धक्कादायक थरार.! होती आई म्हणून वाचली ताई, तिने वाघाच्या डोक्यात खुर्ची टाकली, त्याने डरकाळी फोडली अन..
- सागर शिंदे
सार्वभौम (राजूर) :-त्या दिवशी सुर्य रतनगडाच्या कुशीत मावळला होता. भंडारदर्याचे पाणी अगदी निच्छींत पहुडले होते. दिवसाने रात्रीचे पांघरून घेत सर्वत्र अंधार दाटला होता. या काळ्याकुट्ट रजनीच्या गर्भात (रात्र) रंजनावर कोणते संकट येणार होते, याची चुनूक देखील तिला नव्हती. डोळ्यची पाती लावते ना लवते तोच समोर मृत्यु दिसावा आणि त्याच्या जबड्यातून सुटका व्हावी असा थरारक प्रसंग अकोले तालुक्यातील शेंडी येथे राहणार्या रंजना सुनील भांगरे यांच्या आयुष्यात येऊन गेला. एका आईच्या मातृत्वाची येथे पुन्हा एक प्रचिती आली. कारण, एक पाय घरात आणि एक पाय दारात ठेऊन उभा असणार्या बिबट्याला अगदी वाघीनीसारखे तोंड देणारी ही रणरागिनी आपल्या कुशीत असणार्या लेकीला वाचवू शकली तर 24 तास घराचा पहारा देणारा काळ्याचा (कुत्रा) काळ देखील तिने परत इंद्रदरबारी धाडला. इतकं कोठं धाडस करणार्या या महिलेस रोखठोक सार्वभौमचा मानाचा मुजरा.!
सायंकाळी गडात पडले होते. घरातील कामधंदा आवरुन रंजनाताई आपले दोन वर्षाच्या बाळ धनश्रीसोबत खेळत होत्या. तिच्याशी मातृत्वाचे बोल बोलुन झाल्यानंतर त्यांनी टिव्ही चालु केली आणि त्या एक मालिका पाहत विरंगुळा करत होत्या. अगदी नुकताच अंधार पडू लागल्याने घरात लक्ष्मी येण्याची वेळ असल्यामुळे घराचे दरवाचे उघडेच होते. घर शेंडी गावातून अगदी काही अंतरावरील मुरशेत रोडला असल्याने तेथे लोकवस्ती देखील अगदी विरळ होती. एखादा अचानक प्रसंग आपल्यावर ओढवला जाईल अशी चुनूक देखील मनाला शिवली नव्हती. त्यामुळे, रंजनाताई टिव्ही बघण्यात मग्न झाल्या होत्या. अर्थात फार वेळ झालेला नव्हता, अगदी साडेसहा वाजण्याचा सुमार असेल. अचानक घराच्या आवती-भोवती रेंगाळणारा काळ्या मोठमोठ्याने भुंकू लागला. मात्र, काहीतरी पाहिले असेल, कुत्र्याला पाहुन कुत्रे भुकत असेल असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले.
दरम्यान, आता बराच वेळ झाला होता. काळ्याची कुनकुण सुरूच होती. रंजनाताई धनश्रीला काखेत घेऊन टिव्ही पहात होत्या. टिव्हीचा आवाज जरा मोठा असल्यामुळे बाहेरील कालवा जास्त काही लक्ष वेधेल असा नसल्यामुळे त्या आपल्याच नादात गुंग होत्या. त्यांच्या मनी ध्यानी काही नसताना अचानक काळ्या अगदी भरधाव वेगाने उघड्या दरवाजातून आत पळाला. काय झाले, आत कोण गेले हे काही कळण्याच्या आत प्रचंड कालवाकालव झाली. रंजनाताई कुत्र्याकडे पाहते ना पाहते तोच त्याच्या समोर बिबट्याचे दर्शन झाले. एक पाय घरात आणि एक पाय दारात ठेऊन बिबट्याने जबडा वासला. नेमकी शिकार कोणाला करावे की मागे फिरावे अशा पवित्र्यात असणार्या बिबट्याच्या नजरेला नजर भिडवून रंजनाताई सावध झाल्या. बिबट्या घरात शिरला तर मोठा हैदोस होईल, इतेकच काय! आपल्या कुशित बसलेली लेक धनश्री ही बिबट्याची शिकार झाली तर आपले मातृ अर्थशुन्य ठरले. असे नाना प्रश्न त्यांच्या डोक्यात काहूर माजवून गेले असेल.
एक संवेदनशील व्यक्ती म्हणून आपण रंजना ताईंच्या जाग्यावर स्वत:ला ठेऊन पाहा. पाच फुटावर जबडा ताणून उभा असणारा बिबट्या आणि काखेत असणारी लेक, जिवाच्या आकांताने चुल्हीच्या कोपर्यात दडलेला कुत्रा आणि काळजाचे पाणी-पाणी झालेली तिची आवस्था. या पेक्षाही भयानक होती ती समोर दिसणारी बिबट्याची प्रतिमा. अशा वेळी काही व्यक्तींच्या अंगाचा पाणी-पाणी होऊन काही क्षणात त्या जमिनीवर कोसळल्या असत्या. मात्र, रंजना ताईंच्या धाडसाचे आणि धैर्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. त्यांनी स्वत:ला धिर देत जवळच पडलेल्या खुर्चीला हात लावला. रौद्ररुप धारण करुन दारात उभ्या असणार्या बिबट्याने त्यांच्याकडे पाहिले आणि पुन्हा एक नजर धनश्रीवर टाकली. कुत्रा की मुलगी अशा भयानक संकटात बिबट्या पुढे चाल करणार तोच रंजनाताई पुढे झाल्या आणि त्यांनी थेट बिबट्यावर हल्ला चढविला.
बिबटाचा एक पाय पुढे होण्यापुर्वीच रंजनाताई यांनी जवळच असणारी खुर्ची थेट बिबट्याच्या डोक्यावर भिरकविली. एका मातृत्वात संचारलेली दुर्गा पाहून बिबट्याने उबर्यातील पाय माघे घेतले आणि तो चालता झाला. तरी देखील या ताई थांबल्या नाहीत, त्यांनी पुन्हा बाहेर येऊन त्याच्यावर हल्लाबोल केला. त्यांच्या ओरडण्यात वाघाच्या डरकाळीपेक्षा जास्त सामर्थ्य होते. धावा-धावा, पळा-पळा वाचवा-वाचवा असा एकच कल्लोळ माजला. हा आवाज ऐकल्यानंतर भंडारदर्याच्या पाण्याला देखील भरती-ओहटी यावी असे वातावरण खळबळून निघाले. काही क्षणात सगळा परिसर गलबलुन गेला. बोल-बोल करता सगळे लोक रंजनाताईंच्या घराकडे चालते झाले. लोकांनी पुन्हा आरडाओरड करून बिबट्याला पळवून लावले. हा प्रकार म्हणजे खरोखर अकोल तालुक्यात महिलांचे रुप म्हणजे आदिशक्तीच आहे. तर तालुक्यात वारंवार मातृत्वाचे दर्शन होते. रंजना ताईंच्या या शौर्याला खरोखर सलाम केला पाहिजे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच राजुरचे वनक्षेत्रपाल जयराम गोंदके, विजय भांगरे कळसूबाई अभ्यारण्यचे डी.डी.पडवळ, अमोल आडे, वनपाल परते, वनरक्षक करवंदे घटनास्थळी पोहचले. त्यानी तिथे पिंजरा लावून आजुबाजुच्या शेतकर्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हा बिबट्या मादी जातीचा असून त्याला तीन बछडे असल्याचे चर्चा परिसरातील लोक करत असल्याचे कानी पडले आहे. तर, अकोले तालुक्यात अशा प्रकारे शौर्याचे काम करणार्या व्यक्तींन शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करणे गरजेचे आहे. यापुर्वी मेहेंदुरी येथील शंकर संगारे यांनी देखील काही व्यक्तींना पाण्यात बुडण्यावाचून वाचविले होते. त्यांचा प्रस्ताव पेंडींग आहे. त्याचा देखील आमदार साहेबांनी पाठवुरावा करुन तालुक्याच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवणार्या व्यक्तींचा सन्मान होणे आवश्यक आहे. अन्यथा तालुका विकासापासून वंचित तर आहेच. मात्र, शौर्य गाजवून देखील लोक वंचित राहत असतील तर तालुक्याला गडचिरोली म्हटले तर काय वावघे ठरले? असा प्रश्न जाणकार उपस्थित करु लागले आहेत.
- आकाश देशमुख