भांगरे व पिचड आज फायनल की, सेमी फायनल, पारंपारीक द्वंद्व.! रंगणार की माघार.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

                  जिल्हा बँकेत आता नेहमीपेक्षा वेगळेच राजकारण शिजू लागले आहे. कारण, पुर्वी काही झालं तरी मात्तबर राजकारणी (विखे, थोरात, पिचड) एकाच पक्षात किंबहुना आघाडीत होते. त्यामुळे, बाकी राजकारणी मात्तबर असले तरी त्यांना यांच्या सावलीखाली चालावे लागत होते. म्हणून तर गेली 10 वर्षे राज्याच्या राजकारणाविरहीत नगरमध्ये जिल्हाबँक अनोखी ठरत होती. आता मात्र, ते चित्र राहिले नाही. पिचड कुटुंबाची कोडी सगळ्यांच्या समोर आहे. विखे पाटलांचे राजकारण देखील सर्वज्ञात आहे तर ना. थारोत आणि अजित दादा पवार यांचे चलती असे एकंदर गणित पाहता यंदा काही अंशी सत्तांतर आणि अल्पसे बदल येथे पहायला मिळाणार आहे. त्यात आपल्याला विशेषत: अकोले तालुक्यातून पिचड व भांगरे यांच्यातील लढत उत्सुकतेची ठरणार आहे. त्यामुळे, पाटलांच्या मागे लागून भाजपत गेल्याचा निर्णय फसला की योग्य ठरला? आता त्यांच्या भरवशावर जिल्हा बँक लढवायची की नाही? लढविली तर जय पराजयाचा देखील विचार करावा लागणार आहे. कारण, या निवडणुकीचा थेट परिणाम येणार्‍या विधानसभेवर देखील होऊ शकतो. असा सारासार विचार करुन भाऊंनी निवडणुक लढविली पाहिजे. अशा प्रकारच्या प्रतिक्रीया तालुक्यातील जाणकारांच्या तोंडून उमटू लागल्या आहेत.

आज जिल्हा बँकेच्या उमेदवार प्रक्रियेतून ज्येष्ठ नेते दशरथ सावंत व राष्ट्रवादीचे निष्ठावंतर सुरेश गडाख यांनी माघार घेतल्याचे पत्रकार परिषदेत जाहिर केले. त्यामुळे, तालुक्यातील बहुजन नेतृत्व तथा राजकारणातील प्रांजळ चेहरा असणारे सिताराम पाटील गायकर यांच्या बिनविरोध नेमणुकीवर मोहर लागली. अर्थात त्यांचा विजय हा काळ्या दगडावरील पांढरीशुभ्र रेष होती. मात्र, इतक्या विपक्ष परिस्थितीत देखील तो अशा प्रकारचा विजय व्हावा. हे खरे सोज्वळ राजकारण आणि गणिमी डावपेच म्हणावे लागतील. कारण, सोसायटी गटातून 84 मतदान त्यांनी जमा करताना समोरच्यांना सुचक अनुमोदक न मिळावा अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे, जिल्हाच काय.! राज्यातून देखील त्यांचा विचार करावा इतके हे प्रभावी व्यक्तीमत्व म्हणावे लागेल.

आता तालुक्यातून दुसरे उमेदवार माजी आ. वैभव पिचड यांनी जशी राष्ट्रवादी सोडली तसे त्यांच्यामागे पवार कुटुंब हात धुवून लागले आहे. त्यामुळे, असे बोलले जाते की, एकवेळी सिताराम पाटील गायकर यांना महाविकास आघाडीत अगदी सहज स्थान मिळत होते. मात्र, त्यांनी सहकार्‍यांचे प्रतिनिधीत्व संगमनेर ते थेट दादांपर्यंत केले. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे, आज सिताराम पाटील गायकर यांना बारामतीकडून ग्रिन सिग्नल मिळाला परंतु त्यांचे सहकारी यांना कदाचित निवडणुकीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. मात्र, गेली कित्तेक वर्षे जे कुटुंब जिल्हा बँकेची गणिते जुळवत होते. आज त्यांना मिळते जुळते घेताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसते आहे. या परिस्थितीत सिताराम पाटील गायकर यांची बाकी फार मोठी कसरत करावी लागताना दिसत आहे. एकीकडे ज्यांनी त्यांना राजकारणात उभे केले त्यांना संभाळायचे तर दुसरीकडे स्वत:चे राजकारण पहायचे. एकीकडे पक्षात राहून तालुक्यात वेगळी भूमिका बजवायची तर दुसरीकडे कारखाण्याची गणिते देखील जुळवायची. मात्र, ज्यांनी निष्ठा बाळगून पाय जमिनिवर ठेवत स्वत:चे अस्तित्व निर्माण केले त्यांना अशा प्रकारच्या कसरती फार पराकोटीच्या युद्धासारख्या जातात. म्हणून तर त्यांची देखील आता कोंडी झाल्याचे दिसते आहे.

खरंतर आता जिल्ह्याचे लक्ष अनुसुचित जाती-जमातीच्या निवडणुकीमध्ये लागले आहे. त्यात वैभव पिचड हे काय भूमिका घेतात हे फार महत्वाचे आहे. तर अशोक भांगरे आणि खा. सदाशिव लोखंडे यांच्याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण, त्यांचा मुलगा डॉ. चेतन लोखंडे हे देखील तेथे याच गटातून उभे आहेत. यांच्या व्यतिरिक्त नंदकुमार डोळस, दिपक गायकवाड, निवास त्रिभूवन अशा सहा जणांचे अर्ज आहे. यातील भांगरे आणि पिचड यांच्यातील लढत अधोरेखीत करण्यासारखी आहे. पिचड यांना विखे गटाकडून किती सहकार्य होते यावर त्यांची धुरा अवलंबून असणार आहे. तर गेल्या 40 वर्षात माजी मंत्री मधुकर पिचड यांनी जे काही राजकारण केले. त्यापैकी त्यांना माननारा वर्ग देखील काही कमी नाही. त्यामुळे, तो एक प्लस पॉईंट ठरणार आहे. या व्यतीरिक्त अकोले तालुक्यातून त्यांना सर्वात मोठे लिड राहील यात शंकाच नाही. कारण, येथील बहुतांशी व्यक्ती ह्या लाभार्थी असून त्या पाटील साहेबांसह त्यांना माननार्‍या आहेत.

मात्र, अकोले तालुक्यातील 225 मतदान सोडून विचार केला तर हे गणित फार वेगळे होऊ शकते. कारण, संगमनेर (690), कोपरगाव (328) व नगर तालुका (366) हे प्रतिनिधी ना. बाळासाहेब थोरात यांना येऊन पुर्वीच मिळाले आहेत. मोनिकाताई राजळे या भाजपच्या असल्या तरी त्यांच्या मतदार संघात दोन तालुक्यातून 242 मतदार आहेत. मात्र, त्यांनी विखे पाटलांना एकच प्रश्न केला होता. जर आम्ही भाजपचे आहोत तर आमच्या विरोधात उभे केलेले उमेदवार कोणाचे होते? त्यामुळे भाजपमधील नाराजी नाट्य कायम आहे. अर्थात हे नात्यागोत्याचे राजकारण सर्वश्रृत आहे. त्यामुळे, येथे नेहमी काय होते याची देखील प्रचिती राजकारणात रस असणार्‍यांना चांगली आहे. खरंतर जिल्हा बँकेत पक्ष म्हणून नव्हे तर सत्ताकेंद्री व विकासभिमूख राजकारण होताना दिसून आले आहे. त्यामुळे, आमदार आणि पक्ष हे त्रयस्त भुमिकेत असतात हे कर्डीले साहेबांचे उदा. घेऊन सांगितले तर जास्तकाही मांडण्याची गरज उरत नाही.

जर माजी आ. पिचड यांना आ. विखे यांनी सहकार्य केले तर ते कितपत पुरेशे ठरेल? मात्र, जर शिवाजी कर्डेले, कोल्हे, राळेभात, राजळे, यांच्याकडून पक्ष म्हणून जर मदत झाली तर ही निवडणुक फार काही अवघड जाणार नाही. मात्र, हे सर्व पिचड यांच्या वैयक्तीक संबंधावर बरेच काही अवलंबून राहू शकते असे जिल्ह्यातील काही जाणकार पत्रकारांचे मत आहे. तर, यावेळी तरी जिल्हा बँकेत त्यांच्यासाठी एक चॅलेंज असल्याच्या प्रतिक्रिया जिल्ह्यातील जाणकार राजकारणी व्यक्तींकडून येत आहेत. कादाचित त्यांची आणि विखेपाटील यांची राजकीय भूमिका बदललेली नसती तर जिल्ह्यात आज वेगळेच चित्र पहायला मिळाले असते. कारण, गेल्या निवडणुकीत तीनशेच्या दरम्यान लीड घेऊन पिचड जिल्हा बँकेत गेले गेले. तीच आज परिस्थितीत वेगळी आहे. त्यामुळे, त्यांना तोटा झाला नाही असे म्हणणे चुकीचे ठरले. अर्थात आज दुपारपर्यंत सर्व चित्र अगदी स्पष्ट होईल. येणार्‍या काळात काय होईल याचा पुर्णत: एक अंदाज येऊन जातो. मात्र, काही प्रश्नांची उत्तरे परिस्थितीने दिलेलेच बरे असतात. त्यामुळे, वेट अ‍ॅण्ड वॉच.!

दरम्यान, अकोले तालुक्यात जे काही राजकारण सुरू आहे. त्यामुळे, भल्याभल्यांना नाराजी सहन करावी लागत आहे. जिल्ह्यात एक आणि तालुक्यात एक हा फंडा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या डोईजड झाला आहे. त्यामुळे, दशरथ सावंत यांनी थेट अजित दादा यांना रोखठोक काही प्रश्न करुन बुचकाळ्यात पाडले होते. तर सुरेश गडाख यांनी देखील ना. थोरात साहेबांना काही प्रश्न करून नि:शब्द केले होते. मात्र, त्यांनी सांगितले, तुम्ही हेच प्रश्न वरिष्ठांना विचारा आणि त्यानंतर अकोल्याचे शिष्टमंडळ थेट नाशिकला जाऊन उपमुख्यमंत्री अजित दादा यांना जाऊन भेटले. यावेळी, ना. थोरात यांनी एक गोष्ट सांगितली की, मधुकर नवले हे काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यांना मी हक्काने सांगू शकतो आणि ते माझे ऐकतील देखील. त्यानंतर मधुभाऊ नवले हे देखील आज त्यांंचे अर्ज माघारी घेणार आहेत. त्यामुळे, त्यांच्यावर देखील एक प्रकारे पक्षाकडून अन्यायच म्हणावा लागेल. मात्र, काँग्रेस एक संयमाचा पक्ष आहे. त्यामुळे, नवले यांचे आता येणार्‍या काळात कोठेतरी पुनर्वसन होऊ शकते. आता अनेक गोष्टी एकापठोपाठ अगदी नाट्यमय घडत आहे. मात्र, आज निवडणुकीचे सर्व चित्र क्लेअर होणार आहे. त्यामुळे, वेट अ‍ॅण्ड वॉच.!