतलेल्या आंदोलनाच्या पवित्र्यानंतर बैठकीला पुर्णविराम मिळाला.
या दरम्यान, अनेक उलटसुलट चर्चा झाल्या. त्यावेळी असे ठरले की, पहिल्यांदा काही प्रश्न विचारून आपण जाब मागावा, जर त्याने समाधान झाले नाही तर रोज कॉलेजपुढे आंदोलन करण्याची देखील तयारी ठेवावी आणि तिसरी गोष्ठ म्हणजे या सर्व प्रक्रियेला कायदेशी मार्गाने सामोरे जावे लागले तर धार्मदाय आयुक्तांपर्यंत जाऊन जे काही विश्वस्त मांडळ आहे. त्यांच्या विरोधात आपिल करीत लोकशाही मार्गाने कॉलेजवर ताबा मिळवायचा आणि ते चालविण्याचा प्रयत्न करायचा. यावेळी कायम विश्वस्त आणि सभासद यांच्यावर देखील विचार विनिमय करण्यात आला. त्यात ज्यांनी पिचड साहेबांच्या खाद्याला खांदा लावून कामे केली त्यांनीच त्यांच्या विरोधात बंडाची भूमिका घेत त्यांच्या कार्य कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आता एकच प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे, आज कॉलेज मोठ्या कष्टातून उभे राहिले आहे. राष्ट्रवादीचे नेते म्हणतात, कारखाना तोट्यात, कॉलेज तोट्यात, दुधसंघ तोट्यात, मार्केटयार्ड तोट्यात, नगरपंचायत तोट्यात मग एक गोष्ट लक्षात येत नाही की, जे आज प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. ते यापुर्वी कोठे होते? यांनीच तर पदांचा उपभोग घेतला आहे. वास्तव सांगायचे झाले तर यातील असे बरेच लोक आहेत, जे आच वाल्याचा वाल्मिकी होऊ पाहत आहे. यांनी जर दशरथ सावंत साहेबांसारखा उभी हयात विरोध केला असता तर यांच्या शब्दाला खरोखर प्रमाण माणून यांच्या आरोपांना दाद दिली पाहिजे. मात्र, करुन सवरुन आता हे सगळे देवपुजेला लागले अशा प्रकारची टिका आरोप करणार्या काही व्यक्तींवर होऊ लागली आहे. कारण, यातील बहुतांशी तेच चेहरे दिसून येत आहेत. खरे आत्मियतेचे व्रत घेऊन तालुक्यात पायपिट करीत जंग-जंग पछाडणारे बी. जे देशमुख गेले कोठे? त्यांनी जे काही आरोप कारखाण्यावर केले ते दाबण्याचे काम कोणी केले? म्हणजे, वेळ पडली तर वाल्याचा वाल्मिकी झाला तर राष्ट्रवादीला देखील झुकावेच लागते असेच म्हणायचे की? त्यामुळे, हा बदनामीचा कावा कशासाठी?
खरंतर, पक्ष आणि राजकारण सोडून आज खर्या अर्थाने पाहिले तर कॉलेज चालविणे हे फार जिकरीचे काम होऊन बसले आहे. एकीकडे भर अॅडमिशनच्या काळात केरोनाची महामारी आली तर दुसरीकडे अकोले तालुका हा दुर्गम भाग असल्यामुळे, पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या गोल्डन सिटी सोडून विद्यार्थी खेड्याकडे वळायला तयार नाही. त्यामुळे, येथील इंजिनिअरींग, एमबीए आणि अन्य शाखा चालविताना नाकीनव येताना दिसतो आहेे. त्यामुळे, जे चालु आहे त्याला खोडा घालुन बंद पाडण्याचे पातक कोणी करीत असेल तर ते कोणाच्या माथी मारायचे? थोडं वाईट वाटेल, पण, आज राष्ट्रवादीत जे काही नेते मंडळी आहेत. त्यापैकी किती लोक दानशूर आहेत? जे घर घालुन कॉलेज चालवू शकतील? वास्तवत: यांची उधारी देण्याची दानत नसते. त्यामुळे, कॉलेज चालविणे म्हणजे उचलली जीब आणि लावली टाळुला. असे होता कामा नये अशा प्रकारचा सूर आता सुज्ञ व्यक्तींच्या तोंडून बाहेर पडत आहे.
खरंतर, 10 जुन 2002 ही दिवस बर्याच रथी महाराथींना आठवत असेल. त्यावेळी साखर कारखाण्याच्या मतमोजणी दरम्यान मार्केटयार्ड येथे गोळीबार झाला होता. त्याचे दु:ख म्हणून माजी मंत्री मधुकर पिचड यांनी कारखाणा विरोधकांच्या ताब्यात दिला होता. मात्र, पुढे झाले काय? कारखाना बंद पडला आणि सर्व मशनरी गंजून गेल्या होत्या. आता देव करो आणि कॉलेजचे तसेच व्हायला नको. जर शिक्षण संस्था गंजल्या तर येणारी पिढी काही व्यक्तींना माफ करणार नाही. त्यामुळे, तेथे जर मनमानी कारभार होत असेल तर त्यावर नक्कीच आवाज उठविला पाहिजे. तेथे गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळत नसेल तर नक्कीच आंदोलने केली पाहिजे. मात्र, एक वेळी राजकीय गणिते बदलली कोठे नाही. तर तुम्ही जग बदलायला निघत असाल तर जनता देखील कोणाचा अतिरेख खपून घेणार नाही. कारण, जेथे ज्ञानाचे मंदीर आहे. तेथे अज्ञानी कृती होत असेल तर येणार्या पिढीने तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा? असा प्रश्न एका विद्यार्थ्याने उपस्थित केला आहे.
खरंतर, डॉक्टर किरण लहामटे यांना जनतेने इतका मोठा जनाधार दिला आहे. त्यांनी देखील त्याचा कधी अतिरेख केला नाही. ते आज देखील भाषनात हेच म्हणाले की, जर ते निट चालवत असतील तर त्यात आपला हस्तक्षेप नको. इतकी प्रांजळ भूमिका आमदार साहेबांची आहे. मात्र, त्यांच्या आडून कोणी कारखान्याचा बॉयलर पेटवतय तर कोणी नगरपंचायतीत हात घालतय, कोणी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हवेत गोळ्या झाडतय तर कोणी आता कॉलेज टारगेट करु पाहतय. हे असेच चालु राहिले तर हाच गोतावळ पुढे पक्षासाठी घातक ठरु शकतो. यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे, घे घास पी पाणी करण्यापेक्षा एकएक गोष्टीकडे डॉक्टरांनी लक्ष दिले पाहिजे असे प्रामाणिक मत त्यांच्या कार्यकर्त्यांनी मांडले आहे.