कुस वांझोटी राहिली तर लोक निपुत्रीक म्हणतील, यापेक्षा दुसरे काय होईल.! पण असली मुलं नकोच.!

- सागर शिंदे 

 सार्वभौम (अकोले) :- 

                       त्या दिवशी मी कामानिमित्त संगमनेरला गेलो होतो. चारदोन पोलीस कर्मचार्‍यांना भेटून चहा घेतला आणि एका पोलीस अधिकार्‍याशी चर्चा करून येवले चहाच्या कोपर्‍यावर उभा होतो. काही पत्रकार मित्रांशी जुण्या गाप्पागोष्टींमध्ये मग्न झालो होतो. त्याक्षणी एक 80 ते 85 वर्षाची म्हातारी अगदी 90 अंशाच्या काटकोणात वाकून बस स्थानकाच्या एका कोपर्‍यात चालली होती. त्यांच्याकडे पाहिले आणि नकळत मनाला प्रश्न भिडला. का ह्या म्हातार्‍या घर सोडत असतील? असे काय काम असेल जे या म्हातारीला चालता येत नाही तरी बाहेर पडावसं वाटलं असेल! माझ्या मनात नाना प्रश्नांच्या ठिणग्या पडत राहिल्या. मात्र, माझ्या एकही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. आता मी त्या आजीकडे एकटक पाहत होतो. काही क्षणात तिच्या कासवांच्या पावलांकडे माझे लक्ष गेले आणि पायाकडे पाहुन काळजात चर्रर्र झाले. तो रक्ताळलेला पाय, एकाबाजुने रक्त वाहत होते तर दुसर्‍या बाजुने पिकलेली ओली जखम. काय झालं असेल हा विचार करण्याला देखील माझ्या मनाला वेळ मिळाला नाही. क्षण दोन क्षणात मी उत्तरलो! आजी कोठे जायचे आहे. वर मान करुन त्यांनी करंगळी वर केली आणि मी स्वत: पुढे होऊन त्यांनी म्हणालो, बसा याच कोपर्‍यात.! पण, त्या जखमेकडे पाहुन फार वाईट वाटले होते. त्यामुळे, मी खिशात हात घालुन पाकीट काढले आणि काही नोटा काढून तिच्या हातावर दिल्या. म्हटलं आई उपचार करा.!

             आजी काही मिनिटात परतीच्या पावलांनी माझ्या समोर आली. तिच्या पाठीचा कणा जरी ताठ नसला तरी तिचा स्वाभिमान ताठ होता. मनातील भावना तेव्हाच डोळ्यांच्या कडा ओल्या करतील अशा होत्या. त्या माऊलीने मला सामोरे होत प्रश्न केला. बाळा कुठला रे तू? मी म्हटलं अकोल्याचा. नि:शब्द होऊन ती स्थिरावली. मलाही कळेना तिच्या मनात काय काहूर माजले होते. म्हणून मी स्वत: प्रश्न केला. आई! कोठे जायचे आहे? कोठे राहतात तुम्ही? बाक पडलेल्या काठीचा एक हात काढून तिने उत्तरेकडे असणार्‍या पिंपळाच्या झाडाकडे हात केला. मला गाव कळले नाही. मात्र, त्या दिशेकडे नजर टाकली असता अनेक भिकारी लोक त्या बोधिवृक्षाच्या अश्रयाला निवांत पहुडलेले दिसले. काही बोलण्याच्या आत मी काही संकल्पना स्वत: क्लेअर करून घेत शांत बसणे स्विकारले.

आजीच्या नि:शब्द होण्याने मला फार वाईट वाटले तरी मला त्यांच्या भुतकाळाच्या जखमांचा उत्खनन करायचे नव्हते. त्यामुळे, तुम्ही कुठल्या, मुले कोठे आहेत? लेकी आहेत का? असा कोणताही प्रश्न विचारण्याची धाडस माझ्यात झाली नाही. त्यामुळे, मी तत्काळ पुढचा प्रश्न केला. आजी पायाला इतकी मोठी जखम कशी झाली. त्यावर अगदी थरथरत्या आवाजात त्या उद्गारल्या. बाबा! एका मेेल्याने गाडी पायावर घातली. माझी टाच गेली पण साधा दवाखाना देखील केला नाही. कोण भडवा असेल तो देव जाणे, पण त्याच्या असल्या दगडाच्या काळजाने माझे दात दातावर पडले आणि करकचून आवाज आला. हेच जर त्याच्या माय माऊलीच्या पदरी असले दु:ख आले असते तर? त्याने त्यांना असे वार्‍यावर सोडले असते का? क्षण-दोन क्षणात त्याला माझ्या तोडून अपशब्द निघून गेले. मी किती चूक आणि किती बरोबर हे माहित नाही. मात्र, त्याचे असे वागणे मला अपशब्दास प्रवृत्त करुन गेले.

आजीला कदाचित ज्या काही चारदोन रुपयांच्या नोटा दिल्या होत्या त्या तिच्यासाठी फार सोन्यासारख्या होत्या. त्यामुळे, तीने माझ्यासमोर ते लटलटते हात पुढे करुन नमस्कार केला. आजीबाई, थोडाफार दवाखाना करा, पोटाला खा. असे म्हणत मी मी माझ्या गाडीजवळ गेलो. काही क्षण लोटतात तोच मला आजी ज्या मार्गाने गेली तेथे तिच्या पाऊलखुना दिसून आल्या. मित्रांना.! ती काही लक्ष्मीची पाऊले नव्हती तर त्या पायातून चक्क रक्ताळलेले ठिपके मला दिसत होते. काय करावे मला काहीच कळत नव्हते. आजीने रस्ता क्रॉस केला आणि त्या पिंपळाच्या झाडाचा आसरा घेत कोठे गायब झाली मला देखील कळले नाही. मी माझ्या मित्राला विचारले, आजी गेल्या कोठे? तो म्हणाला की, असेल इथेच कोठे.!

मी गाडी काढली आणि चालता झालो. एका मेडीकलच्या समोर जाऊन उभा राहिलो खरा. मात्र, म्हातारीची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोरुन जात नव्हती. काय करावे काही कळेना. मन बैचेन झाले, अस्वस्थ वाटू लागले होते. कारण, खरोखर ती म्हातारी आणि तिच्या जखमांच्या वेदना मला होत होत्या. मी थेट मेडिकलमध्ये घुसलो आणि एक चांगला मलम विकत घेतला. त्याच बरोबर काही गोळ्या देखील घेतल्या. मेडिकल चालकाने विचारले दवाखाण्याची चिठ्ठी? म्हटलं एक अज्ञात म्हातारी आहे. तिच्या पायाहून कोणीतरी गाडी घातल्यामुळे फार मोठी जखम झाली आहे. त्यामुळे, जे काही चांगले व गुणकारी असेल ते औषध द्या. त्यावर त्याने काही गोळ्या आणि ट्युब दिली. त्याला रक्कम विचारली आणि मी खिशात हात घालुन काही पैसे त्याच्या समोर ठेवले.

खरंतर, लोक किती असंवेदनशील आहेत याची मला फार मोठी प्रचिती आली. चंद पैशासाठी असले लोक मानुसकी विसरतात याचे फार वाईट वाटले. कारण, माझ्याकडे हे औषध घेण्यासाठी फक्त सुट्टे दोन रुपये कमी होते. तरी देखील त्या मेडिकल चालकाने औषधे दिली नाही. मी पाचशे रुपयांची नोट काढली आणि त्याच्या समोर केली. त्याने आपले दोन रुपये काढले आणि बाकी पैसे परत केले. खरं सांगतो. मला त्या वाहन चालकाने म्हातारी जखमी केली याचे इतके दु:ख वाटले नसले तितके याने दोन रुपयांसाठी पाचशे घेतल्याचे वाटले होते. कारण, याला मी घडलेला प्रकार सांगितला होता. म्हणजे गोरगरिबासाठी शे दोनशे खर्च करण्याची आपली दानत आहे. मात्र, दोन रुपये खर्च करण्याची मानसिकता या मोठ्या लोकांची नाही. त्याच्या या व्यावहाराने माझ्या चेहर्‍यावर प्रचंड तणाव जाणवत होता. माझ्यासोबत असणारा मित्र देखील हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पहात होता. मी का ही उठाठेव करतो आहे. असा प्रश्न देखील त्याच्या मनाला भेडसावला असेल, मात्र करणार तरी काय.!

मी माझी गाडी रस्त्यावरच उभी करुन त्याच्या गाडीवर बसलो आणि रस्ता क्रॉस करुन बस स्थानकाकडे गेलो. रात्रीची वेळ झाली होती. अधार दाटून आला होता. आजीला शोधण्यासाठी आम्ही पुढे झालो तोच एका भिंतीच्या आधाराने निद्रीस्त होऊ पाहणार्‍या आजीचा प्रतिमा आम्हाला दिसली. मी पुढे होऊन आजीला म्हटलं. ही घ्या ट्युब, पायाच्या जखमेला लावा. आता काहीतरी खा आणि गोळी घ्या. आजीने माझे होत धरले. बोलुन तर म्हतारी फार चांगली होती. मग हे खुल्या आभाळाखाली जगणं आणि जगाच्या पाठीवरचं आयुष्य तिच्या वाट्याला का आले असावे? तो उघड्यावर थाटलेला संसार आणि आठरा विश्व दारिद्र घेऊन म्हतारी दत्ताच्या मंदीरासमोर बसली होती. मी करणार तरी काय? तिला काही प्रश्न विचारण्याची मानसिकता खरोखर माझ्यात नव्हती. मात्र, आजीचे पुनर्वसन एखाद्या संस्थेत होण्यासाठी माझा प्रयत्न नक्की असेल.

त्यावेळी मी तेथून काढता पाय घेतला. काही मित्र, संस्था यांना फोन करुन थोडी माहिती दिली. मला यश येईल ना येईल हा प्रकार पुढचा आहे. मात्र, खरंच एखादा दगडाच्या काळजाचा मुलगा अथवा मुलगी जन्माला घालण्याऐवजी कुस वांझोटी राहिलेली कधीही बरी. कोणी निपुत्रीक म्हटले तर चालेल. मात्र, सन्तान असताना देखील असे बेवारस आयुष्य पदरात पडत असेल तर ते न झालेले काय वाईट आहे? किमान पुत्रच नाही ही संकल्पना मनाला आधार देऊन जाईल. मात्र, असून नसल्यासारखे असले तरी त्या वेदना मृत्युपेक्षाही भयानक असतील यात तिळमात्र शंका नाही.! हे असे काही पाहिले की, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, या वाक्यावर देखील विश्वास राहत नाही. बस इतकच.!

- सागर शिंदे