जे भाजप सोडून गेले त्यांच्यावर वैभव पिचड बरसले.! हे धडक प्रश्न उपस्थित होतात.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात सन 2019 साली एक नवा इतिहास रचला गेला. सन 1980 पासून शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेऊन स्वत:च्या अस्तित्वाचे ठसे उमटविणार्या माजी मंत्री मधुकर पिचड यांनी तब्बल 40 वर्षानंतर पुरोगामी विचारधारेला फाटा दिला आणि भाजपत प्रवेश केला. अर्थात त्यांचे सुपुत्र मा.आ. वैभव पिचड यांच्या पुढाकाराने हा पक्षबदल झाला असला तरी त्यांनी अनेक बड्या नेत्यांना विचारुन इतका मोठा निर्णय घेतला होता. म्हणून तर निवडणुकीपुर्वी आज जे काही ज्येष्ठ नेते त्यांना सोडून जात आहेत. ते त्यावेळी त्यांच्या सोबत होते. खरंतर वैभव पिचड यांना निवडून आणणे हे "प्रस्थापित राजकारणी व लाभार्थी" यांचे "उत्तरदायीत्व" होते. मात्र, तेव्हा जनतेच्या मनात विश्वास निर्माण करुन कौल घेण्यात प्रत्येकाला 'अपयश' आले आणि अर्धा लाख मतांनी भाऊंना पराभवाला सामोरे जावे लागले. हे अपयश आले हा जनतेचा कौल होता. मात्र, त्यांच्या पराभवानंतर जी ज्येष्ठांची फळी होती. किमान त्यांनी तरी पडत्या काळात पिचडांची साथ सोडायला नको होती. पण झाले ते भलतेच! सत्ता गेली, पद गेले आणि त्या पाठोपाठ नेते देखील गेले. म्हणजे येथे विचारधारा वैगरे काही नाही! तर केवळ हा पद आणि सत्ताचे मोह असेच म्हणावे लागले. असाच सुर आता भाजपच्या गोटातून येत गयारामांवर टिका होऊ लागली आहे.
अगदी काल परवा (दि.4) मा. आमदार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात कधी नव्हे! वैभव पिचड यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. "सुखात सारा गाव आणि दु:खातून चलेजाव!" अशीच स्थिती अकोले तालुक्यात पहायला मिळाली आहे. त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही. मात्र, नकळत ज्या मिनानाथ पांडे यांच्याशी मोठ्या साहेबांनी विश्वासाची आणि "जीवश्च-कंठश्च मैत्री" केली. गेली 40 वर्षे कधी त्यांना गाडीच्या खाली उतरु दिले नाही, इतकेच काय! राज्य शासनाचा "आदिवासी मित्र पुरस्कार" त्यांना दिला त्यांनी पडत्या काळात राष्ट्रवादी तर कधी काँग्रेसची वाट धरु पाहणे हे साहेबांसाठी फार "जिव्हारी" लागण्यासारखे आहे असे भाजप नेत्यांना वाटते. मात्र, भारतीय राज्यघटनेच्या "सार्वभौम"त्वाचा आदर करीत त्यांनी प्रत्येकाला "व्यक्तीस्वातंत्र्य" दिले. "जाणार्यांनी जावे, येणार्यांनी यावे" अशी भुमीका त्यांनी घेतली.
त्यापलिकडे, मधुकरराव नवले यांनी देखील भाजपशी आपली नाळ जुळत नाही अशी भुमीका घेत थेट काँग्रेसचा रस्ता धरला आहे. खरंतर नवले यांनी पुर्वीपासूनच एक 'री' ओढून धरली होती. भाजप मला मान्य नाही. मात्र, "व्यक्तीपरत्वे" विचार केला तर पिचड कुटूंबाचा माझ्या मनात यत्किंचितही रोष नाही. त्यांनी घेतलेला भाजपचा निर्णय यात माझा पुर्वापार सहभाग नसला तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर असा निर्णय झाल्याने "प्रवाहात वाहण्याची वेळ" आली होती. मुळातच मी कम्युनिष्ठ, पुरोगामी आणि काँग्रेस विचारधारेचा माणूस आहे. तर ज्या गोष्टी 'रक्तात' असतात त्या फार काळ माणूस दडपू शकत नाही. त्यामुळे, भाजप ही विचारधारा माझ्या मनाला कधी रूचली नाही ना रुचेल. आता अशी भूमिका नवले यांनी वारंवार स्पष्ट केलेली असली तरी वैभव पिचड यांनी त्यावर नकळत ताशेरे ओढले आहेत. यातील स्पष्ट 'सारांश' काढायचा ठरला तर त्यांना विचारधारा मान्य नव्हती तर ते निवडणुकीपुर्वीच का गेले नाही? असा प्रश्न उभा ठाकला जातो.
पुढे यापलिकडे, रमेशकाका देशमुख यांनी देखील विधानसभेला भाजपचे स्टेज शेअर केल्याचे तालुक्याने पाहिले आहे. खुलेआम वैभव पिचड यांच्या पाठीशी उभे राहत कोतुळ विभाग संभाळण्याचा प्रयत्न केला. आता कोणी कितीही "तुळशीपत्र" घेऊन राष्ट्रवादी आणि पवार साहेबांच्या नावाला अंघोळ घालत असले तरी डॉ. किरण लहामटे यांनी प्रत्येकाला अगदी खड्यासारखे बाजुला काढले आहे. याचे 'प्रमाण' द्यायचे झाले तर "पिंपळगाव खांडच्या धरणाचे भुमीपुजन" झाले ते आजही सर्वांना आठवत असेल. कारण, मानसे खूप काही विसरतात मात्र "इतिहास" कधीही काही विसरत नसतो. आज बी.जे देशमुख हे तालुक्यात सक्रिय झाल्यामुळे कारखान्याची गणिते जुळविण्यासाठी अनेकजण राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली ऐक येऊ लागले आहेत. म्हणजे स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी वाट्टेल तो "राजकीय स्टण्ट" आता अकोले तालुक्यात पहायला मिळत आहे.
खरंतर जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम पाटील गायकर व राष्ट्रवादी काँग्रेस झेडपीचे "गटनेते" कैलास वाकचौरे यांच्या राजकारणाला खरोखर दाद दिली पाहिजे. कारण, गायकर पाटील हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रतिनिधीत्व म्हणून "जिल्हा बँकेच्या" खर्चीवर विराजमान आहेत. ते जिल्हा पातळीवर राष्ट्रवादीशी संलग्न असतात तर ज्या पिचडांनी त्यांना जिल्ह्यात काम करण्याची संधी दिली त्यांनी भाजपत प्रवेश करुन देखील "तालुका पातळीवर" अगदी खुलेआम त्यांच्यासोबत सक्रियपणे काम करतात. तर दुसरीकडे कैलास वाकचौरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेडपीत आजही "गटनेते" आहेत. म्हणजे दादांचा किती विश्वास म्हणावा लागले. अर्थात या दोघांकडे राष्ट्रवादीच्या लोकनियुक्त आमदारांच्या नंतर लोकनियुक्त म्हणून विश्वासातील सर्वेच्च पदे आहेत. तरी देखील ते तालुक्यात आल्यानंतर ते वैभव पिचड यांच्याशी जुळलेली नाळ ते कधी सोडत नाही. एक "पक्ष" म्हणून नव्हे तर "व्यक्ती" म्हणून या दोन्ही नेत्यांनी राजकारणात एक "नवा पायंडा" पाडला आहे. अर्थात हे दोन्ही नेते "लाभार्थी" असले तरी अशा पद्धतीने एकीकडे राजकारण संभाळायचे, दुसरीकडे पद व तिसरीकडे मार्गदर्शनक नेत्यांची मैत्री जपायची. अर्थात हे वाटते तितके सोपे नाही. मात्र, त्यांना खरोखर मानले पाहिजे. एकीकडे राजकारणात लोक पदांसाठी सर्व काही हरपून जातात. मात्र, या दोन नेत्यांनी "साप तर मारलाच! मात्र, काठी देखील मोडू दिली नाही."
एकंदर स्पष्टच सांगायचे झाले तर, काल वैभव पिचड यांनी पक्ष जाऊद्या, पण त्यांची साथ सोडून जाणार्यांना तसेच कारखाना, झेडपी, नगरपंचायत यांचे "डोहाळे" लागलेल्यांना "अजेंड्यावर" घेत नामी प्रश्न उपस्थित केला आहे. ज्यांना आज भाजपची विचारधारा मान्य नाही. त्यांनी यापुर्वीच का काढता पाय घेतला नाही? आणि त्यांनी खरं सांगावं की, जर मी निवडून आलो असतो तर यांनी भाजपला नाकारलं असतं का? "पक्ष आणि विचारधारा" यांना आज का डोईजड वाटू लागली आहे? अर्थातच त्यांनी शब्दप्रयोग केला नाही. मात्र, हे सर्व "स्वार्थी" राजकारणी असल्याचे त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाल्याचे मत अनेक विश्लेषकांनी आता व्यक्त केले आहे.