टाकळीतील थडक्लास राजकारण ! उपसरपंचावर राजकीय अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल.!
एका गटातून निवडून आलेला सदस्य ऐनवेळी दुसर्या गटाला जाऊन सामिल झाला. त्यामुळे, पहिल्या गटाचे बहुमत घटले आणि दुसरीकडे जाऊन हाच व्यक्ती उपसरपंच झाला. आता या दरम्यान दोन बड्या नेत्यांमध्ये चांगलीच तुफान हाणामारी झाली. मात्र, या दोन्ही गटातील प्रस्तापित नेते इतके शातीर होते की, त्यांनी स्वत: केलेल्या मारामारीची पोलीस ठाण्यात जरा देखील नोंद होऊ दिली नाही. इतकेच काय! त्यांच्या-त्यांच्यात तेरी भी चूप आणि मारी भी चुप अशी भुमिका घेत त्यांच्या वादावर पडदा टाकला. मात्र, हे सर्व जळत-जळत बरोबर गोरगरिबाच्या घरावर आणून ठेवलं आणि मग त्यानंतर झाला विनयभंग व अॅट्रॉसिटीचा वापर. त्यामुळे, गोरगरिबाच्या आडून राजकारण करण्याची परंपरा तालुक्यात पुन्हा पहायला मिळाली अशी चर्चा जनतेत रंगली आहे. दत्तू भरत गरुड (रा. टाकळी, ता. अकोले) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. यावर्षी सरपंच पदाचे आरक्षण व निवड ही निवडणुक झाल्यानंतर लागल्यामुळे अनेकांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. आपले गाव स्वत:कडे रहावे यासाठी अकांत-तांडव करण्यासाठी कोणी कमी पडले नाही. त्यामुळे, भल्याभल्या गावांमध्ये हाणामार्या झाल्याचे प्रकार घडले. मात्र, यात काही ठिकाणी गोरगरिब जनतेवर दादागिरी झाली तर कोणी नकळत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. कोठे कोणाला अपयश पचले नाही तर कोणाकडे बहुमत असून देखील आरक्षणामुळे सरपंच पद राखता आले नाही. अशा अनेक कारणांनी यावेळी राजकारण अगदी रंगून गेले होते. मात्र, या पलिकडे काही ठिकाणी राजकारणाने थडक्लास पातळी गाठल्याचे पहायला मिळाले.
त्याचे झाले असे की, टाकळी हे गाव पुर्वी पिचड कुटुंबाशी निगडीत होते. मात्र, त्यांच्या पक्षबदलानंतर या गावात दोन गट पडले. दोन्ही गट तुल्यबळ असल्यामुळे तालुक्याचे लक्ष येथे लागले होते. अर्थात वास्तवत: येथील राष्ट्रवादीच्या गटाचा पराभव झाला होता. मात्र, ऐनवेळी राजकारण कोठून कसे फिरवायचे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून महाविकास आघाडी स्थापन होताना संपुर्ण देशाने पाहिले आहे. त्यामुळे, त्यांचे चेले किमान ग्रामपंचायत हालवू एकतात इतके तरी राजकारण ते शिकले आहेत. त्यामुळे, जेव्हा बहुमताचा विषय पुढे आला तेव्हा राष्ट्रवादीने विरोधकांचा एक उमेदवार फोडला आणि त्यालाच सरपंच केला. त्यामुळे, ऐनवेळी आलेल्या संकटाचा रोष काढत दोन्ही गट एकमेकांना भिडले आणि येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.
खरंतर, इतक्या अटातटीच्या राजकारणात एखाद्या व्यक्तीने निवडून आल्यानंतर दगा देणे म्हणजे फार मोठी अविश्वासाची गोष्ट आहे. त्यामुळे, सहाजिकच संतापाची लाट पसरणे यात काही गैर नाही. त्यामुळे प्रतिष्ठा जोपासण्यासाठी येथे जे काही झाले ते टाकळीच्या परंपरेला आणि संस्कृतीला न शोभनारे होते. मात्र, यावेळी ज्या काही हाणामार्या झाल्या होत्या. त्यात सामंजस्य घडवून आणण्यात पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे, त्यात दोन्ही गटांनी स्वत:चे गुन्ह्यापासून संरक्षण आणि बदनामी म्हणून का होईना अक्षरशा कोणत्याही प्रकारचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल केला नव्हता. मात्र, या घटनेला नंतर फार वेगळे वळण लागल्याचे बोलले जात आहे.
आता खरे काय आणि खोटे काय! याचा तपास पोलीस करतील. मात्र, एका आदिवासी महिलेला इतक्या गलिच्छ भाषेत कोणी बोलत असेल तर त्याला शासन झालेच पाहिजे. तर दुसरी बाजू म्हणजे एका गटाने पोलीस ठाण्यात स्वत:ची बाजू मांडली आहे की, संबंधित व्यक्तीवर जो काही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला राजकीय अंग असून केवळ एका महिलेला मोहरा करण्यात आला आहे. त्यामुळे, आता या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक राहुल मदने हे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेही पोलीस अधिकारी आजकाल अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये फारसा रस घेत नाहीत. त्यांच्याकडून आरोपीला जामीन मिळेपर्यंत अटक होत नाही. हे आपण यापुर्वी दराडे अॅट्रॉसिटी गुन्ह्यात पाहिले आहे. त्यामुळे, आजकाल अशा गुन्ह्यांचा वचक पोलिसांनी कमी केल्याचे बोलले जाते. मात्र, राजकारणाच्या आडून जातीचा आधार घेऊन राजकीय अॅट्रॉसिटी दाखल करुन घेण्याची परंपरा नगर शहरात दंडगी आहे. तीच अकोले तालुक्यात पहायला मिळत आहे. हे कोठेतरी थांबविण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. बाकी, या गुन्ह्यात सत्य व असत्य काय? हे लवकरच समोर येईल.