पर्यटनासाठी आलेल्या ट्रेकरचा पीडब्लुडीने बळी घेतला. गाडी धरणात बुडून एकाचा मृत्यु, दोघे वाचले, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा व्हायलाच पाहिजे.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यातील कोतुळ पुलावर जलसंधारण व पीडब्लुडीच्या भोंगळ कारभारामुळे एका पर्यटकाला आपला जीव गमवावा लागला आहे. जीपीएसची चुकीची दिशा आणि प्रशासनाकडून दिशादर्शक तसेच सुचना फलक न लावल्यामुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्यामुळे, सतिश सुरेश घुले (वय 35, रा, पाचवड, ता. पैठण, जि. औरंगाबाद) या वाहन चालकास जलसमाधी घ्यावी लागली असून गुरूदत्त राज शेखर (रा. पिंपरी चिंचवड, जि. पुणे) व समिर अरुरकर (रा. पुणे, मुळ कोल्हापूर) असे दोघे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडली असून घटना घडल्यानंतर पीडब्लुडीचे अथवा जलसंधारणचे अधिकारी साधे डोकून देखील पहायला आले नाही. त्यामुळे, एसीत बसलेल्या या गेंड्याच्या कारतड्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार दि. 9 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी पुणे येथून गुरूदत्त शेखर, समिर अरुरकर व सतिष घुले हे तिघे कंपनीची गाडी घेऊन कळसुबाई येथे ट्रेकींग करण्यासाठी निघाले होते. सगळ्याच गोष्टी विज्ञानाच्या आधारे चालतात असा समज करुन त्यांनी जीपीएस यंत्रणा सुरू केली आणि कळसुबाईच्या शिखराकडे निघाले. मात्र, दुर्दैवाने तो जुना रस्ता त्यावर सेव्ह असल्यामुळे तो खालच्या पुलाहून देखविण्यात आला होता. रात्रीची वेळ असल्यामुळे गाडी फार काही नाही तर अवघ्या 45 ते 50 च्या वेगाने होती. त्यामुळे, जर काही अपघात व्हायचा असता किंवा शंका आली असती तर गाडीचा वेग अटोक्यात येईल इतका निच्छित होता. हे जीपीएस वरुन सिद्ध होते.
दरम्यान, यांची गाडी जुण्या पुलाहून आल्यानंतर तेथे जो कच्चा रस्ता आहे. तेथून गाडी थेट आत गेली. विशेष म्हणजे ही गाडी अनावधानाने नव्हे तर त्यांना जीपीएस प्रणालीने तो रस्ता दाखविला. त्यामुळे, नि:शंक त्यांनी गाडी त्याच रोडने आत नेली. ती थोडी थिडकी नव्हे.! तर चक्क 30 ते 40 मिटर गाडी आत नेली. वाहन चालक यांना वाटले होते की, नुकताच पाऊस झाला आहे. त्यामुळे, या रस्त्यावर पाणी साचले असेल, आपण सहज निघुन जाऊ. मात्र, पुढे गेल्यानंतर गाडी पुर्णत: तरंगली आणि या तिघांची तारंबळ उडली.
आता मुळ मुद्दा येथे उपस्थित होतो की, जो कच्चा रस्ता आहे. तेथे कोण्याही प्रकारचा सुचना फलक लावण्यात आलेला नाही. ना पीडब्लुडी विभागाने ना जलसंधारण खात्याने. त्यामुळे, हे नेमके काय कामे करतात आणि केवळ जीव घेण्याचाच पगार घेतात का? असा प्रश्न प्रत्येकजण उपस्थित करू लागला आहे. कारण, अकोले तालुक्यातील 1 हजार 505.08किमी क्षेत्रफळापैकी फक्त एक किलोमीटर रस्ता चांगला दाखवा. खरच या पठ्ठ्यांची पाठ थोपटावी लागले. मात्र, अकोले संगमनेर रोडचे वाटोळे झाले तरी यांना जाग येईनाशी झाली आहे. तर गावागावांतील सामान्य रस्त्यांचे काय हाल आहे हे पाहण्यासाठी यांच्या गावोगावी मिरवणुका काढल्या पाहिजेत. आज जर त्या अपघातस्थळी साधे एक दिशादर्शक फलक असते किंवा एखादी सुचना लिहीली असती अन्यथा कच्च्या रोडवर मातीचा ढिगारा केलेला असता तर आज एक जीव गेला नसता. पण, लोकांच्या जीवाची यांना काय काळजी? मलिदे जमा करण्यात यांचा वेळ खर्ची होत आहे. त्यामुळे यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. त्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढे येणे गरजेचे आहे.
खरंतर, थोडीफार कल्पना केली तरी अंगावर काटा उभा राहतो. जेव्हा ही गाडी पाण्यात गेली तेव्हा पुढे दोघे बसलेले होते ते मागे एकजण. गाडी पाण्यात गेली आणि बघता बघता तिघांना मृत्यु दिसायला लागला. अशा वेळी तिघांनी गाडीच्या काचा खाली केल्या खर्या. मात्र, वाहन चालक घुले यांना पोहता येत नव्हते. ते जिवाच्या आकांताने त्या रात्रीच्या काळोख्या अंधारात ओरडत होते. साहेब.! मला पोहता येत नाही. मला वाचवा, मी मरून जाईल, मी बुडून जाईल. मात्र, तो आवाज एकण्यासाठी रात्र देखील निद्रीस्त झाली होती. यावेळी दोघांनी गाडीच्या काचा खोलुन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी देखील झाला. मात्र, त्यांनी आपल्या सहकार्याची दशा पाहवेनाशी झाली आणि दोघेही पाण्यात बुडणार्या गाडीला जोराचा धक्का देऊ लागले. मात्र, ते प्रयत्न तोडके पडले आणि गाडीने देखील जलसमाधी घ्यायला सुरूवात केली.
दरम्यान, जेव्हा हे दोघे गाडीला लोटून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होतेे. तेव्हा वाहन चालक गाडीचा दरवाजा खोलुन बाहेर आला होता. त्याने स्टोअर पायरीवर उभे राहून मोठमोठ्याने आरडाओरड केली. मात्र, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना.! कोणाचे कसले काय? हा मृत्युचा सापळा रचण्याचे सर्व श्रेय जलसंधारण व पीडब्लुडीच्या अधिकार्यांना जाते. त्यामुळे, त्यांच्यावर 304 (सदोष मनुष्यवध) प्रमाणे एक एफआयआर करून त्यांचा सत्कार केला पाहिजे. मात्र, त्यांना पाठीशी घालणारे देखील आपलेेच काही लोकप्रतिनिधी आहेत. दोन दिसव सहानुभूती दाखवायची आणि तिसर्या दिवशी अर्थपुर्ण तडजोडी करायच्या. इतकेच काय.! काही माध्यमे देखील त्यांचेच गुलामी करतात आणि मलिदे खाऊन सव्वालाखाची मुठ झाकून घेतात. त्यामुळे, यांच्यावर अंकुश कोणाचा राहिलाच नाही.
रात्री 1:45 वाजता ज्या तरुणाने या पिंपळगाव धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेतली आहे. त्याच्या किंकळणार्या वेदना कल्पनेच्या पलिकडे आहेत. जेव्हा तो बुुडणार्या गाडीच्या पायरीवर उभा होता. तेव्हा त्याला जीवंतपणी मृत्यु दिसत होता. जोवर गाडीच्या मशिनमध्ये पाणी गेले नव्हते तोवर त्याने जगण्यासाठी प्रचंड धडपड केली. मात्र, जेव्हा गाडीच्या पुढील इंजिनमध्ये पाणी गेले तेव्हा मात्र तो भागा खाली खाली होत गेला आणि श्वास गुद्मरून घुले यांनी आपला प्राण मुळा नदीला समर्पित केला. यावेळी जे दोघे बाहेर आले होते. त्यांनी जवळच असणार्या विटभट्टी चालकांना घडलेला प्रकार सांगितला तेव्हा त्यांनी देखील प्रयत्न केले. मात्र, ते निष्पफ ठरले.
या सगळ्या घडामोडीत एक गोष्ट फार कौतुकाची वाटते की, पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमणे हे घटना घडल्यानंतर अवघ्या सव्वा तासात घटनास्थळी दाखल झाले होते. संबंधित व्यक्तीला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होते. आणि दुर्दैव याचे वाटते की, घटना घडल्यानंतर अनेक तास उलटून गेले तरी जलसंधारण व पीडब्लुडीचा एकही अधिकारी तेथे दाखल झालेला नव्हता. इतकेच काय! जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी शिघ्र कृतीदल तेथे पाचारण केले. पोलीस उपाधिक्षक राहुल मदने, अकोले पोलीस निरीक्षक अभय परमार, घारगावचे पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, संगमनेर पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तेथे दाखल झाले. अर्थात यात पोलिसांचा यत्किंचितही रोल नाही. मात्र, जेथे कमी तेथे आम्ही ही भूमिका नेहमी ते बजावत असतात. त्यामुळे पोलीस खात्याते खरोखर कौतुक केले पाहिजे.
आता, पुन्हा मुळ मुद्दा असा की, संगमनेर तालुक्यात हिवरगाव पावसा येथे एक अपघात झाला होता. त्यात निळवंडे कॅनॉलच्या एका खड्ड्यात वाळुची गाडी जाऊन तिघे मयत झाले होते. त्यावेळी, संबंधित ठिकाणी दिशादर्शक फलक नाही, सुचना फलक नाही, शासकीय नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे, काँट्रॅक्टर, कंपनी, अधिकारी यांच्यासह अनेकांना आरोपी करण्यात आले होते. त्यामुळे, या गुन्ह्यात देखील जो कोणी दोषी असेल त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. जर कोणी फिर्यादी नसेल तर पोलीस खात्याने अशा वेळी फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला पाहिजे. तर मयताला खरा न्याय मिळेल. अन्यथा अकस्मात मृत्युची नोंद होऊन प्रकरण दाबले जात असेल तर तो एका पर्यटकावर अन्याय झाल्यासारखा आहे. त्यामुळे, यात गुन्हा दाखल केला नाही तर काही संघटना मोठे आंदोलन देखील उभे करणार आहेत अशा प्रतिक्रीया अनेकांनी रोखठोक सार्वभौमला दिल्या आहेत.
भाग 1 क्रमश:
- सागर शिंदे