सासरच्या छळाला कंटाळून विष पेलं.! तिघांवर गुन्हा दाखल.! मृत्युच्या कारणाबाबत संदिग्धता.! अहवालाची प्रतिक्षा.!
सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित तरुणीने विषारी औषध प्राषण करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दि. 3 जानेवारी 2021 रोजी घडली आहे. याप्रकरणी तब्बल 11 दिवसानंतर सुनिता मच्छिंद्र पांडे (रा. कसारा दुमाला, ता, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पती प्रसाद दादा शिंदे, नणंद ज्योती फुलचंद पांडे (दोघेही रा.हिवरगाव पावसा) व दुसरी नणंद सरिता भागवत पांडे (रा.कासारा दुमाला) यांना आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत सुनीता मच्छिंद्र पांडे यांनी गुरुवारी दि. 14 रोजी सकाळी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी मुलगी वैष्णवी प्रसाद शिंदे (रा.हिवरगाव पावसा) हिचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर त्यांचा संसार काही दिवस चांगला सुरू होता. मात्र, कालांतराने तिच्या घराच्यांकडून तिला जास्त त्रास देणे सुरू झाले होते. तरी देखील तिने संसारासाठी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून तिला सासरच्यांनी जास्तच त्रास सुरू केला होता.
दरम्यान, रविवार दिनांक 3 जानेवारीचे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वैष्णवी ही सासरी (हिवरगाव पावसा) येथे नांदत असताना पती प्रसाद दादा शिंदे, नणंद ज्योती फुलचंद पांडे (दोघेही रा. हिवरगाव पावसा) व दुसरी नणंद सरिता भागवत पांडे (रा.कासारा दुमाला) यांनी घरगुती कारणांवरून वेळोवेळी विवाहिता वैष्णवी हिस मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केली. इतकेच काय! शारीरिक व मानसिक छळ करुन तिला वारंवार धमकाविले. याच जाचाला कंटाळून वैतागलेल्या वैष्णवी हिने विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सदर प्रकार घडल्यानंतर 11 दिवसांनी सुनिता पांडे यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानंतर तालुका पोलिसांनी पती व दोघी नणंद यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे कायदेशी चौकटीत राहुन गुन्हा दाखल झाला तरी या प्रकरणात काही संशयीत मुद्दे आहेत. संबंधित व्यक्तीच्या खाण्यात काही आल्यामुळे त्याचे पॉयझन झाल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे, डॉक्टरांनी या प्रकरणात व्हीसीआरा राखुन ठेवला असून त्यानंतर जो काही अहवाल येईल त्यानुसार या गुन्ह्याचे चित्र आणखी स्पष्ट होईल. तुर्तास पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आय.ए.शेख हे करत आहे.