जिल्हा बँकेचा वेढा व तह.! दादांच्या भेटीनंतर सिताराम पाटील बिनविरोध.! दोन्ही अर्ज मागे.! भांगरे व पिचड लढत होणार.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                   जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ना. बाळासाहेब थोरात आणि दुसरीकडून विखे पाटील यांनी कंबर कसली आहे. अशात जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सिताराम पाटील यांनी स्वत:च्या विजयासाठी जी काही व्युव्हरचना आखली. ती काही औरच म्हणावी लागेल. कारण, जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि अकोले तालुक्यात भाजप तर जिल्हा बँकेत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात अशा प्रकारची अनोखी लढाई त्यांच्यासारखा व्यक्ती सोडून कोणी लढूच शकत नाही. त्यामुळे, अकोले तालुक्यातील एकही राष्ट्रवादीचा नेता सोबत नसताना देखील थेट मुंबईहून सुत्र हलली आणि साखर कारखाण्याच्या तथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुचलक्यावर तह करुन पाटील साहेबांनी आपला झेंडा अखेर पुन्हा एकदा अटकेपार फडकविला आहे. हे करीत असताना स्थानिक निष्ठावंत मात्र नाराज झाल्याचे पहायला मिळाले आहे. मात्र, करणार तरी काय? तोंड दाबुन बुक्क्यांचा मार.!

आज बुधवार दि. 10 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या अर्थकारणाची जननी असणार्‍या जिल्हा बँकेचे राजकारण अगदी खळबळून निघाले. कारण, येथे जसे विधानसभेला सत्तांतर झाले आहे. त्यानंतर येथील प्रत्येक घडामोडी ह्या अगदी नाट्यामय पद्धतीने घडताना दिसत आहे. मात्र, यात एक गोष्ट अधोरेखीत करावीशी वाटते की, राष्ट्रवादीला आमदारकी प्राप्त झाल्यानंतर अन्य कोणत्याही ठिकाणी यश मिळविता आले नाही. झेडपी, पंचायत समिती आणि त्या पाठोपाठ आता जिल्हाबँक सगळीकडे पिछेहाट होताना दिसत आहे. कारण, येथे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांना आणि सुरेश गडाख यांना पक्षाकडून अर्ज मागे घेण्यासाठी सांगितले गेले. अर्थात ही राज्याच्या राजकारणाची थेअरी म्हणावी लागेल.

खरंतर जेव्हा दोन्ही अर्ज मागे घेण्याचा निर्णय झाला तेव्हा कोणाच्या मनात किंतू परंतु येऊ नये यासाठी काही संकल्पना क्लेअर करण्यात आल्या. यावर बोलताना डॉ. किरण लहामटे म्हणाले की, सावंत आणि गडाख यांनी पक्षाच्या विनंतीला मान देऊन अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे जर त्यांच्या चारित्र्यावर कोणी चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याची गय करणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या सांगण्याहून हा निर्णय (तह) झाला आहे. त्यामुळे, त्यांचे आम्ही आभार मानतो. उद्या जो कोणी उमेदवार निवडून येईल तो आमच्यात सामिल होवो ना होवो आम्ही दादांच्या म्हणण्यानुसार काम करणार आहोत. तर दादांनी आम्हाला साखर कारखाण्याबाबत  शब्द दिला आहे. तो काय आहे हे आम्ही वेळ आल्यानंतर सांगू.

दरम्यान, सिताराम पाटील गायकर यांचे सोसायटी मतदार संघातून निवडून येण्याचे बळ कोणाला नव्याने सांगायला नको. मात्र, तरी देखील त्यांचे बिनविरोध येणे हे देखील एक प्रतिष्ठेचे होते. त्यामुळे, ते साध्य झाले आहे. मात्र, माजी आमदार वैभव पिचड आणि अमित भांगरे यांच्यात होणार्‍या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदर गायकर साहेबांना तालुक्याक्यातून मतदान होणार होतेे. त्यांनी त्यांची यंत्रणा रायगडाच्या किल्ल्यासारखी भक्कम करुन ठेवली होती. मात्र, अनुसुचित जाती-जमाती यांच्यासाठी जिल्ह्यातील 3 हजार 519 जणांना मतदान करावे लागते. त्यामुळे, भांगरे यांना जर संगमनेरातून ना. बाळासाहेब थोरात, नगर तालुक्यातून शिवाजी कर्डीले व कोपरगाव येथून काळे व कोल्हे यांनी जरी सहकार्य केले. तरी मतांची गोळाबेरीज बर्‍यापैकी होऊन जाते. तर वरील सर्वांची मोट बांधण्याचे काम ना. बाळासाहेब थोरात यांनी केलेली आहे. त्यामुळे, उद्या येथील भविष्य पाहता येथील निवडणुक होते की नाही? असा सवाला उभा राहिला आहे. हे सर्व चित्र उद्या समोर येणार आहे.

आता अकोले तालुक्यासाठीच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्यात पक्षीय राजकारण सोडून अनेक ठिकाणी तह झाले आहेत. मात्र, कोठेतरी चांगले करण्यासाठी एक पाऊल छत्रपती शिवरायांनी देखील एक पाऊल मागे टाकले होते. हा इतिहास विसरून चालणार नाही. इतिहासाची पाने चाळली असता लक्षात येते की, वैशाख शु. 12 शके 1656 साली आदिलशाहने पुरंदरला वेढा घातला होता. त्यानंतर दिलेरखान याने पुरंदरच्या किल्ल्यावर स्वारी केली आणि तेव्हा मावळे मुरारबाजी यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यानंतर मात्र, स्वराज्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, मनुष्यहानी झाली. अखेर छत्रपती शिवरायांनी जयसिंगसोबत पुरंदराचा तह करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी 12 जून 1665 साली 32 किल्ले देऊन हे आक्रमण थांबविण्यात आले. अर्थात हे मांडण्याचे कारण असे की, जर स्वराज्य उभे करायचे असेल तर त्यासाठी कधीकधी माघार देखील घ्यावी लागते. अशाच प्रकारचे ही माघार आहे. असे म्हटले तर काही वावघे ठरणार नाही. अर्थात तह या शब्दाहून काही क्षणात राजे छत्रपती यांचे नितळ, निर्मण व आदर्श स्वराज्य उभे राहते. त्यामुळे, आजचे राजकारण आणि तेव्हाची परिस्थिती याची कोठेही तुलना होऊ शकत नाही.