अर्रर्र.! ना. बाळासाहेबांचं गाव ताब्यातून गेलं.! आ. विखेंचा थोरातांना जबरी धक्का.! राज्य आलं गाव गेलं.!

 


- सुशांत पावसे

सार्वभौम (संगमनेर) :- 

            संगमनेर तालुक्यातील ना. थोरत साहेब यांच्या जोर्वे गावातच थोरतांना विखेंनी राजकीय मोठा धक्का दिला आहे. कारण, जोर्वे गावातील लोकनियुक्त सरपंच रविंद्र खैरे यांनी विखे गटात म्हणजेच भाजपमध्ये आज प्रवेश केला आहे. 2017 साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विखे पाटील गटाचे 7 सदस्य तर थोरात गटाचे 6 सदस्य निवडून आले होते. मात्र, सदस्य जरी विखे गटाचे अधिक असले तरी सरपंच पदाला थोरात गटाला जनतेने कौल दिला होता. त्यामुळे, जोर्वे ग्रामपंचायतीवर थोरात राज सुरू होते. पण, आज थोरात गटाच्या सरपंचाने कमळाचा झेंडा हातात धरून काँग्रेसच्या प्रतिष्टेवर पाणी फेरले आहे. त्यामुळे आता जोर्वे गावात विखे राज सुरू होणार आहे. एकंदर माजी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यांचे गाव संभाळता आले नाही, अशी थेट टिका करणार्या विद्यामान महसुलमंत्र्यांना देखील त्यांच्या गावात निवडून आलेला सरपंच राखता आला नाही. अशी परखड टिका होऊ लागली आहे. मात्र, ना. साहेबांना त्यांच्या गावात भरमसाठ लोकांना नेता करुन अनेकांना रोजगार दिलाय. त्याचे साहेबांसाठी फितुरी हेच योगदान आहे का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जोर्वे गावात जे भले पुढारी आहेत, ते सामान्य व गोरगरिब जनतेला विश्वास घेत नाहीत. त्यामुळेच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. यात एक मात्र नक्की साहेबांच्या कार्यकत्यांमुळे त्यांना वारंवार खाली पहायची वेळ येते हेच वास्तव समोर येऊ लागले आहे. उद्या नामदार साहेब जोर्व्यात सायकल वाटप करण्यासाठी सकाळी येणार आहेत. त्यांना काय वाटेल, ते काय बोलतील हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे.

        दरम्यान, संगमनेर तालुक्यात आत्ताच झालेल्या 94  ग्रामपंचायतीवर बहुतांश ना.थोरतांचे वर्चस्व आहे. यामध्ये भाजपला अगदी बोटावर मोजण्याइतक्या ग्रामपंचायती देखील मिळवता आल्या नाही. या 94 ग्रामपंचायतींपैकी शिर्डी विधानसभेला जोडल्या जाणाऱ्या 14 ग्रामपंचायत होत्या. त्यामध्ये आश्वी गटात ना.थोरतांनी बाजी मारली. तेथे बेशक आ. विखेपाटील यांची पिछेहाट होताना दिसून आली. पण, त्याचे शल्य काढण्यासाठी जोर्वे गटात विखे पाटील यांनी थोरतांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीवर बाजी मारली. त्यामुळे, राज्य संभाळणाऱ्या नामदार साहेबांना गाव सांभाळणं कठीण गेलं हे सिद्ध करुन आ. विखे यांनी हम भी किसीसे कम नाही हे दाखवून दिले आहे. संगमनेर तालुक्यातील 26 गाव हे विधानसभेला शिर्डी मतदारसंघात जोडली गेली आहे. येथे ना. थोरात विरुद्ध आ. विखे असा संघर्ष नेहमी बघायला मिळतो. येथील ग्रामपंचायत निवडणूक लागली की, ना. थोरात आणि विखे पाटील गटाचे मुंगसा- सापाचे वैर वारंवार पाहायला मिळते. याची मजा स्थानिक कार्यकर्त्यांसह राज्याचे नेते देखील घेतात. थोरात - विखे काँग्रेसमध्ये असताना 2017 सालच्या जिल्हापरिषद व पंचायत समितीला काँग्रेसचे तिकीट आणन्यामध्ये दोघांत रस्सीखेच झाली. पण, काँग्रेसचे तिकीट मिळविण्यात विखे यशस्वी ठरले तर निवडणुकीत मात्र पराभवाला सामोरे जावा लागले होते. तेथे जिल्हा परिषदेला व पंचायत समितीला थोरतांचे अपक्ष उमेदवार शांताबाई खैरे व स्वाती मोरे यांनी विजय मिळवला. पण आश्वी गटात थोरतांच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यामुळे, आश्वी गटात थोरतांनी आपला फौजफाटा उतरून आश्वी गटात लक्ष केंद्रित केले आहे. त्या प्रयत्नांना थोरतांना ग्रामपंचायतमध्ये यश देखील आले आहे. थोरतानी अश्वी गटात लक्ष घातल्याने आ. विखेंनीही जोर्वे गटात आपली ताकद पणाला लावली आहे. खरंतर जोर्वे हे थोरतांचे गाव, त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात त्या गावाचा डंका संध्या वाजत आहे. संगमनेरात प्रतिष्टेची समजली जाणारी जोर्वे ग्रामपंचायत, त्यात ना. थोरात गटाचा सरपंच फोडून त्याच्या हाती विखेंनी कमळ दिले आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील काँग्रेस प्रमुखाच्या गावातच भाजपचा झेंडा फडकला आहे अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे. जोर्वे गावात मागील पंचवार्षिकमध्ये थोरतांचेच वर्चस्व होते. 2017 मध्ये देखील सरपंच थोरात गटाचाच होता पण आज मात्र विखेंनी सरपंचालच आपल्या गळाला लावत भाजपचा झेंडा जोर्वे ग्रामपंचायतवर लावला आहे. त्यासाठी गोकूळ दिघे यांचा फार मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.

       दरम्यान, संगमनेर तालुक्यात ९४ ग्रामपंचायतींपैकी बहुतांशी सरपंच काँग्रेसकडे आहे. अर्थातच प्राजळ व विकासाचे राजकारण आणि नामदार साहेबांचा स्वभाव हेच त्याचे द्योतक आहे. मात्र, या सगळ्या उलाढालीत ज्या शिवसेनेने विधानसभेच्या प्रचाराचा नारळ संगमनेरातून फोडला, त्या शिवसेनेच्या हाती येथे किती ग्रामपंचायती आल्या? येथील नेत्यांचे कर्तुत्व त्यातून सिद्ध होऊ पाहत आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेच नामदार साहेबांना गळ्याला लावतात. त्यामुळे, येथील स्थानिक नेत्यांना कधी राष्ट्रवादीने ताकद दिली नाही. त्यामुळे, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे देखील चूक आहे. परंतु, नान्याची दुसरी बाजू तपासली तर लक्षात येते की, राष्ट्रवादीत जिल्ह्यातील मोठमोठी पदे संगमनेरात आहेत. त्यात युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश थोरात, सरुनाथ उंबरकर, आबासाहेब थोरात अशी अनेक पदे आहेत. परंतु, त्यांनी देखील आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. यातील काही पदे नुकतीच नेमली गेली असली तरी निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर त्यांनी ४४ आमदार निवडून आणले होते. हे विसरता येणार नाही. त्यामुळे, निवडणुकीत पदाला न्याय देण्याची कसब महत्वाची असते.

      अत्यंत महत्वाचे म्हणजे, येथे भाजपचे प्रतिबिंब पाहता तालुक्यात भाजपचे राष्ट्रीय मा. उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना इतके मोठे पद उपभोगले आहे. मात्र, संघटन काय? याबाबतचे उत्तर ग्रामपंचायतींचा निकाल सांगून जातो. तर, सत्ता असताना माजी. तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे यांनी मागिल ग्रामपंचायतीवर दावा केला होता. तेव्हा राज्यातील अनेक बडे नेते व मंत्री त्यांना घरभेटीला आणले होते. मात्र, दुर्दैव असे की, त्यांनी यावेळी ग्रामपंचायतीत साधी सदस्य देखील उभा केला नाही. अशी टिका त्यांच्यावर होऊ लागली आहे. या पलिकडे भाजपचे विद्यमान तालुकाध्यक्ष इथापे यांनी त्यांच्या पदाला कितपत न्याय दिला.! हे देखील आता नव्याने सांगण्याची गरज राहिली नाही. एकंदर, लोणीतून विखे पाटील ना. थोरात यांच्या गावात राजकीस सत्तांतरणाचा राडा घालू शकतात. तर, भाजपचे लोक नेमकी करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अर्थात हे वास्तव कटू असले तरी सत्य आहे. त्याबाबत मळमळ होणे साहजिक असेल. मात्र, येथे नामदार साहेबांना सोज्वळ विरोध केला जातो तर त्या आडून आपापले हितसंबंध जोपासले जातात हेच सत्य आहे.