अकोल्यात पुन्हा कोरोनाच्या लाटेला सुरूवात.! कर्मचार्‍यांना लसीवर विश्वास नाही की गांभिर्य नाही.!

  

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- अकोले तालुक्यात कोविडचे रुग्ण कमी झाले असे समजून लोक बेधडक वागू लागले आहेत. मात्र, तालुक्यातील जनतेला एक धक्का देणारी ही बातमी आहे. कारण, गेल्या आठ दिवसांपुर्वी तालुक्यात एकही रुग्ण तालुक्यात नसताना आता ही आकडेवरी वाढताना दिसत आहे. त्यामुळे, कोविडचे संकट गेले-गेले म्हणून ते पुन्हा तालुक्यात पसरताना दिसत आहे. यात आणखी एक दुर्दैव असे की, अकोले तालुक्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 700 वॅक्सिन आलेल्या आहेत. मात्र, त्यापैकी फक्त आणि फक्त 350 कर्मचार्‍यांनी त्या घेतल्या आहेत. कोणी साईड इफेक्टला घाबरत आहे तर कोणी नाना कारणांनी त्यास नकार देत आहे. त्यामुळे, प्रशासनच जर त्याकडे संशयित नजरेने पहात असेल तर आम जनतेने त्याकडे कसे पहायचे? असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करू लागले आहेत. त्यामुळे, आता अकोले तालुक्यात जे काही मोठमोठे कार्यक्रम होत आहे, जो काही गर्दी गोंधळाचा प्रकार होत आहे. त्यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया अनेक समाजसेवकांनी दिल्या आहेत.

दरम्यान आजवर अकोले तालुक्यात 77 हजार 621 संशयितांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 3 हजार 177 नागरिक कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. यावेळी कोरोनाशी लढताना 40 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आता रोज 4 ते 6 रूग्ण मिळून येऊ लागले आहेत. आज तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेला खरोखर मानले पाहिजे की, येथे मृत्युरेट (1.28 टक्के) कमी असून रिकवरी रेट (98.82 टक्के) फार आहे. त्यामुळे, 3 हजार 135 रुग्ण अगदी सुखरुप होऊन घरी परतले आहेत. यामागे कोरोना काळात काम करणार्‍या पोलीस, महसुल व आरोग्य विभागासह सामाजिक संस्था आणि व्यक्तींचा फार मोठा वाटा आहे.

आता लग्नसमारंभाचे दिवस सुरू आहेत. त्या हर्षापोटी लोक कोरोनाला विसरुन गेले असून अमाप गर्दी मंगलकार्यालये आणि मंडपांमध्ये दिसू लागली आहे. त्यामुळे, तालुक्यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली तरी त्याचा प्रसार छुप्या पद्धतीने होताना दिसतो आहे. याचे कारण असे की, जर कोणाला हा संसर्ग जडला तरी तो व्यक्ती त्याला अंगावर काढतो. परिमाणी त्याचे स्कोर थेट 15 ते 20 किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचे लक्षात येते. त्यामुळे, हा सर्व प्रकार हाताने आपण ओढावून घेत असल्याचे दिसत आहे. आता यातील आणखी धक्कादायक प्रकार असा की, आजच सरकारने कोविडचे रुग्ण घेणे बंद केले असून कोविड सेंटरला टाळे ठोकले आहेत. तर दुसरीकडे खाजगी रुग्णालयांमध्ये देखील आता रुग्ण स्विकारणे बंद होऊ लागले आहे. कारण, जेथे कोविड वार्ड आहे. तेथे अन्य रुग्ण जाण्यास धजत नाहीत. त्यामुळे, डॉक्टरांचा तोटा होऊ लागला आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात कोरोनावर उपचार करणारे डॉक्टर देखील मिळणे अशक्य होणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी आपले रिकामे चोचले बंद करुन स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.

गेल्या आठ दिवसात येथे एकही रुग्ण मिळून आलेला नव्हता. आता मात्र, येथे दोन दिवसात येथे पाच रुग्ण मिळून आले आहेत. त्यात कुंभेफळ येथे 82 वर्षाचा वृद्ध तर पिंपळगाव निपाणी येथे 58 वर्षाचा व्यक्ती, सावरचोळ येथे 48 वर्षीय पुरुष तर मान्हेरे येथे 50 वर्षाय पुरूष आणि ढोकरी येथे 39 वर्षीय पुरूष अशा पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. म्हणजे काल तालुका कोरोनामुक्त होता तर आज पुन्हा तो बाधित होऊन धोक्याची घंटा वाजली आहे. या पलिकडे संगमनेर तालुक्यात 12 ते 15 अशी सरासरी आकडेवारी सुरच आहे. तेथून अकोल्यात काही व्यक्तींना बाधा झाल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे, सरकारने कोरोनाचे निर्बंध उठविले असले तरी कोरोनाने त्याचे काम सोडलेले नाही. त्यामुळे, संकट गेले असे म्हणून जर कोणी बेजबाबदारपणे वागत असेल तर त्यांना प्रशासनाने समजून सांगणे गरजेचे आहे.

गांभिर्य संपले, तिव्रता कायम.!

काल राज्यात एकाच दिवशी 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा तर केवळ मीडियाचा आकडा आहे. मात्र, वास्तव वेगळी आकडेवाडी आहे. खरंतर राज्याच्या माध्यमांनी कोरोनाचे वृत्तांकन थांबविले तरी कोरोना थांबलेेला नाही. त्यामुळे, लोकांमधून त्याचे गांभिर्य संपले तरी तिव्रता संपलेली नाही. यातील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोना कमी झाला नाही तर त्याच्या तपासण्या थांबलेल्या आहेत. लोक भितीपोटी तपासण्या करीत नाही तर प्रशासन त्यास आता गांभिर्याने घेत नाही. मात्र, कोरोना आजही टिकून आहे. त्यामुळे, प्रत्येक व्यक्तीने वैयक्तीक काळजी घेणे अपेक्षित आहे.

- महेश नवले (शिवसेना नेते)

----------------------------

धोका टळलेला नाही.!

कोरोनाचे संकट अजून गेलेले नाही. जोवर प्रत्येक व्यक्तीपर्यंत वॅक्सिन जात नाही. तोवर संकट गेले असे म्हणता येणार नाही. शासनाकडून जरी काही नियम व अटी शिथिल केल्या असल्या तरी नागरिकांनी स्वत:हुन काही नियम पाळले पाहिजे ते शासनासाठी नव्हे तर स्वत:च्या जीवासाठी आणि आपल्या कुटूंबासाठी. खरंतर अकोले तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. त्यांनी कोरोनाच्या काळात प्रशासनाला फार सहकार्य केले आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात देखील त्यांच्याकडून सदसद विवेक बुद्धीने सहकार्य होईल. अशी माझी खात्री आहे.

- मुकेश कांबळे (तहसिलदार, अकोले)