जिल्हा बँक मतदान : गायकर व पिचड गट आमने सामने.! मध्यभागी मतदार झाले कन्फ्युज.! हे पाहून प्रचंड वेदना झाल्या.!
सार्वभौम (अकोले) :-
जिल्हा बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील राजकारणाला नवा आयाम मिळाला आहे. कारण, येथे राष्ट्रवादीच्या गोटात सिताराम पाटील गायकर यांच्यासारखा मात्तबर नेता दादांच्या अग्रहाखातर दाखल झाला आहे. त्यामुळे, आज तालुक्यात 1995 नंतर तब्बल 25 वर्षांनी एकीकडे मात्तबर विरोधक आणि दुसरीकडून पिचड गट असे चित्र पहायला मिळाले आहे. कारण, आज जिल्हा बँकेच्या रुपाने एकीकडे राष्ट्रवादी तर दुसरीकडे भाजप अशा पेचात मध्यभागी तालुक्यातील सुज्ञ मतदार उभा होता. जेव्हा मतदानाला तो जात होता तेव्हा एकीकडून गायकर व दुसरीकडे पिचड अशा पद्धतीचे चित्र पाहून मतदार कन्फ्युज झाला होता. मात्र, याचे खरे उत्तर आता मतदान झाल्यानंतरच दिसणार आहे. तेव्हा कळेल, कोण किती आडात आणि कोण किती पोहर्यात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माजी आ. वैभव पिचड यांनी माघार घेतली आणि अशोक भांगरे यांचे सुपुत्र अमित भांगरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर खरा कस महाविकास आघाडीचे उमेदवार साभाजी गायकवाड यांचा मुलगा प्रशांत गायकवाड व भाजपचे उमेदवार दत्तात्रय पानसरे या दोघांमध्ये बिगर शेती मतदार संघातून लढत झाली. यात कोपरगावात 166, नगरमध्ये 222, संगमनेरात 231 मतदान होते तर केवळ अकोले तालुक्यात केवळ 58 मतदान होते. मात्र, त्याचीच चर्चा जिल्हाभर होत होती. कारण, येथे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन यांनी पिचड यांची साथ सोडली होती. त्यामुळे, त्यांनी स्वत:ला दादांच्या करवी सिद्ध केले. मात्र, त्यांच्या बळाचे मुल्यमापन खर्या अर्थाने या 58 मतदारांच्या कौलनुसार ठरणार होते. यात मात्र, वैभव पिचड यांनी थेट बाहेरगावी असल्याचे सांगत निवडणुकीकडे पाठ फिरविली. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते कैलास वाकचौरे यांनी त्यांची कमी भरुन काढत बुधचे प्रतिनिधीत्व केले.
दरम्यान, दत्तात्रय पानसरे यांना भाजपचा सपोर्ट असल्यामुळे, अकोले तालुक्यातील विखे गटाचे कट्टर समर्थक तथा काँग्रेसचे कार्यकर्ते विकास वाकचौरे यांनी बाकी एक हाती अगदी बाजिप्रभू प्रमाणे खिंड लढविली. आपल्या पायाला भिंगरी बांधून विखेंच्या निष्ठेवर त्यांनी पाणी सोडले नाही. राजाराम वाकचौरे व रवि आरोटे यांच्या मदतीने त्यांनी पानसरे यांच्यासाठी जितके प्रयत्न शक्य होते. तितके करण्याचा प्रयत्न केला. असे बोलले जाते की, मतदानात बनावट मतदान देखील करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो असफल ठरला. त्यामुळे, दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत अकोले तालुक्याचे मतदान अगदी शंभर टक्के होऊन गेले होते. तालुक्यात जिल्हा बँकेत मतदान किती उत्साही आहेत याची देखील प्रचिती पहायला मिळाली आहे.
दरम्यान, जेव्हा एक तास झाला होता. तेव्हा एक तासात अवघे 5 मतदान झाले होते. मात्र, त्यानंतर जशी गती वाढली ती दुपारी अंतीम टप्प्यात येऊन पोहचली. यावेळी मात्र एक भलतेच चित्र पहायला मिळाले होते. गेल्या 25 ते 30 वर्षे पिचडांच्या आश्रयाखाली काम करणार्या गायकर साहेबांनी त्यांचा डेरा विरोधी पक्षात सामिल केला होता. तर, येथील शिवसेना देखील दुटप्पी भूमिकेत पहायला मिळाली अर्थातच येथे गायकर यांची ताकद पहायला मिळाली. मात्र, मतदार प्रचंड सैरभौर झाल्याचे चित्र देखील फार अनोखे होते. एका मतदाराने रोखठोक सार्वभौमशी मत व्यक्त करताना आपली भावना अगदी प्रांजळपणे कबुल केली की, आमचे राजकारणात उभे आयुष्य गेले. मात्र, ऐकीकडे गायकर व दुसरीकडे पिचड अशा प्रकारचे चित्र कधी पहायला मिळाले नाही. त्यामुळे, मनाला फार वेदना झाल्या. मतदान केल्यानंतर गायकरांकडे जावे की, पिचड गटाकडे याबाबत मनात फार संदिग्धता निर्माण झाली आणि कोणाकडेही न जाता थेट घरचा रस्ता पकडला. अशा पद्धतीचे राजकारण पाहून या व्यवस्थेचा इट आल्यासारखे वाटते. अर्थात त्यांच्या भावना फार काही बोलून गेल्या. मात्र, जेव्हा नेते बेडूक उड्या मारतात तेव्हा त्यांच्यावर अगदी निष्ठा बाळगणारा कार्यकर्ता किती हतबल होतो. याचे हे ज्वलंत उदाहरण होते.
खरंतर, एकीकडे डॉ. किरण लहामटे, सिताराम पाटील गायकर, मधुकर (भाऊ) नवले, अशोकराव भांगरे, माधवराव कानवडे, सुरेश खांडगे, संपत नाईकवाडी यांच्यासह अन्य बडे नेते तर दुसरीकडे भाजपकडून राष्ट्रवादीचे कैलास वाकचौरे, राजू डावरे, शंभू नेहे, राहुल देशमुख, नजीम शेख यांच्यासह अन्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यात खरी ताकद पिचड आणि आता गायकर यांच्यात होती. त्यामुळे, मतपेटीत खरे काय ते समोर येईलच. मात्र, आजही जनतेला गायकर आणि पिचड यांच्यातील दुरावा मान्य वाटत नाही. तो त्यांना वाटत असला तरी मुळा पट्ट्यात आजही अनेकांनी वैभव पिचड व सिताराम पाटील गायकर यांचे एकत्र फोटो लावले आहेत. त्यावर ना नरेंद्र मोदी आहेत ना दादा व शरद पवार साहेब आहेत. त्यामुळे, अनेकांच्या मनावर कोरले गेलेले नेते पक्षबदलाने दुर जातील मात्र, जनतेच्या मनातून नाही. या व्यतिरिक्त दुसरा काय संदेश असू शकतो.!
एकंदर काल जे काही मतदान झाले ते बिगर शेती मतदार संघासाठी झाले. त्यात अकोल्यात 58 पैकी 58 मतदान झाले. जामखेड येथे 48 पैकी 46, कर्जत येथे 64 पैकी 64, कोपरगाव येथे 166 पैकी 159, नगरमध्ये 222 पैकी 217, नेवासा येथे 85 पैकी 83, पारनेर येथे 79 पैकी 78, पाथर्डीत 29 पैकी 29, राहाता येथे 139 पैकी 131, राहुरीत 102 पैकी 100, संगमनेर येथे 231 पैकी 228, शेवगाव येथे 22 पैकी 22, श्रीगोंद्यात 69 पैकी 66, श्रीरामपूर येथे 62 पैकी 60 अशा 1 हजार 376 पैकी 1 हजार 341 मतदान झाले आहे. म्हणजे जिल्ह्यात सरासरी 97.46 टक्के मदतान झाल्याचे पहायला मिळाले आहे. तर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यात कर्जतमध्ये 74 पैकी 73, नगर 109 पैकी 109, पारनेर येथे 105 पैकी 75 असे मतदान झाल्याची आकडेवारी प्राप्त झाली.
आत्ताच हातीआलेल्या माहितीनुसार जिल्हा बॅंकेत महाविकास आघाडील मोठे यश मिळाले आहे. त्यात
फायनल निकाल
१)कर्जत-अंबादास पिसाळ १ मतांनी विजयी
२)नगर- शिवाजीराव कर्डीले साहेब ९४ मतांनी विजयी
३)पारनेरचे - उदयजी शेळके ९९ मतांनी विजयी
४) राखीव - प्रशांतजी गायकवाड विजयी
तर गायकर साहेबांनी अकोले तालुक्यातुन गायकवाड यांना ३५ मतांची आघाडी मिळवुन दिली आहे.