तुम्हाला माहिती आहे? भांगरे अकोल्याचे तीन वेळा आपले आमदार होते.! अन त्यांनी कायकाय केले? नक्की वाचा इतिहासाचे उत्खनन.!
15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्यात काँग्रेसचे योगदान फार मोठे होते. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबडकर यांनी देशाचे संविधान लिहीले आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी सुरू झाली. त्यानंतर अवघ्या दोन वर्षात विधानसभेच्या निवडणुका लागल्या. त्यात अकोले मतदारसंघाचे नाव देखील अग्रभागी होते. भाषा, प्रांत आणि संस्कृती यांचा फार मोठा वारसा लागलेल्या देशात जाती धर्माला देखील प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळे, येथे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने अकोले मतदारसंघ एसटी बांधवांसाठी कायमचा राखीव झाला. सन 1952 साली विधानसभा लागल्यानंतर येथे कोण असा व्यक्ती आहे. तो सामाजाप्रती आत्मियता राखतो, जनतेचे दु:ख जाणतो, जो सर्व धर्म समभाव माणून बहुजणांना देखील न्याय देऊ शकतो. इतकेच काय! सुशिक्षित आणि उमदा तरुण कोण? असा शोध सुरू झाला आणि पहिले नाव पुढे आले ते म्हणजे गोपाळ श्रावणा भांगरे (रा. शेंडी, ता. अकोले) पेशाने शिक्षक असणारा हा व्यक्ती नोकरीबरोबर समाजाप्रती काहीतरी करण्याची जिद्द ठेऊन नि:स्वार्थी भावनेने तालुकाभर काम करत होता. हीच वृत्ती काँग्रेसच्या नेत्यांना भावली आणि भांगरे कुटुंबाला विधानभवनात जाण्याचा पहिला बहुमान मिळाला.
गोपाळ श्रावणा भांगरे हे जानेवारी 1952 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. एक शिक्षकातील सज्जन व शिस्तप्रिय व्यक्तीमत्व भंडारदर्याच्या कुशीतून थेट मुंबईत गेले. तेव्हा वाहने, फारशा बसेस व मोबाईल यांच्यासह विज्ञानाची देखील इतकी प्रगती झालेली नव्हती. तरी देखील मिळेल त्या साधनाने गोपाळ भांगरे हे अकोले तालुक्याचे नाना प्रश्न विधानसभेत मांडत होते. दळणवळणाच्या सेवा सुविधा अगदी अत्याल्प असल्यामुळे तालुक्याचा विकास करताना त्यांना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, माझा तालुका सुज्ञ झाला पाहिजे, येथे प्रत्येकाला शिक्षण, आरोग्य व किमान मुलभुत गरजा तरी मिळाल्या पाहिजेत यासाठी भांगरे यांनी अगदी नेटाने प्रयत्न केला. खरंतर, तेव्हा इतिहास लिहीण्यासाठी प्रगल्भ ठरेल अशी लोकशीही असली तरी, फारसे लोक शिकलेले नव्हते, माध्यमांची प्रगती नव्हती त्यामुळे गोपाळ भांगरे यांचा फारसा इतिहास लिहीला गेला नाही. मात्र, त्यांची समाजाप्रती तळमळ ही इतिहासात अधोरेखीत केल्याचे पुरावे अनेक ठिकाणी मिळून येतात.
भांगरे यांनी लोकशाहीच्या अधिकारांवर 1952 ते 1957 चा कार्यकाळ अगदी यशस्वीपणे पुर्ण केला. त्यानंतर 1957 साली पुन्हा विधानसभा लागल्यानंतर त्यांना जनतेचा मोठा कौल मिळत होता. मात्र, दुर्दैवाने भांगरे कुटुंबावर फार मोठे संकट ओढवले आणि गोपाळराव भांगरे हे अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे विधानसभेचा प्रचार करीत असताना त्यांना भर सभेत स्टेजवर भुरळ आली आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर त्यांचे विरोधक देखील धाय मोकलुन रडत होते. मात्र, तेव्हा देखील निवडणुका झाल्या होत्या. याचे कारण असे की, सन 1957-58 मध्ये राज्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे वारे वाहु लागले होते. तेव्हापासून राज्यात कम्युनिस्टांची चलती सुरू झाली होती. यांच्याकडून जो कोणी उमेदवार उभा केला जात होता. त्याला संयुक्त महाराष्ट्र समिती असे संबोधुन एक प्रकारे चळवळीला बळकटी दिली जात होती. तेव्हा, या समितीकडून नारायण नवाळी या अभ्यासू व्यक्तीमत्वास संधी मिळाली होती. त्यांनी देखील स्वत:ला सार्थ ठरवून अनेकांचा पराभव करुन विजय मिळविला. त्यांच्याच कार्यकाळात 1 मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली होती.
नारायण नवाळी यांच्या कार्यकाळात त्यांच्या कार्याचा फारसा ठसा तालुक्यात उमटला नाही. त्यामुळे, जनता त्यांच्यावर नाराज राहिली. अशा परिस्थितीत एक पर्याय म्हणून पक्षाने एका सुशिक्षित उमद्या तरुणाचा शोध सुरू केला. मात्र, यापुर्वी गोपाळ भांगरे यांच्या घरातून यशवंतराव भांगरे यांचे नाव पुढे आले आणि सुरू झाली पुन्हा भांगरे घराण्याची राजकीय कार्यकीर्द.! अगदी पाच फुट उंची, डोक्यात टोपी, अंगावर कुर्ता वरुन कोट, पायात बुट आणि पायजमा. अगदी 27 वर्षाचा तरुण निवडणुकीत उतरला आणि बोलबोल करता त्यांनी तालुक्यातील लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यास सुरूवात केली. जो भेटेल त्याला रामराम, जो दिसेल त्याच्याशी चर्चा, जो साद घालेल त्याला प्रतिसाद आणि जो सानिध्यात येईल तो कायचा त्यांचाच. अशा प्रकारची त्यांची ओळख होती. निवडणुका रंगल्या तेव्हा कोणत्याही प्रकारचे साधन नव्हते, तरी देखील वाड्या वस्तीवर जाऊन हात जोडणारा हा तरुण धेय्याने पछाडला आणि चक्क सन 1962 साली म्हणजे अवघ्या 27 व्या वर्षी यशवंतराव भांगरे हे विधानसभेत जाऊन पोहचले. त्याकाळी सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून त्यांची इतिहासाने नोंद घेतली होती.
जनतेने भांगरे कुटुंबाला दुसर्यांदा संधी दिल्याचे ऋण व्यक्त करीत यशवंतराव भांगरे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यात विकासाच्या प्रश्नांना हात घातला. भांगरे यांनी तालुक्यात रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावताना वाड्या वस्तींपर्यंत जी काही पाऊलवाटी होती त्याचे रुपांतर मोठ्या रस्त्यात केले. भलेही तो कच्चा असतो पण प्रत्येकाला कसरत करावी लागत होती, त्यामुळे, अगदी डोंगराच्या दरी खोरीत देखील रस्ता नेण्यासाठी भांगरे यांनी महत्वाची भूमिका घेतली. सन 1965 साली आदिवासी समाजासाठी आदिवासी उन्नती सेवा मंडळाची स्थापना करुन एक मोठे योगदान समाजासाठी देऊ केले होते. तसेच डांगी गोसेवा मंडळाची देखील त्यांनी स्थापना करुन येथील जनतेला प्रेरणा मिळावी म्हणून मोठे प्रदर्शन देखील सुरू करण्याचा बहुमान भांगरे यांनी घेतला होता. विशेष म्हणजे, समाजासाठी जे काही करता येईल ते अगदी नि:स्वार्थपणे करण्याची वृत्ती त्यांच्या अंगी होती. त्यामुळे, त्यांना माननारा वर्ग देखील फार मोठा निर्माण झाला होता.
त्यानंतर सन 1967 रोजी राज्यात पुन्हा विधानसभा लागल्या आणि थेट लढत झाली होती ती, बी. के देशमुख आणि यशवंतराव भांगरे यांनी. खरंतर त्याकाळी कम्युनिस्टांची देशात एक लाटच होती. ती नगर जिल्ह्यात देखील काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. कारण, कामगार चळवळी, शेती, पाणी, रोजगार, वीज आणि बर्याच प्रश्नांवर राज्यभर कम्युनिस्टांनी एक स्वत:च्या विचारांच्या आणि कर्तुत्वाचा एक ठसा उमटविला होेता. त्यामुळे, त्याचाच फटका यशवंतराव भांगरे यांना बसला आणि त्यांनी 1067 साली पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी बी.के देशमुख हे निवडून आले होते. अर्थात त्यांच्या कर्तुत्वाचे ठवा उमटल्याचे कोठे पुरावे नाहीत किंवा काम देखील नाही. मात्र, त्यांचे काम असले तरी त्याची माहिती कोठे उपलबद्ध नाही. तरी इतिहासात त्यांच्या आमदारकीचे ठसे उमटतात. मात्र, त्यांच्या पाच वर्षात समाधानकाराक काम झाले नसल्याने अवघ्या 5 वर्षानंतर पुन्हा निवडणुका लागल्या आणि भर दुष्काळात म्हणजे 1972 साली विधानसभा लागल्या. तेव्हा मात्र, गेली वर्षानुवर्षे वाडी-वस्ती पायाखाली घालणार्या यशवंतराव भांगरे यांना पुन्हा न्याय मिळाला आणि ते 72 साली पुन्हा आमदार झाले. तेव्हापासून खर्या अर्थाना भांगरे यांनी तालुक्यासाठी विकासाच्या दृष्टीने काम केले.
खरंतर जेव्हा भांगरे हे 1962 मध्ये विधानसभेत निवडणून गेले तेव्हा त्यांची यशवंतराव चव्हाण यांनी पाठ थोपटली होती. ते म्हणाले होते. शब्बास रं पठ्ठ्या, नगर जिल्हा हा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असून देखील तू तेथून निवडून आलास. चल माग तुला काय मागायचे ते. त्यावेळी यशवंतराव यांनी चव्हाण यांना विनंती केली की, काही नका साहेब. मला फक्त तुमच्यासोबत एक फोटो काढूद्या. याच त्या फोटाची आठवण भांगरे यांनी अगदी अखेरच्या श्वासापर्यंत जपून ठेवली होती. त्यांचा प्रामाणिकपणा पाहून चव्हाण यांनी भांगरे यांना मंत्रीपद देऊ केल्याचे बोलले जाते. मात्र, भांगरे हे फार साधेभोळे व्यक्तीमत्व होते. ते म्हणाले, मला मंत्रीपद झेपणार नाही. माझ्यापेक्षा एखाद्या अशा व्यक्तीला द्या.! जो माझ्या तालुक्याचा विकास करु शकेल. इतके हे सरळ आणि साधे व्यक्तीमत्व होते. मात्र, आज दुर्दैव आहे की, आपल्याला यशवंतराव भांगरे यांच्याबाबा फारसे काही ज्ञान नाही.
पुढे 1972 साली भर दुष्काळात यशवंतराव भांगरे यांनी अकोले तालुक्यासाठी एक मोठी मागणी केली होती. ते यशवंतराव चव्हाण यांना म्हणाले की, साहेब आता काही करा.! पण माझ्या तालुक्याला कालेज द्या.! त्यानंतर अनेकांच्या कष्टातून हेच आजचे अगस्ति कॉलेज उभे आहे. त्या पलिकडे भांगरे यांनीच अगस्ति दुधसंघाची उभारणी केली आहे. ते पहिले संस्थापक चेअरमन म्हणून कार्यरात होते. तर अगस्ति कारखाना, अकोल्याचा मोठा पुला यांच्यासह अनेक कामांमध्ये त्यांनी स्वत: लक्ष घालुन आजच्या मोठ्या संस्था दिसत आहे. 1972 ते 1977 सालापर्यंत भांगरे यांनी तालुक्याला फार मोठे योगदान दिले आहे. पुढे 1978 साली पुन्हा निवडणुका लागल्या आणि तेव्हा खर्या अर्थाने माजी मंत्री मधुकर पिचड यांची राज्याच्या राजकारणत इन्ट्री झाली.
खरंतर 1977 साली मधुकर पिचड साहेब यांचा भांगरे यांनी दारुन पराभव केला. मात्र, त्यावेळी 7 मार्च 1978 साली मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्यात सरकार स्थापन झाले आणि फुटलेल्या काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले. त्यात इंदीरा काँग्रेस व रेड्डी काँग्रेस यांनी सत्ता स्थापन केली. मात्र, यांच्यात एकमेकांचे काही पटले नाही. म्हणून तर 18 जुलै 1978 रोजी उद्योागमंत्री शरद पवार यांनी 40 आमदार फोडून नव्याने पुलोद (पुरोगामी लोकशाही दल) सरकार स्थापन केले. असे बोलले जाते की, त्यावेळी, यशवंतराव भांगरे हे यशवंतराव चव्हाण, जनार्दन रेड्डी व अरस यांच्या सोबतीला होते. मात्र, तरी देखील चव्हाण यांचा पवार साहेबांना पाठींबा असल्याचे बोलले जात होते. म्हणून तर पुलोद सरकारमध्ये यशवंतराव भांगरे यांना मंत्रीपद मिळणार होते. मात्र, अचानक ढाकणे यांना मंत्रीपद मिळून गेले. हे सरकार फक्त अडिच वर्षे चालले त्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या आणि सन 1980 साली मधुकर पिचड, सक्रु बुधा मेंगाळ व यशवंतराव भांगरे यांच्यात निवडणुका झाल्या. तेव्हा इंदिरा गांधी यांचा हात पिचड यांच्या डोक्यावर पडला आणि त्यांनी या निवडणुकीत बाजी मारली. भांगरे कुटुंबाच्या आमदारकीला त्या दिवसापासून खंड पडला आहे. तो आजवर.!
पुढे 1 जानेवारी 1982 साल, त्या दिवशी सह्याद्रीचा पुत्र तिच्या कुशित शांत निजला होता. आता आम्हा, तुम्हा शिवाय कोण रं..!! असे हजारो प्रश्न भावनेच्या आकांताने आसमंतात गर्जत होते. हजारो जनांचा निवारा आणि अन्नदाता त्या दिवशी नि:शब्द निश्तेज पहुडला होता. शेतकर्यांच्या प्रश्नावर ‘रक्ताचे पाट’ वाहू अशी गर्जना करणार्या ‘सिंहाचे आयाळ’ थंड पडले होते. दादा गेले ही बातमी कळसुबाईच्या शिखराहून अगदी वार्यासारखी पसरली. एखाद्या वारूळातून मुंग्यांची रिघ लागावी अशी मानसे भंडारदार्याला वळसा घालुन शेंडीत उतरली. कोणी पदर तोडात धरुन खदखदत होते तर कोणी कळसुबाईच्या उंचीला साद घालुन ‘यशवंतास’ आळवित होते. डोळ्याची पाते लवते ना लवते तोच अथांग जनसागर शेंडीत उतरला. या जनसैलाबाने शेंडी अगदी गदगदुन गेली. कधी नव्हे तेव्हा समुद्राप्रमाणे भंडारदर्याच्या पाण्याला देखील उधान आले होते. भयान दु:खाच्या वातावरणातून आता फक्त आणि फक्त एकच आवाज ‘कृष्णावंती’च्या नदिपात्रात गुंजत होता. आरं.बाबा..! आम्हाली राज्जो (राजा) गेला रं.!! त्या आवाजानं तिथल्या प्रत्येक मानसाचे अंत:करण हेलावून जात होते. कारण, खरोखर त्यांचा राजा अनंतात विलीन झाला होता.
- सागर शिंदे (संपादक)