अकोले हायवे म्हणजे मृत्युचा सापळा.! निकृष्ट कामे आणि मनमानी कारभार.! बोलेरो-ढंपरचा अपघात एक मयत दोन जखमी.!
सार्वभौम (इंदोरी) :-
अकोले तालुक्यातील कोल्हार - घोटी राज्य महामार्गावर इंदोरी फाट्याच्या नजिक मातोश्री लॉन्सच्या जवळ बोलेरो व ढंपरची समोरासमोर धडक झाली. यात बोलेरो मधील एक महिला ठार झाली, तर त्याच गाडीतील अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झालेल्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु असून हा अपघात संबंधित ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून आठवड्या दोन आठवड्याला माणसे मरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. जेथे कामे सुरु आहेत. तेथे लाल झेंडे, रात्रीच्यावेळी रेडीअय पट्ट्या, जेथे अपघाती क्षेत्र आहेत प्लॅस्टीक दुभाजक, दिशादर्शक फलक यांचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र, दुर्दैवाने ठेकेदाराने सर्व नियम ढाब्यावर बसविले असून या भोंगळ कारभारावर नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रुंभोडी येथील कांदा व्यापारी बाबु शेख यांचा मुलगा सोहेल हा आपल्या पत्नी व आई समवेत बोलेरोमधून अकोल्याहून आपल्या घराकडे रुंभोडी येथे चालले होते. त्याच वेळी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास निळवंडे धरणाकडून अकोल्याकडे काही साहित्य घेवून जाणारा ढंपर देखील भरधाव वेगाने चालला होता. यावेळी वाहन चालकांचा रस्त्याचा अंदाज चुकला आणि या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत सोहेल शेख, त्याची पत्नी मुस्कान शेख, आई जतिया शेख हे गंभीर जखमी झाले. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या व तेथील ग्रामस्थांनी थांबून अपघातग्रस्त वाहनांमधून जखमींना बाहेर काढले. दरम्यान, हा प्रकार काही व्यक्तींनी प्रत्यक्ष पाहिला असता अनेकांनी सामाजिक बांधिलकी बाळगत जे जखमी होते त्यांना तत्काळ रुग्णालयात रुग्ण वाहिकेतून अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, या दरम्यान मुस्कान शेख या महिलेचा मृत्यू झाला होता, तर सोहेल शेख व जतिया शेख यांना उपचारासाठी पुढे संगमनेरला हलविण्यात आले.
हा अपघात ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे झाला असल्याचे वास्तवदर्शी चित्र या ठिकाणी दिसून आले. या रस्त्याचे काम सुरु असल्याने संबंधित ठेकेदाराने एकाच बाजूचे डांबरीकरण केले असून सर्व वाहन चालक याच बाजूने जाण्यासाठी घाई गडबड करीत असतात. गेली कित्येक दिवसांपासून दुसर्या बाजूचे काम रेंगाळलेले असल्याने हा अपघात झाला असल्याचे स्थानिक नागरिक बोलत आहे. कोल्हार - घोटी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याने कामाच्या ठिकाणी कुठेही धोक्याचे अथवा सुचनेचे फलक संबंधित ठेकेदाराने लावलेले नाही. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी दगड ठेवूनच हे दगडच रस्ता सुरक्षिततेचे नियम दाखवित आहेत. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार याबाबत मुग गिळून गप्प असल्याने दगडच रस्ता सुरक्षिततेचे नियम वाहन चालकांना दाखवू लागले आहे. त्यामुळे या मृत्यूस संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकामचे अधिकारी हे जबाबदार असल्याने त्यांच्यावर पहिला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
खरंतर, हा महामार्ग होताना त्यात सगळा सावळा गोंधळ होताना दिसत आहे. राजूर ते वाकी या परिसरात आज रस्ता झाला आहे. मात्र, पावसाळ्यात याच रस्ताला पोट आल्याचे दिसून आले. कोठे खड्डे तर कोठे उतार, कोठे वळणं काढली नाहीत तर कोठे भर टाकली नाही. हा सर्व प्रकार उघड पाडण्यास लोकप्रतिनिधी का गप्प आहेत देव जाणे. मात्र काही ठिकाणी नागरिक मात्र जागरुक असल्याचे दिसते आहे.
खरंतर, एक साधं उदा. द्यायचे झाले तर, या ठेकेदारांनी सुगावच्या पुढील वळणावर अवघ्या दिड फुटावर खोदकाम करुन घोडीला घोडा लावण्याचे काम केले होते. तर कोणी पाहू नये म्हणून लगेच वरवर मुरुम टाकून भरती टाकली. मात्र हा प्रकार काही नागरिकांनी त्यांना विचारला असता ठेकेदारांनी वरवर उत्तरे दिली. त्यानंतर मात्र, प्रतिष्ठीत व्यक्तींनी त्यांचे कान धरले असता त्यांनी आपली चुक कबुल केली आणि दिड फुट एवजी तीन फुट खुल खोदून भरती असल्याची कबुली दिली. मग काय.! या जागरुक नागरिकांनी ते निकृष्ट दर्जाचे काम बंद पाडले आणि त्याला पुन्हा खोदकाम करायला लावले. तेव्हा कोठे दर्जेदार काम सुरु झाले आहे. त्यामुळे, अशा पद्धतीने नागरिकांनी सजग राहून कामे करुन घेतली पाहिजे. अन्यथा वर्षभरात गुढघ्याइतके खड्डे आणि आपले मनके ढिल्ले झाल्याशिवाय राहणार नाही.
तर, दुसरी गंमत अशी की, सुगाव फाट्याहून अगदी १०० पाऊली अंतरावर या ठेकेदारांनी इतिहासच रचलेला दिसला. म्हणजे, आज जो जुना रस्ता आहे. त्यापेक्षा नवा रस्ता छोटा केल्याचे स्थानिक नागरिक विकास वाकचौरे यांचेसह अनेकांनी निदर्शनास आणून दिले आहे. ही अशी कामे होत असतील तर त्या कामांचा उपयोग काय? म्हणजे तेथे जो पुल आहे. तो पुर्वीचा मोठा आहे, मात्र आज जो खोदला आहे तो त्यापेक्षा लहान आहे. म्हणजे यांना काही गुना ओळंबा, माप वैगरे ठरवून दिले आहे की नाही? की यांच्या मनाला वाटेल अशी कामे होणार आहे? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला असून हे काम सुगावकरांनी बंद पाडले आहे. एकंदर हा महामार्ग तयार होण्यापुर्वीच जीवघेणा ठरत असून बहुतांशी ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम होताना दिसत आहे. त्यामुळे, येणाऱ्या काळात जसे नाशिक-पुणे हायवे तयार करणार्या कंपनीसह ठेकेदारावर संगमनेरात गुन्हे दाखल झाले. अशीच परिस्थिती येणाऱ्या काळात तालुक्यात पहायला मिळाली तर आश्चर्य वाटू नये.