साहेब पुढे लग्नाला गेले आणि मागे चोरट्यांनी घर फोडले.! लाखाचा ऐवज लुटला.! राजुर पोलिसांना पुन्हा आव्हान.!
नातेवाईकांच्या लग्नाला गेला असता बंद घराचा फायदा घेत मागे चोरट्यांनी एका नोकरादाराच्या घर फोडले. यात तब्बल 1 लाख रूपयांचा मुद्देमाल चोरी गेला आहे. ही घटना अकोले तालुक्यातील राजुर येथे गुरूवार दि. 31 डिसेंबर रोजी ते नवीन वर्षाच्या पहाटे या दरम्यान घडली. याप्रकरणी कृषी सहायक विकास प्रकाश कापसे (रा. राजुर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घरफोडीमुळे राजुर पोलिसांना जणुकाय चोरट्यांनी पुन्हा एक आव्हानच दिले आहे की काय? असा प्रश्न उभा राहिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विकास कापसे हे मुळचे नाशिक येथील इंदिरानगर येथील रहिवासी आहेत. मात्र, त्यांचे आई वडिल राजुर येथे आहेत तर घरी किराणा दुकान असल्यामुळे ते स्थानिक ठिकाणी वास्तव्यास आहे. दरम्यान त्याच्या कुटुंबातील एक व्यक्तीचे लग्न पिंपळगाव, ता. पाचोरा येथे असल्यामुळे त्यांनी गुरूवार दि. 31 डिसेंबर रोजी आपले घर बंद करुन थेट पाचोरा गाठले होते. यावेळी त्यांनी घरातील सर्व साहित्य व्यसस्थित ठेऊन कपाटाला कुलुप देखील लावले होते. सर्व सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर ते मार्गस्त झाले.
दरम्यान, त्याच्यावर नियोजनपुर्वक नजर ठेऊन म्हणा, किंवा अनावधानाने म्हणा. चोरट्यांना बरोबर तेच घर टारगेट करावेसे वाटले. त्यानंतर चोरट्यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन कापसे यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. तेथे घरातील सामानांची उचकापाचक केली. कोठे काय मिळतेय का? घर मालकाने अनमोल ऐवज कोठे ठेवला आहे. हे पाहण्यासाठी चोरट्यांनी घराची चांगलीच झडती घेतली. त्यानंतर, कपाटाला लावलेले लॉक तोडून त्यांनी 83 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. त्यात 52 हजारांची रोख रक्कम व 31 हजार 450 रुपयांचे सोन्याचे दागिने यांचा सामावेश आहे.
दरम्यान कापसे लग्न आटपून 1 जानेवारी 2021 रोजी दुपारी घरी आले असता त्यांना घराचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. त्यानंतर त्यांनी घरात जाऊन आपल्या पैशांची व सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली असता घर सगळे सुपडासाफ करुन केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांच्या आजुबाजूला राहणार्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपल्याला काही माहित नसल्याचे सांगितले. त्यानंतर कापसे यांनी थेट राजुर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तत्काळी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांच्या नजरेने या गुन्ह्याकडे पाहत कापसे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेहे करीत आहेत.
दरम्यान, राजुर पोलिसांची आजवरची कामगिरी फार उल्लेखनिय राहिली आहे. जिल्ह्यात मोठमोठ्या पोलीस ठाण्यात बड्या गुन्ह्यांची उकल झालेली नाही. बहुतांशी गुन्ह्यात मुद्देमाल रिकवर झालेला नाही. मात्र, राजुर पोलिसांनी सलग दोन महिन्यात सहा चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. त्यामुळे, एक प्रकारे चोरट्यांनी राजुरचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना आव्हानच दिले आहे की काय? असा प्रश्न पडला आहे. याचे कारण असे की, बहुतांशी ठिकाणी जेथे आरोपींना बेड्या ठोकल्या जातात, तेथे सराईत चोरटे लगेच चोर्या करीत नाहीत आणि जर केल्याच तर ते एक प्रकारचे पोलीस ठाण्यास आव्हानच असते. त्यामुळे, आता नितीन पाटील हे हा गुन्हा उघडकीस आणतात की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जर त्यांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या तर ते राजुरचे गुणवत्तापुर्ण सर्वात यशस्वी पोलीस अधिकारी ठरु शकतात.
आता दुसरी गोष्ट म्हणजे, अकोले पोलीस ठाण्याच्या हाद्दीत 94 गावे असताना देखील येथे अशा प्रकारच्या चोर्या होत नाहीत. विशेष म्हणजे आता महिना होत आला तरी येथे पोलीस निरीक्षक नाहीत. एकटे पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमने व 20 ते 22 कर्मचार्यांच्या जिवावर हे पोलीस ठाणे टिकून आहे. अकोले तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे पोलीस असून देखील दिले गेले नाहीत. त्यामुळे, अनेक शंका कुशंका जनतेच्या मनात निर्माण होत आहे. संगमनेरचे पोलीस निरीक्षक यांना हजर करण्यात आले. मात्र, अकोल्याला अद्याप पोलीस निरीक्षक मिळेनासे झाले आहे. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे नेमणुका राखून धरणे कितपत योग्य आहे. असा देखील सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
- आकाश देशमुख