गायकर साहेबांचा पिचड साहेबांना हा दुसरा धोका.! पण पिचडांना सहानुभुती! अनुपस्थितीत चांगली मते! 1995 ची पुनरावृत्ती.!

 


- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                  माजी मंत्री मधुकर पिचड यांनी भाजपत प्रवेश केला आणि त्यांचा पराभव होतो कोठे नाहीतर, त्यांचे सर्वच सारथी त्यांच्या रथातून टपाटपा खाली उतरत वेगळ्या वाटेने चालते झाले. मग होणार तरी काय? रथ संथ झाला आणि धोपट मार्गावर असतानाही रथाची चाकं निखळली गेली. पिचड कुटुंब एकटे पडले आणि सुरू झाली भावनिक साथ, तुमचा राजा एकटा पडला आहे. त्याला साथ द्या. अर्थात जोवर सिताराम पाटील गायकर हे त्यांच्या दिमतीला होते. तोवर तालुक्यात बळ वाटत होते. मात्र, आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वच चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळेे, अकोल्यात 1995 नंतर आता पुन्हा गायकर यांनी पिचडांना धोका दिल्याचे दिसू लागले आहे. कारण, तेव्हा देखील विधानसभा निवडणुकीत अशोक भांगरे यांना साथ देत राजकारणाची दिशा बदलविली होती. आज देखील ते अशोक भांगरे यांच्या सोबत पाहून अनेकांना इतिहासाची आठवण झाली आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्येष्ठ नेत्यांकडून येऊ लागल्या आहेत.

आज जिल्हा बँकेचा निकाल लागला. येथे प्रशांत गायकवाड (पारनेर) आणि दत्तात्रय पानसरे (श्रीगोंदा) यांच्यासाठी अकोले तालुक्यात एकमेकांना आजमवा-आजमावी झाली. गेल्या कित्तेक वर्षापासून पिचड कुटुंबाने सिताराम पाटील गायकर यांना हवे ते आणि सर्वेच्च पदावर विराजमान करुन जिल्हा बँकेतील अंडेपिल्ले देखील शिकविले. म्हणून तर सोसायटी मतदार संघात त्यांनी इतके मोठे प्रस्त करून ठेवले की, कोणाच्या मदतीची गरज ठेवली नाही. मात्र, जेव्हा वैभव पिचड यांच्यावर वेळ आली तेव्हा मात्र माजी आमदारांना माघार घ्यावी लागली. हे त्यांच्या एका निर्णयाचे तोटे असले तरी त्यांच्या पडत्या काळात साथ द्यायची सोडून किमान त्यांनी ज्यांना मोठे केले. त्यांनी तरी साथ देणे गरजेचे होते. गायकर यांना खरेदी विक्री संघ, अगस्ति ऐज्युकेशन सोसा., दुधसंघ, अगस्ती साखर कारखाना, राज्याची महानंदा, जिल्हा बँक अशा विविध ठिकाणी सर्वेच्च पदे दिली आहे. मात्र, पिचडांच्या पडत्या काळात त्यांना हे असले दिवस पाहण्याची वेळ आली.

मांडायला आणि वाचालयला थोडसं कठोर वाटेल. मात्र आज तालुक्यात चर्चा आहे की, गायकर साहेबांनी ठरविले असते तर खुद्द शरद पवार साहेबांचा विरोध असता तरी त्यांनी वैभव पिचड यांना जिल्हा बँकेत नेवून बसविले असते. फक्त त्यांनी एक पाऊल मागे टाकण्याची गरज होती. ती अशी की, पिचड यांनी शेतीपुरक व अनुसुचित जाती व जमाती अशा दोन ठिकाणांहून आपला अर्ज दाखल केला होता. मात्र, जिल्ह्याचे राजकारण राज्यातून हलले आणि पिचड यांना जिल्हा बँकेतून माघार घ्यावी लागली. हे अपयश त्यांनी किती काळजावर दगड ठेऊन सहन केले असेल हे त्यांचे त्यांनाच माहित. मात्र, याच ठिकाणी जर सुगाव बु किंवा राजूर येथून वैभव पिचड यांचा सोसायटी मतदार संघातून ठराव करुन घेतला असता तर 84 मतदारांपैकी तसेही 74 ठराव गायकर साहेब म्हणा किंवा पिचड साहेब यांनीच करुन घेतले होते. त्यामुळे, खुद्द पवार साहेब येथे आले असते तरी त्यांचा पराभव झाला नसता. त्यामुळे, एक निष्ठावंत म्हणून गायकर साहेबांचे नाव इतिहासाच्या पानावर कोरले गेले असते. की, सगळ्यांच्या नाकावर टिच्चून राजकीय गणिते बदलून सर्वात मोठा गणिमीकावा करुन दानशुर पणाने अशक्य ते शक्य करुन दाखविण्याचा मान त्यांनी मिळविला असता. पण...

असो.! सन 1995 साली सिताराम पाटील गायकर, कारभारी उगले, शांताराम वाळुंज, गिरजाजी जाधव यांच्यासह अनेकांनी पिचड विरोधी भूमिका घेत माजी मंत्री मधुकर पिचड यांची साथ सोडली होती. त्यावेळी, फक्त दशरथ सावंत, मिनानाथ पांडे, कैलासराव वाकचौरे, विठ्ठल चासकर यांच्यासह काही नेते वगळता सर्वच अशोकराव भांगरे यांच्या बाजुने कौल घेत चालते झाले होते. त्यावेळी, असे काही वातावरण झाले होते की, मधुकर पिचड यांचा पराभव निच्छित आहे. मात्र, झाले काय? तर भलेभले सोडून गेल्याचा फायदा त्यांना झाला होता. कारण, त्यावेळी पिचड हे 77 हजार 757 इतक्या मतांनी विजयी झाले होते. तर भांगरे यांना 44 हजार 626 मते मिळाली होती. त्यामुळे, जनता ऐनवेळी कोणाच्या बाजुने कौल देईल याचा ठाव कोणालाच लागू शकत नाही. याचे आणखी एक उत्तम उदा. म्हणजे, काल जिल्हा बँकेच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्यात गायकर गटाचे काही नेते म्हणत होते. आम्हाला 58 पैकी 45 ते 50 मतदान पडेल व विरोधी उमेदवाराला केवळ 5 ते 8 मतदान होईल. मात्र, झाले काय? तर खुद्द वैभव पिचड हे बुथवर नसताना देखील कच्चे लिंबू (कार्यकर्ते) आणि कैलास वाकचौरे, विकास वाकचौरे, भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासारख्यांनी 22 मते पानसरे यांना मिळवून दिले. म्हणजे, ही गुप्त लाट येणार्‍या काळात अधिक बळकट होत चालली आहे. त्यामुळे, 1995 सालची पुनरावृत्ती पुन्हा झाली तर कोणाला आश्चर्य वाटायला नको.

या सगळ्या पडत्या काळात एक गोष्ट नक्की लक्षात येते, जोवर सत्ता आहे. तोवर सर्व काही सोबत राहतं. मात्र, जेव्हा सत्ता, संपत्ती आणि पद प्रतिष्ठा लयास जाते तेव्हा मात्र, भल्याभल्याचे चेहरे समोर येतात. खरंतर, जिल्हा बँकेच्या निवडीच्या अखेरच्या दिवसापर्यंत गायकर यांनी पिचड साहेबांची साथ सोडली नाही. मात्र, जेव्हा राजकीय मुद्द्यावर बोट ठेवले गेले तेव्हा मात्र, त्यांनी पिचडांचे बोट सोडले. आता कैलास वाकचौरे हे देखील जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यामुळे, त्यांच्या भुमिकेसाठी येणार्‍या निवडणुकांची वाट पहावी लागणार आहे. मात्र, एकंदर त्यांनी 1995 साली त्यांच्या उभारत्या नेतृत्वाने मधुकर पिचड यांनी तरुणांची फार मोठी फळी निर्माण करुन दिली होती. त्यामुळे, ते बंडखोरी करतील नाही करतील तो भाग पुढचा. मात्र, आता तरी असा एखादा तरुण नाही, जो कोणी अशी जादुई कांडी फिरवेल. त्यासाठी भाजपमध्ये केलेला प्रवेश आणि त्यातून बाहेर पडणे हाच एकमेव मार्ग त्यांना विजयपथाकडे नेवू शकतो अशा प्रकारची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली आहे.

टिप :- (सदर लेख हा कोणाला खुश करण्यासाठी किंवा कोणाला दुखावण्यासाठी नाही. ही तालुक्यातील चर्चा आहे. त्यामुळे, जो कोणी एखाद्या व्यक्तीचा चाहता असेल त्याने त्याचे प्रेम स्वत:पुरते मर्यादीत ठेवावे. कोठे रिएक्ट होण्याची गरज नाही. रोखठोक सार्वभौम संपादक सागर शिंदे.)