पत्रकारीतेचा श्वास आणि विश्वास म्हणजे - विश्वासराव आरोटे


सार्वभौम (विशेष) :- 

            लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारीता होय.! त्याची पाळंमुळं अगदी ग्रामीण भागात डोंगराच्या दरीखोरीत राहणार्‍या पत्रकारांपर्यंत रूजलेली आहेत. ते पत्रकार आहेत! मात्र, त्यांना त्यांची स्वत:ची ओळख आणि न्याय देण्याचे काम कोणी करताना दिसत नाहीत. ग्रामीण पत्रकारीता राज्यभर दुर्लक्षित असताना जर त्यांना न्याय देण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते विश्वसनीय नाव म्हणजे विश्वासराव आरोटे होय.! पत्रकारीतेच्या उन्नतीचा वसा घेऊन राज्य पायाखाली घालणारा हा पत्रकारीचेचा स्तंभ गेली अनेक दशके सातत्याने न्यायासाठी झुंज देत आहे. अगदी सह्याद्रीच्या कुशित जन्मलेल्या या विश्वासू व्यक्तीमत्वाने आज पर्वताला गवसणी घातली आहे. तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघासारख्या एका छोट्याशा रोपट्याला आज वटवृक्षात रुपांतर करण्यात आरोटे यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे.

 सन 1 जानेवारी 1985 साली सह्याद्रीच्या कुशित आणि निळवंडे धरणार्‍या मातीत रुजलेल्या चितळवेढे (ता.अकोले, जि.अहमदनगर) या अगदी छोट्याशा गावात विश्वास आरोटे यांचा जन्म झाला. वडिल शेतकरी आणि घरी आठरा विश्व दारिद्र असताना हलाखीच्या परिस्थितीत आपल्या आई-वडिलांच्या संसाराला हातभार लावत त्यांनी मोठ्या कसोशिने व जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले. आई एका शाळेवर स्वयंपाकी म्हणून आयुष्याचे चटके खात होती. तर तिच्या हातावरी फोड पाहून भरल्या डोळ्यांनी विश्वास त्याच शाळेत शिक्षण घेत होते. त्याकाळी फारसा रोजगार नव्हता, आज प्रमाणे हव्या तशा सेवा सुविधा नव्हत्या. त्यामुळे, मिळेल ते काम आरोटे यांनी मोठ्या विश्वासाने केले. आयुष्याच्या वर्तुळरुपी परिघावर जगत असताना त्यांनी अनेक अडचणी सोसल्या. मात्र, कितीही विपक्ष परिस्थिती आली तरी त्यांनी रणांगण सोडले नाही. म्हणून तर ते जगाच्या विश्वासास पात्र ठरले. 

आई.! मी लात मारीन तेथे पाणी काढीन.! तु घाबरू नकोस, असे छाती ठोकून सांगणार्‍या या धडपड्या वृत्तीमुळे त्यांना एका पतसंस्थेत शिपायाची नोकरी लागली. तेव्हा, तो आनंद त्यांच्या गगनात मावेनासा झाला होता. मात्र, त्यांची धेय्यशक्ती इतकी बुलंद होती. की, या व्यतिरिक्त आपल्याला कोठे आणि काय संधी मिळेल यासाठी ते सतत प्रयत्नशिल होते. एक शतकरी सुपूत्र म्हणून त्यांनी दूध विक्री सुरू केली. जे काम करायचे ते अगदी प्रमाणिकपणे.! त्यामुळे, त्यात अपयश आले तरी बेहत्तर, मात्र खचायचे नाही. या धेय्याने पछाडलेला हा तरुण प्रत्येक वेळी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वत:ला सिद्ध करीत राहीला. त्यांच्या आंगात इतके चैतन्य होते की, एकाच वेळी अनेक काम करुन आपल्या कुटुंबाला आपली मदत कशी होईल यासाठी ते अविरत प्रयत्न करीत होते. 

या दरम्यानच्या काळात म्हणजे सन 1999 साली त्यांनी हमालीची नोकरी आणि त्यानंतर वर्तमानपत्र विक्रीचे काम सुरु केले. तेव्हा खर्‍या अर्थाने त्यांच्या आयुष्यात पत्रकारीतेचे रोपटे रुजले गेले. बोलबोल करता नावाप्रमाणे त्यांनी अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवत जनमानसांचा विश्वास संपादन केला. बोल-बोल करता त्यांची पत्रकारीतेत नव्याने ओळख निर्माण झाली. जे कोणी स्वत:ला पत्रकार म्हणून घेतात त्यांच्या तुलनेत आपण देखील चांगले लिखाण करु शकतो अशा प्रकारची एक आत्मिक भावना त्यांच्या मनाला वारंवार छेडत होती. तेव्हा खर्‍या अर्थाने त्यांच्यातील पत्रकारीनेने जन्म घेतला आणि सुरू झाली पत्रकारीतेतील चळवळ.! ग्रामीण भागातील लोकांना न्याय देऊन त्यांच्यापर्यंत वृत्तपत्र पोहचवायचे असेल तर त्या वृत्तपत्रात ग्रामीण भागातल्याच समस्या मांडल्या पाहिजेत. या अजेंड्याखाली त्यांनी लेखनातून व्यक्त होण्यास सुरु केली.

दरम्यान, त्याकाळी म्हणजे सन 2000 साली पत्रकारीतेत नव्याने पाय रोवने वाटते तितके सोपे नव्हते. कारण, प्रस्तापितांच्या मर्मावर बोट ठेवले तर त्यांना  तो व्यक्ती अगदी डोईजड वाटत असे. त्यात विश्वासराव यांचा स्वभाव नितळ, निर्मळ आणि प्रांजळ त्यामुळे, जे मनात तेच ओठात आणि ते ओठात तेच लेखात. त्यामुळे, त्यांना पत्रकारीतेत पाय रोवताना प्रचंड अडचणी आल्या. आता काल ज्याची विश्वास म्हणून ओळख होती, त्यांचे नामकरण विश्वासराव यात झाले होते. ही राव उपाधी मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करीत अनेक परिक्षा द्याव्या लागल्या होत्या. मात्र, जेथे निर्भिड पत्रकारीतेच्या अस्मितेचा प्रश्न उभा राहिल, तेथे विश्वासराव यांनी कधीही तत्वांशी तडजोड केली नाही. पत्रकारीतेत त्यांनी राजकीय अथवा स्वहिताला प्राधान्य न देता निर्भिड लेखन सुरु ठेवले आणि हिच प्रतिमा त्यांना मोठ्या पदावर घेऊन गेली.

सन 1999 पासून वृत्तपत्राच्या सानिध्यात सुरू झालेला हा प्रवास उत्तरोत्तर वाढत गेला. या दरम्यान त्यांनी वार्ताहर म्हणून अनेक वृत्तपत्रांमध्ये काम केले. एक तालुका प्रतिनिधी ते विभागीय कार्यालयाचे उपसंपादक म्हणून त्यांनी दैनिक गांवकरी या उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकाची जबाबदारी यशस्वीरीत्या स्वत:च्या खांद्यावर पेलली. गांवकरीच्या माध्यमातून ग्रामीण भागाची, या भागातील ग्रामस्थांची विश्वासार्हता जपली. त्यांचे प्रश्न आपल्या लेखनीच्या माध्यमातून सातत्याने मांडले. पत्रकारीता करत असतानाच ग्रामीण भागातील पत्रकारांशी देखील त्यांची नाळ जोडली गेली. अन्याथ येथे विश्वास असे एक समिकरणच होऊन गेले. आवाज दिला तेथे विश्वासराव हजर अशा प्रकारची त्यांची ओळख निर्माण झाली. त्यामुळे, त्यांच्या सानिध्यात असणार्‍या अनेकांना राज्य मराठी पत्रकार संघाविषयी आत्मियता वाटू लागली.

बोलबोल करता त्यांच्या 20 वर्षाच्या प्रदिर्घ कालखंडात त्यांच्याभोवती प्रचंड मोठा गोतावळा निर्माण झाला आहे. विशेषत: राज्यातील ग्रामीण भागात काम करणार्‍या पत्रकारांची मोट त्यांनी बांधली. अकोले तालुक्याच्या बरोबरच राज्यातील विविध ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केली. या पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांसाठी खर्‍या अर्थाने कार्य सुरु केले. हे काम करत असतानाच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे या कर्तुत्वान दिपस्तभाशी संपर्क आला. एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ या म्हणीप्रमाणे हे दोन्ही ध्येयवेडे एकाच स्वप्नाने पछाडलेले होते. भान ठेऊन नियोजन करायचे आणि बेभान होऊन काम करायचे अशा उदिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन संपुर्ण राज्य त्यांनी पिंजून काढले. पत्रकारांच्या वेगवेगळ्या समस्या सातत्याने मांडून त्यासाठी राज्यस्तरावर नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करुन प्रश्न तडिस नेण्याचे यशस्वी काम त्यांनी केले.  

यावेळी, पत्रकारांसाठी राज्यस्तरीय अधिवेशने, जिल्ह्यात, तालुक्यात विविध मेळावे, राज्यभरातील सर्व पत्रकारांना पत्रकार संघात सामावून घेणे, पत्रकारांचा विमा काढणे, प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे  राहणे, त्यांना लढ म्हणणे असे अनेक उपक्रम आरोटे यांनी अगदी नि:स्वार्थीपणे राबविले. त्याच्या कार्याची दखल घेत संघटनेने त्यांना अहमदनगर जिल्ह्याध्यक्ष आणि नंतर राज्य सरचिटणीस या पदावर काम करण्याची संधी दिली. या विश्वासास पत्र ठरताना त्यांनी पत्रकार संघाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांबरोबरच क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या गुणवंतांचा राज्यस्तरावर गौरव केला. आर्थिक दृष्ट्या कमकुसत असणार्‍या पत्रकारांना औषधोपचार व इतर गरजा भागविण्यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली. 

पत्रकारीतेचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रपती ते राज्याचे आजी माजी मुख्यमंत्री यांच्यासह शरद पवार आणि अनेक मंत्र्यांकडे त्यांनी पाठपुरावा केला. पत्रकारांना संरक्षण मिळावे, संरक्षण कायदा व्हावा यासाठी ते नेहमीच आग्रही राहीले. पत्रकारांवर होणार्या हल्ल्यांचा निषेध करत आरोपींना अटक होईपर्यंत त्यांनी पाठपुरावा केला. ग्रामीण भागातील पत्रकारांनाही श्रमिक पत्रकारांप्रमाणेच अ‍ॅक्रीडीशन कार्ड मिळावे, एस.टी.बस तसेच रेल्वेसारख्या विविध सवलती मिळाव्यात, शासनाने त्यांचा आरोग्य विमा काढावा, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, पत्रकारांना निवासासी व्यवस्था उपलब्ध करावी या व अशा अनेक मागण्यांसाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न विश्वासराव आरोटे करत आहेत. 

या कामाला येथेच पुर्णविराम मिळाला नाही. तर उत्तर महाराष्ट्राबरोबरच मराठवाडा आणि विदर्भातही पत्रकारांची मोट बांधून त्यांना एका व्यासपिठावर आणण्याचे काम विश्वासराव आरोटे यांनी खर्या अर्थाने केले आहे. त्यामुळे शासनाकडून जरी या चौथ्या स्तंभाला संरक्षण मिळत नसले तरी पत्रकार संघटना भक्कमपणे पत्रकारांच्या पाठीशी उभी आहे. त्यांच्यावरील अन्यायाला तोंड देण्यासाठी सक्षम आहे असा विश्वास पत्रकारांच्या मनात निर्माण करण्यासाठी विश्वासराव आरोटे यांनी अथक परिश्रम घेतले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर शासनाचा यशवंतराव चव्हाण पत्रकारीता पुरस्कार तसेच विविध पुरस्कार मान्यवरांच्याहस्ते प्राप्त झाले आहेत. अर्थातच पत्रकारीचेची ज्योत प्रज्वलित ठेवणार्‍या या व्यक्तीमत्वास उदंड आयुष्य लाभो. विशेष म्हणजे शौर्यदिनाच्या दिवशी सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या या व्यक्तीमत्वाने अशक्य अशा कोविडवर मोठ्या कठीण परिस्थितीत मात केली आहे. त्यामुळे, 1 जानेवारीला पुन्हा जन्म घेणार्‍या या पत्रकारीतेच्या आधारस्तंभास लक्ष लक्ष शुभेच्छा.! 

 - नवनाथ जाधव 

(प्रदेश प्रसिध्दी प्रमुख महा. रा. म. पत्रकार संघ मुंबई)

संपादक

- सागर शिंदे