थोडी ना थिडकी, 1 कोटीची खंडणी आणि भितीपोटी दिले 30 लाख.! शिवसेनेच्या पदाधिकार्‍यासह तिघांवर गुन्हा दाखल.!

सार्वभौम (अकोले) :- 

                    1 कोटीच्या खंडणीसाठी बिल्डींगच्या बांधकामात खोडा घालुन 30 लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. उर्वरित रक्कम न दिल्यामुळे, पुन्हा अर्जफाटे करुन प्रशासनास वेठीस धरणे, फिर्यादीसह पत्नीस धमकाविणे, ठार मारण्याच्या धमक्या देणे असे प्रकार वारंवार होत आहे. हा प्रकार गेल्या तीन वर्षापासून कायम सुरू असून रोख रक्कम, चेक, थेट खात्यावर आरटीजीएस असे करुन आरोपींनी खंडणी वसुल केली आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात लक्ष्मीकांत आंबादास नाईकवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर सुभाष कानवडे, गणेश भागुजी कानवडे, सुभाष भागुजी कानवडे (सर्व रा. अगस्ती बेकरी, अकोले) अशी तिघांची नावे आहे.

याबाबत लक्ष्मीकांत नाईकवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, मी गेल्या 10 वर्षापासून बांधकाम प्रकल्पाची कामे करतो. त्यावेळी मी अर्बन जिनेसीस इन्फ्राकन कंपनीशी भागीदार होतो. मात्र, कालांतराने कायदेशीर रित्या मी त्यातून बाहेर पडलो आणि स्वत:चे अगस्ती डेव्हलपर्स फर्म स्थापन केले. या दरम्यानच्या काळात अर्बन जिनेसीस इन्फ्राकन कंपनीत अकोले येथील आरोपी मयुर सुभाष कानवडे व सुभाष भागुजी कानवडे या दोघांनी गुंतवणुक केली आणि त्यानंतर कालांतराने त्यांचे डायरेक्टरसोबत मतभेद झाले. मात्र, मी त्यापुर्वीच म्हणजे 2017 साली त्या कंपनीसह यांच्या गोतावळ्यातून बाहेर पडलो होतो. या दरम्याच्या काळात अर्बन जिनेसीस इन्फ्राकन कंपनी तथा त्यातील शेअर होल्डर आणि व्यवस्थापन यांच्याशी माझी काही एक संबंध व देणे-घेणे नव्हते. उलट मलाच या कंपनीकडून घेणे होते.

नाईकवाडी यांनी फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, यांच्यात वाद सुरू असताना मी माझे फर्मच्या माध्यमातून राजगुरूनगर व अकोले येथे काम सुरू केले होते. अर्थात हा फार मोठा प्रकल्प असल्यामुळे मी तो उभा करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचे कर्ज काढून तो उभा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मयुर कानवडे व सुभाष कानवडे यांनी व्यक्तीद्वेष म्हणून कामात वारंवार अडथळा आणला. त्यानंतर त्यांना समजून देखील सांगण्यात आले. मात्र, त्यांचा हेतू काय होता याची मला नंतर खात्री झाली. कालांतराने आरोपी यांनी मला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. मला वेठीस धरण्यासाठी त्यांनी राजगुरूनगर येथील मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना खोटी माहिती देऊन तक्रार करीत काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. एक खात्री म्हणून प्रशासनाने काम बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लक्षात आले की, सुभाष कानवडे, गणेश कानवडे, मयुर कानवडे यांनी बांधकामावर हारकती घेतल्या आहेत.

दरम्यान, जोवर पैसा नाही तोवर बांधकाम नाही. अशी भूमिका तिघांनी घेतल्यामुळे, एकीकडे कर्जचे मिटर थांबत नव्हते तर दुसरीकडे बाधकाम अपुर्ण राहून काम प्रलंबित राहिले होते. त्यामुळे, नाईकवाडी यांनी थेट मध्यस्तीचा मार्ग अवलंबविला. त्यावेळी राजू गोडसे, सचिन शेटे, महेश नवले, शिवाजी धुमाळ यांनी भाऊपाटील नवले यांच्या जनलक्ष्मी पतसंस्थेत एक मध्यस्ती म्हणून भूमिका पार पाडण्याचे ठरविले. त्यावेळी 2019 मध्ये झालेल्या बैठकीत असे ठरले की, तिघांना मिळून 55 लाख रुपये द्यायचे. त्यानंतर ते अर्ज मागे घेणार होते. मात्र, ही रक्कम पाहता ती शक्य नव्हती तर दुसरीकडे बांधकाम रखडले होते. व्याज सुरू होते त्यामुळे त्यांनी 47 लाख रुपये देण्यास मी तयार झालो. त्यावेळी एक रकमी 4 लाख 25 हजार रु. दिले देखील होते असे नाईकवाडी सांगतात. तर कधी चेक, बँक टू बँक असे 30 लाख रुपये टप्प्या टप्प्याने दिले होते. ही रक्कम त्यांनी स्विकारली देखील आहे. त्यानंतर कानवडे यांची जे काही अर्ज सरकार दप्तरी जमा केले होते, ते काढून घेतले.

दरम्यान, नाईकवाडी म्हणतात, मी राजगुरूनगर येथे बिल्डींग बांधण्यास सुरूवात केली असता आरोपी हे तेथे आले व त्यांनी उर्वरित रकमेची मागणी केली. इतकी मोठी रक्कम देणे मला शक्य नाही, माझ्याकडे पैसे आले की मी तुमची ठरलेली रक्कम देऊन टाकतो. मात्र, त्यांनी ते एकले नाही. त्यांनी पुन्हा माझ्या राजगुरूनगर येथील बांधकामा विरोधात रिट याचिका दाखल केली. त्यात बांधकाम पाडून टाकावे या मागणिला न्यायालयाने थारा दिला नाही. ती याचिका फेटाळत आदेश माझ्या (नाईकवाडी) बाजुने लागला. मात्र, तरी देखील आरोपींनी सरकार दरबारी कागदी घोडे नाचविण्यास सुरूवात केली. म्हणून मी मागिल मध्यस्ती यांच्या कानावर ही गोष्ट घातली. म्हणून समजले की, आरोपी यांना आता 1 कोटी रुपयांची खंडणी हवी आहे. जर ही रक्कम मिळाली तर अर्ज मागे घेऊ असा निरोप समजला. 

नंतरच्या काळात याच रकमेसाठी नगरसेवीका सोनालीताई नाईकवाडी यांना गणेश कानवडे यांनी रस्त्यात आडवून 1 कोटी  रुपयांसाठी दमदाटी करण्यात आली. त्यानंतर नाईकवाडी यांनी पोलीस ठाणे गावविले आणि गुन्ह्याची नोंद केली. आता पोलीस करणार तरी काय? त्यांनी अदखलपात्र गुन्हा नोेंदविला आणि त्यानंतर साधं चौकशीला देखील कोणाला बोलवि गेले नाही. तो गुन्हा तसाच पडून राहिला आणि कानवडे देखील पुढे अडकाठी करत राहिले. यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. त्यामुळे गेल्या 9 महिन्यांपासून नाईकवाडी हे त्यांचे गार्‍हाणे पोलीस दरबारी मांडत होते. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. आता तिघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून फारसे सहकार्य होत नसल्याचे आरोप धुमाळ यांच्याकडून केले जात आहे

आरोपी अटक करा अन्यथा...

एकीकडे जिल्ह्यात मोठमोठे गुन्हे घडत आहेत. तेव्हा पोलीस पथके तत्काळ रवाना केली जातात. मात्र, अकोले सारख्या ठिकाणी 1 कोटींची खंडणी मागून देखील आरोपी अटक होत नाहीत. हे दुर्दैव आहे. हा गुन्हा निव्वळ शो म्हणून दाखल केलेला नाही तर त्यात 30 लाख रुपयांची रिकव्हरी आहे. यांच्या सोबतचा मास्टर माईंड, याचे हेतू, यांच्याकडील काही कागदपत्र, यांचे जबाब, खूप काही बाकी आहे. आज 15 दिवस झाले आरोपी अटक नाहीत. ते बाकी राजरोस फिरतात. त्यांची माहिती देऊन देखील त्यांच्या मुसक्या आवळल्या जात नसतील तर न्याय शब्दावर विश्वास राहणार नाही. जोवर आरोपींना अटक होत नाही तोवर पोलिसांना देखील पुर्णत: तपास करता येणार नाही. त्यामुळे, तपासी अधिकारी व पोलीस निरीक्षक चांगले असून त्यांच्याकडून निर्भिड पद्धतीने कारवाई होणे आपेक्षित आहे. अन्यथा आता आम्हाला देखील पर्यायी मार्ग वापरावे लागेले.

 - शिवाजी धुमाळ (भाजप, ज्येष्ठ नेते)

पोलिसांना जाग केव्हा येणार.!

एकतर पोलीस गुन्हा दाखल करीत नव्हते, आता गुन्हा दाखल केला. त्याचा पाठपुरावा देखील करीत आहे. मात्र, यात पोलिसांचा रोल महत्वाचा आहे. त्यामुळे, त्यांनी यात आरोपींना तत्काळ अटक केली पाहिजे. कारण, आरोपी हे साक्षिदारांवर दाबाव आणत आहे. तर उशिरा अटक झाली किंवा आरोपींना जर जामीन भेटला तर नंतर त्यांच्याकडून पोलीस काय चौकशी करणार आहे? पोलिसांवर नेमकी कोणाचा दबाव आहे हे कळेना! एका छोट्या शहरात 1 कोटी व 30 लाखांच्या खंडण्या वसुल केला जात असेल तर तालुक्यासाठी ही अशोभनिय काम आहे.

- चेतन नाईकवाडी (युवा उद्योजक, फिर्यादी)

कायदा सांगतो की...,

आयपीसीचा इतका मोठा गंभीर गुन्हा दाखल असताना पोलिसांनी तत्काळ आरोपी अटक केलेच पाहिजे. त्यांच्या विरोधात पुरावे नाहीत ही सबब न देता पुरावे तपासूनच गुन्हा दाखल केला असे गृहीत असते. त्यामुळे, कलम 384, 385 सारख्या गंभर गुन्ह्यात आरोपीस अटक करुन त्याचे जबाब नोंदवून पुरावे जमा केले पाहिजे. सबळ पुरावे किंवा सर्कमटन्स लक्षात घेऊन प्रभल्भ दोषारोपपत्र दाखल करणे हेच तपासी अधिकार्‍याचे (आयओ) काम आहे. आरोपीच्या विरोधात पुरावे मिळून आले नाही तर त्याला कोर्टाच्या आदेशाने न्याय दिला जातो. मात्र, अटक करण्यापुर्वीच पोलिस दिरंगाई करीत असतील तर त्याबाबत दाद देखील मागता येते.

- अ‍ॅड. सुरेश लगड (विशेष सरकारी वकील)

ते बांधकाम योग्यच..!

सुभाष भागुजी कानवडे यांनी अगस्ती डेव्हलपर्स यांच्या बाधकामाच्या संदर्भात जी काही हरकत तक्रार केली होती. त्याची राजगुरूनगर येथील नगरपरिषदेने सखोल चौकशी केली आहे. यात काही कागदपत्रे देखील तपासले आहेत. जी काही वास्तवदर्शी माहिती व पुरावे हाती मिळाले आहेत. त्यानुसार असे लक्षात येते की, कनवडे यांनी ज्या काही हरकती घेतल्या होत्या. त्यात कोणत्याही प्रकारचे तत्थ्य नाही. अगस्ती डेव्हलपर्स यांनी राजगुरूनगर येथे जे काही बांधकाम केले आहे. ते रितसर असून त्यास शासन मान्यता आहे.

- प्रकाश पाटील (मुख्याधिकारी, राजगुरूनगर, पुणे)