महिलाचा खुन करुन लुटले तर बालिकेचा कान तोडून बाळ्या बोचकल्या.! संगमनेरात भर दिवसा दरोडा.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथे महिलास ठार मारुन एका अल्पवयीन मुलीचे कान तोडून सोन्याच्या बाळ्या दरोडेखोरांनी बोचकडून नेल्या. ही घटना मंगळवार दि. 19 रोजी दुपारी भर दिवसा 2 वाजण्याच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी काळे कपडे घालुन घर लुटण्याचा प्रयत्न केला असता आजीने आरडाओरड केली असता त्यांनी तिचा गळा दाबला, ही घटना घडल्यानंतर संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सनी भगवान गायकवाड (रा. अंभोरे, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावित्राबाई मोगल शेळके (वय 65, रा. कौठे कमळेश्वर, ता. संगमनेर) असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सावित्राबाई शेळके ही महिला त्यांच्या घरी एक छोटसं गोळ्या बिस्कीटांचे दुकान चालवून आपली गुजरान करत होती. मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे त्या दुकानावर बसल्या होत्या. त्यावेळी 2 वाजण्याच्या दरम्यान अचानक काही तरुण काळे कपडे परिधान करुन त्यांच्या समोर आले. त्यांनी शेळके यांच्याकडे काही चौकशी करुन बोलण्याचा प्रयत्न केला. ते घरावर दरोडा टाकण्याच्या हातुनेच आले असल्यामुळे त्यांनी थेट घरात प्रवेश केला. अनोळखी पुरुष आणि धिटाईने घरात प्रवेश करतात हे लक्षात आल्यानंतर शेळके आजी यांनी त्यांनी घरात जाण्यापासून मज्जाव केला.
दरम्यान, या दरोडेखोरांनी आजीबाई यांना बाजुला लोटून घरातील साहित्यांची उचकापाचक सुरू केली. त्यावेळी आजी त्यांना मोठ्या धाडसाने व धैर्याने सामोरे गेली. या दरोडेखोरांना पळवून लावण्यासाठी आजीने मोठमोठ्याने आरडाओरड सुरू केली. हा आवाज इतरत्र जाऊ नये यासाठी दरोडेखोरांनी तिचा गळा दाबुन आवाज बंद केला. पुढे काही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या निर्दयी दरोडेखोरांनी आजीचा श्वास बंद करुन टाकला. त्यामुळे, त्या जमिनीवर कोसळल्या. त्यानंतर या दगडाच्या काळजाच्या चोरट्यांनी आजीच्या गळ्यात असणारे अडिच तोडे सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर छोट्याशा दुकानात जे काही पैसे होते ते देखील ते घेऊन गेले.
दरम्यान, जेव्हा घरातील साहित्यांची उचकापाचक करुन हजारो रुपयांचा ऐवज लुटल्यानंतर हे दरोडेखोर घराबाहेर आले असता त्यांच्या दृष्टीस एक बालिका पडली. दुकानात गोळ्या बिस्किटांच्या आशेने आलेल्या बालिकेवर यांची नजर पडताच त्यांनी तिच्या कानातील बाळ्या पाहिल्या आणि तिच्या जवळ जात अक्षरश: कोणत्याही प्रकारची मानुसकी न दाखविता त्यांनी कानातील बाळ्या ओरबडून घेतल्या. यात ईश्वरी भडांगे ही बालिका रक्ताळलेल्या अवस्थेत आपल्या घराकडे गेली. मुलीच्या कानातून वाहनारे रक्त पाहून घरच्यांनी थेट आजीचे दुकान गाठले. त्यानंतर घरात आजी मृत अवस्थेत पडल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी आजुबाजुच्या सर्व लोकांनी या घटनेची माहिती दिली.
दरम्यान, हा प्रकार काही लोकांनी पोलिसांना समजला असता पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घडलेला प्रकार वरिष्टांना कळविला असता त्यांनी देखील संगमनेर जवळ केले. भर दुपारी घडलेल्या प्रकारामुळे, खुद्द पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधिक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख अशा सर्व अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानाने देखील दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. त्यानंतर पोलिसांनी या दरोडेखोरांना बेड्या ठोकण्यासाठी काही पथके रवाना केले आहेत. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक पाडुरंग पवार करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर व तालुक्यात अनेक चोरीचे गुन्हे घडत आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी आश्वी तर त्यांच्यानंतर शहर पोलिसांनी काही दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. मात्र, कोठे चोरीचा प्रयत्न तर कोठे घरफोड्या, कोठे चेन स्नेचिंग तर कोठे दरोडे असे प्रकार आता संगमनेरात राजरोस घडू लागले आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हाद्दीत देखील किरकोळ चोर्या, शेतमालांच्या चोर्या यांचे प्रमाण वाढले आहेत. मात्र, येथील चोर पोलिसांच्या हातावर नेहमीच तुरी देऊन निसटतात हे पहायला मिळत आहे. आता गाड्याचोरी आणि चोर्या दरोडे टाकणार्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.