राजुरच्या बारीत अघोरी विद्या.! त्या घुमत होत्या.! म्हणे सुख पाहिजे तर आमच्या देवाची प्रे करा.! अंधश्रद्धेचा गुन्हा नोंदवा, अन्यथा.!

सार्वभौम (अकोले) :- 

                    अकोले तालुक्यातील बारी परिसरात एका घनदाट जंगलात अंधश्रद्धेचा एक अनोखा प्रकार पहायला मिळाला. शंभर ते दिडशे लोकांच्या घोळक्यात काही महिला घुमत होत्या आणि तुमच्या भोवती लागलेली ईडा-पिडा टळण्यासाठी आमच्या देवाची भक्ती करा असे म्हणून अघोरी विद्या करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार काही सामाजसेवकांनी पाहिला असता त्यांनी या घुमा-घुमीला विरोध केला. मात्र, त्यांचे कोणी काही एक न एकता हा प्रकार सुरूच राहिला. त्यामुळे, अशा प्रकारांतून आदिवासी लोकांची फसवणुक होत असून त्यांना आरोग्य शिक्षण व भौतिक सुविधा पुरविण्यापेक्षा बुवाबाजीला बळी पाडले जात आहे. त्यामुळे, अशा व्यक्तींवर तत्काळ अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली आहे.

खरंतर दुर्दैव असे की, ज्या मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतात, जेथे संपुर्ण देश एकवटला आहे. जेथे विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतराळात जाऊन पोहचले आहेत. त्या मुंबईच्या अगदी शंभर किलोमिटर अंतरावर आदिवासी बांधव मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. ही खरी देशाची उन्नतीमधील शोकांतीका आहे. जेथे आरोग्य व शिक्षणाचे धडे द्यायचे तेथे मोठमोठ्या सिटींमधील लोक येतात आणि त्या आदिवासी बांधवांना चंद लालसा दाखवुन धर्मांतराची भुरळ घालतात. इतकेच काय! हेच समाजद्रोही लोक येथे येऊन आता आदिवासी बांधवांना अंधश्रद्धेचे बळी ठरवत आहेत. त्यामुळे, यांचा शोध घेऊन या व्यक्तींवर कडक कलमांन्वये गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे.

खरंतर या व्यवस्थेचे दुर्दैव म्हणावे लागेल की, येथे येणारे अनेक अधिकारी, शिक्षक, कर्मचारी हे नावापुरते कामावर असतात. मात्र, यांच्याकडून ना कधी प्रॉपर कामे झाली ना प्रामाणिकपणाची नोकरी. त्यामुळे, हा मुळ भारताचा खरा नागरिक जंगलात अज्ञान राहिला. येथे येणारे गुरूजी त्यांच्या जागी डमी शिक्षक म्हणून नोकरीवर ठेवतात आणि हे बहाद्दर घरी चकाट्या मारतात. हे प्रकार यापुर्वी उघड झाले आहे. तर याच वारंघुशी परिसरात गेल्या तीन महिन्यांपुर्वी एक नर्स महिला आदिवासी महिलेचे बाळांतपण करायचे तर संडासात जाऊन बसली होती. इतकेच काय! येथे औषधाला लवकर डॉक्टर मिळत नाही. अशी परिस्थिती या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माझ्या बांधवांची आहे. यावर कोणी आवाज उठवायला तयार नाहीत. मात्र, त्यांना अंधश्रद्धेची भुरळ कशी घालता येईल यासाठी ते हिरारीने काम करताना दिसून येत आहेत.

तसेतर आता बहुतांशी गावांतून तरुणांनी शिक्षणाचे धडा गिरविले आहेत. त्यामुळे, अन्यायाविषयी बंड पुकारण्याची वृत्ती त्यांच्यात निर्माण झाली आहे. मात्र, अकोले तालुक्यातील राजूर परिसरात आजही अशा काही वाड्या वस्त्या आहेत. तेथे मुलभूत सुविधा देखील पोहचलेल्या नाहीत. तेथे मात्र, हे नतद्रष्ट लोक नेमके पोहचतात. किराणा माल, अन्नधान्य, पैसे, कपडे असे नाना अमिष दाखवून या बांधवांचे धर्मांतर करु पहायचे तर आमच्या देवाला पुजा, त्याला दक्षिणा ठेवा, हे आणा ते आणा म्हणून त्यांची लुट करायची. हा प्रकार कोठेतरी थांबला पाहिजे.

ज्यांना आदिवासी समाजाविषयी आत्मियता आहे त्यांनी खुशाल खडू फळा घेऊन वाड्या पाड्यावर जावे. गरिब मुलांना शिक्षण द्यावे, त्यांचा समद्यांवर हल काढावे, त्यांना सामाज्याच्या मुळ प्रवाहात आणण्याचे काम करावे, त्यांना संविधान आणि हक्काची जाणीव करुण द्यावी, शिक्षण व कर्तव्याची माहिती द्यावी. याला सामाजसेवा म्हणता येईल. मात्र, कोणीतरी उठतो आणि आदिवासी भागात जातो. घरा दारात दिवे आगरबत्त्या पुजतो आणि निबू नारळ फोडतो. याला काही सामाजसेवा म्हणता येत नाही. उलट हा त्यांच्या उन्नतीचा मार्ग नसून तो अधोगतीचा मार्ग आहे. त्यामुळे, या सामजविघातक लोकांना जर या समाजाचे चांगले करता आले नाही तर त्यांनी या भोळ्या भाबड्या लोकांना अंधश्रद्धेच्या खाईत तरी लोटू नये. ही अपेक्षा त्यांच्याकडून प्रत्येकजण करतो आहे.