माझ्यातील पत्रकारीतेचा जन्मदाता हरपला.! त्यांनी मला बुळगा नाही निर्भिड घडविलं. मी आणि माझे गुरू नंदकुमार सोनार साहेब...

- सागर शिंदे

सार्वभौम :- 

            तो काळा माझ्या पडत्या आयुष्यापैकी एक होता. तेव्हा नेटकेच की शिक्षकी पेशा सोडून अस्वस्थ आयुष्य जगत होतो. सन 2013 साली नाशिक येथे दैनिक देशदुतला काम करताना जो काही पत्रकारीतेचा छंद जोपासत होतो. तीच गुजराण सुरू होती. मात्र, त्यातून एक रुपया देखील मिळत नव्हता. मोठे हातबल होऊन मी नाशिक सोडले आणि अकोल्याला आलो. तेव्हा माझा मित्र तुषारचे मोबाईल रिपेअरींगचे दुकान होते. घरुन अंघोळ करुन निघायचे आणि त्याच्या दुकानावर येऊन बसायचे. यापलिकडे कोणाच्या बांदावर दोन रुपयांची शेतमजुरी मिळाली तर ती करायची आणि जग म्हणून जागाचे, बस! यापलिकडे आयुष्य अगदी शुन्य होते. चार नातेवाईक आणि लोक नावं ठेवायचे सोडून काही करीत नव्हते. रिकामटेकडा म्हणून ज्याला वाटेल त्याला मदत करीत सुटायचं. हाच नाद लागला होता. या पडत्या काळात एकदा मी असाच अगदी विचारमग्न होऊन बसलो होतो. त्यावेळी कोणीतरी एक भेळ आणली होती. त्याचा कागद अगदी समोर पडलेला होता. त्यात एक जाहिरात होती. पत्रकार पाहिजे आहे. म्हणून म्हटलं जमलं तर जमलं आपलं काम. अकोल्यासाठी प्रयत्न करु. तेव्हा मी सार्वमत पेपरसाठी स्वत:चा मेल आणि एक पत्र सेंड केले. मी मोठ्या उत्सुकतेने त्या फोनची वाट पाहत होतो. अर्थात माझ्याकडे मोबाईल नव्हता. त्यालाही मित्राचा नंबर होता. फोन आला का? फोन आला का? असेच विचारत मी त्याच्यामागे लोंडा घोळत फिरत होता. त्यावेळी 11 ते 12 दिवसांनी माझ्यासाठी फोन आल्याची बातमी समजली आणि मला थेट नगरला बोलविण्यात आले होते.

आता मी पत्रकार होणार! याचा मनात प्रचंड आनंद होता. 2014 साली 19 मे रोजी मला फोन आला आणि 22 मे ला मला बोलविले होते. त्या दोन दिवसात मी किती तयारी केली असेल देवालाच ठाव. पण, मित्राच्या मोबाईलहून पत्रकारीचेची माहिती घेणे, बाळाशास्त्री जांभेकर ते नेवाशाचे मुकुंद पाटील यांच्यापर्यंत नको नको ते वाचन करीत होतो. त्या दिवशी जे कपडे घालायचे होते ते दोन वेळा आईकडून धुवून अकोल्याहून इस्त्री करून ठेवले होते. त्या दिवशी मी पहाटेच घर सोडले. नगरला जाईपर्यंत मनात प्रश्नांची कालवाकालव सुरू होती. कारण, घरी इतका वैतागलो होतो की, नगरला मरून पडतो तरी चालेल. मात्र, रिकामटेकडा हा शब्द मला कधी सहन झाला नाही. वाचनाची तेव्हाही प्रचंड आवड होती. 2013 पर्यंत 400 पानांचे एक पुस्तक लिहून 300 पेक्षा जास्त पुस्तके वाचली होती. विचारांची आणि काहीतरी करण्याची प्रचंड आवड होती. मात्र, योग्य दिशा नव्हती आणि पुन्हा बँण्ड वाजवत आयुष्य काढण्याची बिल्कुल इच्छा नव्हती. त्यामुळे, काही झालं तरी हा जॉब सुटता कामा नये. यासाठी मी स्वत:च्या मनाची पुर्ण तयारी केली होती.

तेव्हा सार्वमतचे कार्यालय नगरच्या सावेडी परिसरातील सन्मीत्र चौकात होते. मी शोध घेत ऑफीस जवळ केले आणि बिचकत-बिचकत आत प्रवेश केला. काळजाचे ठोक द्वितगतीने धावत होते. सकाळी मी पोहचलो तेव्हा 10 चा सुमार असावा. एक ते दिड तास बसल्यानंतर एक गाडी आली. श्रीकांत जाधव हे साहेबांना घेऊन आले होते. पांढराशुभ्र कुर्ता आणि त्यावर पांढरा पायजमा या पलिकडे साहेबांचा पोषाख शक्यतो कधी बदलला नाही. चेहर्‍यावर प्रचंड रुबाब आणि आल्याआल्या स्टापवर ओझरती नजर ही त्यांची एक शैलीच होती. मी त्यांना पाहिले आणि ताडकण उभा राहीलो. कारण, माझ्या मागे असणार्‍या सर्व स्टाफने त्यांना पाहताक्षणी स्टॅण्डींग पोझीशन दिली होती. त्यांनी माझ्यावर एक नजर टाकली आणि विचारं.! काय? माझे शब्दच उमटले नाही. कारण, त्या व्यक्तीमत्वाचे प्रभावी प्रतिबिंब माझ्यावर पडल्याने मी प्रचंड कावराबावरा होत घाबरुन गेलो होतो. माझ्या प्रश्नाचे उत्तर तेथे असणार्‍या एका व्यक्तीने दिले. साहेब.! तो मुलाखतीला आला आहे.

आत जाण्यापुर्वीच माझी व्हिकेट पडली होती. तेव्हा आत बोलविल्यानंतर काय? असा प्रश्न मनाला पडून उरातली धडधड वाढली होती. काही वेळ गेला आणि लगेच बेल वाजली. मला आत बोलविले होते. एक दिर्घश्वास घेऊन मी आत गेलो. मुलाखतीचे सर्व तत्व अगदी अंगवळणी पडेल इतकी तयारी मी गेल्या दोन दिवसात केली होती. एक नम्र व्यक्ती म्हणून मी त्यांच्यापुढे गेल्यानंतर त्यांनी मला पुर्णपणे न्यहाळले. माझे व्यक्तीमत्व भरदार दिसावा म्हणून मी भर उन्हात देखील स्वेटर घातलेले होते. साहेबांनी काही क्षण माझ्यावर नजर फिरवली आणि म्हणाले. बस.

मी स्वत:ला सावरुन त्यांच्या समोर बसलो. साहेब काय विचारतील काय नाही याची भिती कायम होती. तोच त्यांना एक फोन आला आणि ते बराच वेळ फोनवर बोलत बसले. सुदैवाने तो फोन मला स्टेबल करुन गेला. कारण, माझ्या मनातील भिती बर्‍यापैकी कमी झालेली. मात्र, संदिग्धता आणि दडपण कायम होते. साहेबांनी फोन बाजुला ठेवला आणि प्रश्न केला. कोठून आला. अकोले तालुक्यातील प्रवरेच्या काठी असणार्‍या उंचखडक या छोट्याशा गावातून. मी उत्तरलो. त्यानी पुढील प्रश्न केला, भाऊसाहेब मंडलिक यांच्या का? त्यांना ओळखतो का? मी हो म्हणत  तेथून आमची चर्चा सुरू झाली. या दरम्यान आमच्यात फार वेळ प्रश्न-उत्तराचा तास सुरू होता. खरंतर माझ्यातील आत्मियता आणि प्रमाणिकपणा पाहुन साहेबांनी माझ्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. मला देखील त्यांच्याविषयी फार प्रेम वाटले. नोकरी मिळो ना मिळो. पण साहेब वरवर कठोर दिसत असले तरी ते आतून फार प्रेमळ आणि प्रांजळ होते. याची मला प्रचिती आली.

आता बराच वेळ झाला होता. साहेबांनी मला शेवटचा प्रश्न केला. पगार किती हावा आहे. खरंतर मी तेव्हाच ठरविले होते. आता काही झाले तरी मागे वळून यायचे नाही. मी अंत:करणातून उत्तरलो. साहेब.! घरी आई मोलमजुरी करते. वडिल देवाला प्रिय झाले. घरी वडिलोपार्जीत अमाप वैभव होते. मात्र, ते त्यांनीच विकून टाकले. आज मी मेलो तरी गाडायला जागा नाही. इतकी बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे, हवं तर मला पगार नको. फक्त दोन वेळचे अन्न आणि रहायला जागा द्या. बाकी या पलिकडे मी काही मागणार नाही. हवंतर मला मेस लावून द्या. माझे तेव्हाही फार डोळे भरुन आले होते. कारण, आयुष्यात खुप काही करण्याची इच्छा होती. मात्र, कोठेही प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. पत्रकारीतेत मी चांगले करीअर करु शकतो याची मला खात्री होती. त्यामुळे, मला फक्त पाऊल ठेवण्यासाठी जागा हवी होती. साहेबांनी मला सांगितले ठिक आहे. पाहू.! मी जड पाऊलांनी बाहेर आलो. साहेब त्यांच्या कामात मग्न झाले. मी आपला बाहेर येऊन नि:शब्द बसून होतो.

आता बराच वेळ झाला होता. कदाचित चार साडेचार वाजले असावेत. साहेब अचानक बाहेर आले. मी त्यांना पाहिले आणि तत्काळ उभा राहीलो. आरे.! तू गेला नाही का? मी म्हणालो, साहेब तुम्ही म्हणाले बाहेर बसा. म्हणून थांबलो. साहेब पुन्हा आत गेले आणि त्यांनी माझ्या अर्जावर काहीतरी लिहीले. आत एका व्यक्तीस बोलावून तो अर्ज व्यवस्थापन विभागात दिला. काही वेळानंतर मला बोलावले गेले आणि विचारले. कधी हजर होतो.? त्यानंतर मी म्हटलं, साहेब आत्तापासूनच. त्यांनी गालातल्या गालात हसू काढले आणि म्हणाले. आरे तुला जॉब दिला आहे. आज घरी जा. दोन दिवस विचार कर, वाटलं तर कपडे आणि तुला जे काही हवं ते घेऊन ये. माझ्या चेहर्‍यावर आनंदाच्या प्रचंड लहरी दाटल्या होत्या. साहेबांचे शब्द एकले आणि नकळत माझ्या पाठीचा कणा त्यांच्यासमोर नतमस्तक झाला. काय करु आणि काय नको. हेच कळेनासे झाले होते. त्या दिवशी मी अगदी आकाशात आनंदाने विहंग करणार्‍या पक्षाप्रमाणे गावाकडे निघालो होतो. तेथेच उशिर झाल्यामुळे, रात्री घरी यायला रात्री 11 वाजून गेले होते. घरी आल्यानंतर आई, भाऊ, ताई यांना माहिती दिली आणि त्यांना देखील फार आनंद वाटला. चला, एकदाचा लागला कामाला म्हणून अनेकांनी सुटकेचा श्वास टाकला. ते दोन दिवस कसे गेले ते काहीच काळले नाही. 

तेव्हा माझ्या मित्राने मला एक नवा मोबाईल घेऊन दिला होता. त्याचे पैसे मी गेले कित्तेक दिवस फेडत होतो. तो घेऊन 22 मे रोजी मी सकाळी नगर गाठले. जेव्हा ऑफिसला पोहचलो तर ते उघडले देखील नव्हते. मोठ्या आतुरतेने शिपायाची वाट पाहत बसलो. सकाळी 10:30 वाजता कार्यालयाचा दरवाजा उघडला. मी आत जाऊन उत्सुकतेने सर्व ऑफिसची पहाणी केली.  त्या दिवशी पहिला व्यक्ती मला भेटला होता. तो म्हणजे शेषराव पठाडे साहेब. साहेब इतके दिलदार आणि गमतीदार होते की, त्यांनी आल्याआल्या मला प्रश्न केला. कोठून आला रे भाऊ हाताने वाटुळं करायला? हे महाशय नेमकी बरे बोलले की वाईट हेच मलाच काळेना. मी त्यांना उत्तर दिले आणि एका कोपर्‍यात गप्प बसलो. त्यांच्यानंतर अनेकजण आले. मात्र, हे सर्व मला अगदी वेगळ्याच पद्धतीने न्याहळत होते. त्यात एक बुजूर्ग व्यक्ती जीएन सर होते. त्यांनी मला बोलविले आणि विचारले, पान लावता येते का? मी म्हटलं नाही. टाईप करता येते का? म्हटलं नाही, बातमी लिहीता येते का? म्हटलं थोडीफार, म्हणे नेमकं तुला काय येतं? म्हटलं साहेब मी नवा आहे. मला अजून शिकायचे आहे. मग काय बोकांडी बसायला आला का? ते व्यक्तीमत्व देखील जरा हटके आणि परखड होतेे. मात्र, त्यांच्या मनात कोणत्याही आकस भाव नव्हता. ही दोघे अशीच दिलखुलास असली तरी यांनीच मला फार प्रेम दिले.

11 ते 12 वाजण्याच्या सुमारास साहेब आले. त्यांनी मला बोलावून घेतले. आज फक्त ऑफिसचा अभ्यास करायचा आणि सर्व पेपर वाचून काढायचे. या पलिकडे काहीच कराचे नाही. हळुहळु मी कार्यालयात जसजसा वेळ देत होतो. तसतसे अनेकांचे टोमने मला खावे लागत होते. खरोखर मी इतका वैतागलो होतो की, पत्रकार होण्याची इच्छा माझी पुरती नमली होती. पण करणार तरी काय? घराकडे जाऊन पुन्हा बे-ऐके बे तेच पाढे पंच्चावन्न करण्यापेक्षा येथील अवहेलना मला मान्य वाटत होती. पण या सगळ्यांचे दुखणे कोठे होते. हे मला शेवटपर्यंत कळेनासे झाले होते. गेल्या आठ दहा दिसत होते कोठे नाहीतर मी या व्यवस्थेला पुर्ण कंटाळलो होतो. कदाचित शेती असती तर ती केली असती. डिएड झाले मात्र भरती निघाली नव्हती, कंत्राटी शिक्षक म्हणून काम करायला पगार मिळत नव्हता. काय सांगायची आमची कथा.! तेव्हातर आमचे हाल कुत्र खात नव्हतं. याच दरम्यान कदाचित 3 जानेवारी रोजी गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यु झाला होता. तेव्हा पंकजाताई यांना रडताना पाहिले होते. तेव्हा खर्‍या अर्थाने मला देखील बापाची किंमत कळली होती. मी त्या दिवशी कार्यालयाच्या गॅलरीत जाऊन धाय मोकलुन रडत होतो. एकीकडे येथे होणारा त्रास आणि दुसरीकडे हतबल आयुष्य यात मी प्रचंड गोंधळून गेलो होतो.

मी रडत असल्याची माहिती कोणीतरी साहेबांना दिली आणि त्यांनी मला बोलावून घेतले. मी प्रांजळपणे त्यांना माझी हकीकत सांगितली. तेव्हा साहेब स्वत: बाहेर आले आणि त्यांनी सर्व स्टाफला तंबी दिली. जर त्याला कोणी बोलाल तर माझ्याइतके वाईट नाही. तेव्हपासून साहेबांनी मला एक जॉब दिला. ते म्हणाले. एक महिनाभर एकही न्युज तू आणायची नाही. फक्त शहरात कोठे काय आहे. कोणते कार्यालय कोठे आहे. शहरात काय-काय प्रश्न आहे. यावर अभ्यास करायचा. मी तोच फंडा वापरला. मात्र, जेव्हाकधी मी बातम्या आणत होतो, तेव्हा त्या कोणी घेत नसायचे. माझ्याभोवती अवहेलनेचा जो शनी लागला होता. तो कायम होता. मात्र, मी देखील आता निर्ढावलो होतो. या सर्वाचे एकच मुळ होते. ते म्हणजे 4 ते 5 वर्षे जे जुने लोक होते. त्यांच्यातील काहींना 8 हजार पगार होता आणि अगदी कालच आलेलो मी, मला साहेबांनी 10 हजार पगार दिला होता. त्यामुळे, पहिल्या दिवसापासून अनेकांची पोटदुखी होत होती. मात्र, साहेब माझ्या पाठीशी खंबीर उभे होते. त्यांच्या विश्वासास पात्र होऊन अवघ्या 12 दिवसात मी टाईपींग शिकलो होतो. सकाळी कार्यलय मी उघडत असे, आलो की थेट टाईपींगसाठी बसे तर सर्व गेल्यानंतर मी पहाटे 4 वाजेपर्यंत शिकत असे. अगदी हाच नित्यक्रम मी दिड वर्षे पाळला. तर 9 महिन्यात एकही सुट्टी घेतली नाही. एकदा मला समजले की, आई आजारी आहे. तेव्हा मी साहेबांकडे गेलो आणि म्हणालो साहेब एक दिवस सुट्टी हवी आहे. आईला भेटायला जायचे आहे. तेव्हा साहेबांनी सहज विचारले. साप्ताहीक सुट्टी कधी असते.? त्यावर मी म्हणालो, सर मी नऊ महिन्यात एकही सुट्टी घेतलेली नाही. त्यावर साहेब आवाक झाले आणि लागेच व्यवस्थापनाला बोलावून घेतले. त्यांना झाप-झाप झापले आणि त्या दिवसापासून माझी साप्ताहीक सुट्टी कायमची सुरू झाली. तो वर शनिवार होता. खरंतर पुढे दोन वर्षात सगळ्यांचे पगार वाढले. मला जॉईन नंतर 12 हजार पगार होणार होता. मात्र, मी 4 वर्षे साहेबांना एका शब्दानेही हटकले नाही. तोवर 8 हजार वारे 12 पर्यंत आले होते. असाच एक दिवस साहेबांनी मला सहज विचारले. सागर, तुझा पगार किती झाला रे? मी म्हटलं सर तुम्ही 10 दिला तोच आहे. साहेबांनी त्याच दिवशी 12 हजार करुन दिला होता. नंतर तो वाढता राहिला.

जेव्हा मी जॉईन होऊन 20 ते 25 दिवस झाले होते. तेव्हाच नगरमध्ये जीतू भाटीया या व्यापार्‍याची हत्या झाली होती. तेव्हा त्याची रिपोर्टींग करण्याचा योग मला आला. त्यावेळी मी अगदी निर्भिडपणे त्याचे वृत्तांकन केले होते. तर खळबळजनक माहित्या समोर आणल्या होत्या. तेव्हापासून साहेब माझ्यावर फार खुश होते. खर्‍या अर्थाने तोच माझ्यातील क्राईम रिपोर्टरचा जन्म ठरला. त्यानंतर जे काही सुसाट वेगाने सुटलो की, भल्याभल्यांचा जळफळाट झाला. त्यानंतर माझ्याविरूद्ध कट कारणस्थाणे रचून मला खाली करण्याचे अनेक प्रश्न झाले. मात्र, नंदकुमार सोनार नावेची माझी कवच कुंडल हेच माझे बळ होते. साहेबांनी नंतर सार्वमत सोडले तेव्हा मी फार रडलो होतो. त्यांच्यानंतर अनेकांनी सार्वमत सोडले. मात्र, साहेबांनी मला स्वत: फोन केला होता. तो माझा वैयक्तीक निर्णय आहे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नको. टिकून रहा, तुझ्यावर जळणारे फार आहेत. मात्र, तु ज्या गतीने आणि दिशेने चालला आहे. तो योग्य आहे. साहेबांनी फार प्रेम केले. आयुष्यात सर्वात फ्रि लिखाण करण्याचे स्वातंत्र्य आणि हवं तरं जग, काहीही कर असे म्हणारे माझे आधारस्तंभ सोनार साहेबच होतो. साहेबांच्या जिवणावर एक पुस्तक लिहावं इतके त्यांनी मला जपले आहे. हजारो आठवणींचा साठा माझ्या काळजात मी जतने केलेला आहे.

 गेल्या तीन दिवसांपासून आदिवासी भागात गेलो होतो. त्यामुळे, मोबाईलला रेंज नव्हती. त्यानंतर जेव्हा आमचे सहकारी गणेश हापसे भेटले आणि त्यांनी साहेबांची बातमी दिली तेव्हा शब्दच उमटले नाही. प्रचंड अस्वस्थता सहन करीत मनाची घुसमट सुरू होती. साहेब, गेले तरी त्यांच्या आठवणी काळजात अगदी ध्रुवतार्‍यासारख्या घर करुन बसल्या आहेत. मांडावे तितके कमीच आहे. मात्र, साहेब आमच्यात नाही. अशी कल्पना देखील येणार्‍या काळातही आम्ही करु शकत नाही. बस इतकेच.! साहेब शरिराने गेले पण मनाने आणि त्यांच्या कर्तुत्वाने आमच्या काळजात जिवंत आहे आणि राहतील. साहेब........

- सागर शिंदे