आरे देवा.! कोरोना नंतर आता संगमनेरात बर्ड फ्लु.! कावळा निगेटीव्ह अन कोंबडा पॉझिटीव्ह.! 10 किमी क्षेत्र निगराणीखाली.!

सार्वभौम (संगमनेर) :-

                     संगमनेर तालुका कोरोनाने सावरतो कोठे नाहीतर आता पुन्हा येथे बर्ड फ्लू चा संसर्ग सुरू झाला आहे. घारगाव परिसरात एक कावळा संशयित  मयत झाला होता. त्यामुळे, तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, कालांतराने कावळ्यावर जे आरोप करण्यात आले होते. ते फेल ठरले आहेत. कारण, तो मयत कावळा निगेटीव्ह असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानंतर पुन्हा संगमनेर तालुक्यातील शिंदोडी परिसरात असणार्‍या ढोणवाडी येथे काही काही कोंबड्या बर्ड फ्लु पॉझिटीव्ह असल्याचा शासकीय अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे, शिंदोडी पासून 10 किमीचा परिसर निखराणीखाली ठेवण्यात आला असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे, काल जे प्रशासन कोरोनाशी दोन हात करुन लढत होते. ते प्रशासन पुन्हा बर्ड फ्लु शी लढण्यास सज्ज झाल्याचे दिसते आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील शिंदोडी (ढोणवाडी) परिसरात काही कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांची माहिती प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानंतर या कोंबड्यांचे सॅम्पल तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला होता. सखोल तपासणीअंती लक्षात आले की, या कोंबड्याचा मृत्यू बर्ड फ्लु मुळे झाला आहे. त्यामुळे, या रोगाचा आता संगमनेर व्यतिरिक्त जिल्हाभर प्रसार होऊ नये. यासाठी प्रतिबंध उपायोजना म्हणून शिंदोडी येथील बाधित कोंबड्याचे शास्त्रोक्त पद्धतीने कलींग करुन विल्हेवाट लावणेबाबत केंद्रशासनाने सुचना केल्या आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाने शिंदोडी येथून 1 किमीचा परिसर इन्फक्टेड झोन तर 10 किमीचा परिसर निगराणी झोन म्हणून घोषित केला आहे. त्या बाधित क्षेत्रात सर्व कुक्कुट पक्ष्यांची तसेच निगडीत खाद्य व अंडी यांचेही शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त कुक्कुट शेड निर्जतुकीकरण करुन 10 किमी त्रिज्येतील परिसरात कुक्कुट  पक्ष्यांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा, प्रदर्शन, आयोजित करण्यास 90 दिवस प्रतिबंध घालण्यात आला आहे. जर शासनाने निर्धारीत केलेल्या नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कडक करावाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे, अशा संसर्गातून वाचायचे असेल तर ते अटोक्यात असतानाच त्यावर आळा बसविण्यासाठी प्रत्येकाना सहकार्य करणे अपेक्षित आहे.

दरम्यान, संगमनेर तालुक्यात बर्ड फ्लु चे पक्षी आढळून आल्यानंतर प्रशासनाने संगमेनरात 9 पथकांची नेमणूक केली आहे. त्यात 45 जणांचा सामावेश आहे. तर यात 55 वर्षापेक्षा जास्त वयाचे जे कर्मचारी आहेत. त्यांना कलिंगचे काम देऊ नये. असे आदेशात म्हटले आहे. या सर्व पथकात अकोले तालुक्याचे पशु वैद्यकीय अधिकारी याचे नियंत्रण अधिकारी असणार आहे. तर या व्यतीरिक्त राहुरी तालुक्यातील सडे येथे देखील कोंबड्याचा अहवाल बर्ड फ्लु पॉझिटीव्ह आला आहे. यात ज्या सुचना आणि प्रतिबंध संगमनेर तालुक्यासाठी करण्यात आला आहे. तो राहुरी तालुक्यातील सडे गावाच्या 10 किमी लागू करण्यात आला आहे.