संगमनेर पोलीस ठाण्याच्या समोर त्याने स्वत:ला जाळून घेतले.! खरंच स्वातंत्र्य मिळूनही प्रजेला न्याय मिळतोय का?

सार्वभौम (संगमनेर) :- 

              भाड्याने दिलेले घर भाडेकरु खाली करत नाही, त्यांनी घरावर अतिक्रमण केल्याने न्यायासाठी आयुष्य वेचणार्‍या अनिल शिवाजी कदम (वय 73, रा. खांडगाव, ता. संगमनेर) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या अगदी समोर तसेच तहसिलदार कार्यालयाच्या खाली स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यात हा व्यक्ती 40 टक्के भाजला असून या प्रकारामुळे संगमेनरा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार सकाळी तिरंगा फडकविल्यानंतर काही वेळात घडला. नाशिब.! पोलीस ठाण्याच्या आवारात एक रावसाहेब कदम व राजेंद्र गायकवाड यांनी तत्काळ पाहिले आणि पाण्याची बादली आणून त्यांच्यावर ओतली. तोवर आजोबा बरेच भाजले होते. या प्रकारामुळे, 26 जानेवारी 1950 साली प्रजेच्या हाती सत्ता दिली खरी. मात्र त्यांनी न्याय देण्यात हे प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे या वृद्ध व्यक्तीने ना. पोलीस महानिरीक्षक ना. बाळासाहेब थोरात, पोलीस अधिक्षक, भाजपचे पदाधिकारी व पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांना अत्मदहनाचा अर्ज देऊन देखील त्याला कस्पट समजून दुर्लक्ष केले. त्यामुळे, या व्यक्तीच्या शरिरीक आणीस आता जबाबदार कोण? असा प्रश्न पुढे आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनिल शिवाजी कदम यांनी दि. रविवार दि. 10 जानेवारी 2021 रोजी पोलीस निरीक्षक संगमनेर यांच्या नावे एक अर्ज लिहीला होता. त्यात त्यांनी असे म्हटले होते. की, माझे भाडेकरु नामे सादीक रज्जाक शेख यांनी यांनी माझ्या घरावर अतिक्रमण केले असून त्याचे संदर्भात माझ्यावर वारंवार अन्याय होत असल्याने माझ्यावर शारिरीक, मानसिक, आर्थिक नुकसान होण्याची नामुष्की ओढविली आहे. त्यामुळे, मी अनिल शिवाजी कदम 26 जानेवारी 2021 रोजी कोठेही, केव्हाही माझे जिवण संपवेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी सादिक शेख व त्यांच्या पत्नी यांची राहील. अशा प्रकारचा तक्रार अर्ज त्यांनी पोलीस ठाण्यात जमा केला होता. त्यानंतर त्यांनी खाली प्रति म्हणून काही नावे देखील टाकली आहेत. त्या संबंधित व्यक्तींनी त्याची दखल का घेतली नाही? असा मुळ प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे.

यात महत्वाचे म्हणजे ना. बाळासाहेब थोरात यांना प्रति अर्ज करण्यात आला आहे. साहेब, राज्याचे नेतृत्व करतात. मात्र, त्यांच्या व्यवस्थापनाने त्यावर काय हलचाली केल्या हे त्यांनीच तपासून पाहिले पाहिजे. तर दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस महानिरीक्षक यांना देखील त्यांनी यापुर्वीच कळविले होते. तशा प्रकारचा अर्ज 2427/455/06/2018 मध्ये पोलीस अधिक्षक यांना प्राप्त आहे. अर्थातच हा अर्ज पोलीस विभागीय कार्यालयात दाखल झालेला आहे. कारण, कदम हे गेल्या कित्तेक वर्षापासून न्यायासाठी प्रयत्न करीत आहे. त्यांचे आयुष्य संपत आले तरी त्यांना न्याय भेटत नसेल तर ही प्रशासन आणि व्यवस्था काय कामाची? अशीच धारणा होऊन याच प्रशासकीय व्यवस्थेला आणि समाज व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

खरंतर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवरी या दिवशी न्यायासाठी प्रचंड हाल सहन केलेले लोक आत्मदहनाचा इशारा देतात. तर काहींची ती स्टन्टबाजी नियमीत झाली आहे. मात्र, यात कदम यांनी दोन वेळा प्रशासनाचे दरवाजे ठोकून देखील त्यांना न्याय मिळाला नाही. मग अशा वेळी खरोखर प्रश्न पडतो की, भारत स्वातंत्र्य झाला. मात्र, येथील जनता अन्यायाच्या जाचातून मुक्त झाली का? तसेच 26 जानेवारीला प्रजेच्या हाती सत्ता मिळाली. मात्र, न्याय मिळाला का? जर न्यायासाठी आयुष्य संपविण्याची वाट पाहत असेल तर शासन आणि प्रशासन यांनी खारोखर आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. अन्यथा यांच्याकडून जनतेचे संरक्षण होत नसेल तर हे जनतेचे सेवक आहे की भक्षक असा प्रश्न उभा ठाकला आहे.

आता येथील पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांनी खर्‍या अर्थाने अशा प्रकरणांमध्ये लक्ष देणे गरजेचे होते. पोलीस अधिकार्‍यांना अशा गोष्टीकडे गांभीर्याने घेण्यास सुचना करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्या कार्यकाळात असे प्रकार घडावेत. ही त्यांच्या कामातील नामुश्की आहे. कारण, यापुर्वी जे पोलीस उपाधिक्षक रोषण पंडीत होते. त्यांनी पोलीस यंत्रणेवर एक चांगला वचक निर्माण केला होता. अधिकार्‍यांशी त्यांची कोणत्याही प्रकारची सलगी नसायची. अधिकारी काय आणि कर्मचारी काय.! त्यांना समान होते. त्यांनी पुढार्‍यांचा देखील लिबास उतरुन अवैध धंद्यांवर मोठा वचक निर्माण केला होता. दुर्वैवाने येथे सर्व चित्र हे विरोधी दिसत आहे.

आजकाल संगमनेरात वरिष्ठ अधिकार्‍यांशी गोड बोलुन मलिदा जमा करण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे कर्मचार्‍यांच्या गैरहजेर्‍या, त्यांना 24 रुपयांचे दंड, वरुन शिक्षा, आणि कडक ड्युट्या. तर दुसरीकडे काही कर्मचारी खास वाळु, गुटखे, कत्तलखाने यांच्याकडे सोडले आहेत. म्हणजे, म्हणजे दे देतात ते हौशी आणि जे सरळ नोकरी करतात ते नकोशी. अशा प्रकारची टिका आता प्रशासकीय यंत्रणेवर होऊ लागली आहे. आता शहरात सर्व काही अलबेले सुरू आहे. कोणी खून होऊन मरा किंवा कोणी पेटून मरा, यांना काही घेणेदेणे नाही की काय? असाच काहीसा प्रकार येथे पहायला मिळत असल्याचे बोलले जात आहे.

एकंदर या व्यवस्थेचे अजोबा हे पीडित आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, ते आमच्या अखत्यारीत नाही अशा प्रकारच्या अनेक पळवाटा आता समोर येतील. मात्र, मी आत्मदहन करणार अशा प्रकारचे अर्ज देऊन देखील त्यावर प्रशासन काहीच करीत नाही. हे किती मोठे दुर्दैव आहे. हे सर्व महसुलमंत्र्यांच्या तालुक्यात घडले, ते ही पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधिक्षक यांना पत्रव्यवहार करुन देखील. त्यामुळे, यात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधिक्षक कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि जर कारवाई होत नसेल तर थोरात साहेबांच्या मतदारसंघात मतदार सुरक्षित व त्यांना न्याय मिळतो का? असा देखील प्रश्न आता विरोधानांनी उपस्थित केला आहे.