पिचड व भांगरे पुन्हा आमने सामने.! अकोल्यातून जिल्हाबँक लढत पुन्हा रंगतदार होणार.! थोरातांनी भाऊंना संधी द्यावी.!

- सागर शिंदे

          सार्वभौम (अकोले) :- 

                           जिल्हाबँक म्हणजे एक फार मोठे घबाड आहे. येते राजकारण विसरुन नगर जिल्ह्यातील अनेक मातब्बर एकत्र येतात आणि वाटाघाटी करतात. खरंतर, जिल्हा बँकेत भरती घोटाळ्याची टिमकी वाजली आणि तेव्हा खर्‍या अर्थाने तेथील यंत्रणेचे बुरखे माध्यमांकडून फाडले गेले. कोणी त्यांचे पाहुणे कामाला लावले तर कोणी अर्थपुर्ण तडजोडी करुन तेथे गाढवांना गोपाळशेट करुन मोठमोठी पदे दिली असेच काहीसे आरोप देखील झाले. अर्थात हा सगळा काथ्याकुट करुन त्या घोटाळ्याची चव जाऊन चोथा उरला आहे. त्यातील तत्थ्य काय आणि त्यावर झालेला निर्णय काय! तो तुम्हा सर्वांच्या समोर आहे. कारण, तसेही माध्यमांनी हा विषय सविस्तर आपल्या समोर पुर्वीच मांडलेला आहे. मात्र, आता पुन्हा जिल्हाबँक कोणाची? असा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्‍या या जिल्ह्यात आता काँग्रेस व शिवसेना यांच्या दिमतीला असणार आहे. तर दुसरीकडून भाजपचे तीन मातब्बर नेते तर अकोल्यातून चौथा अलिप्त नेता यांच्या खेचाखेचीत 3 हजार 519 मतदार हे नेमकी कोणाच्या बाजुने कौल देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यात जिल्ह्यातले सोडा हो.! अकोले तालुक्यात कशा प्रकारे रणधुमाळी पेटेल, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कारण, पिचड पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर त्यांच्यावर पवार कुटुंबाने वारंवार हल्लाबोल केला आहे. तर त्यांना सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी हे कुटुंब सतत क्रियाशिल असल्याचे वारंवार दिसून येत आहे. म्हणून तर आता येथे पुन्हा अशोक भांगरे आणि वैभव पिचड यांच्या प्रतिष्ठेची लढाई पहायला मिळणार आहे.

एकंदर सविस्तर आकडेवारी पाहिली तर लक्षात येते की, जिल्हा बँकेत एकुण तीन प्रकारचे मतदार आहेत. त्यात विविध कार्याकारी सोसायटी, त्यांचे 1 हजार 371 मतदार, तर शेती पुरक तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था यांचे 832 मतदार व बिगर शेती यात 1 हजार 316 मतदार अशा 3 हजार 519 मतदारांना जिल्हा बँकेत मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यात अकोले तालुक्याचा विचार करता विविध कार्याकारी सोसायटीतून 84 मतदार, शेती पुरक संस्थांमधून 83 मतदान तर बिगर शेतीमधून 58 मतदार असे 225 मतदारांना मतदानाचा हक्क आहे. त्यामुळे, सोसायटीच्यातरी मोचक्या मतदारांची मनधरणी करणे, त्यांना खुश करणे, त्यांची मने जिंकणे आणि त्यांना काहीतरी आश्वासने देणे अशा नाना प्रकारे येथे मतदानात रंगत भरणार आहे. तर येथे काही ठरावांना लाख मोलाची किंमत ठरली आहे. त्यामुळे, येथे देव माणूस निवडून येणार यात तिळमात्र शंका नाही. 

खरंतर अकोले तालुक्यातून दशरथ सावंत, वैभव पिचड, सिताराम पाटील गायकर, मधुभाऊ नवले, अशोक भांगरे, अमित भांगरे, सुरेश गडाख, महेश देशमुख यांनी आपले अर्ज भरले आहेत. तर विखे गटाचे एकनिष्ठ नेते विकास वाकचौरे यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे, येथे आठ जणांमध्ये नेमकी कोणात लढत होते आणि कोण माघार घेते हे येत्या 11 फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे. तुर्तास पिचड आणि गायकर यांच्यासह काही उमेदवारांच्या निर्णायक भुमिकेवर तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे गणित अवलंबून आहे. तर पिचड यांना मात्र, त्यांच्या निर्णयानंतर लक्षात येऊ शकते की, ते प्लास मध्ये जातील की मायनस. हे लवकरच स्पष्ट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे, येथे नेमकी कोण कोणाच्या पक्षाचे हा विचार नसला तरी कोण कोणाच्या गटाचे हा विचार मात्र नक्की करावा लागेल. त्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. असेच काहीसे दिसून येत आहे.

आता एकंदर मतांचा आणि चेहर्‍यांचा विचार केला तर सोसायटी गटातून सिताराम पाटील गायकर यांना शह देणे वाटते तितके सोपे नाही. एकंदर त्यांना दशरथ सावंत यांच्याकडून काहीसा शह होऊ शकतो. कारण, सावंत यांची पाटपाण्याच्या चळवळीसह सहकारातील चळवळ देखील दंडगी आहे. या व्यतिरिक्त त्यांनी अकोले, संगमनेरच्या सहकारात महत्वाच्या भुमिका बजावल्या आहेत. त्यामुळे, एक अनुभव म्हणून किमान निवडणुकीला काहीसा रंग भरु शकतो. मात्र, या व्यतिरीक्त गडाख यांनी जर त्यांच्या विरोधात दंड थोपटले तर मात्र पाटील यांना फायदाच होऊ शकतो असे अभ्यासकांचे मत आहे. याचे कारण असे बोलले जाते की, येथे 74 सोसायट्यांचे ठराव घेणे हीच लाख मोलाची कामगिरी पाटील यांनी शिताफीने पार पाडली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी विरोधकास फक्त 11 मते मिळु दिली होती. आता यापेक्षा गणित काही वेगळे असेल असे वाटत नाही. कारण, त्यांचा बहुजन चेहरा, कष्टाळु वृत्ती आणि स्वभाव हे बरेच काही सहकार्य करून जाते.

आता या पलिकडे अकोले तालुक्यातून बिगर शेती गटातून मधुभाऊ नवले यांचा एकमेव अर्ज आहे. नवले यांना सहकाराचा दांडगा अनुभव आणि अभ्यास देखील आहे. त्यामुळे, त्यांना तालुक्यातुन किती सहकार्य होते यापेक्षा ना. बाळासाहेब थोरात हे त्यांना किती सहकार्य करतात हे पहाणे सर्वात महत्वाचे आहे. कारण, अकोले सोसायटी गटात तरी नामदारांची चक्रे कुचकामी असली तरी बिगर शेती आणि शेती पुरक या दोन गटात त्यांच्या हाती फार काही आहे. तसेही अकोले तालुक्यात काँग्रेस ही अधिक बळकट करण्यासाठी स्वत: नामदार साहेबांनी भाऊंना काँग्रेसमध्ये येण्याची गळ घातली आणि नंतर राष्ट्रवादीने त्यांना बोहल्यावर चढविण्याचा प्रयत्न केला तरी मधुभाऊंनी साहेबांचा शब्द प्रमाण मानत त्यांचा पंजा सोडला नाही. त्यामुळे, अकोले तालुक्यातून भाऊंच्या रुपाने काँग्रेसचा संचालक देतात का? हे देखील पाहणे तितकेच महत्वाचे आहे. कारण, या गटाची धुरा आजवर आ. अरुण काका जगताप यांनी सांभाळलेली आहे. त्यामुळे, थोरात साहेबांपुढे ते एक मोठे आव्हाण असणार आहे.

तर यात महत्वाचे म्हणजे, एसी, एसटी राखीव गटातून सात अर्ज आले आहेत. त्यातील तीन उमेदवार हे अत्यंत तुल्यबळ असणार आहे. त्यात वैभव पिचड, अशोक भांगरे व डॉ. चेतन लोखंडे यांच्यात चांगली रंगतदार लढाई होणार आहे. मात्र, एक सलोखा म्हणून भांगरे आणि लोखंडे यांच्यात सलोखा होऊन एकास एक अशी लढत झाली तर पिचड यांच्यासाठी ती फार मोठी कसरत असणार आहे. मात्र, यासाठी अजून काही काळ वाट बघावी लागणार आहे. कारण, पिचड यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी नामदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती. तर येणार्‍या काही दिवसात आ. विखे पाटील हे राजूर गाठणार आहेत. त्यामुळे, येथील काही गणिते बदलण्याची शक्यता आहे. यात एकच गोष्ट अधोरेखीत होते की, पिचड यांच्या पक्षबदलाचा निर्णय त्यांच्या पराभवाचे कारण ठरले. त्यामुळे, आता जो काही निर्णय घ्यावयाचा आहे. तो फार विचारपुर्वक घ्यावा लागणार आहे. कारण, या निर्णयावर पुढील बरीचशी गणिते अवलंबून राहणार आहे असे जिल्ह्यातील जाणकारांचे मत आहे.

भाग 1 क्रमश:

- सागर शिंदे