दोन भाच्यांसह मामाचाही मृत्यु.! दगडच्या खाणीतील पाण्यावर तरंगले मृतदेह.! धक्कादायक प्रकार.!
संगमनेर तालुक्यातील झोळे येथे गणेशवाडी परिसरात असणार्या म्हसोबा नाल्यात शेळ्या धुण्यासाठी गेलेल्या मामा व दोन भाच्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना रविवार दि. 17 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात शेळ्या धुवत असताना एका मुलाचा पाय घसरला असता दुसरा त्यास हात देण्यासाठी गेला, या दरम्यान दोघे पाण्यात बुडाल्याचे पाहुन त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या मामाने पाण्यात उडी मारली असता या दोघांनी त्यांना जिवाच्या आकांताने घट्ट पकडले, त्यावेळी दुर्दैवाने यात तिघांना जलसमाधी घ्यावी लागली आहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात तिघांची आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयुर संतोष गाढवे (वय 12), सुरज संतोष गाढवे (वय 15) व संजय भाऊसाहेब खर्डे (वय 40, तिघे रा. झोळे) अशी मयत झालेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संजय भाऊसाहेब खर्डे यांची बहिन कर्जुले पठार येथे दिलेली होती. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या पतीचा तीन वर्षापुर्वी अपघाती मृत्यु झाला होता. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून त्या आपल्या दोन मुलांसह आपल्या भावाच्या घरी राहत होत्या. आज रविवार दि. 17 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास खर्डे हे आपल्या दोन्ही भाच्यांसह गणेशवाडी परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. काही वेळ शेळ्या चारुन झाल्यामुळे शेळ्यांना चांगलाच उन्हाचा तडका बसला होता. त्यावेळी खर्डे यांनी त्यांच्या शेळ्या जवळच असणार्या दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यावर नेल्या होत्या.
दरम्यान, काही काळानंतर त्यांच्या मनात आले की, आपण शेळ्यांवर पाणी टाकले पाहिजे. म्हणून ते शेळ्या धुण्यासाठी पाण्यात उतरले होते. त्यांचे काम सुरू असताना त्यांचे दोन्ही भाचे हे त्या पाण्याच्या कडेवर उभे होते. त्यावेळी अचानक एका मुलाचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्यामुळे, त्याने गटांगळ्या खायला सुरूवात केली. हा प्रकार त्याच्या भावाने पाहिला असता त्याने आपल्या भावास वाचविण्यासाठी थेट पाण्यात उडी मारली. मात्र, दुर्दैवाने दोघांना पोहता येत नसल्यामुळे ते पाण्यात बुडाले.
दरम्यान, या परिसरातून एक पाट जातो, त्याच्या शेजारीच एक दगडाची खान आहे. या खाणित मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. खाणिचे खोदकाम हे ओबडधोबड असल्यामुळे, कोठे खड्डा तर कोठे ठाव आहे. त्यामुळे, हे दोन्ही मुले ज्या ठिकाणी पडले तेथे खोलवर खड्डा असल्यामुळे त्यांना ठाव घेता आला नाही. आपले दोन्ही भाचे बुडत असल्याचे पाहुन खर्डे यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. मात्र, दोघांना वाचविण्याच्या नादात मामांना देखील भाच्यांच्या समवेत आपले प्राण गमवावे लागले आहे. हा प्रकार भर दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडल्यामुळे, मोठा कल्लोळ माजला होता. या डोहापासून अगदी काही अंतरावर एक साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. तेथील लोकांना या घटनेची कल्पना मिळताच सगळे लोक या खानिकडे आले. मात्र, तोवर फार उशिर झाला होता.
दरम्यान, संगमनेर तालुक्यात चंदनापुरी, खांडगाव, मिर्झापूर, धांदरफळ, निळवंडे, निमज अशा अनेक ठिकाणी गौणखणिजाची परवाणगी देण्यात आली आहे. मात्र, तेथे मोठमोठे खड्डे करुन प्रशा सन व तस्कर रिकामे झाले आहेत. त्यांनी येथून कोट्यावधींचा मलिदा उपसून नेला खरा. मात्र, त्यांच्यानंतर या खड्ड्यांमध्ये अशा प्रकारे जीव जात आहेत. याला जबाबदार कोण? त्यामुळे, कायदेशीर रित्या याला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आता होऊ लागली आहे. यापुर्वी देखील पठार भागावर वाळुच्या गर्त्यात दोन मुलांचा मृत्यु झाला होता. रायते परिसरात देखील एका व्यक्तीचा वाळुच्या गर्त्यात बुडून जीव गेला होता. या व्यतिरिक्त अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात दोन भाचे व मामांचा मृत्यु झाला होता. अशा घटनांना आळा बसण्यासाठी प्रशासनाने ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.
- सुशांत पावसे