अकोल्यात भाजपचा 45 तर राष्ट्रवादीचा 39 जागांवर दावा.! सांगा गणित कसं जुळवायचं.! वास्तवत: भाजप 19 तर महाविकास आघाडी 32.!
सार्वभौम (अकोले) :- अकोले तालुक्यात 52 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी पेटली होती. 15 जानेवारी रोजी मतदान झाल्यानंतर आज 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी झाली. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यासह भाजप आणि मित्रपक्षांनी कंबर कसली होती. यात 51 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायती बिनविरोध आल्या होत्या तर 41 ठिकाणी निवडणुका झाल्या होत्या. आता गावपातळीवर पक्ष विरहीत अनेकांनी आपले नशिब आजमाविले होतेे. त्यातील काही उमेदवार निवडून देखील आले होते. ते कोणत्या पक्षाचे आहेत हे खुद्द निवडून जे आले त्यांना देखील माहित नाही. मात्र, त्यांच्यावर भाजप आणि महाविकास आघाडीने आपला दावा ठोकला आहे. त्यामुळे, 52 पैकी 45 ग्रामपंचायतींवर भाजपने दावा केला आहे. तर 39 ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने दावा केला आहे. यात शिवसेनेने वैयक्तीक 9 जागांवर एकहाती सत्ता सिद्ध केली आहे तर राष्ट्रवादीने 31 जागांवर निर्विवाद वर्चस्व सांगितले आहे. या व्यतिरिक्त भाजपने 35 ग्रामपंचायती ह्या आपल्या हक्काच्या सांगितल्या आहते. त्यामुळे, जोवर सरपंच पदाची निवड होत नाही. तोवर ही आकडेवारी केवळ हवेत नेणारी असणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडी लोकशाही पद्धतीने झाल्या आहेत. त्यामुळे आता गावचा प्रथम मुखीया कोण त्यासाठी येत्या तीन ते चार दिवसात हे आरक्षण जाहिर होणार आहे. अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 51 ग्रामपंचायतींमध्ये 466 जागा आहेत. त्यापैकी 11 ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या असून त्यातील 181 उमेदवार बिनविरोध निवडून गेलेले आहे. ज्या काही ग्रामपंचायतींचे इलेक्शन लागले होते. तेथे बहुतांशी ठिकाणी चुरशीची लढत होती. यात काही नाही म्हटले तरी भाजपला गावपातळीवर चांगलाच धक्का बसला आहे. आंबडसह सहा ते सात ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यातून गेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी प्रस्तापित व्यक्तींना साध्यासाध्या कार्यकर्त्यांनी मोठी शह दिल्याचे पहायला मिळाले आहे. या पलिकडे मोठमोठ्या ग्रामपंचायती भाजपला राखण्यात यश आले आहे. त्यात कळस, देवठाण, गणोरे, कोतुळ यांसह अन्य ग्रामपंचायतीत पुन्हा कमळ फुलले आहेत. भाजपने दिलेल्या माहितीनुसार 466 जागांपैकी 295 जागांवर भाजप तर 171 जगांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. तसेच 52 पैकी 35 ग्रामपंचायती भाजपकडे तर 17 ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडे अशी अकडेवारी त्यांनी जुळविली आहे.
एकंदर, डॉ. किरण लहामटे यांनी देखील सत्तेचे समिकरण जुळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात 31 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस तर 6 ग्रामपंचायतींवर शिवसेना, काँग्रेसच्या ताब्यात 2 ग्रामपंचायती तर भाजपच्या ताब्यात 12 ग्रामपंचायती अशा प्रकारची आकडेवारी महाविकास आघाडीने काढली आहे. हे असे असले तरी यात अशा काही ग्रामपंचायती आहेत, ज्यावर आजही संदिग्धता आहे. कारण, यात असे काही उमेदवार आहेत ज्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन सत्कार स्विकारला आहे तर थोडे पुढे जाऊन भाजपच्या कार्यालयात देखील जाऊन मुजरा ठोकला आहे. त्यामुळे, जोवर सरपंच पदाचे आरक्षण जाहिर होत नाही, तोवर हा सावळा गोंधळ पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीचा ग्रामपंचायत निवडणुकीत फार मोठा फरक पहायला मिळाला. तो असा की, ज्या काही गावांमध्ये बिल्कुल विरोध होत नव्हता तेथे युवा पिढी लढायला शिकली आणि त्यांनी गावातील प्रस्तापित व्यक्तींना चांगलाच शह देण्याचा प्रयत्न केला. या तरुणांना कोठे यश आले तर कोठे अपयश आले.
म्हाळदेवी महाविकास आघाडी, ब्राम्हणवाडा महाविकास आघाडी, टाकळी भाजप, रूंभोडी महाविकास आघाडी, मेहेंदुरी महाविकास आघाडी, उंचखडक खु महाविकास आघाडी, पांगरी महाविकास आघाडी, बहिरवाडी भाजप, हिवरगाव भाजप (भाऊ समर्थक), निंब्रळ भाजप, मन्याळ महाविकास आघाडी, लिंगदेव महाविकास आघाडी, पिंपळगाव निपाणी महाविकास आघाडी, पिंपळगाव खांड महाविकास आघाडी, घोडसरवाडी रद्द, लहित महाविकास आघाडी, बेलापूर महाविकास आघाडी, विरगाव भाजप, मनोहरपूर महाविकास आघाडी, वाघापूर भाजप, इंदोरी महाविकास आघाडी, धामनगाव पाट भाजप, धामनगाव आवारी महाविकास आघाडी, बोरी भाजप, वाशेरे भाजप, सुगाव खुर्द मविआ, पिंपळदरी महाविकास आघाडी, गणोरे भाजप, नाचणठाव महाविकास आघाडी, कळस बु भाजप, ढोकरी भाजप, तांभोळ महाविकास आघाडी, देवठाण भाजप, कळंब महाविकास आघाडी, जांबळे महाविकास आघाडी, परखतपूर महाविकास आघाडी, निळवंडे भाजप, शेरणखेेल महाविकास आघाडी, नवलेवाडी महाविकास आघाडी, उंचखडक बु भाजप, कळस खु महाविकास आघाडी, चैतन्यपूर महाविकास आघाडी, कुंभेफळ महाविकास आघाडी, आंबड महाविकास आघाडी, मोग्रस भाजप, जाचकवाडी महाविकास आघाडी, कोतुळ भाजप, औरंगपूर महाविकास आघाडी, चितळवेढे महाविकास आघाडी, धुमळवाडी सेना भाजप, भोळेवाडी भाजप, बदगी भाजप, बेलापूूर महाविकास आघाडी, अशा पद्धतीने ग्रामपंचायतींवर वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.
आता यात महत्वाचे म्हणजे, हा वरील कौल प्रत्येक गावातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींना विचारुन तयार करण्यात आलेला आहे. यात अशी काही गावे आहेत जेथे भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि रिपाई यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत. ते सरपंच पदाची सोडत निघाल्यानंतर आपला निर्णय जाहिर करणार आहेत. तर काही ठिकाणी एकाच गटाचे दोन गट आहेत तर काही ठिकाणी विरोधी गट असून देखील ते एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही. त्यामुळे, सत्ता समिकरण व आरक्षण यावर फार काही अवलंबून असणार आहे. म्हणून हा एक प्राथमीक अंदाज असला तरी तो परिपुर्ण असले असे काही नाही. मात्र, बहुतांशी ठिकाणी जेमतेम परिस्थिती सारखीच असण्याची शक्यता आहे.
- सागर शिंदे