आ. विखेंच्या बालेकिल्ल्यावर ना. थोरातांचा हल्ला.! 83 ग्रामपचायतीवर नामदार तर 9 आमदार.!

 

 - सुशांत पावसे

सार्वभौम (संगमनेर) :- 

                   संगमनेर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि राजकीय आखाड्यात कोण बाजी मारते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यामध्ये 4 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या तर 90 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले. त्यात थोरात गटा-गटांमध्ये निवडणूक पहायला मिळाली तर अगदी काही ठिकाणी शिवसेना-भाजपने आपली ताकद पणाला लावली होती.

      शुक्रवार दि. 15 जानेवारी रोजी मतदान झाले तर आज 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी झाली. यामध्ये 83 ग्रामपंचायतीवर ना. थोरतांनी निर्विवाद वर्चस्व राखले आहे. तर 10 ग्रामपंचायतींमध्ये विरोधकांना थांबवा लागले आहे. खळी ग्रामपंचायतीमध्ये थोरात विखे एकत्र येऊन सत्तेची तडजोड केल्याचे पाहायला मिळाले. पण या 94 ग्रामपंचायतीं पैकी 14 गावे ही शिर्डी विधानसभेला जोडली गेली आहे. येथे मागील पंचवार्षीकला 11 ग्रामपंचायती ह्या विखे गटाकडे होत्या तर 3 ग्रामपंचायती थोरात गटाकडे होत्या. मात्र, ह्या वर्षी पराभवाचा वचपा काढत थोरतांनी 6 ग्रामपंचायतींनवर मुसंडी मारली आहे. त्यामुळे विखे गटाला अश्वी गटामध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, थोरतांकडे असलेली कनोली मनोली येथे सत्तांतर होऊन विखे गटाकडे आली आहे. मालदाडमध्ये 35 वर्ष शिवसेना नेते साहेबराव नवले यांच्या हाती असलेली ग्रामपंचायत मात्र थोरतांनी बहुमतात मिळवली आहे. त्यामुळे साहेबराव नवले गटाचा येथे दारुण पराभव झाल्याचे पहायला मिळाले. मात्र, काही ठिकाणी अपक्ष उमेदवार आले आहे. ते कोणाकडून आपला कल दर्शवितात हे अद्याप कोणालाच ठाऊक नाही. त्यामुळे जोवर सरपंचपदाची सोडत होत नाही तोवर ही गावे कोणाच्या ताब्यात हे कोणी सांगू शकत नाही.

        याबाबत सविस्तर माहिती अशी की, 94 ग्रामपंचायतीमध्ये 888 जागा होत्या. त्यापैकी 4 ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या होत्या. या चारही ग्रामपंचायती  थोरतांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाल्याने  विरोधकांना येथे उमेदवार देखील मिळाले नाही. त्यामुळे, संगमनेरमध्ये निव्वळ बुळगा विरोध पाहायला मिळाला. खरंतर तालुक्यातील पठारभागावर  26 गावं ही अकोले विधानसभा मतदारसंघात जोडली गेली आहे. या 26 गावांपैकी 18 गावांची ग्रामपंचायत निवडणूक होती. येथे थोरात विरुद्ध पिचड अशी एकास एक तुल्यबळ उमेदवार देऊन निवडणूक होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पिचडांनी येथे डोकून देखील पाहिले नाही. उलट डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्तीगत लक्ष घालून काही उमेदवार निवडून आणले आहे. त्यामुळे, पिचडांची पठारभागावरून पीछेहाट झाल्याचे पाहायला मिळाले. ग्रामपंचायत ही विधासभेचा पाया असतो. पण हा पायाच कच्चा असेल तर विधानसभेचा कळस कसा बांधणार असे प्रश्न आता पिचडांवर उपस्थित होत आहे. मात्र, वरवंडी,डिग्रस येथे सत्तांतर होऊन विखे पुरस्कृत भाजपची सत्ता आली आहे. तर कौठे धंदारफळ येथे नेताजी घुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने संगमनेर विधानसभा मतदार संघामध्ये खाते उघडले आहे. या व्यतिरिक्त मंगळापुरमध्ये भाजप-शिवसेना मिळुन पाच तर थोरात गटाचे चार ह्या बोटावर मोजण्याइतक्या ग्रामपंचायती वगळल्या तर विरोधकांना येथे साधा पॅनल देखील उभा करता आलेला नाही. त्यामुळे कोणी किती ही लावा "शक्ती", कोणी कितीही लावा "युक्ती" कोणी कितीही करावा हल्ला लय मजबुत "थोरतांचा" किल्ला असेच काहीसे चित्र संगमनेर मध्ये पाहायला मिळत आहे.